भारतीय आध्यात्मिक परंपरेत भिक्षा मागण्याला काय महत्व आहे? सद्गुरु हे समजावून सांगायला एका हुशार भिकार्‍याची गोष्ट तसेच गौतम बुद्धाच्या आयुष्यातली एक घटना सांगतात. उपजीविका करताना, सद्गुरु म्हणतात, माणूस स्वतःला एकत्र करतो, पण जाणीवपूर्वक भिक्षा मागणे हे स्वतःला सोडून देण्याचे साधन म्हणून वापरले गेले आहे.

सद्गुरु: एकदा एक भिकारी होता जो प्रत्येक गोष्टीची भीक मागत असे. आयुष्यभर, त्याने एकच फाटका कोट वापरला. हळूहळू त्याने एक विशिष्ट समज निर्माण केला आणि लोकं त्याच्याकडे सर्व प्रकारच्या अडचणींवर उपाय विचारायला जाऊ लागले. तो एक अतिशय हुशार माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. ही बातमी राजापर्यंत पोचली आणि तो देखील त्याच्याकडे सल्ला घ्यायला जाऊ लागला.

असे अनेक वर्षे सुरू राहिले, आणि तो भिकारी, जो आता प्रधान बनला होता, त्याला आता तो भिकार्‍याचा कोट घालून बाहेर पडता येईनासे झाले, त्यामुळे त्याने स्वतःसाठी एक नीटनेटका पोशाख तयार करून घेतला.

एके दिवशी, राजा म्हणाला, “तू भिकारी राहू नकोस, तू माझा मंत्री बनायला हवेस.” भिकार्‍याने उत्तर दिले, “तुम्ही मला जे काही देऊ करत आहात, त्याला माझ्या दृष्टीने काहीही किंमत नाही, पण त्यामुळे जर मी लोकांना उपयोगी पडू शकतो, तर मी एका अटीवर तुमचे म्हणणे मान्य करीन: मला राजवाड्यात एक अशी खोली हवी जिथे कोणीही आत शिरून तपासणी करू शकणार नाही, अगदी तुम्ही सुद्धा. जर कोणी त्या खोलीत शिरले किंवा ती खोली तपासून पाहिली, तर मी तुमचा मंत्री म्हणून काम करणार नाही.” राजा म्हणाला, “हो, मी तुला एक खोली देईन. ती तुला हवी तशी ठेव. मला तुझ्या खोलीत डोकावून पाहण्याचे कारणच काय?”

असे अनेक वर्षे सुरू राहिले आणि तो भिकारी, जो आता प्रधान बनला होता, त्याला आता तो भिकार्‍याचा कोट घालून बाहेर पडता येईनासे झाले, त्यामुळे त्याने स्वतःसाठी एक नीटनेटका पोशाख तयार करून घेतला. कालांतराने त्याचे खूप कौतुक होऊ लागले आणि तो राजा आणि प्रजा या दोघांचाही लाडका बनला. त्याची लोकप्रियता आणि त्याचे अतुलनीय शहाणपण पाहून इतर मंत्री त्याचा मत्सर करू लागले. काही मंत्री विचार करू लागले, “त्या खोलीत नक्कीच काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे. म्हणूनच त्या खोलीत कोणीही शिरू नये असे त्याला वाटते. तो नक्कीच राजा आणि राज्याविरुद्ध कट रचत असणार. अन्यथा, तो स्वतःला येवढे का सुरक्षित ठेवतो आहे?

अफवा पसरतच गेली, आणि लवकरच ती राजाच्या कानावर पडली. राजा चिडला आणि एक दिवस त्याने मंत्र्याला सांगितले, “तुझ्या खोलीत काय आहे ते मला पहायचे आहे.” मंत्री म्हणाला, “तुम्ही ते पाहू शकता, पण ज्या क्षणी तुम्ही त्या खोलीत प्रवेश कराल, त्या क्षणी मी निघून जाईन आणि तुमचा मंत्री म्हणून काम पाहणार नाही.” त्या माणसाची बुद्धिमत्ता माहिती असल्याने राजा त्याला गमावू इच्छित नव्हता, आणि म्हणून त्याने स्वतःला रोखले.

