सद्गुरु: तर शंतनुने आपल्या मुलाचे आयुष्य हिरावून घेतले तसेच जसे ययातीला आपल्या मुलाचे तारुण्य हवे होते. शंतनूला सत्यवतीपासून दोन मुले होती. पहिल्या मुलाला चित्रांगद म्हणून ओळखले जायचे तर दुसऱ्याला विचित्रवीर्य म्हुणुन संबोधले जायचे. चित्रांगद, एक गर्विष्ठ तरुण, एक दिवस जंगलात गेला. तेथे त्याचा सामना एका गंधर्वशी म्हणजे विलक्षण कौशल्य असलेली व्यक्ती जी या जगातील नाही, त्याच्याशी झाला, त्याचे नावसुद्धा चित्रांगद होते. जेव्हा या गंधर्वने मुलाला विचारले “तू कोण आहेस?” तो अभिमानाने म्हणाला, ” मी चित्रांगद आहे.” गंधर्व हसला आणि म्हणाला,” तुझी स्वतःला चित्रांगद म्हणून घ्यायची हिम्मत कशी झाली? मी चित्रांगद आहे. तू तुझं नाव बदलण्यातच तुझं भलं आहे. हे माझं नाव आहे. हे धारण करण्यास तू अपात्र आहेस. तरुण राजकुमार उभा राहिला आणि म्हणाला, ”तुझी असं बोलण्याची हिम्मत कशी झाली! असं दिसून येतंय तू खूप काळ जगला आहेस. ये, आपण लढूया कारण माझ्या वडिलांनी मला चित्रांगद हे नाव दिले आहे आणि हे माझे नाव आहे. ते लढले आणि क्षणभरात तो मुलगा मरण पावला.

विचित्र माणूस

आता एकच पुत्र बाकी राहिला होता- विचित्रवीर्य. विचित्र म्हणजे विचित्र किंवा विपरीत, वीर्य म्हणजे पुरुषत्व. तो एक विचित्र किंवा विपरीत पुरुष होता. अपल्याला नक्की ह्याचा अर्थ काय आहे हे माहित नाही. एकतर त्याला पत्नी नको होती किंवा तो पत्नीबरोबर राहण्यात असमर्थ होता. आपण बायको मिळवणे किंवा मूल होणे ह्याकडे आजच्या काळाच्या संदर्भाने बघू नये. तो राजा असल्या कारणाने ही त्या काळी अत्यंत महत्वपूर्ण बाब होती, अनेक पुत्र असणे ही सर्वात मोठी चिंतेची गोष्ट होती. नाहीतर वंश पुढे कोण नेईल? दररोज, ते युद्धासाठी जात होते. तुम्ही कितीही शूरवीर असले तरी तुम्ही मारले जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही मारले गेलात तर तुम्हाला पुत्र आहे कि नाही ही एक खूपच महत्वाची बाब होती. ह्या कारणामुळेच ते नेहमी बायको आणायचा किंवा पुत्राला जन्म देण्याचा विचार करायचे कारण जर तुम्हाला पुत्र नसेल तर तुमचे पूर्ण साम्राज्य दुसऱ्या कोणाकडेतरी जाईल.

विचित्रवीर्य लग्न करण्यास तयार नव्हता. भिष्म लग्न करण्यास तयार नव्हता. चित्रांगदा मरण पावला होता. त्यामुळे कुरु कुळ हे नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ह्या परिस्थितीत काशीच्या राजाने त्याच्या तिन्ही मुलींच्या स्वयंवराची घोषणा केली आणि त्याने कुरुंकडे आमंत्रण पाठवले नाही. त्याप्रदेशातील कुरु राजवंश हा सर्वात मोठा आणि सन्माननिय होता पण त्यांना आमंत्रित केले गेले नाही कारण काशीच्या राजाला आपल्या मुलींचे लग्न विचित्रविर्य- ज्याच्या पुरुषत्वाबद्दल अफवा ऐकल्या होत्या, त्याच्याशी लावायचे नव्हते. भीष्माला हे सहन झाले नाही कारण कुरु घराण्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा ही त्याच्या स्वतःच्या आणि इतर कोणाच्याही कल्याणाच्या वर होती. म्हणूनच त्याने स्वयंवरात जायचे ठरवले.

भीष्माने अंबाचे अपहरण केले

स्वयंवर म्हणजेच एका तरुण मुलीला तिचे नशिब निवडायची संधी मिळते. जेव्हा राजकुमारीचे लग्न लावायचे ठरते, तेव्हा ते एक कार्यक्रम आयोजित करतात, ह्या कार्यक्रमात क्षत्रिय कुळातले जे स्वतःला योग्य समजतात ते उपस्थित राहू शकतात, आणि ती तरुणी तिचा नवरा निवडू शकते. हा तिचा अधिकार होता. यात कोणीही दखल देऊ शकत नव्हते. काशीच्या राजाच्या तिन्ही मुली- अंबा, अंबिका आणि अंबालिका एकत्र स्वयंवरात आल्या. अंबा ही शल्व राजा ज्याचे नाव सल्व होते त्याच्या प्रेमात होती आणि ती त्यालाच निवडणार होती. तिची निवड दाखवण्याची साधी सोपी पद्धत अशी होती की तरुणीला एक पुष्पहार दिला जायचा आणि ती तरुणी सभागृहातील सर्व पुरुषांकडे पहायची आणि तिने वर निवडला की त्याच्या गळ्यात पुष्पहार घालायची आणि तो तिचा नवरा बनायचा. अंबा सल्वाकडे गेली आणि तिने त्याचा गळ्यात पुष्पहार घातला.

