चोरावर मात कशी कराल?.... एक झेन कथा
एक भुरटा चोर अनेकदा रंगेहात पकडला जात असे. त्याच्याशी कसे वागायचे? खालील दोन गोष्टींमधून आपल्याला शिक्षा, दया आणि मानवी स्वभावाविषयी बोध घेता येतो.
एक गरीब, भुकेला माणूस भुरट्या चोऱ्या करू लागला. एकदा तो तुरुंगात गेला. त्याने तिथून पळून जाण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तो दर वेळेस पकडला गेला आणि त्याची शिक्षा वाढत गेली. शेवटी एकदा बऱ्याच वर्षांनी त्याची सुटका झाली.
थंडी आणि भुकेने तो कासावीस झाला होता. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि एकावेळच्या जेवणाची सोय करण्या पुरता देखील कोणताही मार्ग नव्हता. कोणीही या गुन्हेगारावर विश्वास ठेवायला, त्याला काम द्यायला तयार नव्हता. तो अनेक ठिकाणी फिरला, पण तो जिथे जिथे गेला, तिथे तिथे लोकांनी त्याला हाकलून लावले. एका खेडेगावात लोकांकडून मार खाल्ल्यानंतर त्याला एका पाद्र्याच्या घरी आसरा मिळाला.
तो पाद्री त्याचे इतक्या प्रेमाने स्वागत करेल असे त्याला अजिबात वाटले नव्हते. “हे देवाचे घर आहे. कोणी गुन्हेगार असो वा पापी, जे कोणी इथे आसरा मागायला येईल ते देवाचे लेकरू आहे” असे म्हणत पाद्र्याने त्याचे सांत्वन केले, त्याला खायला अन्न दिले, घालायला कपडे दिले आणि राहायला जागा दिली.
त्याने पोटभर जेवण केले, झोपला आणि मध्यरात्र होताच मोठ्या जोमाने उठला. त्याची दृष्टी त्या खोलीतील चांदीच्या वस्तूंवर गेली. चोरीच्या प्रबळ उर्मीने, ज्याने त्याला खायला घातले त्याच्याविषयी थोडासुद्धा विचार न करता, त्याने त्या चांदीच्या वस्तू घेऊन पळ काढला.
गावात फिरत असताना, त्याच्याकडे चांदीच्या वस्तू पाहून काही गावकऱ्यांना त्याच्याबद्दल शंका आली. पोलिसांनी त्याला पकडून त्याची चौकशी केली. त्याची उत्तरे समाधानकारक न वाटल्याने त्यांनी त्याला पाद्र्याच्या घरी नेले. “याने तुमच्या चांदीच्या वस्तू चोरल्या आहेत अशी आम्हाला शंका आहे. या तुमच्या आहेत का, हे बघून सांगता का?” पोलिसांनी पाद्र्याला विचारले.
आता चोरी पकडली जाणार आणि आपल्याला पुन्हा अनेक वर्षे गजाआड काढावी लागणार या विचाराने तो माणूस घाबरला.
पण पाद्र्याचा चेहरा करुणेने भरलेला होता. तो म्हणाला,” अरे मित्रा, मी तुला या वस्तूंबरोबर चांदीच्या मेणबत्या देखील दिल्या होत्या. त्या तू न्यायला विसरलास का?” असे म्हणत त्याने त्या मेणबत्त्या त्याला दिल्या. “माफ करा, आम्हाला वाटले हा चोरीचा माल आहे” पोलीस म्हणाले. पाद्र्याच्या करुणेने भारावून गेलेल्या त्या माणसाला पोलिसांनी सोडून दिले आणि ते निघून गेले. ( ही “ले मिजरेबल” मधील कथा आहे.)
यासारखीच एक गोष्ट झेन परंपरेमध्ये आहे, ज्यामुळे पाश्चिमात्य कथाकारांना स्फूर्ती मिळाली असावी. त्यातूनही असाच संदेश
दिला आहे:
एकदा एका झेन गुरूंना त्यांच्या शिष्यांमध्ये चलबिचल झालेली दिसली, म्हणून चौकशी केली.
“त्याने परत चोरी केली” शिष्य म्हणाले आणि त्यांनी एका शिष्याला गुरूंच्या पुढ्यात उभे केले. गुरु म्हणाले “त्याला माफ करा.”
“अजिबात नाही. तुमच्या सांगण्यावरून आम्ही त्याला अनेकदा माफ केले आहे. आता जर तुम्ही त्याला हाकलून दिले नाहीत, तर आम्ही सगळे तुम्हाला सोडून जाऊ” शिष्यांनी ठणकावले.
“तुम्ही सगळे जरी सोडून गेलात तरी मला त्याला हाकलून द्यावेसे वाटत नाही” गुरूंनी सांगितले.
गुन्हा केलेल्या शिष्याने गुरूंच्या पायावर लोळण घातली आणि तो धाय मोकलून रडू लागला.
सद्गुरूंचे स्पष्टीकरण
सद्गुरू: माणसाच्या अंगात कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगायची ताकद असू शकते, पण अतीव दयाभावनेला तो शरण जातो. शिक्षा माणसांना दगडाप्रमाणे कठोर बनविते पण तर्कातीत करुणा त्याला विरघळून टाकते.तुम्ही जसजसे एखाद्याबरोबर कठोर होत जाता, तसतशी त्या माणसात शिक्षा सहन करण्याची ताकद येते. फक्त दयाबुद्धीने त्याला पाझर फुटतो. अध्यात्मिक गुरु कोणालाही तो या क्षणी कसा आहे त्यावरून त्याला पारखत नाही. एखादा माणूस जेव्हा नारळाचे झाड लावतो, तो फळ लागले नाही म्हणून चवथ्याच आठवड्यात ते झाड उखडून टाकत नाही. तसेच गुरु प्रत्येक शिष्याची क्षमता ओळखतो आणि ती पूर्णपणे कशी विकसित करायची याकडे लक्ष देतो. केवळ आत्ता या क्षणी त्याच्या मध्ये आवश्यक ते गुण नाहीत म्हणून, गुरु कोणाकडेही दुर्लक्ष करत नाही.
स्वतःला जे शिष्य समजतात त्यांनी प्रत्येक संधीचा उपयोग विकासासाठी आणि परिवर्तनासाठी करण्याची तयारी दाखवली पाहिजे. विशेषतः प्रतिकूल परिस्थिती ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची उत्तम संधी असते. त्या ऐवजी, ते जर गुरूलाच अमुक कर, तमुक कर म्हणू लागले तर त्याचा अर्थ त्यांना फक्त स्वतःचा अधिकार गाजवायचा आहे. त्यांना कोणतेही परिवर्तन नको आहे. अशी लोकं शिष्य म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांच्यावर वेळ घालवण्यापेक्षा त्यांना जाऊ देणेच श्रेयस्कर.
Editor’s Note: Sadhguru offers Isha Kriya, a free, online guided meditation that helps bring health and wellbeing. Daily practice of this simple yet effective 12-minute process can transform one's life. Try Isha Kriya today!