तुमचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सर्वकाही तुमच्या सर्वांगावर कोरलेलं आहे!

सद्गुरु: कर्माकडे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला एखाद्या व्यक्तीच्या शरीरात, मनात, भावनां आणि त्याच्या उर्जेमधे घडून गेलेल्या गोष्टींच्या स्मृतींचे अवशेष असे म्हणता येईल. घडून गेलेल्या अनेक घटनांच्या स्मृतींचे हे अवशेष आहेत. तुमच्यातील एक मोठा भाग, जो तुम्ही एक व्यक्ती म्हणून अस्तित्वात आहात त्यापेक्षा कितीतरी अधिक काळ जगलेला आहे. तुम्ही त्याकडे एक पुनर्जन्म या दृष्टीकोणातून पाहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर आधुनिक प्रचलित वैज्ञानिक दृष्टी लक्षात घेतली, तर जेंव्हा जेनेटिक्स म्हणजे “अनुवंशिकी” असे म्हंटले जाते, तर याचा अर्थ निश्चितपणे असा आहे की तुमचे पालक अजूनही तुमच्या माध्यमातून जगत आहेत. तुम्हालाच वाटतं की तुम्ही वेगळे आहात. असे अनेक लोकांबाबत घडते की 40-45 एवढे वय झाले, की त्यांनी आयुष्यात स्वतःसाठी अगदी जाणीवपूर्वक वेगळा मार्ग आखला नाही, तर ते अगदी त्यांच्या पालकांसारखेच वागणे सुरू करतात. तुमचे आई वडील एका विशिष्ट पद्धतीने आयुष्य जगले, पण तुम्हाला सुद्धा पुन्हा त्याच मार्गाने का जावे लागावे?

कर्म म्हणजे फक्त तुम्ही काय केले होते आणि काय केले नव्हते येवढेच नाही, ती उरलेली स्मृती आहे. कर्म हे थेट सृष्टी निर्मितीच्या सुरुवातीच्या क्षणापर्यंत जाते. तुम्ही जर सजग, जागृत होऊन शरीराचे अंतरबाह्य सखोल निरीक्षण केलं, जर तुम्ही पुरेसे जागृत असाल, तर तुम्ही अगदी सृष्टी निर्मितीची सुरुवात देखील पाहू शकता. लाखो वर्षे घडून गेलेली प्रत्येक गोष्ट शब्दशः सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत सामावलेली आहे, विशेषतः मानवी प्रणालीमध्ये. आणि आम्हाला हे अनुभवाने माहिती आहे.

आज विज्ञानाने येवढी प्रगती केली आहे की तुम्ही जेव्हा सेकोयाचे झाड तोडता, तेव्हा वैज्ञानिकांना गेल्या 3000 वर्षांत काय घडून गेले आहे हे माहिती करून घेता येते – किती पर्जन्यमान होते, तापमान कसे होते, आगी, वादळे, सर्वकाही. हे म्हणजे कोणीतरी तुमचा हात बघून तुम्हाला तुमचा भूतकाळ आणि भविष्य सांगत आहेत. हे अनेक मार्गांनी सूचक आहे.

मी खरोखरंच तुमचा हात पाहून तुमच्या आयुष्यात काय घडून गेले आहे आणि काय घडू शकेल हे सांगू शकतो. हे तुमच्या हातावर कसे आले? खरं पाहता तर ते तुमच्या सर्वांगावर लिहिलेले आहे. मी तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाकडे पाहिले, विशेषतः असे भाग जे इतर भागांपेक्षा अधिक सूचक असतात, त्यांच्याकडे पाहिले, तर मी तुमचा भूतकाळ आणि भविष्य सांगेन. मी तुमच्या कानाच्या पाळीमागे डोकावून पहिले, तर मी जवळजवळ सर्वकाही सांगेन– मी चेष्टा करत नाहीये. मी जर एखाद्या महत्वाच्या ठिकाणी गेलो, तर मी स्थानिक गाईड्स किंवा इतर कोणाला या ठिकाणी काय घडले होते याविषयी काहीही विचारत नाही. मी त्या ठिकाणी फक्त असा एक दगड किंवा खडक शोधतो जो त्या ठिकाणी बराच काळ स्थिर स्थितीत आहे. मी फक्त तिथे जाऊन त्याच्यासोबत बसतो आणि त्या संपूर्ण परिसराची माहिती मला आपोआप समजते, कारण खडकाला सुद्धा त्याच्या भोवताली घडलेल्या सर्व घटनांची स्मृती असते.

