ज्ञान म्हणजे एखादे तत्वज्ञान नसून ती आपली बुद्धी इतकी तल्लख करण्याची प्रक्रिया आहे जी “जीवनाच्या प्रक्रियेला आरपार भेदून खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला दाखवून देईल” असे सद्गुरू इथे आपल्याला समजून सांगतात.

सद्गुरू: तत्वचिंतन म्हणजे ज्ञान नव्हे; ज्ञान म्हणजे “जाणून घेणे”. दुर्दैवाने तत्वज्ञान हेच आजकाल ज्ञान-योग म्हणून खपवले जात आहे. मूलत:, तुम्हाला जर ज्ञान मार्गावर जायचे असेल तर तुमच्याकडे अतिशय सतर्क आणि तल्लख बुद्धी असणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या बुद्धीला हळूहळू इतके तीक्ष्ण केले पाहिजे की ती अगदी तल्लख व्हायला हवी. कुठलीच गोष्ट तिच्याकडून सुटायला नको. ती प्रत्येक गोष्टीला भेदून जायला हवी पण त्याच वेळी कुठलीच गोष्ट तिला चिकटायला नको; आसपास घडणार्‍या कोणत्याच गोष्टीने ती प्रभावित व्ह्यायला नको. हेच ज्ञान आहे.

तुम्ही जर तुमच्या बुद्धीला अश्या अवस्थेत ठेऊ शकलात तर ती सहजिकपणे जीवनाच्या प्रक्रियेला आरपार भेदून खरं काय आणि खोटं काय, वास्तव काय आणि भ्रम काय हे तुम्हाला दाखवून देईल. पण आजकाल लोक थेट निष्कर्षापर्यंत जाऊन पोचलेत. त्यांनी तत्वज्ञान रचून ठेवलेत. ते खुलेआम म्हणतात “सर्वकाही माया आहे. सर्वकाही भ्रम आहे, मग काळजी कशाला करायची?” ते स्वत:चं फक्त सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा माया खरोखरच त्यांच्या मानगुटीवर बसते तेव्हा त्यांचे सर्व तत्वज्ञान हवेत विरून जाते.

“जे मला माहीती आहे, तेवढंच मला माहीती आहे. जे मला माहीती नाही, ते मला माहिती नाही.” – हेच ज्ञान आहे.

एका तत्वचिंतकाच्या बाबतीत ही घटना घडली: तो मोठ्या छातीठोक पणे सांगत असे “सर्वकाही माया आहे, कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही अनुभवत असलेलं सर्व जग एक भ्रम आहे.” एकदा असं झालं – तो त्याच्या दोन भिक्षुंसोबात चाल्ला होता. एक पिसाळलेलं माकड चवताळून त्याच्या मागे लागलं. तो तत्वचिंतक किंचाळला आणि जोरात धावत सुटला. थोड्या वेळाने त्या माकडाला दुसरी काहीतरी आकर्षक वस्तु दिसली आणि त्याने त्या तत्वचिंतकाचा पिच्छा सोडला आणि तिथून निघून गेला. तो तत्वचिंतक थांबला आणि मग त्याच्या लक्षात आलंकी त्याची माया वगैरे ची सगळी शिकवण अचानक गळून पडली. “माकड माया आहे. माकडाचा पागलपणा माया आहे. माकड मला चावेल, हीसुद्धा मायाच आहे. मग मी असा का पळालो?” त्या क्षणी ही गोष्ट त्याला इतक्या तीव्रपणे जाणवली की त्यानंतर तो पुर्णपणे बदलून गेला.

जग एक भ्रम आहे असं म्हणणे, सृष्टी आणि सृष्टीकर्त्याबद्दल चर्चा करणे किंवा जग असं आहे अन् तसं आहे अश्या गप्पा करणे याला ज्ञान म्हणत नाही. ज्ञानयोगी कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवण्याचा किंवा कुठल्याच गोष्टीशी स्वत:ची ओळख बांधण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. ज्याक्षणी ते तसं करतात त्याच क्षणी त्यांच्या बुद्धीची तल्लखता आणि तिची परिणामकारकता संपुष्टात येते. दुर्दैवाने ज्ञानाच्या नावाखाली लोक अश्या बर्‍याच गोष्टींवर नुसताच विश्वास ठेवत आहेत जसे “मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे”. या विश्वाची रचना कशी आहे, आत्म्याचं रूप आणि आकार कसा आहे, तो मुक्त कसा होईल, अशा कितीतरी गोष्टींबद्दल फक्त पुस्तकं वाचून हे लोक स्वत:च्या मनात अनेक धारणा बनवत असतात. याला ज्ञानयोग म्हणत नाहीत कारण तुम्ही काही गोष्टींवर फक्त विश्वास ठेवत आहात. ज्ञानयोगाच्या मार्गावर चालणारे लोक अश्या बुद्धीचे असतात की ते कुठल्याच गोष्टीवर नुसता विश्वास ठेवत नाही आणि कुठल्याच गोष्टीवर अविश्वासही ठेवत नाहीत. “जे मला माहीती आहे, तेवढंच मला माहीती आहे. जे मला माहीती नाही, ते मला माहिती नाही.” – हेच ज्ञान आहे.