सद्गुरु: ज्या क्षणी तुम्ही जसे खरेखुरे आहात त्यापेक्षा इतर काही गोष्टींबरोबर तुमची ओळख जोडून घेता त्या क्षणी तुमच्या मनाची क्रिया सुरू होते. तुम्ही ती थांबवू शकत नाही. तुम्ही प्रयत्न केला आहे का? तुम्ही स्वतःचे मनोरंजन करता आणि फक्त जीवन घालवता. स्वतःचे मनोरंजन करू नका. फक्त चोवीस तास बसून रहा आणि मनाला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल, ते (मन) तुम्हाला कुठे घेऊन जाते. तीन दिवसात तुम्ही वेडे व्हाल. हे म्हणजे जसे तुम्ही खराब अन्न खाल्ले आणि तुम्हाला वात झाला. तुम्ही तो धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर काही उपयोग नाही. तुम्ही फक्त खराब अन्न खाणे थांबवले पाहिजे.

तुमच्याकडे चुकीच्या ओळखी जोडलेल्या आहेत आणि जेव्हा चुकीच्या ओळखी घडतात तेव्हा मनाची क्रिया अविरत सुरू राहते. तुम्ही ती थांबवू शकत नाही, तुम्ही वाट्टेल ते करा. फक्त एवढेच आहे की ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असली तर तुम्हाला ते सामान्य वाटते. ते सामान्य नाही. तुम्ही सामाजिकदृष्ट्या स्वीकारलेल्या पातळीवरील वेडेपणात आहात. प्रत्येक जण असाच आहे, म्हणून तुम्हाला वाटते की हे ठीक आहे. पण तुम्हाला मनात एकही विचार न येता येथे फक्त बसण्याचा आनंद ठाऊक नाही. जर मी स्वतःला 4-5 दिवस बंद करून घेतले तर मला एकही विचार येत नाही. मी काही वाचत नाही किंवा खिडकीबाहेर सुद्धा पाहत नाही. मी एकाही विचाराविना फक्त बसतो.

समजा तुम्ही एखाद्या तेजस्वी सुर्योदया कडे पाहू लागलात , तर तुमचा विचार थोड्या काळासाठी नाहीसा होतो. कारण काही तरी खूप मोठे घडत होते. किंवा तुम्ही तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामांमध्ये गुंतलात, तर त्या वेळी तुमचा विचार काही काळासाठी अदृश्य होतो. ते तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतात.

जीवनाचा स्रोत जो तुमच्यामध्ये कार्यरत आहे तो म्हणजे विचार प्रक्रियेपेक्षा फार मोठी अपूर्व घटना आहे.

तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या गोष्टीच्या संपर्कात येता, तेव्हा लहान-सहान गोष्टी आपोआप नाहीशा होतात. जीवनाचा जो स्रोत तुमच्या मध्ये कार्यरत आहे तो म्हणजे विचारप्रक्रियेपेक्षा फार मोठी अपूर्व घटना आहे. तुम्ही कधीही त्या अपूर्व घटनेच्या संपर्कात आला नाहीत, म्हणून विचार हा इतका महत्त्वाचा बनला आहे. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे तर, तुमचा विचार जर खूप महत्त्वाचा आहे तर त्याचा अर्थ असा की कोठेतरी तुमच्या विकृत आकलनशक्तीमध्ये सृष्टिकर्त्याची निर्मिती महत्त्वाची नाही. तुमची स्वतःची निर्मिती खूप महत्त्वाची बनली आहे. आपल्या आत असलेल्या सृष्टिकर्त्याकडे किंवा त्याच्या निर्मितीकडे तुम्ही लक्ष देत नाही, पण तुम्ही स्वतःच्या निर्मितीत दंग आहात. हा निर्मात्याबद्दल सर्वात वाईट अनादर नाही का? आपल्यात असलेल्या या जीवनस्रोताकडे एक क्षणभरही तुमचे लक्ष वेधले गेले नाही. जर तुम्हाला इथे विचार किंवा काहीही न करता निव्वळ बसण्याचा, फक्त जीवन असण्याचा, आनंद समजला तर आयुष्य काही वेगळंच होऊन जाईल.

निर्मितीच्या स्रोताशी संपर्क साधणे

जेव्हा बाह्य जगाचा विचार केला जातो तेव्हा वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या प्रकारे सक्षम असतात. परंतु जेव्हा आतलेपणाचा विचार होतो तेव्हा आपण सगळे सारखेच सक्षम आहोत. असे घडले नाही, कारण तुम्ही कधीच लक्ष दिले नाही, ते अवघड आहे किंवा अशक्य आहे किंवा तुम्ही अपात्र आहात असे नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या आतील स्वरूपासाठी सारखाच सक्षम आहे. बाह्य कार्यासाठी, भले तुम्हाला इमारत बांधायची असो वा स्वयंपाक करायचा असो वा आणखी काही करायचे असो आपल्यापैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे सक्षम आहे. परंतु जेव्हा आतील वास्तवतेचा विचार केला जातो तेव्हा आपण सर्वजण तितकेच सक्षम आहोत. हे एकाच्या बाबतीत घडले आणि दुसऱ्याच्या बाबतीत घडले नाही कारण त्याने लक्ष दिले नाही. बस इतकेच.

तुमच्यात जे आहे ते स्वतः तुमच्याशिवाय कोणीही नाकारू शकत नाही.

