उत्तम आरोग्याचे तीन मुलमंत्र
उतम तब्येतीसाठी सद्गुरू तीन प्रमुख नियम पाळायला सांगतात.
#१ योग्य आहार
Sadhguru: जेव्हा अन्नाविषयी तुम्ही बोलत असता, तेव्हा तुम्हाला कोणते ठराविक अन्न किती सहज पचते आणि तुमच्या शरीराचा हिस्सा बनते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायला हवी. जर तुम्ही खाल्लेले तीन तासात पचले नाही, तर त्याचा अर्थ तुम्ही ते अन्न टाळायला तरी हवे किंवा कमी प्रमाणात खायला हवे. जर तेअन्न तीन तासाच्या आत तुमच्या शरीराबाहेर टाकले गेले तर त्याचा अर्थ, ते जरी उत्तम अन्न नसले तरी ते अन्न तुमचे शरीर सहज पचवू शकते.
जर तुम्ही भरल्या पोटी झोपायला गेलात तर पोटातील अवयवांवर दाब येतो. यामुळे अनेक प्रकारच्या तब्येतीच्या तक्रारी देखील उद्भवतात. जर तुम्ही दोन जेवणांमध्ये, अधे-मधे काहीही न खाता, ५ ते ६ तासांचे अंतर ठेवले, तर पेशींच्या स्तरापर्यंत शरीराची शुद्धी होते. निरोगी आयुष्याकरता शरीराची ही शुद्धी अत्यावश्यक असते. जर तुमचे वय ३० हून अधिक असेल तर दिवसातून दोनदा जेवणे तुम्हाला पुरेसे आहे - एक सकाळी आणि एक संध्याकाळी.
रात्रीच्या जेवणानंतर झोपायच्या आधी तीन तासांचे अंतर असायला हवे.आणि शिवाय त्यात निदान २० ते ३० मिनिटांचा हलक्या व्यायाम समाविष्टकेला...जसे की शत पावली घालणे...तर तुमचे शरीर जास्तीत जास्त निरोगी राहते. तुम्ही जर पोटात अन्न असताना झोपायला गेलात तर शरीर व्यवस्थेमध्ये एक प्रकारचे जडत्व निर्माण होते. शारीरिकदृष्ट्या हे जडत्व म्हणजे मृत्यूच्या दिशेने झपाट्याने केलेली वाटचाल होय. मृत्यू हे अंतिम जडत्व झाले.
जर तुम्ही भरल्या पोटी झोपायला गेलात तरपोटातील अवयवांवर दाब येतो. यामुळे अनेक प्रकारच्या तब्येतीच्या तक्रारी उदभवू शकतात. त्याकरता देखील झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही खाल्लेले अन्न पोटातून पुढे सरकणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही अवस्थेत झोपलात तरी पोटामुळे तुमच्या कोणत्याही अवयवांर दाब येता कामा नये.
#२ तुमच्या शरीराचा उपयोग करा.
शारीरिक हालचालींचा विचार करता एक सोपी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले शरीर पुढे-मागे वाकायला आणि दोन्ही बाजूला वळायला सक्षम आहे. कोणत्याही स्वरुपात किमान थोडी तरी हालचाल व्हायला हवी. या हालचाली करण्याकरता पारंपरिक पद्धतीने केलेला हठयोग हा सर्वात उत्तम मार्ग आहे आणि तो शास्त्र शुद्धदेखील आहे. जर पारंपरिक हठयोगाचा समावेश तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात आत्तापर्यंत केला नसेल तर तुम्ही दररोज पुढे-मागे झुकणे, शरीर दोन्ही बाजूंना वळणे आणि हात पुढे करून उठाबशा करणे असा व्यायाम करायला हवा, जेणेकरून तुमचा पाठीचा कणा ताणला जाईल. जर तुम्हाला तुमच्या सर्व व्यवस्था, मुख्यत्वे मज्जासंस्था, निरोगी ठेवायच्याअसतील तर हा व्यायाम प्रत्येकाने दररोज करणे गरजेचे आहे...अन्यथा मज्जासंस्था वाढत्या वयात त्रासदायक होऊ शकते..
#३ पुरेशी विश्रांती घ्या.... पण जास्त नको.
प्रत्येकाला किती विश्रांती पुरेशी असते, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. कोणत्या प्रकारचे आणि किती अन्न तुम्ही सेवन करता हा एक महत्वाचा निकष आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाऊन हे ठरवले पाहिजे की कोणते अन्न खाऊन तुम्हाला जड वाटते आणि कोणते अन्न खाऊन तुम्हाला हलके आणि उत्साही वाटते. जर तुमच्या आहारात तुम्ही ४०% प्रमाणात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करण्याची खबरदारी घेतलीत तर तुम्हाला अंगात हलकेपणा जाणवेल.