या ग्रहावरील वेगवेगळ्या वस्तु वेगवेगळ्या प्रकारची कंपने बाहेर फेकत आहेत, आणि ही कंपने ग्रहाच्या स्थितीनुसार बदलत आहेत. या सर्व गोष्टींचे मोजमापन केले गेले आहे, पण त्याद्वारे त्यांना खरोखरच काय म्हणायचे आहे हे ते सुसंगतपणे सांगू शकत नाहीत. प्रत्येक खडक, प्रत्येक गोटा काहीतरी सांगत आहे – हे आधुनिक विज्ञानाला सुद्धा स्पष्ट झाले आहे. ते जाणून घेण्यायेवढे आपण संवेदनशील आहात का? हा प्रश्न आहे. कारण एखादी व्यक्ती काय बोलते आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर त्याआधी तुम्हाला त्यांची भाषा माहिती असणे आवश्यक आहे, तुम्ही त्या भाषेप्रती पुरेसे संवेदनशील असायला हवे, नाहीतर तुम्हाला ते समजणार नाही. विश्वातील सर्वगोष्टी अनेक गोष्टी सांगत आहेत – पण त्यांचे ऐकण्यासाठी तिथे आहे तरी कोण?

https://youtu.be/ZzuHXOsTTFE" width="560"

 

तुमचं शरीर एक छोटेसं ब्रम्हांड आहे

जर तुमच्या भोवताली घडणार्‍या जीवनाविषयी तुम्ही संवदेनशील असाल, तर ते काय सांगत आहेत हे तुम्हाला जाणवू शकते. त्यापेक्षा अधिक म्हणजे, तुम्ही ज्याला “मी स्वतः” असे संबोधता त्या जीवनाविषयी; सृष्टी निर्मितीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यन्त, जर संवेदनशील असाल, तर सर्व काही या भौतिक शरीरातच सामावलेले आहे – कारण ते खुद्द एक छोटेसे ब्रम्हांड आहे – म्हणूनच त्याला “सूक्ष्म-ब्रम्हांड” असे संबोधले जाते. विशाल ब्रम्हांड ही त्याचीच एक विस्तारीत आवृत्ती आहे – सूक्ष्म-विश्वात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट, सूक्ष्म स्वरुपात, येथेही घडलेली आहे, आणि अद्यापही घडते आहे.

“अद्यापही घडते आहे” असे मी का म्हणतो आहे, कारण सृष्टी-निर्मिती घडली, आणि ती सहा ते सात दिवसांमध्ये घडली ही एक अत्यंत बालिश कल्पना आहे, कारण सृष्टी-निर्मिती ही अशी कोणती गोष्ट नाही, जी घडून गेली; ती निरंतर घडतेच आहे. काळ-वेळ ही कल्पनाच अतिशय बालिश आहे; “दहा लाख वर्षांपूर्वी” असं काही अस्तीत्वात नाही. जो अस्तित्वाकडे बारकाईने पाहतो, त्यांच्यासाठी हे सर्व आत्ताच आहे, ते सर्वकाही इथेच आहे. तर मग “इथे” कोठे आहे? सध्या तुम्ही बसला आहात तिथे ते आहे का? नाही. ते इथे तुमच्या आत आहे कारण हेच एकमेव स्थान तुम्ही अनुभवू शकता. तुम्ही हे जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, की हेच एकमेव स्थान तुमच्यासाठी या अस्तीत्वातून प्रकट करण्यात आली आहे. इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला उघड करण्यात आलेली नाही; तुमच्या डोळ्यांनी दाखवल्याप्रमाणे नाही, तर गोष्टी वास्तविक आहेत त्या स्वरुपात पहाण्यासाठी खूप प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल.

तर, कर्म म्हणजे फक्त एक सोपा शब्द नाही. आपण जेव्हा ”हे तुझे कर्म आहे” असे म्हणतो, तेंव्हा त्याचा अर्थ असा आहे की द बिग बँग म्हणजे सृष्टी निर्मितीचा पहिल्या महास्फोट सुद्धा तुमचेच कर्म आहे; ते सुद्धा तुम्हीच केले आहे. खुद्द सृष्टी निर्मितीची सुरुवात देखील तुमचेच कृत्य आहे कारण ते देखील तुमच्यात सामावलेले आहे. प्रत्येक गोष्ट आपण ज्याला चैतन्य म्हणतो त्यामध्येच घडली. आणि ते तुमच्यासाठी अनोळखी नाही, ते तुमच्यासाठी परके नाही – तुम्ही जे कोणी आहात त्याचा तो आधारभूत पाया आहे. म्हणून सृष्टी निर्मितीची सुरुवात सुद्धा तुम्हीच आहात.