काही काळ गेल्यानंतर राजा अस्वस्थ झाला आणि लोकं त्याला अनेक गोष्टी सांगू लागले. “तुम्ही राजे आहात आणि तुमच्या राजवाड्यात तुमच्यापासून काहीही गुप्त ठेवता येऊ शकत नाही.” असे अनेक दिवस झाले आणि एक दिवस राजाने आग्रह धरला, “मला तुझी खोली पहायची आहे.” मंत्र्याने संमती दिली, आणि राजा आतमध्ये गेला. त्याला त्या खोलीत काहीच दिसले नाही. ती एक अतिशय साधी, रिकामी खोली होती. भिंतीवर भिकारी घालत असलेला तो फाटका कोट टांगून ठेवला होता.

राजाने हे सर्व पाहिले आणि त्याने विचारले, “तू हे येवढे गुप्त का ठेवले होतेस? इथे तर काहीही नाही.” मंत्र्याने उत्तर दिले, “दिवसभर, मी एक मंत्री आहे. रात्री, मी हा कोट घालून जमिनीवर झोपतो. त्यामुळे मला माझ्या मंत्रीपदाचा कधीही अहंकार होत नाही. पण आता तुम्ही करार मोडल्यामुळे, मी माझे पद सोडून देत आहे.” असे बोलून त्याने तो कोट घातला आणि तो निघून गेला.

जाणीवपूर्वक भिक्षा मागणे

भारतात भिक्षा मागणे हा आध्यात्मिक परंपरेचा भाग होता. तुम्ही तुमचे अन्न निवडत नव्हता; तुम्ही भिक्षा मागत होतात आणि लोकं जे देतील ते खात होतात. आध्यात्मिक मार्गावरचा माणूस तुमच्या दारात उभा राहून तुमच्याकडे अन्नाची भिक्षा मागतो आहे, आणि तुम्ही त्याला अन्न देता आहात ही तुमच्यासाठी एक अतिशय सन्मानाची गोष्ट समजली जात असे. आज या परंपरांचा गैरवापर केला जात आहे, आणि आज अनेक लोक, जे फक्त पैसे आणि अन्नाच्या शोधात असलेले भिकारीच असतात, ते आध्यात्मिक साधकांचा वेश परिधान करून फिरतात. पण जेंव्हा लोकं जाणीवपूर्वक भिक्षा मागत असत, तेंव्हा त्याला एक पूर्णपणे वेगळा अर्थ आणि शक्यता होती.

एक भिकारी कदाचित असहाय्यतेमुळे तसे करत असेल, पण एक संन्यासी मात्र त्याच्या स्वतःच्या विकासासाठी जाणीवपूर्वक तसे करत असतो, त्यामुळे तो स्वतःला पुर्णपणे संतुष्ट ठेवत नाही.

जेंव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर हात पसरते, आणि तुम्हाला जर असे वाटले की ती व्यक्ती गैरवापर करत आहे, तर तुम्ही तिला नकार देऊन पुढे जाऊ शकता. तुम्हाला जर असे वाटले की तो खरोखरच गरजू आहे, तर एक मनुष्य म्हणून तुम्ही त्याला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. फक्त विचार करून पहा की तुमचा हात रस्त्यावर एखाद्या व्यक्तीसमोर पसरणे तुम्हाला किती कठीण आहे ते. तो माणूस त्या यातनांमधून जात असतो.

एक भिकारी कदाचित असहाय्यतेमुळे तसे करत असेल, पण एक संन्यासी मात्र त्याच्या स्वतःच्या विकासासाठी जाणीवपूर्वक तसे करत असतो, त्यामुळे तो स्वतःला पुर्णपणे संतुष्ट ठेवत नाही. भिकार्‍यासमोर असे कोणते महान ध्येय नसते. तो फक्त त्याचे स्वतःचे पोट भरायचा प्रयत्न करत असतो आणि ते स्वतः कष्ट करून भरायला तो असमर्थ असतो.

