आध्यात्मिक मार्गावर असताना आपले स्वतःचे मन खरोखरच आपल्या विरुद्ध कार्य करते का या प्रश्नाचे उत्तर सद्गुरु देतात.

प्रश्नकर्ता: आपले मन खरोखरच सदैव आपल्या विरोधात असते का, आणि तसे जर असेल, तर तसे कशामुळे होते ?

सद्गुरु: आता तुमच्या मनामुळेच तुम्ही आध्यात्म हा शब्द ऐकला आहे. बरोबर? तुमच्या मनामुळेच मी आत्ता तुमच्याशी काय बोलतो हे समजून घेण्यास तुम्ही समर्थ आहात. म्हणून जो तुमचा मित्र आहे, त्याला तुमचा शत्रू बनवू नका. कृपया तुमच्या आयुष्यात जरा डोकावून पहा आणि मला सांगा, तुमचं मन तुमचा मित्र आहे की शत्रू? तुम्ही जे कोणी आहात ते फक्त तुमच्या मनामुळेच आहात, नाही का? तुम्ही गोंधळून गेला आहात ही तुमची करणी आहे. जर तुम्हाला तुमच्या मनाशिवाय रहायचे असेल तर ते अगदी सोपे आहे; तुम्हाला तुमच्या डोक्यावर एक मोठा फटका मारणे आवश्यक आहे. मन ही काही समस्या नाही. ते कसे हाताळायचे हेच तुम्हाला माहित नाही, ही समस्या आहे. म्हणून मनाबद्दल बोलू नका, तर ज्या अकुशलतेने तुम्ही ते हाताळण्याचा प्रयत्न करत आहात त्याकडे लक्ष द्या. एखाद्या गोष्टीचे अपूर्ण ज्ञान किंवा समज नसताना, जर तुम्ही ती हाताळण्याचा प्रयत्न केला तर सर्वकाही गोंधळून होईल.

मन ही समस्या नाहीये मुळीच. ते कसे हाताळावे हेच तुम्हाला माहित नाही, हीच खरी समस्या आहे.

उदाहरणार्थ, तांदूळ उगवणे, तो एक मोठा पराक्रम आहे असे तुम्हाला असे वाटते का? एक साधा शेतकरी ते पिकवत आहे. मी तुम्हाला 100 ग्रॅम भात, आवश्यक तेवढी जमीन आणि तुम्हाला पाहिजे असेल ते सर्वकाही देईन. तुम्ही एका एकरात भात लावा आणि ते मला द्या, तुमच्या लक्षात येईल त्यासाठी किती कष्ट करावे लागतात ते. भात उगवणे ही एक मोठी गोष्ट आहे म्हणून नाही, तर तुम्हाला त्याबद्दल काहीही समजत नाही आणि माहित नाही, म्हणूनच ते इतके कठीण आहे. त्याचप्रमाणे  अवकाशाप्रमाणे आपले मन रिकामे ठेवणे ही काही कठीण गोष्ट नाही, ती तर एक सर्वात सोपी गोष्ट आहे. परंतु तुम्हाला त्यातले काहीही समजत नाही, म्हणून हे खूप अवघड वाटतं. आयुष्य असे घडत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट व्यवस्थित हाताळण्याची क्षमता प्राप्त करायची असेल तर ती काय आहे संपूर्ण समज आपल्याला असणे आवश्यक आहे. अन्यथा काही वेळा अपघाताने आपण काही गोष्टी व्यवस्थितपणे करू शकता. पण प्रत्येक वेळी तसे घडणार नाही.

एक दिवस एका अगदी कट्टरपंथी चर्चमध्ये, पाद्री प्रत्यक्ष सेवेच्या आधी रविवारच्या शाळेतल्या मुलांकडे जात होता. आपणास माहित आहे की, ती सर्व अगदी उत्साही मुलं आहेत, तर तो खरोखरच त्यांना मनापासून काहीतरी सांगत होता. पण त्यांना मुले किंचित हिरमुसलेली दिसली म्हणून त्यांना एक कोडे घालून वर्गात ते थोडा अधिक रस घेतील असा विचार त्यांनी केला. आणि त्यांनी कोडे घातले, “आता मी तुम्हाला एक कोडे घालणार आहे.असे कोण आहे जे हिवाळ्यासाठी शेंगदाणे गोळा करते, झाडांवर चढते, इकडेतिकडे उड्या मारत फिरते आणि त्याला फरची शेपटी असते? ”एका चिमुरडीने तिचा हात वर केला. "ठीक आहे, ते कोण आहे ते मला सांग." ती म्हणाली, "याचे उत्तर येशू आहे, हे मला माहिती आहे, पण मला वाटतं ती खार आहे." म्हणून आतापर्यंत तुम्हाला याप्रकारे ज्ञान प्राप्त झाले
आहे. आपण प्राप्त केलेले बहुतेक शिक्षण या संदर्भात आहे. काय योग्य व अयोग्य आहे, काय ठीक आहे काय ठीक नाही, देव आणि भूत काय आहे, सर्व काही कोणत्या ना कोणत्या संदर्भात आहे, आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवावरून नाही.

