स्वामी निर्विचारा: पुन्हा एकदा, सोमवारचा दिवस, माझा सुट्टीचा वार. पुन्हा एकदा कित्येक तास मी हे जीवन मला नक्की कुठं घेऊन चाललं आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करत माझ्या विचारांच्या आणि भावनांच्या भुलभुलैयात हरवून गेलो. आणि पुन्हा एकदा, माझ्या हाती काहीच गवसलं नाही. मला अजूनही आठवतं, अगदी पूर्वी, १९९० मध्ये... जीवन तसं छान चाललं होतं, खाणंपिणं, सिनेमा, आणि नवनवीन साहसे- पण या सर्वांवर सतत माझ्यामधील अपूर्णतेच्या खोल जाणिवेचं मळभ दाटलेलं, आणि मी त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत चित्रविचित्र गोष्टी करू पाहे. एके दिवशी, मी सरळ माझ्या नोकरीचा राजीनामाच देऊन टाकला, कोणत्याही कारणाशिवाय. पण नोकरी सोडण्यानेही काहीही बदललं नाही. त्यासाठी अजून दोन नोकऱ्या, वडिलांबरोबरची अत्यंत टोकाची भांडणं, आणि माझ्या आतील भावनांची वादळं ह्या साऱ्यातून गेल्यावर माझ्या आईनं मला एप्रिल १९९४ मध्ये ईशा योगाचा क्लास करायला लावला. आणि तिथून पुढे, कायमचा स्थिरावलो, किंवा खरंतर कायमचाच अस्थिर झालो!

क्लास पूर्ण केल्यावर लवकरच मी, दर रविवारी जाऊन इशाचे त्या काळी सर्व तामिळनाडूभर जे कलासेस होत होते, त्यांसाठी व्हॉलंटियर करायला सुरुवात केली. मी ९० दिवस चालणाऱ्या “होलनेस प्रोग्रॅम” मध्ये एक आठवड्यापुरतंच व्हॉलंटियर करण्यासाठीही आलो, परंतु, मी जवळपास पूर्ण प्रोग्रॅम होईपर्यंत राहिलो. ह्याच काळात सदगुरुंची अध्यात्मिक महानता , एका सामान्य माणसाला निर्विकल्प समाधी अनुभवताना पाहणं (समाधीची “महासमाधी” पूर्वीची सर्वोच्च अवस्था), घोर साधना, आणि आश्रमातील तेवढेच गहन एकान्ताचे क्षण, ह्या माझ्या आयुष्यातल्या काही सर्वोत्तम आठवणी आहेत.

“होलनेस प्रोग्रॅम” संपल्यावर मी आश्रमातून परतलो तो सदगुरुंच्या सहवासात राहण्याची पेटती आस मनात घेऊनच! डिसेंबर १९९४, मला कळलं की सदगुरूंनी ब्रह्मचर्येचं व्रत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना तसे अर्ज करायला सांगितले आहेत. मला त्यावेळी या मार्गाबद्दल काहीच कल्पना नव्हती, तरीही मी अर्ज करून टाकला. “सदगुरुंचा सहवास तरी मिळेल” म्हणून. २७ फेब्रुवारी, १९९५, महाशिवरात्रीच्या दिवशी, मला इतर सात जणांबरोबर दीक्षा दिली गेली, आणि ईशा मध्ये ब्रह्मचर्यमार्गाची महान परंपरा सुरु झाली.

कष्टांचे, पण आनंदाचे दिवस

आश्रमातील बदलेल्या जीवनात रुळणं मला अजिबातच अवघड गेलं नाही. आम्ही कितीही काटकसरीने राहत असलो तरी ते अत्यंत आनंदाचे दिवस होते. आम्ही थोडेच लोक होतो, “पाती”चा अप्रतिम स्वयंपाक, ठराविक असं काही काम नाही, रोज झऱ्यामध्ये स्नान करणे, जंगलात भटकणे, पाण्याच्या टाक्यामध्ये पोहणे, रविवारचं क्रिकेट, फुलझाडांना, झाडांना पाणी घालणे, इतरांबरोबर “इग्लू” चं (साधनेची जागा) बांधकाम करणे, साधना, आणि क्वचित आश्रमाला भेट देणारे मोजके पाहुणे - आयुष्य अप्रतिम आणि अगदी सहज सोपं होतं.