अपंगत्व हे केवळ एखादा हात किंवा पाय गमावणे नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आयुष्याकडे पाहता आणि ते अनुभवता, त्यातसुद्धा तुम्ही अपंग असू शकता. वास्तविकपणे, आयुष्यकडे पहाण्याचा आणि त्यावर विचार करण्याच्या पद्धतीने बहुतेकजण अपंग आहेत. त्याचप्रमाणे, भिकार्‍याने पण स्वतःला एका कोपर्‍यात लोटून घेतले आहे, आणि त्याला वाटते की भीक मागणे हा उपजीविकेचा सर्वात सोपा मार्ग आहे.

स्वतःला टाकून देणे

एक आध्यात्मिक व्यक्ती, भिक्षा मागायला सुरुवात करते कारण तिला स्वतःला टाकून द्यायचे असते. “माझी उपजीविका मी स्वतः करतो, माझा पैसा, माझे अन्न, माझे स्वतःचे घर” ही कल्पना तुमच्या अहंकाराचा एक मोठा भाग आहे. एके दिवशी, गौतम बुद्धांकडे एक पाहुणे फुले घेऊन आले. लोकं जेंव्हा आपल्या गुरूंना भेटायला जातात तेंव्हा ते त्यांना अर्पण करण्यासाठी फुले घेऊन जातात हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.

भिक्षा हे स्वतःला टाकून देण्याचे साधन म्हणून वापरले जात असे कारण उपजीविकेसाठी पैसा कमावण्यात, तुम्ही स्वतःचाच लवाजमाजमा निर्माण करता.

जेंव्हा ती व्यक्ती आली, तेंव्हा गौतम बुद्धानी तिच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, “ते टाकून दे.” त्या माणसाने इकडेतिकडे पाहिले आणि त्याने विचारले, “काय टाकू?” त्याला वाटले ते फुलांविषयी बोलत आहेत. तो थोडासा गांगरला, “पण ही मी तुमच्यासाठी आणली आहेत.” गौतम बुद्ध पुन्हा म्हणाले, “ते टाकून दे.” म्हणून त्याने ती फुले खाली टाकली. गौतम बुद्धानी त्याच्याकडे पाहिले आणि ते पुन्हा म्हणाले “ते टाकून दे.” तो माणूस म्हणाला, “मी तर फुले खाली टाकून दिली आहेत. मी ती भेट म्हणून आणली होती, पण तुम्ही ती खाली टाकून द्यायला सांगितलीत, म्हणून मी तसे केले. आता आणखी काय खाली टाकायचे आहे?” गौतम म्हणाले, “नाही, तू अगोदर स्वतःला खाली टाकून दे. फुले ही काही अडचण नाही. तू माझ्यासाठी फुले वेचून आणलीस. ते ठीक आहे. मी त्यांचा स्वीकार करेन. पण तू स्वतःला टाकून दे.”

भिक्षा हे स्वतःला टाकून देण्याचे साधन म्हणून वापरले जात असे कारण उपजीविकेसाठी पैसा कमावण्यात, तुम्ही स्वतःला जमा करता. पण एखाद्या व्यक्तीसमोर हात पसरताना तुम्ही स्वतःला टाकून देता, तुम्हाला हे माहिती असते आणि त्याची पूर्ण जाणीव असते की तुमची उपजीविका करायची क्षमता तुमच्या अंगात आहे, पण तरीही तुम्ही भिक्षा मागणे स्वीकारले आहे. मानवात होणारा तो एक प्रचंड मोठा बदल आहे. लोकं कदाचित तुम्हाला भीक्षा वाढतील किंवा पुढे जायला सांगतील. त्यामुळे काही फरक पडणार नाही, पण एक भिक्षुक असणे ही काही लहान गोष्ट नाही.