प्रश्न : भावनांचं जेवढं मोल आहे, त्यापेक्षा त्यांचा त्रासच जास्त होतो. मग आपण भावरहित होणं जास्त चांगल नाही का?

सदगुरु : माणसांमध्ये भावना नसतील तर त्यानां मानव म्हणता येणार नाही. भावना मानवी जीवनाचा एक सुंदर पैलू आहेत, त्यांच्या अभावी माणूस कोरडा, रुक्ष होऊन जाईल. भावनांनी मर्यादा तोडली कि तो वेडेपणा होतो. तुमचे विचार जर स्वैर धावू लागले तर तो वेडेपणा होतो. भावनांवरचं तुमचं नियंत्रण सुटलं, की तो सुद्धा वेडगळपणा होतो.   

भावना ही काही अडचण नाही!

माणसं भावनांकडे समस्या म्हणून पाहतात कारण त्यांच्या भावनांचा त्यांना त्रास होतो. कारण त्यांच्याकडे त्रासदायक भावना असतात. जर त्यांच्यामध्ये सुंदर, मधुर भावना असत्या तर त्यांचा त्यानां त्रास झाला असता का? तुमच्यामध्ये आनंद, प्रेम, जिव्हाळा अशा भावना असतील, आणि जर अशाच प्रकारे त्या तुमच्यामध्ये व्यक्त होत असतील, तर तुम्ही भावनांना अडचण म्हणाल का? नाही.

जर तुम्ही भावरहित झालात तर भावना तुमच्यातच दबून राहतील आणि तुम्ही कोरडे, रुक्ष व्हाल.

जर तुमचं शरीर स्वस्थ आणि अगदी उत्तमरित्या कार्य करत आहे, याला तुम्ही अडचण म्हणाल का? नाही. पण जर शरीर रोगग्रस्त आणि त्रासदायक असेल; उठताना, बसताना, सकाळी वाकताना वेदना होत असतील तर तुम्ही म्हणाल शरीर एक अडचण.  जर तुमच्यामध्ये खरोखर सुमधुर भावना असत्या ज्यांनी तुमचं आयुष्य फुलांप्रमाणे सुंदर केलं असतं, तर भावनां नाकारण्याचा विचार तुमच्या मनात आलाच नसता. 

तुमच्या भावना सोडून दया, संपवा, किंवा भावनांच्या पलीकडे जा असं मी तुम्हाला म्हणत नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे- तुमचं शरीर असो, तुमची बुद्धी असो, तुमच्या भावना असोत वा तुमच्यातली उर्जा असो - या चार मिती तुम्ही आत्ता अनुभवत असाल – सर्वप्रथम त्यांना अगदी सुखकर आणि आनंदी बनवा. एकदा जर का हे चारी पैलू सुखी, आनंदी झाले, कि ते मग अडचण बनणार नाहीत. म्हणून जेव्हा भावना अडचणी बनत नाहीत – जेंव्हा माणसं कशाचीही आकांक्षा न ठेवता अगदी आनंदी असतात तेव्हाच त्यांच्यामध्ये या जीवनाच्या पलीकडे जायची जिज्ञासा निर्माण होते.

इथेही नाही आणि तिथेही नाही! 

तुम्ही सध्याच्या घडीला फक्त जगायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही देवाला साद घालत असता, ते सुद्धा केवळ तुमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आला तरच.  हो ना?  इथे पृथ्वीवर जगण्यात अपयशी ठरलात, कि मग स्वर्गात चांगल जीवन जगण्याचा विचार करू लागता. इथे जर तुम्हाला आयुष्य नीट जगता आलं नाही तर स्वर्गात ते जमेल याचा काय भरवसा? कर्नाटकातील प्रसिद्ध संत आणि महान कवी बसवण्णा म्हणतात, “इल्ली सल्लवदरू अल्लीयू सल्लरैय्या” म्हणजे, “ज्यांना इथे जमलं नाही त्यांना तिथेही जमणार नाही.” म्हणून हे भावनांच्या पलीकडे जाण्याबद्दल नाही आहे. तुम्ही पलीकडे गेलंच पाहिजे, पण ‘पलीकडे’ म्हणजे भावनांच्या पलीकडे किंवा बुद्धीच्या पलीकडे किंवा ह्याच्या-त्याच्या पलीकडे असं नव्हे. तुम्ही त्या मर्यादेच्या पलीकडे जायला हवं ज्यानं तुम्हाला रोखून ठेवलं आहे.  भावना आणि विचार सुद्धा तुम्हाला तडीस नेण्यासाठी तुमची साधने आणि पद्धत बनू शकतात.

तुमच्या मर्यादांच्या पार जाण्यासाठी तुम्ही मनाचा वापर केलात तर आपण त्याला ‘ज्ञान योग’ म्हणतो. याच मर्यादा ओलांडण्यासाठी तुम्ही भावनांचा वापर केलात तर आपण त्याला ‘भक्ती योग’ म्हणतो. तुमच्या शरीराच्या सहाय्याने या मर्यादांच्या पलीकडे जायचा प्रयत्न केलात, तर आपण त्याला ‘कर्म योग’ म्हणतो. आणि मर्यादांच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या उर्जेचा उपयोग केलात तर त्याला ‘क्रिया योग’ म्हणतो. हे चारही पैलू प्रत्येकी एक प्रवेशद्वार आहे. आणि एक प्रवेशद्वार; एक तर तुम्हाला थांबवू शकतं किंवा तुम्हाला सहज पलीकडे जाऊ देऊ शकतं. म्हणून तुमच्या भावनां दाबून ठेवू नका किंवा नाकारण्याचा प्रयत्न करू नका.  तुम्ही त्यांना दाबून ठेवू शकणार नाही.   भावनांशी मैत्री करण्यासाठी त्यांना खोलात जाऊन समजून घेणं आवश्यक आहे आणि  ज्यांचा सहवास सुखकारक आणि आनंदी वाटतो, त्यांनाच आपण मित्र म्हणतो.

Editor’s Note: This is an excerpt from Sadhguru’s 2-in-1 book “Emotion: The Juice of Life & Relationships: Bond or Bondage”, available on Flipkart and Amazon.