माझ्यावर कोणी जादूटोणा करू शकते का? ते मी कसं निष्प्रभ करु शकतो?
जादूटोणा खरं आहे का? हो, आणि कदाचित नाही. सद्गुरू आपल्याला इतरांकडून आपल्यावर केल्या जाणार्या काळ्या जादूविषयी, आणि आपण स्वतःवरच काळी जादू कशी करतो याबद्दल सांगतात.
प्रश्न: ऊर्जा नकारात्मक पद्धतीने वापरता येऊ शकते का, उदाहरणार्थ जादूटोणा करण्यासाठी?
सद्गुरू: आपण हे समजावून घेणे आवश्यक आहे की ऊर्जा ही केवळ ऊर्जा असते; ती दैवी नाही किंवा वाईटही नाही. तुम्ही त्यामधून काहीही बनवू शकता – एक देव किंवा दानव. हे वीजेसारखे आहे. वीज दैवी आहे का सैतानी? ती जेंव्हा आपल्या घराला प्रकाश देते तेंव्हा ती दिव्य असते. ती जेंव्हा विद्युत खुर्ची (मृत्यूदंड कैद्यांना मृत करण्याची खुर्ची) बनते, तेंव्हा ती वाईट असते. हे फक्त त्या क्षणी कोण चालवत आहे यावर अवलंबून आहे.
वास्तविकतः पाच हजार वर्षांपूर्वी, अर्जुनाने कृष्णाला हाच प्रश्न विचारला होता, “जर तू सर्व काही सारखीच ऊर्जा आहे, आणि प्रत्येक गोष्ट दैवी आहे असे तू म्हणतोस; आणि दुर्योधनात असलेले दैवत्व तेच असेल, तर मग तो असा का वागतो? कृष्ण हसला, कारण सर्व काही शिकवल्यानंतरही अर्जुन पुन्हा पुन्हा याच सोप्या, बालिश प्रश्नाकडे वळत होता. कृष्णाने उत्तर दिले, “देव निर्गुण आहे, परमात्मानिर्गुण आहे. त्याच्याकडे स्वतःचे कोणतेही गुणधर्म नाहीत.” याचा अर्थ असा की ती फक्त एक शुद्ध ऊर्जा आहे. तुम्ही तिच्यापासून काहीही निर्माण करु शकता. तुम्हाला खायला येणार्या वाघात सुद्धा तीच ऊर्जा असते, तुमच्याकडे येऊन तुम्हाला वाचवणार्या देवाकडे पण तीच ऊर्जा असते. फक्त त्या वेगवेगळ्या मार्गांनी कार्यरत असतात. तुम्ही जेंव्हा तुमची गाडी चालवत असता, ते चांगले आहे का वाईट? कोणत्याही क्षणी ती तुमचे आयुष्य घडवू शकते किंवा तुमचे प्राण घेऊ शकते, नाही का?
तर मग लोकं जादूटोणा करु शकतात का? ते नक्कीच करु शकतात. जर सकारात्मक वापर असतील, तर नकारात्मक उपयोग सुद्धा नक्कीच आहेत. एक वेद, अथर्व वेद ऊर्जेच्या सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही शक्तींच्या वापरासाठी समर्पित आहे. पण माझ्या असे पाहण्यात आले आहे, की बहुतांश वेळा या गोष्टी मानसिक असतात. थोडेफार तसे असेलही, पण बहुतांश वेळी तुमचे मनच तुम्हाला वेडे करत असते. मला तुम्हाला वेडे करून सोडायचे असेल, तर मला तुमच्यावर खरोखरच काळी जादू करण्याची आवश्यकता नाही. उद्या सकाळी तुम्ही जेंव्हा तुमच्या घराबाहेर पडलात, आणि समजा तिथे एक कवटी पडलेली आहे सगळीकडे रक्ताचा सडा पडलाय, एकदा तुम्ही ते पाहिलेत, की झाले! तुम्ही आजारी पडाल, तुमचा व्यवसाय नुकसानीत जाईल, तुमच्याबाबत सर्व गोष्टी नकारात्मकच घडतील, कारण तुमच्या मनावर एका विशिष्ट भीतीचा पगडा पडलेला असतो. कोणतीही जादूटोणा केलेला नसतो. ही कोणात्या तरी प्रकारची काळी जादू आहे असे दर्शवणारी फक्त काही विशिष्ट प्रतिके दाखवून तुमचे मन उध्वस्त केले जाते. त्यामुळे बहुतेक वेळा, ते फक्त मानसिकच असते. जरी तुमच्यावर काळी जादू केली गेली असेल, तर फक्त दहा टक्केच खरे असू शकते. बाकी तुम्हीच तुमचा नाश करत असता. म्हणूनच ती प्रतीकांसह येते. त्यांना तुमच्या स्वतःच्या मानसिकतेचा तुमच्यावर होणारा परिणाम समजलेला असतो. एकदा ती प्रतिके तयार केली, की तुम्ही स्वतःचाच विनाश करून घेता.