एकदा आपण जे नाही त्या गोष्टीसह आपली ओळख जोडली, की मन ही एक एक्स्प्रेस ट्रेन आहे जी आपण थांबवू शकत नाही. हवं ते करा, पण ते काही थांबणार नाही.

तर मग तुम्ही या मनाला कसे थांबवू शकता? तुम्ही जे नाही, त्या गोष्टींनी स्वत:ची ओळख जोडून घेतलेली आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला तुम्ही जे नाही अशा गोष्टीसोबत जोडता, त्या क्षणी आपले मन हे अखंडपणे चालू राहणारच. समजा तुम्ही बरेच तेलकट पदार्थ खाल्ले आहेत, तर पोटात ग्यास होणारच. आता तुम्ही तो रोखून धरण्याचा प्रयत्न केला तरीही, तुम्ही तसे करू शकत नाही. तुम्ही जर योग्य अन्न खात असाल तर तुम्हाला काहीही रोखून ठेवण्याची गरज भासणार नाही, शरीर छान असेल. तसेच मनाचे देखील आहे - तुम्ही जे नाही त्या गोष्टींशी तुम्ही तुमची चुकीची ओळख जोडून घेतलेली आहे. एकदा तुम्ही चुकीच्या ओळखींशी ओळखले जाऊ लागलात, की मग तुम्ही मनाला रोखू शकत नाही.

तुम्ही जर स्वतःची ओळख तुम्ही जे नाही त्या प्रत्येक गोष्टीपासून दूर नेलीत, तर तुमचे मन फक्त रिकामे आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला ते वापरायचे असेल, तर तुम्ही ते वापरू शकता; अन्यथा ते रिकामेच राहील. आणि ते तसेच असायला हवे, त्याचे इतर कोणतेही स्वरूप असणे अपेक्षित नाही. पण सध्या, तुम्ही तुमची ओळख तुम्ही नाही अशा असंख्य गोष्टींसोबत जोडून घेतलेली आहे. तुम्ही किती गोष्टींसोबत तुमची ओळख जोडून घेतली आहे ते पहा, तुमच्या भौतिक शरीरापासून सुरुवात करा. तुम्ही तुमची ओळख अनेक गोष्टींसोबत जोडून घेतली आहे आणि तुम्ही तुमचे मन थांबवायचा विचार करत आहात, ध्यानस्थ होण्याचा प्रयत्न करत आहात – पण ते शक्य नाही. एकतर तुम्ही तुमच्या ह्या ओळखी नष्ट करून काढून टाका नाहीतर आयुष्यच तुमच्यासाठी तसे करेल. तुम्ही स्वतःची ओळख ज्या गोष्टींसोबत जोडून घेतली असेल, जेंव्हा मृत्यू तुमच्यासमोर येऊन उभा राहील, तेंव्हा या सार्‍या ओळखी आपसूकच गळून पडतील, नाही का? म्हणून जिवंतपणी तुम्ही जर इतर कोणत्या मार्गाने हे शिकला नाहीत तर मृत्यूच येऊन तुम्हाला शिकवेल की तुम्ही स्वतःला जसे ओळखता तसे तुम्ही नाही. तुम्हाला काही समजत असेल, तर तुम्ही आत्ताच हे शिकाल की हे असे नाही. तुम्ही आत्ता शिकला नाहीत, तर मृत्यू येऊन तुम्हाला तुमच्या ओळखीपासून दूर करेल.

म्हणून तुम्ही स्वतःची ओळख दूर करणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी सकाळी फक्त 10 मिनिटे वेळ घालवा आणि तुम्ही स्वतःची ओळख ज्या गोष्टींसोबत जोडून घेतली आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही ते नाही अशा किती गोष्टी आहेत ते पहा. तुम्ही किती हास्यास्पद गोष्टींसोबत आणि हास्यास्पद मार्गांशी तुम्हाला स्वतःला जोडून घेतले आहे हे पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुमच्या घरात तुमच्या भोवताली असलेल्या या सर्व गोष्टी फक्त मानसिकदृष्ट्या मोडून काढा आणि ज्या गोष्टींसोबत आपली ओळख जोडली जाते त्या तुम्हाला समजतील. छोट्या वस्तू, मोठ्या वस्तू, तुमचं घर, तुमचं कुटुंब या सर्व गोष्टी मानसिकरित्या मोडून काढा आणि पहा. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला दुखः होते, त्या गोष्टींसोबत तुम्ही नक्कीच जोडले गेले आहात. तुम्ही जे नाही, त्यासोबत एकदा तुमची ओळख जोडली गेली, की मन म्हणजे एक वेगवान आगगाडी बनते जी तुम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही काहीही केलेत, तरीही तुम्ही तिला थांबवू शकत नाही. म्हणजे तुम्ही मनाचा एक्सिलेटर वाढवत जाता आणि
त्याचवेळी त्याला ब्रेक लावावेसे वाटतात – हे तसं होत नाही. अगोदर ब्रेक लावण्याआधी एक्सिलेटरवरुन तुमचा पाय काढून घेणे गरजेचे आहे.