प्रश्नकर्ता - सद्गुरू, असं का आहे, तुम्ही जिथं कुठं जाता, तुम्ही त्याच एका विशिष्ठ पद्धतीनं बसता? डाव्या पायातलं सॅंडल काढून, डाव्या पायाची मांडी घालून आणि उजवा पाय जमिनीवर. ही तुमची स्टाईल आहे का कुणीही बसण्याची ही उत्तम पद्धत आहे?

सद्गुरू - तुम्ही अजूनही भारतीय शैलीचं टॉयलेट वापरता?

प्रश्नकर्ता - हो

सद्गुरू - तुम्ही एका विशिष्ट पद्धतीनं बसता? का? कारण या शरीराची घडण त्याच प्रकारची आहे. कुठल्यातरी युनिव्हर्सिटीनं याचा अभ्यास केला आणि ते म्हणाले की, 'शौचाला बसण्याचा हा उत्तम मार्ग आहे", कारण तुमच्या मांड्या पोटाच्या जवळ जाऊन, जे काही बाहेर जायची गरज आहे ते सहज बाहेर जातं. जर जे बाहेर जायची गरज आहे ते बाहेर गेलं नाही, तर ते हळूहळू तुमच्या डोकयात जातं.

शरीरात योग्य ताळमेळ आणणे

योग्य विज्ञानात, आपण शरीराची काही ठराविक आसनं ठराविक कृतींसाठी सहायक असतात हे ओळखलं. किंवा दुसऱ्या शब्दात, ज्याला आपण हठयोग म्हणतो, ही शाररिक आसनं, शरीर अश्या प्रकारे घडवण्यासाठी आहेत, की तुमचं शरीर भूमितीच्या दृष्टीनं एका विशिष्ट अचूकतेपर्यंत पोहोचतं. तुमच्या शरीराची भूमिती वैश्विक भूमितीशी संलग्न होतो, ज्यामुळे तुम्ही कायम संतुलित असता, तुमचं संतुलन कधीच ढळत नाही.

 

तुम्ही किती संतुलित आहात, तुम्ही गोष्टी किती स्पष्टपणे पाहू शकता आणि तुम्ही किती उत्तमपणे गोष्टी करू शकता, हे तुमचा ताळमेळ किती अचूक आहे यावर अवलंबून आहे. जर तुमचा ताळमेळ अगदी अचूक असेल, लोकांबरोबर, झाडांबरोबर, तुमच्या आजूबाजूच्या जीवनाबरोबर, तर तुमचं जगातलं कार्य किती सुरळीत आणि घर्षणमुक्त आहे ते सर्वस्वी तुम्ही ठरवू शकता. 

मी कायम असा बसत नाही - फक्त बोलायचं असतं तेव्हा. सिद्धासन नावाचं एक आसन आहे. याचे अनेक पैलू आहेत. एक साधी गोष्ट म्हणजे, डाव्या पायाच्या टाचेचा एक भाग ज्याला वैद्यकीय शास्त्रात 'ऍकिलीस हील' असं म्हणतात. तुम्ही ऍकिलीस बद्दल ऐकलंय?

तर तुमच्या डाव्या पायाची टाच किंवा 'ऍकिलीस हील', तुमच्या मूलाधाराच्या संपर्कात हवी. यानं तुमचे विचार सुस्पष्ट, भावना मुक्त, आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं आकलन अगदी स्पष्ट होतं.

जेव्हा तुम्ही तुमच्या ऍकिलीस हील चा हा भाग तुमच्या मूलाधाराच्या संपर्कात ठेवता, तेव्हा एक अश्या

प्रकारचं संतुलन तुमच्या आत येतं ज्यामुळे  तुमचं मन कुठल्याही विशिष्ट बाजूला झुकत नाही.

तुम्ही ऐकलंय की ऍकिलीसचा मृत्यू त्याच्या टाचेला बाण लागून झाला. तुम्हाला वाटतं, टाचेला इजा होऊन, कुणाचा मृत्यू होऊ शकतो? पण ऍकिलीसचा मृत्यू असा झाला. भारतातहि अजून एका व्यक्तीचा मृत्यू याच प्रकारे झाला, ऍकिलीसच्याही आधी - कृष्ण. कुणाला मारण्याचा हा अगदी प्रगत मार्ग आहे. कुणाचा गळा कापून किंवा डोकं फोडून नाही. केवळ त्यांच्या डाव्या पायाच्या टाचेवरच्या एका बिंदूवर इजा करून. आपल्या शरीरातली ऊर्जा एका ठराविक व्यवस्थेनुसार वाहते. जर तुम्ही तुमचं 'ऍकिलीस हील' तुमच्या मूलाधाराच्या संपर्कात ठेवलं, तर असं काही संतुलन निर्माण होतं की, तुमचं मन कुठल्याही ठरविक बाजूला झुकत नाही.   

कुठलीही बाजू न घेणं

आपल्या सर्वांची काही ठराविक मतं, कल्पना आणि विचारसरणी असते. तुमचा जीवनाचा अनुभव आणि तुमच्या मनावर उमटलेले ठसे, तुमच्या दृष्टीला प्रभावित करतात. तुम्हाला हे आवडतं. तुम्हाला ते आवडत नाही, तुम्ही या व्यक्तीवर प्रेम करता, तुम्ही या  व्यक्तीचा तिरस्कार करता - हे सगळं कारण तुम्ही तुमच्या मनात सदैव कुठली न कुठली बाजू निवडत असता. पण तुम्हाला खरंच जीवन जाणायचं असेल, तर सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही कुठलीच बाजू न घेणं. तुमच्या मध्ये, आयुष्याची प्रत्येक क्षणी, सर्व गोष्टींकडे, अगदी नव्यानं पाहण्याची तयारी हवी.

