स्थानिक प्रदेशातलेच अन्न का खावे ? - एक यौगिक दृष्टिकोन
आजच्या जगात, सुपरमार्केटमध्ये चक्कर मारली किंवा हॉटेलच्या मेनूकार्डवर नजर फिरवली तर तुम्हाला जगभरातील आकर्षक पर्याय मिळू शकतात. परंतु, सद्गुरू स्पष्ट करतात की, जरी दुरून प्रवास करून आलेले पदार्थ खाणे आपल्या जिभेला भुरळ घालू शकले, तरी यामुळे स्वास्थ्य लाभणार नाही. ते शरीराचा पृथ्वीशी असलेल्या खोल संबंधाचा मागोवा घेतात. शरीराची पृथ्वीसोबत देवाण-घेवाणीची एक प्रक्रिया सतत सुरू असते, जी कालांतराने मानवी प्रणालीला ती ज्या ठिकाणी आहे त्या प्रदेशासाठी योग्य बनवते.
प्रश्न: नमस्कार, सद्गुरु. तुम्ही मानवी प्रणाली आणि आकाशीय भूमिती यांच्यातील संबंधाबद्दल बोलत आलेले आहात. एखादा मनुष्य पृथ्वीवर ज्या प्रदेशात आहे, पृथ्वीच्या त्या विशिष्ट भागाचा आणि त्याच्या शरीराचा काही संबंध आहे का? उदाहरणार्थ, जमैकाचे लोक खूप चांगले धावपटू आहेत. विशिष्ट जागा जिथे कोणी लहानाचे मोठे होतात त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडतो का? म्हणूनच स्थानिक अन्न खाण्यास सांगितले जाते का?
सद्गुरू: मानवी प्रणाली कशी काम करते यावर निश्चितपणे स्थानाचा खोलवर परिणाम होतो. हे इतर प्रत्येक जीवासाठी देखील खरे आहे. दक्षिण भारतात सहजपणे जगणारे वनस्पती आणि प्राणी जीवन न्यूयॉर्क राज्यात किंवा जगाच्या त्या भागात कोमेजेल कारण तेथील जीवन वेगळ्या प्रकारे विकसित झाले आहे. हे केवळ हवामानामुळे आणि सूर्यप्रकाशाच्या प्रमाणामुळे किंवा थंडीमुळे नाही. त्यांचा खूप मोठा प्रभाव आहेच, परंतु जीवन एका विशिष्ट प्रकारे का विकसित झाले आहे याचा स्थानाशी काहीतरी संबंध आहे.ही एक मानववंशशास्त्राने मान्य केलेली वस्तुस्थिती आहे, की जेव्हा लोकांचा एक विशिष्ट वंश पूर्णपणे भिन्न भौगोलिक स्थानावर स्थलांतरित होतो, तेव्हा त्यांच्या शरीरातील अनेक वांशिक वैशिष्ट्ये हळूहळू बदलतील. कालांतराने, हा बदल इतका होतो की त्यानंतर ते कसे होते हे ओळखणे शक्य नसते. भारतात दीर्घ काळापासून वांशिक मिश्रण आहे. परंतु, आपण पाहू शकता की ग्रहावरील या ठिकाणी असण्याने त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये पूर्णपणे बदलली आहेत. अर्थात तापमान, हवामान आणि ते खाणाऱ्या अन्नाचासुद्धा प्रभाव असतो.
दुर्दैवाने, प्रत्येक फरकाला, काही लोक भेदभाव करण्यासाठी वापरतात. अन्यथा, जर तुम्ही या ग्रहाने निर्माण केलेल्या विविध प्रकारच्या मनुष्यांचा आणि इतर जीवांचा अभ्यास केला, तर ते आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहे. याबद्दल जाणून घेण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत.
आपल्याला घडवणाऱ्या शक्ती
या ग्रहाच्या जीवसृष्टीवर प्रभाव टाकणाऱ्या शक्ती अक्षांशाप्रमाणे बदलतात. याचा शरीर कसे घडते यावर परिणाम होतो. जीवनाच्या एखाद्या तुकड्याने घेतलेल्या ठराविक आकार आणि स्वरूपामुळे तो वेगवेगळ्या प्रकारे सक्षम होऊ शकतो. भारताचे अक्षांश आणि रेखांश मोठ्या प्रमाणावर तेथील लोकांना बहिर्मुखी ऐवजी अंतर्मुखी बनवतात. याचा अर्थ असा नाही की इतर जण अंतर्मुख होऊ शकत नाहीत - प्रत्येकजण होऊ शकतो. परंतु नक्कीच जगाच्या वेगवेगळ्या भागात राहून, शरीर वेगवेगळ्या प्रकारे सक्षम बनते. असे नाही की जर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलात तर पुढील दोन वर्षांच्या काळात तुमच्याबद्दल सर्व काही बदलेल. जोपर्यंत तुम्ही बदलण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत ते कदाचित होणार नाही. तुम्ही प्रतिकार करू शकता, परंतु तुम्ही प्रतिकार केलात तरीही तुमच्या स्वतःच्या हयातीत काही बदल घडतील कारण तुम्ही भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी आहात.