पण हो, असे विज्ञान आहे ज्यात या उर्जांचा नकारात्मक वापर करून एखाद्या व्यक्तीला दुसर्याचे नुकसान करता येऊ शकते. त्यापासून कसा बचाव करता येईल? एक गोष्ट म्हणजे, तुम्ही जर आध्यात्मिक साधना करत असाल, तर तुम्ही या गोष्टींबद्दल चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही त्या गोष्टींचा विचार करण्याची सुद्धा गरज नाही. दूसरा मार्ग म्हणजे, तुम्ही रुद्राक्षासारखी काही विशिष्ट संरक्षणं वापरू करू शकता, जे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेपासून संरक्षण करते. पण तुम्ही या गोष्टींबद्दल चिंता करण्याची गरज नाही. आयुष्यावर तुमचे लक्ष केन्द्रित करा आणि पुढे जात रहा. तुम्ही जर साधना करत असाल, तर अजिबात काळजी करू नका, त्याची काळजी घेतली जाईल.
ध्यानलिंग
तुम्ही जर अशा प्रभावाखाली असाल तर तुम्ही ध्यानलिंगाच्या क्षेत्रात येऊन बसू शकता, कारण ध्यानलिंगामधे या सर्व गोष्टींचा परिणाम शून्य करणारे काही पैलू आहेत. तुमच्यावर असे काही केले जात आहे अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर तिथे जाऊन फक्त एक दिवस बसा आणि निघून जा. त्याची काळजी घेतली जाईल. पण तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष न देणे अधिक चांगले कारण तुमचे मनच इतर कोणाहीपेक्षा तुमच्यावर “काळी जादू” करत असते.
ध्यानलिंगाच्या प्रवेशद्वारापाशी वनश्री आणि पतंजलि मंदिरे आहेत. ती ध्यानलिंगापासून पंधरा अंश कोनात असलेल्या जागी आहेत. ती त्यासाठीच त्या ठिकाणी बांधलेली आहेत. अन्यथा वास्तुरचनेच्या दृष्टीकोणातून, मला ती अधिक जवळ बांधायला आवडले असते. साधारणपणे, ज्या लोकांना भूत-पिशाच्चाने पछाडलेले असते किंवा ज्यांच्यावर जादूटोणा झालेला असतो, किंवा इतर काही अशा प्रकारच्या समस्या असतात, त्यांना ज्या प्रकारची समस्या आहे त्यानुसार पुढे किंवा मागे पंधरा अंशाच्या कोनात बसण्यास सांगितले जाते.
ती जागा विशेषतः अशा प्रकारे करण्यात आली आहे जेणेकरून लोकं त्याचा वापर करू शकतील. तुम्हाला त्याची जाणीव असो किंवा नसो, काळ्या जादूसारखा ऊर्जेचा नकारात्मक वापर आणि इतर गोष्टी अस्तित्वात आहेत. पंधरा अंशाचा कोन हे द्वार आहे. तुम्हाला माहिती असो अथवा नसो, प्रवेश करणारा प्रत्येकजण ते बाळगत असणारे नकारात्मक प्रभाव तिथे सोडतो. असे प्रभाव सोडणारे हजारो लोकं आहेत. म्हणूनच ज्या लोकांनी ध्यानलिंगाला भेट दिलेली आहे त्यांना अचानक त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याचे आढळून येते. याचे कारण त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक परिणाम गळून पडलेला आहे.
आपण जेंव्हा “नकारात्मक परिणाम” असे म्हणतो, तेंव्हा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी काहीतरी नकारात्मक करणे असाच त्याचा अर्थ होतो असे नाही. अनेक मार्गांनी, तुम्ही नकारात्मकता घेतली असू शकते. असे पहा, की कोणीतरी फळात विष घालून ते तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही. फळात कदाचित नैसर्गिक विष असू शकते, मी जेंव्हा ते खातो तेंव्हा ते माझ्या शरीरात शिरते. त्याचप्रमाणे आयुष्याचे नकारात्मक परिणाम तुमच्यात अनेक मार्गांनी प्रवेश करू शकतात. कोणीतरी तिथे बसून तुमच्याविरुद्ध कट रचत आहे असे असणे आवश्यक नाही. त्यामुळे ध्यानलिंगाचे प्रवेशद्वार, पंधरा अंशाचा पहिला कोन, याच हेतूने निर्माण करण्यात आला आहे, आणि लोकांनी इतर काहीही इच्छा बाळगण्यापूर्वी या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. त्यांना फक्त त्या साठ ते सत्तर फुट जागेतून चालत जावे लागेल, आणि केवळ तसे करण्यामुळेच या नकारात्मकतेची काळजी घेतली जाईल.