शरीराला विश्रांती हवी असते, झोपच हवी आहे असे नाही. विश्रांती घेण्याचा झोप हा एकच मार्ग आहे हा गैरसमज आहे. तुम्ही बसलात किंवा उभे राहिलात तरी तुम्ही विश्रांत अवस्थेत राहू शकता, किंवाअस्वस्थ राहू शकता किंवा सुस्तावलेले राहू शकता. जर तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आनंददायी विश्रांत अवस्थेत रहात असलात तर तुमची झोपेची गरज कमी होत जाते.
शरीराचे पाच कोष
योगामध्ये मानवी शरीरसंस्था पाच कोषांनी बनलेली आहे असे मानतात. मानवी शरीरसंस्थेचा प्रत्येक भाग, यात मनही आले, एक शरीर म्हणून पाहिले जाते आणि त्याच्यात बदल घडवण्यासाठी योग हे एक तंत्र आहे. शरीराचे ते पाच कोष म्हणजे अन्नमय कोष, मनोमयकोष, प्राणमयकोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष.
तुमचे दृश्य (भौतिक, हाडामासाचे) शरीर किंवा अन्नमय कोष म्हणजे तुम्ही खाल्लेले अन्न....थोडे की जास्त हा तुमचा पर्याय आहे, तरिही तो एक अन्नाचा ढिगारा आहे. जसे तुम्ही एक दृश्य शरीर बाहेरून जमा केले आहे, तसेच एक मानसिक शरीर आहे. मन म्हणजे शरीराचा एखादा अवयव नव्हे - शरीरातील प्रत्येक पेशीला स्वतःची स्मृती आणि बुद्धी आहे. या मानसिक शरीराला मनोमय कोष असे म्हणतात. दृश्य शरीर म्हणजे हार्डवेअर आणि मानसिक शरीर म्हणजे सॉफ्टवेअर.
जोवर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एखाद्या चांगल्या इलेक्ट्रिसिटीला जोडले जात नाहीत, तोवर फारसे काही करू शकत नाहीत. शरीराचा तिसरा कोष म्हणजे प्राणमय कोष किंवा ऊर्जा शरीर. दृश्य शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर हे तिन्ही सूक्ष्मतेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर पण एकाच शारीरिक क्षेत्रात मोडतात. रूपक द्यायचे झाले तर...दिवा म्हणजे दृश्य शरीर. पण तो दिवा जो प्रकाश देतो तो सुद्धा दृश्यच आहे. आणि त्यामागची विद्युतशक्ती पण दृश्यच आहे. दिवा, प्रकाश आणि विद्युतशक्ती सगळे काही दृश्य आहे. पण त्यांच्यात सूक्ष्म फरक आहे. तसेच दृश्य शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर हे सगळे दृश्यच आहे पण त्यांच्यात सूक्ष्म फरक आहे.
शरीराचा पुढचा कोष, ज्याला विज्ञानमय कोष म्हणतात, तो परिवर्तन करणारा असतो. तो शारीरिक अवस्थेचे रुपांतर अशारीरिक अवस्थेमध्ये करण्यास मदत करतो. त्याला कोणतेही शारीरिक गुणधर्म जोडले गेलेले नाहीत, पण म्हणून तो पूर्णपणे अशारीरिक देखील नाही. पाचवा कोष आहे आनंदमय कोष. ज्याला इंग्लिश मध्ये ‘ब्लिस बॉडी’ म्हणतात. याचा अर्थ तुमच्या आत आनंदाचा झरा आहे असे नाही. आम्ही त्याला ब्लिस बॉडी म्हणण्याचे कारण आमच्या अनुभवानुसार, आपण जेव्हा त्याला स्पर्श करतो तेव्हा आपण आनंदी होतो. आनंद हा त्याचा स्वभाव नाही. तो आपल्या करता आनंद निर्माण करतो. आनंदमय कोष हे सर्व शारीरिक गोष्टींचे स्त्रोत असणारे अशारीरिक परिमाण आहे.
जर तुम्ही दृश्य शरीर, मानसिक शरीर आणि उर्जा शरीर योग्य पातळीवर आणले आणि त्यात समतोल राखला तर तुम्हाला कोणताही शारीरिक अथवा मानसिक आजार होणार नाही.
मी तुम्हाला हजारो लाखो आजारातून बरे झालेले लोकं दाखवू शकेन, विशेष करून दीर्घ शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे झालेले - फक्त आवश्यक संतुलन साधल्याने. असंतुलनामुळे सर्व तऱ्हेचे आजार निर्माण होतात. जेव्हा शरीर स्वस्थ असते तेव्हा कसला आलाय आजार? जर तुम्ही शरीराचे पहिले तीन कोष एकाच पातळीवर आणलेत तर आनंदमय कोषाला स्पर्श करण्याचा मार्ग आणि शक्यता निर्माण होईल, जिथे आनंद ही अस्तित्वाची नैसर्गिक वृत्ती बनते. कोणत्याही एखाद्या विशिष्ट गोष्टीचाआनंद नव्हे, तर शुद्ध निव्वळ आनंद, जो आयुष्याचा स्वभावधर्म आहे.