अमेरिकन चिकित्सक, बिल आणि हिलरी क्लिंटनचे वैद्यकीय सल्लागार आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये सर्वाधिक खप असणारे लेखक मार्क हायमन यांनी जागतिक शांती दिन, 2014 रोजी सद्गुरूंसोबत स्वास्थ्य आणि आरोग्यासंबंधित विषयांवर संवाद साधला.

मार्क हायमन: जागतिक शांततेसाठी सर्वात मोठा धोका आणि त्यावर उपाय काय आहे यावर विचार करत असताना मला असे जाणवले की याचं साधं उत्तर तुमच्या खिशात बसू शकतं. आणि जर आपण ते योग्य पद्धतीनं वापरलं तर या एका गोष्टीने आपण जगभर वाढत असलेल्या दीर्घकालीन आजारांवर उपचार करू शकतो. योग्य जीवनशैलीने टाळता येणाऱ्या रोगांमुळे वर्षाला पाच कोटींपेक्षा अधिक लोक मरण पावतात, तर दोन कोटी लोक संसर्गजन्य रोगांमुळे.

पुढील 20 वर्षांमध्ये 47 ट्रिलियन डॉलर्स - जे एकत्रित सहा सर्वात मोठ्या राष्ट्रांच्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा जास्त आहे - अशी भयंकर किंमत मोजायला लावणाऱ्या जागतिक आर्थिक विकासासाठीच हा एकमेव सर्वात मोठा धोका नाही. यामुळे आपल्या महासागरांना, आपल्या मातीला आणि आपल्या वातावरणालासुद्धा धोका आहे. हवामान बदल, राजकीय अस्थिरता आणि जगभरातील आपल्या लोकसंख्येची प्रत्यक्षात काळजी घेण्याच्या क्षमतेचा अभाव, यासाठी हे सर्वांत अधिक जबाबदार आहे. आणि तरीही, जर आपण केवळ या एका गोष्टीचा योग्य वापर केला तर या सर्व समस्या सोडवण्याची क्षमता आपल्याकडे आहे.

ही वस्तू काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ती माझ्या खिशात आहे. तो एक चमचा (काटा) आहे. कारण आपण आपल्या चमच्यात शेवटी काय ठेवतो ही गोष्ट आपल्या जगाबद्दल सर्व काही ठरवते. हीच गोष्ट ठरवते की आपल्या आरोग्याचे काय होणार आहे, ज्या भूमीवर आपण आपले अन्न पिकवतो, ज्या हवेमध्ये आपण श्वास घेतो आणि जे पाणी आपण पितो यामध्ये काय होणार आहे. ही गोष्ट जगभरातील सरकार आणि समाजांची स्थिरता किंवा अस्थिरता देखील ठरवते. जेव्हा आपण जागतिक शांततेच्या धोक्यांविषयी बोलतो, तेव्हा आम्ही फक्त आईसिस आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेबद्दल बोलतो, जे नक्कीच वास्तविक आणि महत्त्वाचे आहेच पण तरीही ही एक गोष्ट अशी आहे ज्याबद्दल कोणीही बोलत नाही.

आज मानवजातीला भेडसावत असलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे एक निरोगी जग कसे निर्माण करावे? कारण निरोगी जग हे शांत जग आहे. एक जग जेथे आपण आजारी आणि लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत असलो, आणि रोगामुळे आणि त्या रोगांच्या खर्चामुळे दबलेले असलो, तर ते एक अस्थिर, असुरक्षित आणि अशांत जग असणार आहे. तर, आज आपण यांपैकी काही मुद्द्यांविषयी बोलणार आहोत. आशा आहे की आपल्याला योग्य दृष्टिकोन आणि काही उपाय देखील मिळतील.

आर्थिक समस्या आणि आरोग्याचे प्रश्न एकमेकांशी जोडलेले आहेत आणि आपण आपल्या समाजात हा वाढता आर्थिक भार पाहात आहोत. या वर्षी युनायटेड स्टेट्स 2.8 ट्रिलियन डॉलर्स आरोग्यसेवेवर खर्च करत आहे , जे अर्थव्यवस्थेच्या सुमारे 16% आहे आणि त्यातील 84% मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणाशी संबंधित आणि चुकीच्या जीवनशैलीने उद्भवणाऱ्या आजारांसाठी आहे. आणि तरीही, आमची आरोग्य सेवा प्रणाली त्यावर लक्ष देत नाही, कारण असे दिसते की उपाय डॉक्टरांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे - तो आपल्या स्वतःच्या हातात, आपल्या अंतःकरणात आणि आपल्या स्वतःच्या मनात आहे. तर, एक प्रश्न असा आहे, की आपण हे आपल्या हातात घेण्यासाठी अधिक समर्थ कसे होऊ शकतो? मला याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडेल.

