सद्‌गुरु: दुर्दैवाने, पाश्चात्य देशांध्ये तंत्र विद्या म्हणजे अनिर्बंध संभोग अशा आशयाने सादर करण्यात येत आहे. तंत्राचा इतका वाईट अर्थ काढला गेला आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यांना फक्त पुस्तकं विकण्यात रस आहे त्यांनीच या विषयावरची पुस्तकं लिहिलेली आहेत. “तंत्र” या शब्दाचा शाब्दिक अर्थ तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) आहे. हे एक आंतरिक तंत्रज्ञान आहे. या पद्धती व्यक्तिनिष्ठ(सब्जेक्टिव) आहेत वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) नाहीत.

समाजातील सध्याच्या समजुतीमध्ये तंत्र या शब्दाचा अर्थ अपारंपरिक किंवा सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य पद्धती असा आहे. खरं पाहता ते योगापेक्षा वेगळं नाहीये; फरक इतकाच आहे की त्यामध्ये काही विशिष्ट पैलू काही विशिष्ट पद्धतींनी वापरले जातात. हे योगाचंच एक छोटंस अंग आहे ज्याला आपण तंत्र-योग असं म्हणतो.

तंत्र ही एक विशिष्ट क्षमता आहे. तिच्याशिवाय कुठलीही शक्यता असित्वात येणं शक्य नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की आपलं तंत्र कितपत परिपक्व आणि शुद्ध आहे.

"मला लैंगिक गरजा आहेत म्हणून मी तंत्र मार्गाचा अवलंब करणार," या दृष्टीने विचार करणारे लोक मूर्ख आहेत. तंत्रा मध्ये फक्त लैंगिकतेचाच वापर करण्यात येतो असे नाही; त्यात आपल्यातल्या प्रत्येक पैलूचा वापर स्वत:च्या प्रगतीसाठी करण्यात येतो.

दुर्दैवाने, काही लोक चुकीच्या कारणांसाठी या मार्गाकडे आकर्षित झालेत. त्यांना त्यांच्या लैंगिकतेला आध्यात्मिक मान्यता हवी असते म्हणून ते त्या मार्गावर जातात. अध्यात्मिकतेच्या नावाखाली स्वत:लाच मूर्ख बनवण्यात कोणता शहाणपणा आहे? शारीरिक प्रक्रियेला एक शारीरिक प्रक्रिया म्हणूनच हाताळायला हवं; तिला वेगवेगळी नावं देण्याची काहीच गरज नाही.

तंत्र योगाचं सोपं तत्व असं आहे “जे तुम्हाला रसातळाला घेऊन जाऊ शकतं तेच तुम्हाला सर्वोच्य स्तरावर सुद्धा नेऊ शकतं.” सहसा आयुष्यात माणूस ज्या गोष्टींमुळे अधोगतीला लागतो त्या गोष्टी आहेत अन्न, नशा (मद्य ईत्यादी) आणि लैंगिकता. तंत्र-योग याच तीन गोष्टींचा तुमच्या प्रगतीसाठी वाहन म्हणून उपयोग करते. पण जेव्हा लोक काही विशिष्ट पदार्थांचा उपयोग करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांनी काही विशिष्ट स्थितीतच असलं पाहिजे; नाहीतर ते केवळ एक व्यसन होऊन जाईल. ते साध्य करण्यासाठी पराकोटीची शिस्त असणं गरजेचं आहे; अशी शिस्त जी स्वत:ला लावून घेण्याचा प्रयत्न सुद्धा बहुतांश लोकांसाथी अशक्य असतो. हा एक अशा प्रकारचा मार्ग आहे ज्यावर चालतांना १०० पैकी ९९ लोक निव्वळ व्यसनी होऊन जातील.

