यश म्हणजे अंतिम शिखर नव्हे!
@सदगुरु या आठवड्याच्या स्पॉटमध्ये, आयुष्यातल्या यशाचे घटक उलगडून दाखवत आहेत. यशस्वी होण्यासाठी जे काही लागते, ते तुमच्यापाशी आहे का ? गुणवत्ता व यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आणि तुम्हाला जे व्हावेसे वाटते ते होणे यांतील गुणोत्तराचा विचार आपण करतो का? सदगुरु म्हणतात, “यश हे प्राप्त केलेल्या विशिष्ट, अंतिम अशा निष्कर्षामध्ये नसते तर तुम्हाला ज्याची खरी ओढ आहे, त्यासाठी आनंदी आणि अथक प्रयत्न करण्यामध्ये असते.”
मी नुकताच रशियातल्या फिफा वर्ल्ड कपहून परतलो. उपांत्य आणि अंतिम सामन्यांमधील वातावरण, तीव्रता आणि थरार केवळ अविश्वसनीय होते. या स्पर्धेमध्ये मेस्सीसारखे प्रस्थापित स्टार गोल करण्यात अपयशी ठरले तर एम्बाप्पेसारखे नवे स्टार उजळून उदयाला आले. नामांकित संघ निकालात निघाले, इतर देश वर उगवले. मला वाटते, फुटबॉलचे प्रशिक्षण सुरु करण्याच्या दृष्टीने योग्य अशा वयातले लक्षावधी तरुण असलेल्या भारतासारख्या देशाने भविष्यकाळातल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणे अगदी शक्यप्राय आहे. तर मग यशस्वी होण्यासाठी काय लागते ? त्यातली एक गोष्ट म्हणजे गुणवत्ता, दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.
कोणत्याही क्षेत्रात - कोणी महान फुटबॉलपटू असेल, महान कलाकार, महान अभिनेता, महान संगीतकार किंवा आणखी कोणीही असेल - मी म्हणेन की त्यांच्या यशाचा ऐंशी टक्के भाग प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा आणि वीस टक्के भाग गुणवत्तेचा असतो. केवळ असामान्य गुणवत्ता असलेले असे थोडे असतात - इतरांना मात्र तासनतास सराव करावा लागतो. एखाद्या फुटबॉलपटूला जागतिक पातळी गाठण्यासाठी हजारो तासांचा सराव करावा लागतो. वर्ल्ड कपमध्ये एखादा गोल करण्यासाठी बरीच वर्षे ते दररोज चार ते सहा तास बॉलला किक मारत आलेले असतात.
तुम्ही मोठय़ा अभिनेत्यांकडे पाहिले तर .... रंगमंचावर दोन तास काम करण्यासाठी त्यांनी दररोज बारा, पंधरा वर्षेसुध्दा सराव केलेला असू शकतो ... तेव्हा त्याचा परिणाम दिसतो. कुठल्याही गोष्टीसाठी असामान्य गुणवत्ता असणे आवश्यक नसते. तुम्ही पूर्ण मोकळेपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही ज्याची निवड केली असेल ते होऊ शकता. एकदा, मी शाळेत असताना एक प्रश्न विचारण्यात आला ... तुम्ही काय करु शकता आणि काय करु शकत नाही ... करण्यासारख्या ब-याच गोष्टी माझ्याकडे होत्या, त्यामुळे मी फार कंटाळलो होतो पण काय करायचे, याबाबतच केवळ ते बोलत होते. नंतर मी सांगितलं, “मला पुरेसा पैसा आणि वेळ देण्यात आला तर मी चंद्रापर्यंत एक जिना बांधेन.” त्यांना वाटले, हा उध्दटपणा आहे. मी सांगितलं, “असे काही कोणी केले नसेल पण पुरेसा पैसा आणि वेळ असेल तर ते करता येईल.” तशी संधी येते किंवा नाही, एवढाच प्रश्न असतो. अन्यथा असे काय आहे जे माणूस करु शकत नाही ?
संधी चालून येते का नाही, हे सुध्दा जगातल्या वेगवेगळ्या वास्तवांवर अवलंबून आहे. संधी चालून आली तर तुमची त्यासाठी तयारी आहे का ? यश आणि अपयशातला तोच फरक आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे उत्कटता आणि इच्छा असणे आवश्यक असते. जो कोणी आयुष्याबद्दल उत्कट असतो, त्याला मोकळा वेळ नसतो. नेहमीच काहीतरी करण्यासारखे असते - ते कामच असते असे नाही. तुम्हाला ज्यात स्वारस्य आहे, ते तुम्ही केले तर कधीच ते काम वाटत नाही. त्याचे कधी ओझे वाटत नाही. ते करताना तुम्हाला आनंद वाटत असेल तर दिवसाचे चोवीस तास ती गोष्ट तुम्हाला कराविशी वाटते. तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल - वाचन, गाणे, नृत्य, नाटक, काहीतरी निर्माण करणे किंवा काहीतरी नवे शोधून काढायचे असेल - तर उत्तमच ! पण नुसतेच रिकामटेकडेपणाने राहायचे? तुमचा मेंदू आणि तुमच्या शरीराला अशा पध्दतीने सराव-स्वाध्याय झाला पाहिजे, की त्यांचे कार्य त्यांच्या कमाल क्षमतेने होत राहील.
तुमच्याकडे करण्यासारखे काहीही नसेल तर त्याचा अर्थ तुमच्या आयुष्यात साचेबंदपणा आहे. तुमच्या बाबतीत असे कधीही घडणार नाही अशी मला आशा आहे. तुमचा आयुष्यप्रवाह नदीसारखा वाहात असेल तर नेहमीच काहीतरी करण्यासारखे असेल. आणि तुम्हाला हे कळण्याआधीच आयुष्य संपलेले असेल. तुम्ही शंभर वर्षे जगलात आणि सगळा वेळ त्यात व्यतीत केलात तरीसुध्दा मानवी बुध्दी आणि मानवी जाणीव यांच्या पूर्ण क्षमतेचा आढावा घेण्याइतपत पुरेसा वेळ तुमच्याकडे असणार नाही. तर आता ही वेळ जगण्यासाठी आहे, आराम करण्यासाठी नाही. आम्ही तुम्हाला चिरविश्रांती देऊ तेव्हाच आराम मिळेल. यश हे प्राप्त केलेल्या विशिष्ट, अंतिम अशा निष्कर्षामध्ये नसते तर तुम्हाला ज्याची खरी ओढ आहे, त्यासाठी आनंदी आणि अथक प्रयत्न करण्यामध्ये आहे.