माझ्याबरोबर तीसहून अधिक वर्ष राहिलेले लोक आहेत. माझ्या बरोबर रोज काम करणारे आणि असं बरंच काही. पण अजूनही मी माझ्या मनात त्यांच्याबद्दल एकही मत तयार केलं नाहीये.

हे लोकांना समजणं फार अवगड आहे. माझ्याबरोबर तीसहून अधिक वर्ष राहिलेले लोक आहे. माझ्या बरोबर रोज काम करणारे आणि असं बरंच काही. पण अजूनही मी माझ्या मनात त्यांच्याबद्दल एकही मत तयार केलं नाहीये. केवळ कुठलं काम करताना, मी कदाचित त्यांच्या क्षमतेकडे बघतो. पण माझं त्यांच्या बाबत कुठलंही मत नाही. एवढ्या वेळात, मत तयार व्हायला हवं, पण मी तसं होऊ देत नाही, कारण हाच आध्यात्मिक प्रक्रियेचा गाभा आहे, की सतत जीवनाच्या प्रत्येक अंशाकडे एक संभावना म्हणून बघणं. 

संभावनेमध्ये आणि वास्तवामध्ये अर्थातच अंतर असतं. काही जणांकडे ते अंतर सर करण्याचं धाडस आणि चिकाटी असते, काहींकडे नसते. पण प्रत्येक जीव हा एक संभावना बाळगून असतो. जर तुम्ही त्या संभावानेचं दार उघडं ठेवलं, तर तुम्ही कुणाबद्दलही कुठल्याही प्रकारचं मत तयार करणार नाही. 

चांगलं, वाईट, भयानक - अशी मतं निर्माण करू नका; ते अत्ता जे आहेत तसं केवळ त्यांच्याकडे बघा. या क्षणी ते कसे आहेत, एवढंच माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ते काल कसे होते याच्याशी माझं काही घेणंदेणं नाही. उद्या तुम्ही कसे असाल, बघूया. उद्याचा दिवस आपण निर्माण करायला हवा, त्याबद्दल अत्ताच काही निशचित करायला नको. 

योग्य भूमिती साधणं

तुमच्या शरीराची एक विशिष्ट भूमिती आहे. अत्ता सध्या, पाश्चिमात्य संस्कृती मध्ये असा प्रचार केला जातोय की, 'योग म्हणजे शरीराला लवचिक बनवण्यासाठीचा व्यायाम आहे". असं असेल तर मी म्हणतो, त्याऐवजी  टेनिस खेळा, पळायला जा, डोंगर चढा किंवा अजून काही. योग हा फिटनेस बद्दल नाहीये. शरीर यामुळे सशक्त होणं, हा केवळ त्याचा एक परिणाम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनासाठीची अचूक भूमिती साधणं, कारण या भौतिक विश्वात सर्वकाही अचूक भूमितीवर अवलंबून आहे.    

एखादी इमारत आज आपल्या डोक्यावर कोसळणार की इथं दीर्घ काळासाठी उभी राहणार हे मुळात ती भूमितीच्या दृष्टीनं किती अचूक आहे यावरून ठरतं. आपलं शरीर, ही ग्रहमाला आणि पूर्ण ब्रह्मांडाच्या बाबतीतही हेच लागू आहे.

पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, ते काही तिला कुठल्या दोरीनं बांधलंय म्हणून नाही, तर केवळ भूमितीच्या अचूकतेपायी. जर या भूमितीत जरासाही दोष निर्माण झाला, तरी हे कायमसाठी संपून जाईल. आणि हेच तुमच्याबाबतही खरं आहे. जर तुम्ही तुमची मूलभूत भूमिती बिघडू दिली, तर संपलात तुम्ही.

जर तुम्हाला केवळ फिट राहायचं असेल तर टेनिस खेळा, पळायला जा, डोंगर चढा किंवा अजून काही. योग हा फिटनेस बद्दल नाहीये. शरीर यामुळे सशक्त होणं, हा केवळ त्याचा एक परिणाम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनासाठीची अचूक भूमिती साधणं, कारण या भौतिक विश्वात सर्वकाही अचूक भूमितीवर अवलंबून आहे.

हे फार महत्वाचं आहे की अगदी लहान वयापासूनच, तुम्ही अचूक भूमिती साधण्यासाठी योग्य गोष्टी कराव्या. यानं तुम्ही जीवनासाठी पूर्णपणे सक्षम होता. जे लोक असा विचार करत आहेत की त्यांच्या आयुष्यात फक्त चांगल्याच गोष्टी घडाव्या, ते नक्कीच जीवनासाठी सक्षम नाहीयेत. कारण जर तुम्हाला अगदी भयावह प्रसंगांना देखील आनंदानं सामोरं जाणं माहित नसेल, तर तुम्ही सर्व संभावना नष्ट कराल. तो थोडाअधिक त्रास टाळण्यासाठी तुम्ही जीवनाच्या अगदी उत्तुंग संभावनांनाच टाळून जाल. भूमितीच्या दृष्टीनं तुम्ही एक विशिष्ट स्तराचा ताळमेळ साधला असेल, तरच कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायची तुमची तयारी असेल.     

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर. 

Youth and Truth Banner Image