या प्रकारच्या बदलाचे आकलन करणे खूप कठीण आहे कारण सांस्कृतिक आणि इतर सामाजिक प्रभावांचे प्रमाण इतके मोठे आहे आणि ते इतके गुंफलेले आहेत की तुम्ही त्यांना खरोखर वेगळे करू शकत नाही. पण समजा आज जेवढ्या प्रमाणात लोक प्रवास करतात तसे होण्याआधी जर आपण जगाकडे पाहिले असते, तर तुम्ही हा फरक स्पष्टपणे दिसला असता - पृथ्वीने जगाच्या एका विशिष्ट भागात विशिष्ट प्रकारचे जीवन कसे निर्माण केले. हे प्रत्येक इतर जीवासाठी आणि निश्चितपणे मनुष्यांच्या बाबतीतही खरे आहे.
योग पद्धतीनुसार खाणे
योगामध्ये, अन्नाबद्दलचा नियम म्हणजे, माणूस एका दिवसात किती अंतर चालू शकतो, तेवढ्याच परिसरातून त्याने अन्न खावे. एका दिवसात, तुम्ही जे अंतर चालू शकता, त्या क्षेत्राच्या त्रिज्येमध्ये पिकणारे अन्न तुम्ही खावे. तुम्ही दूर उगवलेले अन्न खाऊ नये कारण तुम्ही बाळगून असलेले शरीर हे मुळात या पृथ्वीचाच एक भाग आहे. तुम्ही जिथे राहाता त्या विशिष्ट भागातून जर तुम्ही अन्न खात असाल तर तुमचे शरीर आणि पृथ्वी यांच्यात सतत देवाणघेवाण होत असते. आजही तुम्ही इथे असताना, तुम्ही या ठिकाणी बसलेले असताना, तुमचे शरीर आणि पृथ्वीचा हा भाग ज्यावर तुम्ही बसलेले आहात, त्यांच्यात एक सखोल स्तरावर देवाणघेवाण होत असते.
यामुळेच पृथ्वीच्या संपर्कात असणे हा व्यक्तीच्या आरोग्याचा आणि कल्याणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. योग केंद्रात, जर लोक स्वस्थ नसतील तर आम्ही त्यांना नेहमी बागेत काम देत असतो जेणेकरून ते पृथ्वीच्या संपर्कात राहातील. आज आधुनिक स्पामध्ये, पृथ्वीच्या संपर्कात असणे म्हणजे केवळ ओल्या मातीचा लेप लावणे असे झाले आहे. तुम्ही कसेतरी करून पृथ्वीच्या संपर्कात असला पाहिजे. तुम्ही ते कसे करता याने काही फरक पडत नाही; ओल्या मातीचा लेप लावून, मातीत हाताने काम करून, जमिनीवर झोपून किंवा इतर काही - मुळात तुम्ही संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहात.
स्वास्थ्यासाठी खाणे
अन्न ही एक प्रकारची देवाणघेवाण आहे. पृथ्वीमध्ये जे होते, ते तुम्ही शरीरात घेत आहात. तुम्ही जे अन्न खात आहात ते पृथ्वीच्या त्या भागातून आले असेल जिथे तुम्ही राहाता, तरच शरीर सर्वोत्तमरित्या काम करेल. समजा तुम्ही एका जमिनीच्या तुकडयावर राहता, स्वतःचे अन्न पिकवता आणि ते खाता. एका महिन्याच्या आत, तुम्हाला तुमच्या स्वास्थ्यामध्ये एक अगदी वेगळा बदल दिसेल. जर ही एक सोपी गोष्ट केली गेली तर मला वाटते की आपण या ग्रहावर कर्करोगाचे प्रमाण पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी करू शकतो. जर आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीच्या संपर्कात राहिलो आणि अन्न देखील त्याच भागातून घेतले, इतर कुठून नाही, तर कर्करोगाच्या कमीतकमी पन्नास टक्के घटना कमी होऊ शकतात.
आत्ता सध्या, जर मी नाश्त्याला गेलो तर अन्न न्यूझीलंड, व्हिएतनाम आणि न जाणो कुठून कुठून येते. आपण माल वाहतूक करण्यास सक्षम आहोत आणि आज सुपरमार्केट आहेत जे तुम्हाला जग विकू शकतात, परंतु आपण हे सुखासाठी करत आहोत, आरोग्यासाठी नाही.
संपादकीय टीप: 'स्वास्थ्याचा चवदार मंत्र' हे ईशा योग केंद्राच्या स्वयंपाकघरातील पाककृतींचे पुस्तक आहे जे खाण्यासारख्या सोप्या कृतीतून मिळणारा आनंद आणि तुमच्यातल्या अनेक शक्यता शोधण्यास मदत करेल. पचन, पोषण, खाद्यपदार्थांचे वर्गीकरण आणि इतर बऱ्याच गोष्टींवरील सद्गुरूंचे विचार या संपूर्ण पुस्तकात गुंफलेले आहेत. डाऊनलोड करा.