प्रश्नकर्ता: सद्‌गुरू, आम्ही शेती विद्यापीठात अभ्यास करीत असल्यामुळे माझा प्रश्न कृषीशी संबंधित आहे. कृषी हा एक असा उद्योग होता जो मध्ययुगीन काळात GDP ला तीस टक्क्यांपेक्षा अधिक हातभार लावत होता परंतु तो आता सोळा ते सतरा टक्क्यांपर्यंत आला आहे.  सद्यपरिस्थिती पाहता, हे कळतं की हा एकमेवं उद्योग आहे जो दोन-तृतियांश लोकसंख्येला रोजगार पुरवतो. हा विरोधाभास देशाच्या आर्थिक विकासात अडथळा आणत नाही का?

Graph showing the decline of GDP of Agriculture in India

 

सद्‌गुरू: कृषीला उद्योगांमध्ये मोडणे हे फार प्रगतशील आहे. शेती करायची मानवी क्षमता ही आपल्या सभ्यतेचा आधारस्तंभ आहे. जर आपण शिकारीच राहिलो असतो, तर आपण या संस्कृतीला कधी वाढूच दिलं नसतं. आपल्या मातीतून अन्न उगवण्याच्या क्षमतेमुळेच
आम्ही शहरं आणि गावं बांधली, आणि स्थिरावलो. अनेक कला, विज्ञान आणि इतर सर्व काही वाढीस आले. जर आपण नुसते प्राण्यांची शिकार करायच्या मागे राहिलो असतो, तर कधीही अशा प्रकारच्या संस्कृतीचा विकास करू शकलो नसतो.

शेतीची किमया

शेती ही आपल्या सभ्यतेचा आधार आहे. आपण हे विसरता कामा नये. ही एक प्रकारची जादूच म्हणा. तुम्ही ज्या जमिनीवर चालता, त्या जमिनीचे रुपांतर अन्नात होत आहे. जर तुम्हाला मी ज्या जादूबद्दल बोलत आहे, ते कळत नसेल, तर आज रात्री तुम्ही जेवताना, ताटातलं सर्व खा परंतु लोणच्याऐवजी ताटात थोडी माती ठेवा, आणि ती बाकीच्या जिन्नसांना लावून खा. तुम्हाला कळेल की आपल्याला माती खावी लागल्यास किती भयानक वाटतं. पण तीच माती, जी आपण नुसती खाऊ शकत नाही, ती पिकवून आपण अन्न उगवतो, जे आपलं पोषण करतं आणि हे मांस व रक्त तयार करतं. ही मुळीच साधारण गोष्ट नाही.

मातीतून पिक उगवणे ह्याला शेती म्हणतात. वनस्पती जीवनाचे निरीक्षण करून आणि त्याचा वापर करून माणसांनी ह्या अभूतपूर्व प्रक्रियेचा शोध लावला. जिथवर मला कळतं - तुम्ही महाविद्यालयात असल्याने, मला सांगू शकता की मी चुकतोय का - दक्षिण अमेरिकेचा काही भाग वगळता हा एकमात्र देश आहे जिथे 12,000 वर्षांहून अधिक काळ शेतीचा इतिहास आहे. इथे दक्षिण भारतातील, तमिळनाडूमध्ये, आम्ही हीच जमिन 12,000 वर्षांहून अधिक काळ नांगरली आहे. अमेरिकेत ते मातीला "घाण" (Dirt) म्हणतात. इथे, आपण ताय मण्णू म्हणतो कारण आपला ह्या मातीशी गहन संबंध आहे.

Sadhguru holding soil in his hands

 

जगण्यासाठी शेती

१७० ते १८० वर्षांपूर्वी भारत एक अतिशय औद्योगिक देश होता. तीनशे वर्षांपूर्वी आपण या ग्रहावर कदाचित सर्वात औद्योगिक देश म्हणून नावाजलेले होतो. मुख्य उद्योगांपैकी एक म्हणजे वस्त्रोद्योग. आपण या देशामधून जगभरात लागणारी ६० टक्के वस्त्रं निर्यात करत होतो. १८०० ते १८६० च्या सुमारास ब्रिटीशांनी पाहिलं की युरोपातून कपडे खरेदी करण्यासाठी भारतात प्रचंड प्रमाणात पैसा येत आहे. अरब भारतातून कापड खरेदी करत व ते युरोपमध्ये दहा पट जास्त किमतीने विकत. म्हणून, त्यांचे सर्व सोने आणि चांदी भारतामध्ये येत होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या मोहिमांची सुरुवात केली. कोलंबस, वास्को द गामा आणि इतर. अरबांना प्रत्येक गोष्टीसाठी द्यावी लागणारी १० पट अधिक किंमत वाचावी म्हणून प्रत्येकाने समुद्रमार्गाचा शोध घ्यायची जोखीम पत्करायला सुरुवात केली.

