३ जुलै २०२३, रात्री ९:३० IST
उन्हाळा संपल्यानंतर येणार्या आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला (जुलै-ऑगस्ट दरम्यान) गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. या पवित्र दिवशी शिव - आदियोगी म्हणजे पहिला योगी यांनी पहिल्यांदा सप्तर्षीं – सात जगप्रसिद्ध ऋषी – जे त्यांचे पहिले शिष्य होते, त्यांच्यामध्ये योग विज्ञान संक्रमित केले. आणि या दिवशी आदियोगी, आदि गुरु अर्थात प्रथम गुरु बनले. सप्तर्षींनी या ज्ञानाचा जगभर प्रसार केला, आणि अगदी आजही, या पृथ्वीतलावरील प्रत्येक आध्यात्मिक प्रक्रियेमागे आदियोगींनी निर्माण केलेल्या अदभूत ज्ञानाची प्रेरणा आहे.
गुरु हा शब्द संकृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने वापरला जातो. गुरु साधकाचे अज्ञान दूर करतो, आणि त्याच्या आत असलेला निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिकरित्या साधक त्यांच्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो.