माझे गुरु जर मला भेटले, तर हा माझा शेवटचा जन्म असेल का?
प्रश्नकर्ता सद्गुरूंना विचारत आहे, की एखाद्याची त्याच्या गुरूंशी झालेली भेट म्हणजे त्याची पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका झाली असे समजायचे का?
प्र: जर एखादी व्यक्ती तुमच्या संपर्कात आली, तर हा त्या व्यक्तीचा शेवटचा जन्म आहे असे आपण समजू शकतो का?
सद्गुरु: कोणीतरी काही काळापूर्वी मला विचारले होते, “फक्त ब्रम्हचारी लोकंच तुमचे शिष्य आहेत का?”होय, केवळ तेच माझे शिष्य आहेत. जेंव्हा मी ब्रम्हचारी असे म्हणतो, तेव्हा अधिकृतरित्या दीक्षा मिळालेल्या व्यक्ती असे मला म्हणायचे नाहीये. ते औपचारिक प्रक्रियेतून गेलेले आहेत किंवा नाही हा मुद्दाच नाहीये. काही ना काही प्रकारे ते त्या वाटेवर चालत आहेत.फक्त ब्रम्हचारी व्यक्तीच माझे शिष्य आहेत. ते जर ब्रम्हचारी नसतील, तर ते माझे शिष्य असूच शकत नाहीत. त्यांना इतर कोणत्या गोष्टीत रस असेल, तर शिष्यत्वाचा प्रश्नच कुठे येतो? ते कोणाचेच शिष्य असू शकत नाहीत. कोणाचेही शिष्य असणे हे कोणा एका व्यक्तीशी संबंधित नाही. तुम्ही या व्यक्तीचे किंवा त्या व्यक्तीचे शिष्य नाही. तुम्ही जर शिष्य आहात, तर तुम्ही शिष्य आहात, येवढेच. तुम्ही जर भक्त आहात, तर तुम्ही भक्त आहात. तुम्ही या देवाचे भक्त किंवा त्या देवाचे भक्त असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – तो केवळ एक मूर्खपणा आहे. तुम्ही भक्त आहात येवढेच पुरेसे आहे. तो एक गूण आहे.
अंधकारमय बनणे
असे कित्येकजण आहेत, जे माझ्यावर डोळे खिळवून बसलेले असतात पण ते मला गुरु मानत नाहीत. पुढच्या वेळेला सुद्धा ते कदाचित इथे येतील.कदाचित मी येथे नसेलही, पण ते इथेच घुटमळत राहतील, कारण त्यांनी एक अनुभव घेतलेले आहे, आणि त्यांना तो पुन्हा घ्यायचा आहे. “गुरु” म्हणजे अंधार दूर करणारा” “गु” म्हणजे अंधार, “रु” म्हणजे घालविणे, दूर करणे. जेंव्हा तुम्हाला गुरु आहेत असे तुम्ही म्हणता, तेंव्हा तुमच्यातील अंधार दूर झालेला असतो. मग तुम्ही या ठिकाणी पुन्हा कशासाठी याल? तुम्ही प्रकाशमान झाल्यामुळे तुमच्यातील अंधार दूर झालेला नसतो. तुम्ही स्वतःच पूर्णतः रिक्त, शून्य झाल्यामुळे तुमच्यातील अंधार दूर झालेला असतो, तुम्ही स्वतःच अंधार बनता, मग काहीही दूर करायची गरजच भासत नाही. तुम्ही त्याच्यापासून दूर झालात, तर अंधार एक भयंकर गोष्ट आहे. पण जर तुम्हीच अंधार बनलात, तर अंधार ही एक अमर्याद, अनंत गोष्ट आहे.
अंधार, ही एक भयंकर गोष्ट आहे कारण तुम्ही या ठिकाणी कशाचा तरी एक छोटा भाग म्हणून जगत आहात. तुम्हीच जर अंधार बनलात, तर ती अमर्याद गोष्ट आहे. जर मी तुम्हाला “अमर्याद बना” असा आशीर्वाद दिला, तर तुम्हाला खूप छान वाटेल. पण मी जर तुम्हाला “अंधार बना” असा आशीर्वाद दिला, तर तुम्ही म्हणाल हा तर एक शाप आहे. ते तसे नाहीये. अंधार अमर्याद आहे, आणि अमर्यादित्व हाच अंधार आहे.
