सद्गुरु: अंबा निराशेपासून हताशपणाकडे, हताशपणापासून रागाकडे, रागापासून क्रोधाकडे, क्रोधापासून सूडाच्या तहानेपर्यंत गेली. भिष्माला ठार मारेल अशा व्यक्तीला शोधून काढण्यासाठी ती जागोजाग फिरली. पण भिष्माच्या पराक्रमामुळे कोणीही त्याच्याशी लढायला तयार नव्हते. आणखी एक बाब म्हणजे, जेव्हा भीष्माने कधीही लग्न न करण्याचे वचन दिले आणि स्वत:ला नपुंसक केले तेव्हा शंतनू म्हणाले होते, “तू आज माझ्यासाठी जे केलेस त्याबद्दल मी तुला आशीर्वाद देतो. मी १८ वर्षे ब्रह्मचारी आहे आणि तपस्या केली आहे. मी स्वत: हून मिळवलेली सर्व योग्यता, मी माझ्या अंत: करणात जी उर्जा निर्माण केली आहे, ती तुला देईन आणि आशीर्वाद देईन, की तुझ्या आयुष्यात तु तुझा मृत्यू निवडू शकतोस. तू केव्हा मरणार ते तू निवडू शकशील. "ह्या आशीर्वादामुळे आणि तो ज्या प्रकारचे योद्धा होता त्यामुळे, त्याच्याशी युद्ध करायला कोणीही तयार नव्हते.

भीष्म परशुरामाशी लढतो

मग अंबा परशुरामांच्या शोधात निघाली. परशुराम शस्त्रास्त्र प्रशिक्षण, विशेषत: तिरंदाजीसाठी भीष्माचे शिक्षक होते. जेव्हा तिने परशुरामांसमोर जाऊन नतमस्तक होऊन तिची दुर्दशा व्यक्त केली तेव्हा परशुराम म्हणाले, “काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी हे निश्चित करीन.” त्याने भीष्माला बोलावले. भीष्माने येऊन प्रणाम केला. परशुराम म्हणाले, “पुरे! आता तुझे व्रत पुरे कर. कृपा करून या बाईशी लग्न कर. ”भीष्म पहिल्यांदाच म्हणाला, “तुम्ही माझे गुरु आहात. जर तुम्ही मला माझे स्वत: चे डोके छाटण्यास सांगितले तर मी ते करेन परंतु माझे वचन मोडण्यास सांगु नका. मी घेतलेली प्रतिज्ञा मोडू शकत नाही.”

तुम्ही संपूर्ण कथेमध्ये पहाल, असे लोक आहेत जे प्रतिज्ञा करतात, आणि काहीही होवो - जीवन किंवा मृत्यू, कोणत्याही कारणाने काही फरक पडत नाही - त्यांना दिलेला शब्द पाळायचा असतो. असे का आहे, हा असा कालावधी आहे जेव्हा लोक पूर्णपणे असभ्य अस्तित्वातून संस्कृती आणण्याचा प्रयत्न करीत होते. या प्रयत्नात, माणसाचा शब्द सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तेथे कोणतेही संविधान किंवा दंड कोड लिहिलेले नाहीत. अशा स्थितीत माणसाचा शब्द ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. मी काही बोललो तर मी ते करतो आणि त्यासाठी मी कोणतीही किंमत मोजयला तयार आहे. कोणताही कायदा नसताना माणसाचा शब्द हा एकच नियम असतो.

पण परशुरामला अवज्ञेची सवय नाही. तो आज्ञाधारक आणि फक्त आज्ञाधारक आहे! जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या सर्व भावांचे आणि आईचे डोके उडवण्यास सांगितले तेव्हा जराही विचार न करता त्याने चारही जणांची डोकी कापून टाकली. त्याचे वडील त्याच्या आज्ञाधारकपणामुळे खूष झाले आणि म्हणाले, “वरदान माग. तुला काय हवे आहे? ” परशुराम म्हणाले, "माझी आई आणि माझे भाऊ पुन्हा जिवंत व्हावे अशी माझी इच्छा आहे." म्हणून वडिलांनी त्यांना परत जिवंत केले.

आज्ञाभंग ही एक गोष्ट आहे जी परशुराम स्वीकारू शकत नाही कारण ते तशा पद्धतीने मोठा झाले आहेत. जेव्हा त्यांनी पाहिले की भीष्म आज्ञा पाळायला तयार नाही, तेव्हा ते संतापले आणि त्या दोघांमधील द्वंद्वयुद्ध - असामान्य द्वंद्वयुद्ध सुरु झाले. पण परशुरामांनी स्वत:ला जे काही माहित होते ते सर्व भीष्माला शिकवले होते आणि त्याला पराजित करणे शक्य नाही असे त्यांच्या लक्षात आले. दोघेही दिवसेंदिवस एकमेकांशी कडवटपणे झुंजले पण कोणीही एक विजेता होऊ शकत नाही हे लक्षात येताच परशुरामांनी हात उंचावून अंबाला सांगितले, “तुला आणखी कोणी तरी शोधावे लागेल.”