परंतु, या प्रकाराला वाम-मार्गी तंत्र म्हणतात; ही थोडी अपरिपक्व किंवा अशुद्ध टेक्नॉलॉजी आहे. त्यात अनेक कर्मकांड आणि विधी आहेत. अजून एक वेगळा प्रकार आहे ज्याला दक्षिण-मार्गी तंत्र म्हणतात; ही टेक्नॉलॉजी अत्यंत परिपक्व आणि तावून-सुलाखुन शुद्ध केलेली आहे. हे दोन प्रकार एकमेकांपासुन पुर्णपणे भिन्न आहे.

दक्षिण-मार्गी तंत्र

दक्षिण-मार्गी तंत्र हे मुख्यत: आंतरिक आणि आपल्या आतील जीवन उर्जांशी संबंधित आहे. त्याचा संबंध फक्त आणी फक्त तुमच्याशीच आहे; त्यामध्ये कुठल्याच कर्मकांडाचा किंवा बाह्य कृतीचा समावेश नाही. तसं असेल तर मग त्याला तंत्र विद्या म्हणता येईल का? एक प्रकारे त्याची गणना तंत्रा मध्येच होते पण योग हा शब्द खरतर त्या सगळ्यांना व्यापून टाकतो. आपण योग हा शब्द म्हणतांना कुठल्याच शक्यतेला वगळत नाही, त्यात प्रत्येक शक्यतेचा समावेश आहे. पण काही विकृत लोकांनी ज्यात शरीराचा काही विशिष्ट पद्धतींनं वापर करण्यात येतो असे काही वाम-मार्गी तंत्रच तेवढे पाहिले. त्यातल्या शारीरिक पैलूना अवास्तव महत्व दिले आणि त्यात अगदी विचित्र लैंगिक गोष्टी मिसळून त्याबद्दल पुस्तकं लिहिली आणि त्यालाच त्यांनी “तंत्र” असं नाव दिलं. पण ते “तंत्र” मुळीच नाही.

“तंत्र” म्हणजे आपल्या आंतरिक उर्जांचा वापर काही गोष्टी घडवण्यासाठी करणे. तुम्ही तुमच्या बुद्धीला कुठल्याही गोष्टीचे विश्लेषण करू शकेल इतके अती-तीक्ष्ण करत असाल तर ते एक प्रकारचं तंत्रच आहे. तुम्ही तुमच्या आंतरिक उर्जांचा वापर करून तुमचं हृदय अतिशय प्रेमळ बनवलंत आणि सगळ्यांना भारावून टाकेल इतकं उत्कट प्रेम तुमच्यातून प्रवाहीत होऊ लागलं तर ते सुद्धा एक प्रकारचं तंत्रच आहे. तुम्ही तुमचं शरीर अविश्वासनिय कृत्य करता येऊ शकतील इतकं शक्तीशाली बनवलं तर ते सुद्धा एक प्रकारचं तंत्रच आहे. किंवा तुम्ही तुमचं मन, भावना आणि शरीर यापैकी काहीही न वापरता केवळ आंतरिक उर्जांच्या माध्यमातून काही गोष्टी घडवून आणू शकत असाल तर ते सुद्धा एक प्रकारचं तंत्रच आहे. आणि म्हणून तंत्र म्हणजे काहीतरी विचित्र आणि मूर्खपणाचा प्रकार आहे असं मुळीच नाही.

तंत्र ही एक विशिष्ट क्षमता आहे. तिच्याशिवाय कुठलीही शक्यता असित्वात येणं शक्य नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की आपलं तंत्र कितपत परिपक्व आणि शुद्ध आहे. तुमची आंतरिक ऊर्जा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला १०००० कर्मकांड करावे लागतात की तुम्ही केवळ इथे निवांत बसून ते करू शकता? हा खूप मोठा फरक आहे. तंत्रशिवाय कुठलीच आध्यात्मिक प्रक्रिया घडू शकत नाही; खालच्या दर्जाचं तंत्र की उच्च दर्जाचं? प्रश्न फक्त येवढाच आहे.