An old illustration of an Indian weaver | Photo credit: Wikipedia

जेव्हा ते इथे आले तेव्हा त्यांनी उद्योग पाहिला आणि कळलं की तो किती साधा आणि कुशल आहे: माणूस बसतो आणि टक, टक, टक, टक करतो आणि मग कापड बाहेर येतं. त्यांनी पाहिलं की हा तर एक सोपा उद्योग आहे आणि मशीनने ते करू शकतील, ज्याची स्थापना करायला त्यांनी सुरू केलं. साठ वर्षांच्या काळात या देशाचा कापड निर्यात ९८ टक्क्यांनी घटला. फक्त दोन टक्के उरला कारण त्यांनी इतके जबरदस्त कर बसवले होते आणि काही ठिकाणी जिथे अतिशय चांगले कापड तयार केलं जायचं, तिथे त्यांनी
कामगारांचे अंगठे कापले आणि हातमाग नष्ट केला.

१८३० च्या दशकातले ब्रिटीश गव्हर्नर जनरलांपैकी एकाने म्हटले की, "भारतातून विणकर समूळ नाश पावले." लाखो लोक उपासमाराने मरण पावले कारण विणकाम उद्योग बुडाला. ह्याच वेळी मोठ्या प्रमाणात लोक पुन्हा शेतीकडे वळले. शेती ही प्रमुख उपजीविकेचं साधन बनली; स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबांसाठी अन्न मिळावं या हेतूने त्यांनी जमिनीची लागवड करण्यास सुरुवात केली. ह्याच कारणामुळे १९४७ मध्ये भारतातील जवळ जवळ ७७ टक्के लोकसंख्या शेतीमध्ये गुंतली होती. 

मानवी कौशल्याचे व्यवस्थापन

आज हे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. याचा अर्थ असा होतो की जर दहा लोकांना खायचं असेल तर सहा लोक स्वयंपाक करतात. मानव संसाधन वापरण्याचा हा एक प्रभावी मार्ग नाही. खरं तर, आपण आपल्या देशाकडे पाहिल्यास, असं दिसेल की आपल्याकडे असलेली एकमेव खरी साधनसंपत्ती मानव संसाधन आहे. आमच्याकडे जास्त काही नाही, परंतु आमच्याकडे लोकं आहेत. जर आपण या लोकसंख्येला प्रशिक्षित, एकाग्र करून प्रेरणा दिली, तर आपण एक विलक्षण चमत्कार घडवू शकतो. जर असं करण्यास आपण अपयशी ठरलो तर आपण एक मोठी आपत्ती ठरू शकतो.

शेतीमध्ये साठ टक्के लोकसंख्येची गुंतवणूक करणे योग्य नाही. आम्हाला लोकसंख्या विस्थापित करावी लागेल. लोकसंख्येला विस्थापित करणे याचा अर्थ भौगोलिकदृष्ट्या शहरांमध्ये स्थानांतरित करणे असा होत नाही तर इतर व्यवसायांमध्ये, शिल्पकला आणि कौशल्यांकडे वळवणे. अजून कोणतेही निश्चित आणि संगठित प्रयत्न यादृष्टीने घडले नाहीत.

