सद्गुरू म्हणतात, आयुष्यात जेंव्हा आपण ध्येयं ठरवतो तेंव्हा स्वतःला जीवनातील इतर उच्च शक्यतांपासून वंचित ठेवतो.  खरोखरच यशस्वी जीवन जगायचं असेल तर, तिथवर पोचण्याचा एक सोपा मार्ग आहे. त्यासाठी आवश्यक ती सोपी वाटसुद्धा ते दाखवतात. कमी श्रमात अधिक फायदा ही मानसिकता केवळ इतरांची फसवणूक करत नसून सर्वप्रथम ती आपली फसवणूक कशी करते ह्याचं स्पष्टीकरण ते देतात.

जीवनाला सामोरे जाण्याचे दोन मार्ग आहेत; पहिला म्हणजे ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करू लागा. मग कशाप्रकारची ध्येयं ठरवाल तुम्ही? ह्या जगातल्या ज्या गोष्टींमुळे तुम्ही प्रभावित झाला आहात त्यानुसार कि जे तुम्ही आजवर कधी करून पाहिलेलं नाही, किंवा जे आजवर तुमच्या आयुष्यात आलेलं नाही ते?  एकतर तुम्ही इतर कोणासारखं होऊ पाहता किंवा इतर जे काही करत आहेत ते करू पाहता. ज्या ध्येयाप्रती तुम्ही पोचायचा प्रयत्न करत आहात एकतर ते तुम्हाला ठाऊक असलेल्या गोष्टींच्या मर्यादेत बसणारे आहे अथवा त्याची किंचित सुधारित आवृत्ती असणार. पण मग, जे आपल्याला आधीपासूनच ठाऊक आहे ते प्राप्त करण्यासाठी संपूर्ण वर्ष खर्च करणं हे थोडं गैर नाही का? माझा म्हणण्याचा हेतू असा की, जे तुम्हाला ठाऊकच नाही, ते तुम्हाला माहिती झालं पाहिजे. आजवर तुम्ही ज्याचा विचारही केला नाही, त्याचा तुमच्या आयुष्यात प्रवेश झाला पाहिजे. मगच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने संपन्न होईल. जे आपल्याला आधीपासूनच माहित आहे फक्त तेच करण्यात काय अर्थ आहे?

समजा ज्या आर्थिक किंवा भौतिक गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या बाबतीत ध्येय निश्चिती करणं तुम्हाला गरजेचं वाटत आहे; तर तसं तुम्ही नक्की करा. परंतु, वैयक्तिक स्तरावर मला वाटतं की, हा वेळेचा आणि जीवनाचा निव्वळ अपव्यय आहे. समजा तुमच्याकडे लाखभर रुपये आहेत आणि वर्षाच्या शेवटी कोटी रुपये मिळवण्याचं तुमचं ध्येय आहे. तसे ते नाही मिळाले तरी त्या आशेवर तुम्ही जगलात ही एक चांगली बाब ठरते. परंतु समजा, जर ही ठरवलेली रक्कम तुम्हाला जानेवारी महिन्यातच मिळाली, मग उरलेले महिने तुम्ही काय करणार? नक्कीच तुम्हाला दहा कोटी मिळवावेसे वाटतील. कोणे एके काळी केवळ एक रुपया सुद्धा तुम्हाला समाधान देत असे. पण त्याच समाधानाकरता तुम्हाला आज दहा कोटींची आवश्यकता वाटत आहे. हा जीवन विकास म्हणता येणार नाही. ह्याला भाववाढ/महागाई म्हणावी लागेल.

तर वास्तविक पाहता, तुम्ही आयुष्यभर केवळ महागाई निर्माण करता. ही भाववाढ ना अर्थव्यवस्थेला उपयुक्त आहे ना जीवनाला. भौतिकशास्त्राच्या भाषेत ह्या वाढीचा अर्थ काहीतरी भरणे- जसं की गाडीच्या चाकात हवा भरणे- ह्या अर्थाने घेतला जातो. पण अर्थशास्त्रानुसार ही वाढ म्हणजे काही विशिष्ट घटक आपल्या आवाक्याच्या बाहेर जाणं. म्हणजेच, तुम्ही जाणीवपूर्वक आपल्या जीवनात ही वाढ निर्माण करत आहात-हा काही चतुराईचा मार्ग झाला का? वेळ-अधिष्ठित ध्येय निश्चित करून तुम्ही कदाचित काही गोष्टी प्राप्त केल्या असतीलही, पण तुमच्या जीवनाचा एकंदरीत विचार करता, त्या गोष्टींना तितकसं महत्व नसेल हेही खरं.

म्हणूनच, वार्षिक ध्येयं ठरवण्याऐवजी असं का नाही करत?‘आज दिवस संपतांना मी अधिक आनंदी असेन, अधिक उत्साहित असेन, अधिक, चांगला असेन’, असा संयमित विचार करा. हे काही जीवनध्येय नाही, हो ना? उलट, त्याचं सिंहावलोकन करणं सोपं जाईल. दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःला विचारू शकता की,‘आज मी कालच्यापेक्षा अधिक बरा आहे का?’ केवळ ह्या चोवीस तासांकडे पहा. त्यामुळे तुम्ही अधिक सजग व्हाल. तुम्ही निव्वळ आनंदी किंवा उत्साही होणं हा इतका सीमित विचार ह्यात नाही. तर, तुमच्या जीवनातील अधिकाधिक गोष्टींकडे तुम्ही अधिक सजग होणं ह्यातून अपेक्षित आहे.