त्याचवेळी भीष्म आत आला. तिथे बसलेले इतर योद्धे त्याला घाबरत होते कारण तो एक महान योद्धा होता. त्याबरोबर त्यांना हेही माहित होते कि त्याने स्वतःच्या शरीराचा भाग कापून स्वतःला नपुंसक केले आहे आणि तो कधीही लग्न करणार नाही. म्हणून त्यांनी त्याला टोमणा मारला, “हा म्हातारा इथे का आला आहे? तो वधू शोधत आहे का? किंवा कुरु कुळाकडे योद्धे नाहीत जे स्वतः येथे येऊन वधु घेऊन जाऊ शकतील? हे कारण आहे का ह्याचं इथे येण्याचं?” भीष्म संतापला कि त्याचे राष्ट्र आणि कुळ ह्या दोघांची थट्टा केली जात आहे. म्हणून त्याने तिन्ही मुलींचे अपहरण केले आणि त्यांना आपल्याबरोबर नेले. इतर योद्ध्यांनी युद्ध केले पण भीष्माने त्या सर्वांचा पराभव केला. सल्वसुद्धा लढला कारण त्याच्या वधूचे अपहरण केले जात होते,परंतु भीष्माने त्याला पराभूत केले आणि त्याची खिल्ली उडवली व तिन्ही मुलींना तिथून घेऊन गेला.

पूर्वीच्या पिढ्यांमध्ये स्त्री हि तिच्या मनाप्रमाणे अटी ठेवत असे यात हा एक मोठा बदल होता. अंबा रडकुंडीला आली होती. ते सर्व कुरुंची राजधानी हस्तिनापूरकडे जाताना अंबा म्हणाली, “तू हे काय केलंस? मी त्या माणसाच्या प्रेमात होते आणि मी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला होता. तो माझा नवरा आहे. तू मला असं घेऊन जाऊ शकत नाही.”

भीष्माने उत्तर दिले, “मी तुला मिळवले आहे. मी जे मिळवतो ते कुरुंचे असते.” यावर तिने विचारले, “ तू माझ्याशी लग्न करशील का?” भीष्म म्हणाला, “ तुझे लग्न विचित्रवीर्यशी होईल.” परंतु विचित्रवीर्यने फक्त अंबिका आणि अंबालिकाशी लग्न केले. तो अंबाशी लग्न करण्यास नकार देत म्हणाला, ”तिने दुसऱ्याला पुष्पहार घातला आहे. तिने तीचे हृदय दुसऱ्याला दिले आहे. मी अश्या स्त्रीशी लग्न करणार नाही.”

अंबाची दशा

महाभारत भाग ८: अंबाची दशा

अंबा पूर्णपणे गोंधळली होती, “मी आता काय करू?” भीष्माने माफी मागितली आणि म्हणाला, “ मी तुला सल्वाकडे परत जाण्याची व्यवस्था करून देतो.” यावर अंबा खूप खुश झाली आणि सल्वाकडे परत गेली.- पण तिला तिथे मोठा धक्का बसला. सल्व तिला नकार देत म्हणाला, ”मी इथे कोणी दिलेले दान घेण्यासाठी नाहीये. मी युद्ध हरलो. त्या म्हाताऱ्या राक्षसाने मला हरवले आणि तो आता मला वधु दान म्हणून देण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुला स्वीकारणार नाही.परत जा.”

ही ५००० वर्षांपूर्वीची स्थिती आहे, एक राजकुमारी सर्व ठिकाणी नाकारली गेली, ती वडिलांकडे परत जाऊ शकत नव्हती, तिचा नवरा नव्हता, तिचा माणूस तिला परत घेत नव्हता.

आता अंबा दोन्ही ठिकाणी नाकारली गेली होती. ती हस्तिपुरात परतली आणि तिने भीष्माशी लग्न करण्यासाठी आग्रह केला, "तू माझे आयुष्य उध्वस्त केलं आहे. मी ज्याच्यावर प्रेम करत होते त्याच्यापासून तू मला दूर केलस, तू बळजबरीने मला इथे आणलं, आणि ज्याने माझ्याशी लग्न करायला हवं होतं तो माझ्याशी लग्न करणार नाही. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. परंतु भीष्माने साफ नकार दिला,"माझी निष्ठा माझ्या राष्ट्राशी आहे, मी शपथ घेतली आहे की मी लग्न करणार नाही, हे असेच आहे.

पूर्णपणे उध्वस्त होऊन अंबा बाहेर पडली. माझी इच्छा आहे की तुम्ही कल्पना करावी, हे ५000 वर्षांपूर्वी घडलं, एक राजकुमारी सर्व ठिकाणी नाकारली गेली, ती वडिलांकडे परत जाऊ शकत नाही, तिला नवरा नाही. तिचा माणूस तिला स्वीकारत नाही आहे. पूर्णपणे उध्वस्त होऊन, आपण कुठे जाणार याची कल्पना नसताना, ती तशीच बाहेर पडली.

पुढील भागात...