लोक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की आध्यात्मिक प्रक्रिया खूप कठीण आहे, कारण ते चुकीच्या गोष्टी करत राहतात. बाह्य जगात आपल्याला हे कळून चुकले आहे की तुम्ही योग्य गोष्ट केल्याशिवाय काम होणार नाही. आतल्या बाबतीतही हेच आहे. एके दिवशी जवळच्याच एका गावात एक पर्यटक आला आणि त्याने विचारले," ईशा योग केंद्र येथून किती दूर आहे?"

तेथीलच खेड्यातील मुलाने उत्तर दिले,"ते 24,996 मैल दूर आहे."

तो म्हणाला," काय? इतक्या दूर?"

मुलगा म्हणाला," हो तुम्ही ज्या मार्गाने जात आहात त्या मार्गाने. जर तुम्ही मागे वळाल, तर ते फक्त चार मैलांवर आहे."

तुम्ही एका दिशेने पाहत आहात आणि आध्यात्मिक बनण्याचा प्रयत्न करीत आहात- आता हा एक खूप लांबचा मार्ग झाला. तुम्हाला जगाच्या पलिकडे जाऊन परत यावे लागेल. तुम्ही फक्त मागे वळले, तर ते इथेच आहे. कारण जे तुम्ही शोधताय ते तुमच्या आतच आहे, तुमच्या बाहेर नाही. जे तुमच्या आत आहे त्याला स्वतः तुमच्या शिवाय आणखी कोणीही नाकारू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या अंतर्भागात तुम्हाला कोणी प्रवेश नाकारू शकतो का? जर हे होत नसेल तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की, त्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती तुम्ही निर्माण केली नाही. दुसरे कोणतेही कारण नाही.

तुमचे मन ताळ्यावर आहे का?/ तुमचे डोके सरकले आहे का?

आत्ता विचार दडपण्याचा प्रयत्न करू नका. सर्वात मोठी चूक घडली आहे, ती अशी की लोकांनी तुम्हाला सांगितले, "मनावर ताबा मिळवा." एकदा का तुम्ही मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलात, की तुम्ही संपलात! आपण असे म्हणूया की आत्ता तुम्ही 'शांभवी महामुद्रा'चा सराव करत आहात. जर तुम्ही ही प्रक्रिया केली, तर ही तुम्ही व तुमचे शरीर आणि तुम्ही व तुमचे मन यांच्या दरम्यान एक विशिष्ट अंतर निर्माण करील. तुम्ही शांभवी क्रिया करा आणि फक्त बसा- तुमचे शरीर इथे असेल, तुमचे मन बाहेर तिथे असेल, आणि तुम्ही ज्याला "मी स्वतः" म्हणवता ते आणखी कुठेतरी असेल. एकदा हा भेद निर्माण झाला की मग मनाशी कोणताही संघर्ष उरत नाही.

जर कोणी तुम्हाला म्हटले, "तुमचे डोके सरकले आहे". तर अपमानित वाटून घेऊ नका. ते तुम्हाला देऊ शकणारी ही सर्वात मोठी प्रशंसा आहे.

एकदा का तुम्ही डोक्याबाहेर म्हणजेच मनाबाहेर पडलात, की मग काहीच अडचण नाही. जर कोणी तुम्हाला म्हटले, "तुमचे डोके सरकले आहे", अजिबात अपमानित वाटून घेऊ नका. ही त्यांनी तुम्हाला देऊ शकता येणारी सर्वात मोठी प्रशंसा आहे. ते तुम्हाला म्हणत आहेत, " तुम्ही बुद्ध आहात." बुद्ध म्हणजे तो मनापलीकडचा / मनावेगळा आहे. मनापासून वेगळे असणे याला लोक वेडेपणा समजतात. तो वेडेपणा नाही. वेडेपणा हा नेहमीच मनाचा असतो. तुम्ही तुमच्या मनापासून वेगळे झालात तर शंभर टक्के शहाणे व्हाल. तो वेडेपणाचा शेवट आहे. आता तुम्ही जीवन जसे आहे तसे पाहू शकाल.

एकदा का तुम्ही जीवन जसे आहे तसे पाहू लागलात- तसे नाही जसे तुमचे मन परावर्तित करते- मग तुम्ही पहाल की सर्वकाही अगदी लहान आहे. तुमचे मन काय करू शकते, जग काय करू शकते, हे इतके लहान आहे की तुम्ही त्याच्याशी अगदी वाटेल तितके खेळू शकता.आणि तुमची इच्छा नसेल, तर तुम्ही अगदी माघार घेऊ शकता. दोन्ही जाणीवपूर्वक घडतात. तुमच्यामध्ये आता कुठलीही सक्ती उरत नाही. ज्या क्षणी तुम्ही सृष्टीच्या मूळ स्त्रोताचे साक्षी बनता, त्या क्षणी तुमच्यातील सर्व सक्ती दूर होते, मग सर्व काही निवडून केले जाते आणि जीवन सुंदर बनते.

जीवन सुंदर बनते- काय घडते आहे त्यामुळे नाही, तर तुम्ही ते करणे निवडत असल्यामुळे. काहीही सुंदर किंवा कुरूप नाही. जर तुम्ही तुमच्या निवडीने ते करता, आणि त्यात स्वतःला गुंतवता तर सर्व काही सुंदर आहे. जर ते तुमच्यावर लादले गेले किंवा सक्तीचे असेल तर सर्व काही भयानक होते. हेच मनाच्या क्रियाकलापालाही लागू पडते. हे जर जाणीवपूर्वक असते तर तुम्ही मनाशी- जे एक अप्रतिम साधन आहे- खेळू शकला असता, परंतु ते सक्ती करणारे आहे, म्हणून ते तणावपूर्ण बनले आहे.