मुळात योग प्रक्रियाच मनाच्या बंधनांच्या पलीकडे घेऊन जाणारी आहे. जोपर्यंत तुम्ही मनाच्या प्रभावाखाली असता, तोपर्यंत तुमच्यावर भूतकाळाचे वर्चस्व असते, कारण मन म्हणजे फक्त गत स्मृतींची साठवण होय. जर तुम्ही फक्त मनाच्या माध्यमातून आयुष्याकडे पहात असाल, तर तुमचा भविष्यकाळही भूतकाळा सारखाच असेल. त्याहून ना कमी ना जास्त. हे जग त्याचे पुरेसे उदाहरण नाही का? आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर कितीही गोष्टींमुळे कोणत्याही  सोई, सुविधा, संधी चालून आल्या तरी आपण इतिहासाचीच पुनरावृत्ती करतो आहोत की नाही?

भूतकाळ हा तर अस्तित्वातच नाही. पण तुम्ही त्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीशी ती अस्तित्वात असल्यासारखे वागत असता. हेच खरं भ्रमजाळ आहे आणि मन हा त्याचा पाया आहे.

तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडताना दिसतील, कारण जोपर्यंत तुम्ही मनाच्या प्रभावानुसार आयुष्य जगत असता,तोपर्यंत तुम्ही फक्त जुन्या माहितीच्या आधारे आयुष्य जगत असता. भूतकाळ फक्त तुमच्या मनात असतो. तुमचे मन जागे आहे, म्हणून भूतकाळ अस्तित्वात आहे. समजा, या क्षणी तुमच्या मनाचे अस्तित्व नाहीसे झाले तर तुमचा भूतकाळ अस्तित्वात असेल का? नाही. आता तिथे भूतकाळ नाही, फक्त वर्तमानकाळ आहे. वास्तवामध्ये फक्त वर्तमानकाळ असतो. पण आपल्या मनात भूतकाळ जिवंत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर मन म्हणजे तुमचे कर्म. तुम्ही मनाच्या पलीकडे गेलात तर तुम्ही कर्माची बंधने पार करून जाता. जर तुम्ही ती एक एक करत सोडवत बसलात तर त्याला लाखो वर्ष लागतील. आणि त्या प्रक्रीये दरम्यान तुम्ही अजून कर्मे तयार करत रहाल, ते वेगळेच.

तुमच्या जुन्या कर्मांची काहीच अडचण नाहीये. तुम्ही नवीन कर्मांचा साठा निर्माण करणे कसे टाळता येईल ते शिकायला हवे. ते जास्त महत्वाचे आहे. पूर्वकर्मे आपोआप निघून जातील. त्याकरता विशेष काही करायची गरज नाही. पण नवीन कर्मांचा साठा तयार न करायला शिकणे आवश्यक आहे. ते जमल्यावर पूर्वकर्म सोडून देणे खूप सोपे आहे.

तुम्ही मनाच्या पलीकडे गेलात की तुम्ही कर्म बंधनातूनही पूर्णपणे मुक्त होता. त्याकरता तुम्हाला विशेष काही करायची गरज नसते. कारण जेव्हा तुम्ही कर्म करत असता तेव्हा तुम्ही अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टीबद्दल विचार करत असता. हा मनाचा खेळ आहे. भूतकाळ हा तर अस्तित्वातच नाही. पण तुम्ही त्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीशी ती अस्तित्वात असल्यासारखे वागत असता. हेच खरं भ्रमजाळ आहे आणि मन हा त्याचा पाया आहे. जर तुम्ही मनाच्या पलीकडे गेलात तर तुम्ही एका झटक्यात यासगळ्या पसाऱ्याच्या पलीकडे जाल.

अध्यात्म शास्त्राचा मूळ उद्देश हा नेहमीच मनाच्या पलीकडे कसे जाता येईल, मनाच्या बंधनांच्या पलीकडे जावून आयुष्याकडे कसे पाहता येईल हे शोधण्याचा आहे. अनेकांनी वेगवगळ्या पद्धतीने योगाची व्याख्या केली आहे. काही म्हणतात, “ तुम्ही विश्वाशी एकरूप झालात तर तो योग आहे”, “तुम्ही स्वताच्या अस्तित्वाच्या पलीकडे गेलात तर तो योग आहे”, “तुम्ही भौतिक जगात गुंतला नाहीत  तर तो योग आहे”. या सगळ्या व्याख्या बरोबर आहेत, मुळीच चुकीच्या नाहीत. पण त्या तुमच्या अनुभवाशी मिळत्या-जुळत्या नाहीत. कोणीतरी म्हटले आहे ,” तुम्ही जर देवाशी एकरूप झालात तर त्याला योग समजावे.” पण तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोठे आहात? तुम्हाला माहीत नाही देव कोठे आहे? मग त्याच्याशी एकरूप कसे होणार?

पण पतंजलीनी असे स्पष्टपणे सांगितले आहे की “मनाच्या घडामोडींच्या पलीकडे जाण्याकरता जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या घडामोडी पूर्णपणे थांबवता; तुम्ही तुमच्या मनाचा हिस्सा बनणे बंद करता, त्याला योग म्हणतात”. मनाच्या माध्यमातूनच जगातील सर्व गोष्टींचा तुमच्यावर प्रभाव पडत असतो. जर तुम्ही पूर्णपणे जागरूक राहून मनाच्या प्रभावाबाहेर पडलात तर तुम्ही नैसर्गिकरित्या सगळ्याशी एकरूप होता.

तुम्ही आणि मी वेगळे आहोत, वेळ आणि अवकाश वेगळे आहे हा विचार फक्त मनामुळे अस्तित्वात आहे. हे मनाचे  बंध आहेत. तुम्ही मन संपुष्टात आणले तर वेळ आणि अवकाश संपुष्टात येईल. कोणतीही अमुक अथवा तमुक गोष्ट अस्तित्वात नसते. कोणतीही गोष्ट इकडे अथवा तिकडे नसते. कोणतीही गोष्ट आत्ता अथवा नंतर अशी नसते. प्रत्येक गोष्ट फक्त इथे, आत्ता, केवळ ह्याच क्षणात असते.

तुम्ही मनातील सर्व बदलांच्या आणि अभिव्यक्तीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकलात तर तुमच्या मनाचा तुम्ही हवा तसा  उपयोग करू शकाल. तुम्ही तुमचे मन तुमच्या आयुष्यावर विध्वंसक परिणाम करण्याकरता देखील वापरू शकाल. पण जर तुम्ही मनामध्ये गुंतलेले असाल तर तुम्हाला तुमच्या मनाचे खरे स्वरूप कधीच लक्षात येणार नाही.

This is an excerpt from Isha’s latest book “Mind Is Your Business,” available for purchase and download at Isha Downloads.

Editor’s Note: Excerpted from Sadhguru’s discourse at the Isha Hatha Yoga School’s 21-week Hatha Yoga Teacher Training program. The program offers an unparalleled opportunity to acquire a profound understanding of the yogic system and the proficiency to teach Hatha Yoga. The next 21-week session begins on July 16 to Dec 11, 2019. For more information, visit www.ishahathayoga.com or mail info@ishahatayoga.com