प्रश्नकर्ता:  सद्गुरू, मी सतत चिंतेनं ग्रासलेला असतो. असे का घडते आणि मी ते कसे नियंत्रणात ठेवू शकतो?

सद्गुरु: मानसिक स्वास्थ्य ही एक संवेदनशील गोष्ट आहे... जेंव्हा शारीरिक स्वास्थ्याचा प्रश्न येतो, जर तुम्हाला कुठल्या बाह्य गोष्टींचा संसर्ग झाला नसेल, तर इतर सर्व आजार आपल्या आतमधूनच निर्माण होतात. जे तुमच्या आतमधून येत आहे, ती तुमची जबाबदारी आहे का? जर तुमचे शरीर आतमधून आजार निर्माण करत असेल, तर त्यावर उपाय करायची जबाबदारी तुमची आहे का?

दुपारपर्यंत एखाद्या बटाट्यासारखे पलंगावर पडून राहणार्‍या लोकांना अनेक आजार जडलेले असतात हे खरे नाही का? सकाळी 5 वाजता उठून पळायला, पोहायला खेळायला जाणारे किंवा इतर काही करणारे लोकं मूर्ख असतात असे त्यांना वाटते. त्यांना असे वाटते की फक्त खाऊन पिऊन आणि लोळून ते खरोखरच आयुष्याची मजा लुटत आहेत. पण काही काळानंतर, तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. आणि मग स्वतःची तब्येत ठीक नसताना एखाद्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असणे हा त्याच्या नशिबाचा भाग आहे असे त्यांना वाटते. नाही! आरोग्य तुमच्या आतून निर्माण केले जाते. संसर्गाच्या माध्यमातून बाहेरून कोणते आक्रमण झाले असेल तर ती वेगळी बाब आहे.

समस्या फक्त हीच आहे – तुमचे आरोग्य तुमच्या हाताबाहेर चालले आहे, मग कारण कोणतेही असो.

जेंव्हा मानसिक आरोग्याचा प्रश्न येतो, असे बोलणे खूपच संवेदनशील आहे, परंतु तरीसुद्धा – तुमच्या शरीराला काही होणे ही जर तुमची जबाबदारी असेल, तर तुमच्या मनाला जर काही होत असेल तर ती देखील तुमचीच जबाबदारी नाही का? त्यात अनेक घटकांचे योगदान असू शकते. अगदी शारीरिक आजार सुद्धा अनेक घटकांमुळे उद्भवलेले असू शकतात. हे मानसिक आजारांबाबत सुद्धा असेच असू शकते. पण आपण मानसिक आजार आणि क्लेश/दुःख याकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या क्लेश/दुःखावर उपचार करून घेऊ शकत नाही; कदाचित ते सुद्धा दुःखी असू शकतील.

तुम्ही जर वैद्यकीयदृष्ट्या आजारी असाल, तर औषधांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आजारावर काही प्रमाणात उपाय करू शकता, जे रसायनशास्त्राशी संबंधित आहे. पण रसायनांचा सर्वात अत्याधुनिक कारखाना इथेच आहे. (मानवी शरीरात) समजा तुमचे आरोग्य तुमच्या हातात असते, तर तुम्ही चिंता किंवा आनंद यापैकी कशाची निवड केली असती? नक्कीच, आनंद हीच तुमची निवड असती, आनंदाची सर्वोच्च पातळी गाठण्याची.

समस्या फक्त हीच आहे – तुमच्या शरीराची रासायनिक क्रिया तुमच्या हाताबाहेर चालली आहे, मग कारण कोणतेही असो. अनुवंशिक कारणे असू शकतात, संसर्ग असू शकतो, बाह्य उत्तेजके असू शकतात, अनेक कारणे आहेत. पण तरीसुद्दा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी नाही का? ज्या क्षणी ही जबाबदारी माझी नाही असा विचार तुम्ही करायला लागता – तेंव्हा ते तुमच्या हातातून पुर्णपणे निसटते. ही तुमची जबाबदारी आहे असा विचार तुम्ही केलात, तर उद्या सकाळपर्यंत कदाचित सर्व आजारांवर उपाय मिळणार नाहीत, पण तुम्ही स्वास्थ्याच्या दिशेने प्रवास सुरू करू शकाल.

 हे अतिशय महत्वाचे आहे – तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही काय नाही, याची जबाबदारी तुमच्याकडेच असायला हवी. हे माझे मूलभूत ध्येय आहे: धर्मातून जबाबदारीपर्यन्त. धर्म म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणार्‍या चुकीच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी वर स्वर्गात आहे असा गैरसमज. समस्या अशी आहे की तुम्ही एका गोल ग्रहावर आहात आणि तो गोलगोल फिरतो आहे. विश्वात कोठेही “ही वरची बाजू आहे” असे लिहून ठेवलेले नाही. तुम्हाला वरची बाजू कोणती हे सुद्धा माहिती नसेल, तर अपरीहार्यपणे, तुम्ही चुकीच्या दिशेलाकडेच नजर ठेवता.

