प्रश्नः नमस्कार, सद्गुरू. कृष्णाने ज्ञानोदयापूर्वी काही साधना केली होती का? या आयुष्यात त्याला अशी अवस्था कशी प्राप्त झाली?

सद्गुरु: मनुष्यासाठी दररोज आनंदात आणि प्रेमाने जगणे ही एक प्रचंड साधना आहे. बहुतेक लोक तेव्हाच हसतात जेव्हा कोणीतरी आजूबाजूला असतं, परंतु जेव्हा ते एकटे असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाहिले तर त्यांचा उदास चेहरा सर्व काही सांगून जातो. 

लोकांमध्ये मिसळणे हे एखाद्या सणासारखे आहे, परंतु असणं हे नेहमीच एकटेपणात असतं. आयुष्यातील प्रत्येक क्षणी प्रेमळ असणं - केवळ एखादी विशिष्ट परिस्थिती उद्भवली किंवा एखादी व्यक्ती दिसली तरच नाही - जर तुम्ही फक्त प्रेमळ असाल, कुठलाही भेदभाव न करता, तर तुमची बुद्धिमत्ता पूर्णपणे वेगळ्या प्रकारे फुलते. प्रेमळ असणे ही दुसऱ्याला दिलेली भेट नाहीये. ही तुमच्या स्वतःची प्रसन्नता आहे - तुमच्या भावना, मन आणि शरीर स्वाभाविकपणे प्रसन्न बनतात. आणि आज हे सिद्ध करण्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे आहेत की जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हाच तुमची बुद्धी उत्तम प्रकारे कार्य करते.

तुम्ही पाहाल, की जर आरामाच्या स्थितीत असताना तुमचं हृदय मिनिटाला ६० वेळा धडधडत असेल, तर तुमच्या अस्तित्वाचे सूर या पृथ्वीशी पूर्णपणे जुळलेले असतील. तुम्ही सूर्यनमस्कार आणि शांभवी महामुद्रा यांसारख्या काही सोप्या यौगिक पद्धती सुमारे १८ महिने केल्या, तर ते ६० असेल – तुमचे सूर जुळलेले असतील. जेव्हा तुमचे सूर जुळतात तेव्हा आनंदी राहणे स्वाभाविक असते कारण मानवी प्रणालीची रचना अशाच प्रकारे केली आहे. ती फुलून येण्यासाठीच बनली आहे.

वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत कृष्णाची साधना हीच होती - तो त्याच्या सभोवतालच्या जीवनाशी पूर्णपणे सुसंगत होता. त्याने लोणी चोरले आणि सर्व प्रकारच्या खोड्या काढल्या तरीही प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करत होता  याचा अर्थ असा की तो कसातरी सर्वांना स्वतःशी जुळवून घेत होता. त्यानंतर, १६व्या वर्षी, त्याचे गुरू, सांदीपनी यांनी त्याला आठवण करून दिली की त्याच्या जीवनाचा एक मोठा उद्देश आहे. कृष्णाने हे ऐकल्यावर त्याच्या आत खूप संघर्ष झाला. गोवर्धन टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका छोट्या टेकडीवर जाऊन तो उभा राहिला. जेव्हा तो परत खाली आला तेव्हा तो पूर्वीसारखा मुलगा राहिला नव्हता. लोकांना कळून चुकले की काहीतरी विलक्षण घडले आहे आणि त्यांना हे देखील कळले की ते त्याला गमावणार आहेत. जेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो अजूनही त्यांच्याकडे पाहून हसत होता, पण त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हते, एक दूरदृष्टी होती.

या आठवणीनंतर, कृष्णाने सर्वप्रथम कंसाच्या अत्याचाराचा अंत केला. मग तो बलरामासोबत सांदीपनीच्या आश्रमात परतला आणि २२ वर्षांचा होईपर्यंत प्रखर आध्यात्मिक साधना करत ब्रह्मचारीचे जीवन जगला. इथे कृष्णाची साधना वेगळ्या प्रकारची होती. सांदीपानींनी ती अशा प्रकारे तयार केली की ती मोठ्या प्रमाणात अंतर्गत स्वरुपाची होती. कृष्ण सत्ययुगातील असल्याप्रमाणे जगला आणि वागला म्हणून सर्व काही त्याच्यासाठी मानसिक पातळीवर घडले. संदीपनींना सूचना देण्यासाठी तोंड उघडण्याची गरज नव्हती. सर्व काही मानसिकरित्या सांगण्यात आले; सर्व काही मानसिकरित्या आत्मसात केले गेले; सर्व काही मानसिकरित्या प्राप्त झाले. आणि त्याने ते आपल्या आयुष्यात लाखो वेगवेगळ्या प्रकारे दाखवून दिले.