कार्तिकेयाचा हस्तक्षेप

अंबा हिमालयीन प्रदेशात निघून गेली आणि गहन तपस्येमध्ये गेली. ती बर्फाच्छादित शिखरावर बसली आणि महान योद्धा असलेल्या शिवपुत्र कार्तिकेयाच्या धावा करत साधनेच्या खोल अवस्थेत गेली. तिच्या मनात, तिला वाटले की कार्तिकेय ही अशी व्यक्ती असेल जी भीष्माला मारू शकेल. तिच्या तपस्येवर खूष झालेला कार्तिकेय हजर झाला आणि जेव्हा तिने “तू भीष्माला मारले पाहिजे” असे सांगितले तेव्हा त्याने उत्तर दिले, “हत्या करण्याची माझी वेळ निघून गेली आहे.”

आपल्याला हे कदाचित माहित नसेल, कार्तिकेय दक्षिण दिशेला आला आणि न्यायाच्या शोधात त्याने अन्याय म्हणून पाहिलेली प्रत्येक गोष्ट कत्तल केली. तो कर्नाटकातील सुब्रमण्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी आला. शेवटच्या वेळी त्याने आपली तलवार तिथल्या पाण्यात धुतली आणि म्हणाला, “ही तलवार आता कधीही रक्त पाहणार नाही.” त्याने हिंसा सोडली आणि डोंगरावर चढला, ज्याला आज कुमार पर्वत म्हणून ओळखले जातो, आणि आपला देह त्याने तिथे सोडला. त्याच्या विदेही अवस्थेत, जेव्हा अंबाने त्याला बोलावले तेव्हा तो म्हणाला, "मी भीष्माला मारू शकत नाही परंतु तुमची दुर्दशा आणि तुमची भक्ती पाहून मी तुम्हाला आशीर्वाद देईन." त्याने तिला कमळांचा हार घातला आणि म्हणाला, “ही माला घे. जो कोणी ही माला धारण करील तो भीष्माला मारेल.”

महाभारत भाग ९: बदला घेण्यासाठी तहानलेली अंबा

आता, मोठ्या आशेने, पुन्हा एकदा अंबा हातात तो पुष्पहार घेऊन गेली - या माला तिच्यासाठी नेहमीच आपत्ती घेऊन आल्या. तिने प्रथम पुष्पहार घेतला तेव्हा काहीतरी वेगळंच घडलं. पुन्हा एकदा तिने कमळाच्या फुलांचा हार घेतला - आणि ती खेड्यातून, गावातून फिरत राहिली, “हा पुष्पहार घालून भीष्माला मारण्यास कोणी तयार आहे का?” पण कोणीही त्याला स्पर्श करण्यास तयार नव्हते.

पुष्पहार घेऊन तिचा प्रवास चालूच राहिला आणि ती पांचाल नगरीचा राजा द्रुपद राजाच्या दरबारात आली, जे भारतवर्षातील दुसर्‍या क्रमांकाचं साम्राज्य होतं. पण द्रुपदला अंबाजवळ जायचेही नव्हते कारण आतापर्यंत अंबाची प्रतिष्ठा सगळीकडे पसरली होती. एका भूताप्रमाणे, ती भीष्माच्या रक्तासाठी तहानलेली, खेड्या- खेड्यातुन, गावागावातून फिरत होती. जेव्हा द्रुपदने तिला भेटण्यास नकार दिला तेव्हा संपूर्ण निराश होऊन तिने कमळांची माला द्रुपदच्या राजवाड्यातील एका स्तंभात लटकविली आणि पुन्हा उजाड आणि उदास होऊन सरळ हिमालयात निघून गेली. ही कमळांची फुले तशीच ताजी राहिली आणि द्रुपदाला या मालेची इतका भीती वाटली की, त्याने कोणालाही तिला स्पर्श करु दिला नाही. दररोज त्यांनी दिवे लावले व पुष्पहाराची पूजा केली परंतु कोणीही त्याला स्पर्श केला नाही, कुणालाही याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते.

शिवांचे वरदान

अंबाने हिमालयातला आपला प्रवास सुरू ठेवला. ती तिथे प्रचंड तप करत बसली. हळूहळू, त्या तरूण स्त्रीचे सुंदर शरीर फक्त हाडांपुरते उरले. ती तिथेच बसली, केवळ हाडे आणि कातद्याचा सांगाडा बनून आणि ती शिवाला पुकारत राहिली. शिव स्वतः प्रकट झाले. ती म्हणाली, “तुम्ही भीष्माला मारलेच पाहिजे.” शिवाने उत्तर दिले, “भिष्माला तूच ठार मारणे अधिक योग्य नाही काय? माझ्याऐवजी तू त्याला मारलेस तर सूड घेतलयाचा आनंद तूला मिळेल ”अचानक तिचे डोळे उजळले आणि ती म्हणाली," हे कसे शक्य आहे? मी एक स्त्री आहे आणि तो एक महान योद्धा आहे, मी त्याला कसा मारणार? ” शिवाने उत्तर दिले, “मी तुला आशीर्वाद देतो तुझ्या पुढच्या जन्मात तू त्याचा वध करशील.” मग अंबा म्हणाली, “पण पुढच्या जन्मात मला हे सर्व आठवणार नाही. त्यामुळे बदलाची गोडी मला कळणार नाही. ” शिव म्हणाले, “काळजी करू नकोस . तुला आठवण राहील याची खात्री मी देतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला सगळं आठवेल. तुला सूडाची गोडी कळेल. जे काही तू सहन केलेस त्याबदल्यात तुला तुझा सूड मिळेल. ” मग ती तेथे बसली आणि नंतर परत येण्यासाठी आपल्या शरीराचा तिने त्याग केला.