अंधार दूर करणारा याचा अर्थ असा नाही, की तो तुमच्यामध्ये उजेडासाठी दिवा ठेवेल. तुम्हाला काहीतरी पाहता यावे यासाठी विद्वान आणि शिक्षकांनी तुमच्यात उजेड पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण गुरु तुमच्यात उजेड पाडण्यासाठी दिवा लावण्याचा प्रयत्न करत नाही. ते तुम्हाला कसे मिटवून टाकता येईल ते पाहत आहेत. तुम्हाला जर गुरु सापडले, तर त्याचा असा अर्थ आहे, की तुमच्यातील अंधार मिटवून टाकलेला आहे कारण तुम्ही सुद्धा त्याचाच एक भाग बनलेले आहात. तुमच्यासाठी अंधार नाहीच आहे; तुमच्यासाठी केवळ अमर्यादीत्व आहे.
निरंतर हुंगत बसू नका
तुम्हाला तुमचे गुरु भेटले असतील, तर तुम्ही पुन्हा या ठिकाणी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु तुम्ही त्यांना खरोखरच गुरु म्हणून भेटले नसाल, तुम्हाला फक्त थोडीफार त्यांच्या बद्दल आवड निर्माण झालेली असेल, पण त्यांच्यात विलीन होण्यासाठी पुढचे पाऊल टाकायचे तुमचे धाडस होत नसेल, तर ती वेगळी गोष्ट आहे. जेंव्हा तुम्हाला गुलाबाचा वास आवडतो, जिथे कुठे गुलाब असतील तिथे तुम्ही जाता. पण सदैव हुंगत फिरू नका. त्यामध्ये पाऊल टाकून त्यात विलीन होण्याची वेळ आलेली आहे, कारण तुम्ही तसे केले नाहीत, तर तुम्ही त्याचा वापर तो ज्यासाठी आहे त्यानुसार करत नाही आहात.
जर तुमच्याकडे उडण्यास सक्षम असे विमान आहे पण तुम्ही ते एखाद्या बसगाडीप्रमाणे जमिनीवरच फिरवायचे ठरवले, तर त्यात काही चूक आहे का? ते चूक आहे असे मी म्हणणार नाही, पण ते भयंकर आहे. एखादे विमान एखाद्या कारसारखे चालवणे हे भयंकर आणि अतिशय मूर्खपणाचे आहे. भयंकर आणि मूर्ख असणे चुकीचे आहे का? नाही. भयंकर आणि मूर्ख हे पुरेसे वाईट आहे, आपण ते चूक असणे आवश्यक नाही. तुम्ही त्याचा सामान्य पद्धतीने वापर केलात, तर तुम्हाला अधिक उंचीवर कोण घेऊन जाऊ शकेल, तसे करणे अतिशय मूर्खपणा आणि भयंकर ठरेल.
हा टिकून राहणारा संबंध नाही. तुम्ही जर हे नाते प्रस्थापित केलेत, तर सर्व काही समाप्त होते. जेंव्हा सर्व काही समाप्त होते, जेंव्हा सर्व गोष्टी संपुष्टात येतात,आणि एक निर्विकार गोष्ट घडते जी भौतिक आयामाच्या पलीकडची आहे. आपला अमर्याद विस्तार व्हावा म्हणून ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो ती गोष्ट घडते. हे एक नैसर्गिक ध्येय आहे. फक्त ह्या मार्गात खूप वेडी-वाकडी वळणे आहेत. आणि घेतलेल्या प्रत्येक वळणानंतर हेच कसे योग्य वळण आहे यावर लोकं आपापली तत्वज्ञान मांडायला सुरूवात करतात.