सद्गुरु: आज जागतिक शांती दिन असल्याने, अन्नाबद्दल शांती आणि हिंसेच्या संदर्भाने बोलू. मुळात, आपण आपल्या शरीराला हिंसकपणे हाताळतो, आपण हिंसकपणे जगतो, आणि मग आपण जगात शांती असण्याचे अपेक्षित जातो. मनुष्यांना वगळता जग अगदी शांतीपूर्ण आहे. आपण या पृथ्वीवर ज्या प्रकारे जगतो, त्यानेच हिंसा निर्माण होत. जसे मार्क यांनी म्हटले, या धरतीवर लढाया आणि युद्धांसारख्या अगदी हिंसक आणि क्रूर परिस्थिती आहेत. त्यांना हाताळणे गरजेचे आहे - त्याबाबत शंका नाही - आपण ज्या दैनंदिन हिंसेसोबत जगतो, त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

दर वर्षी, आपण ५३ अब्ज भूचर प्राणी आणि १० कोटीहून अधिक समुद्री जीव मारत आहोत. जेव्हा आपण इतकी हिंसा करत आहोत, तेव्हा आपण स्वस्थ आणि शांतीपूर्ण असणे शक्य नाही. केवळ आपण खात असलेल्या अन्नाची गुणवत्ता नाही, तर आपण ते कसे खातो, किती बेदरकारपणे खातो किंवा किती जागरूकपणे खातो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काय खावे याबद्दल पुष्कळ चर्चा होत असली तरी अन्न कसे खावे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी काहीच मार्गदर्शन किंवा प्रयत्न होत नाही. मी आत्ताच कुठेतरी वाचले की २०% अमेरिकी लोकांचे जेवण कार मध्ये होते.

पूर्वेमध्ये परंपरेनुसार, आपल्याला नेहमी आपल्या शरीरात अन्न जात असताना कसे असावे ते शिकवले जाते. तुम्ही कुठल्या अवस्थेत आले पाहिजे, कुठल्या आसनात बसले पाहिजे, मनामध्ये कुठला भाव असला पाहिजे - या गोष्टींना पूर्वेमध्ये खूप महत्त्व होते. आता २० % जेवण लोक कार मध्ये ग्रहण करत आहेत, आणि कदाचित आणखी २०% बार मध्ये घेत आहेत. मला ठाऊक नाही, किती लोक टेबलावर बसून जाणीवपूर्वक पद्धतीने, अन्नाकडे आणि त्यांच्यासोबत जेवणाऱ्या लोकांकडे ठराविक प्रमाणात लक्ष देऊन जेवण करतात. मला वाटते की जेवणामध्ये काय घटक असले पाहिजे याबद्दल जगामध्ये पुरेसे ज्ञान आहे, पण तरीही, काही वरवरचे बदल सोडले तर बहुतेक लोक अजूनही आवश्यक बदल करायचे बाकी आहेत.

जरी तुम्ही काय खाता याने मोठा प्रभाव पडत असला, तरी तुम्ही ते कसे खाता हे तितकेच महत्त्वाचे आहे.

जरी तुम्ही काय खाता याने मोठा प्रभाव पडत असला, तरी तुम्ही ते कसे खाता हे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादा प्राणी खात आहात, एखादी भाजी किंवा इतर काही - मूळात अन्न ही एक सजीव गोष्ट आहे. जे सजीव जीवन होते, ते स्वतःला अर्पण करून तुमचा एक भाग होत आहे. एक जीवन दुसऱ्यामध्ये रूपांतरित होत आहे - याच प्रक्रियेला आपण 'खाणे' म्हणतो. हे काही केवळ पचन नाही - एक जीवन दुसऱ्यामध्ये विलीन होत आहे.

जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुठल्या जीवनाचा तुकडा तुमच्या आत घेता, ते तुमच्या शरीरासोबत कसे एकरूप होते आणि त्यातून काय निर्माण होते, हे तुम्ही खात असताना तुमच्या आतली रासायनिक अवस्था कशी ठेवता यावर अवलंबून असते. खात असताना तुम्ही कसे असले पाहिजे, कुठल्या आसनात तुम्ही बसले पाहिजे आणि तुम्ही या अन्नाचे तुमच्या आत कश्या प्रकारे स्वागत केले पाहिजे - या गोष्टींकडे आजकाल पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आत्ता सध्या, काय खावे याबद्दलच मोठा वाद चालू आहे. तेही एक मोठे आव्हान आहे, जे मार्क पेलत आहेत.