 

“वरती बसलेला कोणीतरी” तुम्ही कसे आहात याला जबाबदार कसा असू शकेल? आपण ही जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आता आली आहे – आणि मग आपण आपले सर्वोत्तम प्रयत्न करू शकतो. या ग्रहावरील प्रत्येकाची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता एकसारखीच असेल का? नाही, तसे कधीही घडणार नाही. पण आपण आपल्या स्वतःसाठी जे काही करतो आहोत ते सर्वोत्तम प्रकारे करत आहोत का? हे अतिशय महत्वाचे आहे. आपण जे करू शकतो, ते घडायलाच हवे. आपण जे करू शकत नाही ते जर आपण केले नाही, तर काहीच अडचण नाही. पण आपण करू शकत असणारी गोष्ट जर आपण केली नाही, तर आपण एक मोठी आपत्ती आहोत.

शरीर प्रणालीत संतुलन आणण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. त्यात रसायनशास्त्र सामावले आहे; शरीरात निरनिराळ्या अनेक ग्रंथी कार्यरत असतात. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे योग्य प्रकारे बसायला शिकणे. अशा प्रकारे बसा ज्यामुळे शरीराला स्न्यायूंचा आधार घ्यावा लागणार नाही, ते इतकया चांगल्या प्रकारे संतुलित असेल, की जेंव्हा ते बसून असेल, तेंव्हा ते फक्त बसूनच राहील. दिवसातील काही तास येवढेच करा, आणि तुमच्या लक्षात येईल – तुम्हाला खूप चांगले वाटेल. तुम्ही या समस्येतून बाहेर पडण्यासाठी करू शकणार्‍या इतर आणखीही जटिल प्रक्रिया आहेत. पण किमान येवढा प्रयत्न तरी करून पहा – भूमितीयदृष्ट्या स्वतःला अशा स्थितीत ठेवा ज्यामुळे तुमच्या शरीरावर कोणताही ताण नसेल.

सुरूवातीला, त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत असे लक्षात येईल, पण एकदा तुम्ही असे बसलात, की कोणत्याही प्रयत्नांशिवाय, कोणत्याही विशिष्ट अवयवाला ताण न देता, शरीर जागेवर राहते. भूमिती सर्वात महत्वाची आहे. विश्वातील कोणत्याही भौतिक गोष्टीसाठी हे सत्य आहे – एखादी गोष्ट किती परिणामकारकतेने कार्यरत राहते ते तीची रचना किती चांगली आहे यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ गाडीचे इंजिन. तुम्ही एखाद्या इंजिनाला खरोखरच चांगले म्हणत असाल, तर त्याचा अर्थ ते भौमितिकदृष्ट्या अतिशय चांगले संरेखित केलेले आहे असा आहे; त्यात कोणतेही घर्षण नाही. जेंव्हा तुम्ही एखाद्या इमारतीचा आराखडा सुंदर आहे असे म्हणता, तेंव्हा त्याचा अर्थ तिची संरचना भौमितिकदृष्ट्या अतिशय चांगली आहे असा आहे.

शरीर आणि संपूर्ण विश्वाच्या बाबतीतही असेच आहे. सध्या, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. त्यांना लोखंडी तारांनी हाताळले जाते का? ही फक्त भूमिती आहे. जर सौर यंत्रणेने ही भौमितिक संरचना सोडली, तर तीचा नाश होईल. केवळ भूमितीच्या परिपूर्णतेमुळेच, ती कार्यरत आहे. तुमच्या शरीराचे पण तसेच आहे: एका स्तरावर, योगाची संपूर्ण प्रणाली तुमची भौतिक भूमिती; वैश्विक भूमितीशी समन्वय साधण्याबद्दलच आहे, त्यामुळे इथे जगणे अतिशय सहजतेने घडते.

 तर त्याला तुम्ही ताणतणाव म्हणा, चिंता म्हणा, किंवा आणखी काही नाव द्या – मूलतः शरीर प्रणालीत घर्षण आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपली शरीर प्रणाली भौमितीयदृष्ट्या चांगली संरेखित करणे हे महत्वाचे आहे, आणि त्यानंतर तिला योग्य प्रकारचे वंगण घालणे महत्वाचे आहे. तसे करण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्या ठिकाणी भौमितीय अचूकता असते, तिथे कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत, कोणतेही घर्षण निर्माण होत नाही. तुम्ही तुमच्या शरीर प्रणालीत तेच आणायचे आहे. या छोट्या गोष्टींना तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवू देऊ नका. तुम्हाला सदैव छळणारी एक लहानशी चिंता तुमच्या जीवन प्रक्रियेचा विनाश करू शकते. यावर शक्य तितक्या लवकर इलाज करणे अत्यावश्यक आहे.