अविकसित मानवजात

45 ते 50 वर्षांपूर्वी शेतीमधील आमची मुख्य समस्या सुरू झाली, जेव्हा आम्ही निर्वाह शेतीकडून रोख शेती किंवा व्यावसायिक शेतीकडे वळलो. हा बदल अजून पूर्णपणे नाही झाला कारण हे व्यवस्थित पद्धतीने केलं गेलं नाही. म्हणून आपल्याला एक गोष्ट दिसते ती म्हणजे ग्रामीण लोकसंख्या खूपच कमी होत चालली आहे. 40 वर्षांपूर्वी आपण गावात गेलात तर सगळ्यांकडे घालायला धड कपडे नव्हते, पिण्याचे पाणी नव्हते - जिथून म्हशी पाणी प्यायच्या, लोकदेखील त्याच तलावातून प्यायचे - आणि अजून भरपूर समस्या होत्या, परंतु पुरुष आणि महिला धडधाकट होत्या. आज ग्रामीण भागातील 60 टक्के लोकांच्या स्नायूंची वाढ पूर्णपणे झालेली नाही. त्यांची वाढ खुंटण्याचं कारण म्हणजे
उदरनिर्वाह शेतीपासून व्यावसायिक शेती करण्याच्या बदलामुळे झालेला बदल.

 

ते जेव्हा उदरनिर्वाहासाठी शेती करत होते तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण ते वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खायचे. आज दक्षिण भारतातील मुख्य आहार भात, चिंच, कांदा आणि मिरची हा आहे. यांच्यापासून रुचकर पदार्थ कसे बनवायचे ते त्यांना माहिती आहे: रसम साधम हेच पुरेसं आहे. उत्तर भारतात फक्त गहू, मिरची आणि कांदा आहे. यामुळे, पौष्टिकतेची पातळी खूपच खालावली आहे. ही एक चिंतेची बाब आहे कारण आपण एक अविकसित पिढी निर्माण करत आहोत. 

Group of villagers

 

या देशातील बहुतांश लोकांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात चांगलं खाल्लं नाही आणि नंतर ते याची भरपाई करू शकत नाहीत. शरीराच्या आणि मेंदूचा विकास झालेला नाही. आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतीचं योग्य व्यवस्थापन करणे, त्यांस तंत्रज्ञानाची जोड देणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फायदेशीर होणं. सध्या, सरासरी एक हेक्टर किंवा 2.5 एकर जमीन प्रत्येकाच्या ताब्यात आहे,  एवढ्या कमी जमिनीत फार काही अर्थपूर्ण करणे शक्य नाही. एवढ्या लहान जमिनीतून, आपण खरोखर काहीही महत्त्वपूर्ण करू शकत नाही. म्हणून आम्ही शेतकरी उत्पादक संघटना आणि इतर काही गोष्टी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यायोगे लागवडी खालील जमिनीचं प्रमाण वाढेल. लागवड, सिंचन आणि विपणन ह्यासाठी एक ठराविक आकारमान गरजेचं आहे. शेतीतून मिळणारं उत्पादन एवढं कमी आहे की ह्याला अजून काही उपाय नाही.

Farmlands in India

 

उपायाच्या दिशेने वाटचाल

Nadi Veeras, the Rally for Rivers volunteers getting trained in various aspects to revive the rivers, including economical farming methods

सध्या "Rally for Rivers" चळवळीचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. अंदाजे पाच ते सहा वर्षांच्या कालावधीत, आपण योग्य ते तंत्रज्ञान वापरून या उत्पन्नास तीन ते आठ पटीनी सहज वाढवू शकू. जलस्रोतांचा योग्य प्रकारे वापर आणि जनावरांना शेतजमिनीवर परत आणण्याबरोबरच, सिंचनपद्धतींचं एकत्रीकरण करणं हे सर्वात महत्वाचं आहे. ट्रॅक्टर फक्त जमिन नांगरतो - जमिनीला सुपीक बनवू शकत नाही. त्यासाठी, तुम्हाला प्राण्यांची आवश्यकता आहे. भविष्यात आपण जनावरांशिवाय, अजून दुसरी पद्धत वापरून शेती करणे शक्य नाही.  

 

अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत, परंतु हा एक मोठा, वैविध्यपूर्ण देश आहे - इथे कधीही निषेध आणि गोंधळ न करता काहीही सकारात्मक किंवा नकारात्मक होऊ शकत नाही. लहान सहान गोष्टी करायलाही संघर्ष करावा लागतो, पण जर का आपण हे आत्ता केलं
नाही तर भारताच्या शेतीचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. जर तुम्ही शेतकऱ्यांचं सर्वेक्षण केलं तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्यापैकी किती जणांची इच्छा असेल की आपल्या मुलांनी पुढे शेती करावी? विश्वास ठेवा, जवळजवळ दोन ते पाच टक्के, जास्त जण नाहीत. देशासाठी हे अनुकूल नाही.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image