मार्क हायमन: हे अगदी खरे आहे. वास्तविक, जर लोकांनी ते सध्या खात असलेले अन्न जाणीवपूर्वक खाल्ले तर ते कदाचित ते यापुढे खाणार नाहीत. एक रुग्ण होता ज्याला वजन कमी करायचे होते. पण तो म्हणायचा की तो खूप व्यस्त आहे. तो प्रत्येक दुपारच्या जेवणाच्या वेळी बर्गर किंगला जावे लागते, दोन मोठे बर्गर्स मागवतो त्याला ते पटकन खावे लागतात. मी त्याला म्हणालो, "माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक घास चवीने मनापासून खावा, त्याचा आस्वाद घ्यावा आणि खरोखर त्याचा आनंद घ्यावा." काही आठवड्यांनंतर तो जेव्हा परत आला तेव्हा म्हणाला, “मी प्रयत्न केला. या पद्धतीने खाताना मला अगदी किळस येऊ लागली होती. मी ते आता खाऊ शकत नाही. ” आपण बऱ्याचदा अजागरुकपणे खात असल्याने आपल्याला आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामाची जाणीवही नसते. मला वाटते की रोग निर्माण करण्यासाठी आणि रोग बरा करण्याची प्रचंड शक्ती अन्नामध्य असते. आपण खाल्लेल्या अन्नाची गुणवत्ता आपल्या आरोग्याची गुणवत्ता ठरवते आणि आपण आपले अन्न कसे खातो याची जाणीव, ते अन्न आपल्या शरीरात कसे पचणार आहे हे देखील ठरवते. या प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रक्रिया आहेत.

आणि या देशात (अमेरिका) समस्या अशी आहे की अन्न उद्योगाने आमच्या अन्न व्यवस्थेचे अक्षरशः अपहरण केले आहे आणि कारखाना-निर्मित विज्ञान प्रकल्प तयार केले आहेत जे आपल्याला अत्यंत व्यसनाधीन करतात आणि रोग निर्माण करतात. आणि ज्या पद्धतीने आपण ते वाढवत आहोत, त्याचा आपल्या पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे - आपली माती, आपला पाणीपुरवठा आणि आपली हवा खराब होत आहे. हवामान बदलामध्ये औद्योगिक शेतीचे मोठे योगदान तर आहेच आणि त्यातून आपण जे अन्न पिकवत आहोत त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

प्रक्रिया केलेले पदार्थ साखर आणि पीठाने भरलेले असतात. सरासरी अमेरिकन दरवर्षी 152 पौंड साखर आणि 146 पौंड पीठ खातो, जे शरीरात साखरेप्रमाणेच कार्य करते. एकत्रितपणे, दिवसाला सुमारे एक पौंड साखर आणि मैदा याप्रमाणे खाल्ले जात आहे. यामुळे हृदयरोग, कर्करोग, टाइप 2 मधुमेह आणि अल्झायमर, ज्याला ते आता टाइप 3 मधुमेह म्हणतात यासारखे रोग जडत आहेत. साखर आणि पीठ उदासीनता, वंध्यत्व आणि पुरळ यासारखे रोग देऊ शकते. परंतु जरी त्यांचा आमच्या आरोग्यावर प्रचंड विपरीत परिणाम होत असला तरी ते या देशात आपण खात असलेले मुख्य अन्न आहे.

आपण खात असलेल्या बर्‍याच कॅलरीज साखरेपासून येतात - 20% पर्यंत. मला वाटते की आपल्याला अन्न व्यवस्था, त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो आणि आपण कसे बदल घडवून आणू शकतो ते पहावे लागेल. आपण आपल्या शरीरात काय घालतो याबद्दल दररोज योग्य निवड करणे ही एक अतिशय क्रांतिकारी कृती आहे. मला वाटते की आपण सर्वांनी आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या शरीरात, आपल्या घरात क्रांती सुरू करणे आवश्यक आहे, जेणेकरून जगाला अधिक शांततापूर्ण स्थितीकडे नेणे शक्य होईल. कारण सध्या आपण ज्या पद्धतीने खातो त्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. आणि यातूनच पुढे राजकीय अस्थिरता निर्माण होऊन शांततेला धोका निर्माण होतो.