समजा तुम्ही कोठेतरी प्रवास करत आहात, आणि तुमच्या लक्षात आले की तिथे जायच्या नेहेमीच्या मार्गात अडथळे आहेत आणि तुम्हाला दूसरा रस्ता घ्यावा लागणार आहे – तर मग कारमधील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे रस्ते सुचवायला लागतील आणि त्यावर वाद घालत बसतील. असे होते की नाही? जेंव्हा स्पष्ट मार्गदर्शक खूण नसते, तेव्हा प्रत्येकजण त्यांच्या कल्पनेनुसार सुचवायला लागतो, आणि प्रत्येकजण दावा करतो की त्याचं म्हणणं ठीक आहे. जो मनुष्य धूम्रपान करतो तो म्हणतो हेच जीवन आहे. जो मनुष्य मद्यपान करतो तो म्हणतो हेच जीवन आहे. जो मनुष्य इतर कोणत्यातरी गोष्टीत आनंद मानतो, तो म्हणतो हेच जीवन आहे. जो मनुष्य मादक पदार्थांचे सेवन करतो, तो म्हणतो हेच जीवन आहे, खादाड माणूस म्हणतो, हेच जीवन आहे. – ही सगळी माणसं “हेच जीवन आहे” यावरच भर देत असतात. आणि म्हणून मार्ग बदलतात.
जर कोणतीही गोष्ट म्हणजे जीवन असेल, तर तुम्ही ती गोष्ट जितकी अधिक कराल, जीवन तितकं चांगलं वाटलं पाहिजे. परंतु तसे घडत नाही. तुम्ही जर अधिक खाल्ले, तुम्ही जर अधिक मद्यपान केले, अधिक धूम्रपान केले, तुम्ही जर अधिक सेक्स केलात, तर जीवन अधिक आनंदी बनत नाही. लोकांनी ह्या सर्व गोष्टी करून पाहिल्या आहेत, आणि त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये. “काहीही न करणे” ही एकच गोष्ट तुम्ही निरंतर, अव्याहतपणे करू शकता. आणि गुरु म्हणजे फक्त तीच गोष्ट आहे, कारण गुरु म्हणजे केवळ एक रिक्त अवकाश, एक पोकळी. आणि एक रिक्त अवकाश हीच अशी एकमेव गोष्ट आहे, जी अंधार दूर करू शकते कारण ती स्वतःच अंधार आहे – तेथे काहीच घडत नाही. जेथे काहीच घडत नाही, तेथे तुम्ही तुम्हाला हवे असेल तर, पाहिजे ते करू आणि घडवू शकता.
गुरु म्हणजे केवळ एक रिकामा रंगमच आहेत. तुम्ही तेथे प्रवेश केलात, की ते त्या दिवसासाठी आवश्यक असणारे नाट्य निर्माण करतात, पण खरे म्हणजे ते केवळ एक रिकामा रंगमंच आहेत – केवळ चार भिंती आणि आतमध्ये काहीही नाही. तुम्ही आत पाऊल टाकलेत, तर तुम्ही सुद्धा शून्य बनाल. इतर कोणताही मार्ग नाही. तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं, आणि त्यांचं ऐकलं. ते तसं नाहीये. तुम्हाला त्यांच्या आतमध्ये प्रवेश केला पाहिजे. तेंव्हाच ते खर्या अर्थाने तुमचे गुरु होतात. आणि तोपर्यंत ते तुमचं मनोरंजन करतात, कारण त्या परिस्थितीनुसार ते योग्य असे नाट्य निर्माण करत असतात.
एकदा तुम्ही त्यांच्या आत पाऊल टाकलेत, तर मग पुन्हा तुम्हाला इथे बसावं लागणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होणारच नाही. तुम्ही जर तसे केले नाही, फक्त दुरूनच तुम्ही त्यांचा गंध हुंगला असेल, कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या गुरूंचा नाद लागला असेल आणि म्हणून तुम्ही त्यांचे अनुकरण करीत आहात. पण शरीर आणि मनापेक्षाही अधिक खोलवर काहीतरी जाणीव तुम्हाला झाली असेल, तर पुन्हा इथे बसणे नाही.
Editor’s Note: This is an excerpt from Sadhguru’s 2-in-1 book “Emotion: The Juice of Life & Relationships: Bond or Bondage”, available on Flipkart and Amazon.