आणि मग मे १९९५ मध्ये आश्रमात पहिलावहिला ”सम्यमा” प्रोग्रॅम झाला, आणि मग, ध्यानलिंग प्राण प्रतिष्ठापनेचं काम वेगानं सुरु झालं. हळूहळू आश्रमाला आकार येऊ लागला - तरीही आता जे दिसतं तसा काहीच प्रकार अजून नव्हता, आवाक्यानेही आणि विस्तारानेही. माझ्या अखत्यारीत तीन महिने सातूमाऊ म्हणजे संजीवनी गंजी बनवण्याचं काम, तसंच प्रोग्रॅमच्या काळात इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, आणि फ्लोअरिंग हाताळणे- ही कामे होती, अर्थातच कोणत्याही ट्रेनिंग किंवा पूर्वानुभवाशिवाय!

त्या काळातल्या आमच्या कामांपैकी एक काम- ध्यानलिंगासाठी जे मटेरियल येत असे त्याच्या लॉरी आणि ट्रक्सना मदत करणे, हे होतं. आम्हाला त्या लॉरी तन्नीरपंडाल पासून आश्रमपर्यंत चिखलभरल्या रस्त्याने ढकलत आणाव्या लागत. ट्रकमधील हेल्पर आम्ही ढकलताना खाली उतरत, पण कित्येकदा, ते आमच्यामागे चिखलभरल्या रस्त्याने यायला तयार नसत. मग आश्रमात पोहोचल्यावर आम्हालाच मटेरियल उतरवून घ्यावे लागे. मला आठवतं एकदा आम्हाला पूर्ण ट्रकभर कडाप्पा दगड उतरवायला लागले होते, प्रत्येकाचं वजन १० किलोच्या आसपास होतं. 

आणखी एकदा, जे हेल्पर ट्रकबरोबर सिमेंटची पोती उतरवायला आले होते, त्यांनी पोत्यामागे २ रुपये मजुरी मागितली. आम्ही त्यांना १.७५ रुपये द्यायला तयार होतो, पण ते मानेनात, त्यांना वाटलं की आम्हाला इतक्या रानावनात दुसरा काही पर्यायच नाहीये. त्यांनी आम्हाला नीट ओळखलेलं नव्हतं. मी, दोन इतर ब्रह्मचारी, आणि काही धनिकांडीचे मजूर, आम्ही मिळून २०० पोती भराभर उतरवली, त्यांना आणि आम्हालाही नवलच वाटलं!

शिवलिंग शिळेला छेद

dhyanalinga-consecration-sadhguru-sitting-front-of-linga

जुन १९९६ चा सुमार, ध्यानलिंग शिळा आश्रमात आली. मग १-२ महिन्यांनी, एके रात्री सर्व आश्रमवासींना सदगुरूंनी एका प्रक्रियेसाठी लिंगशिळेभोवती बोलावलं. लिंगशिळा वाळूवरती आडवी, वरचा सहस्रार चक्राचा भाग दक्षिणेकडे करून ठेवलेली होती. सदगुरूंनी लिंगाशिळेला विभूती लावली, विभूतीनेच सहस्रारभोवती एक मोठा गोल आखला. आम्ही डोळे बंद करून”ओम नमः शिवाय” मंत्रजप करत होतो. एके क्षणी सदगुरूंनी, ते नेहमी आमची ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी वाजवतात तशी टाळी वाजवली.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी लिंगशिळेजवळ गेलो, मी पाहिलं कील रात्री सदगुरूंनी जो विभूतीचा गोल आखला होता त्यामध्ये एक बारीक रेघ दिसत होती. जवळून पाहता ती रेघ कडेने अजून पुढे जात होती, आणि लिंगशिळेला बारीक छेद गेल्यासारखं वाटत होतं. आम्ही सदगुरूंना सांगितलं, आणि ते लगेचच पाहण्यासाठी आले. मग त्यांनी श्रीनिवास अण्णांना, छेद पाहण्यासाठी सप्लायरला कुणीतरी पाठवायचा निरोप द्यायला सांगितलं. दोन दिवसांनी चेन्नईहुन काही तज्ञ लोक आले, आणि त्यांनी हा छेद असला तरी तो मोठा होणार नाही आणि त्याने लिंगशिळेला कोणताही धोका नाही असं सांगितलं. ते गेल्यावर सदगुरूंनी आम्हाला लिंगाशिळेला पांढऱ्या कापडाने झाकायला सांगितलं, आणि काही दिवसात आम्ही लिंगशिळेवर एक झापाचे छप्परही उभं केलं.

ध्यानलिंगच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर जवळपास दोन वर्षांनी एका सत्संगामध्ये सदगुरु त्या छेदाबद्दल बोलले. त्यांनी म्हटले की प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी लिंगशीळा भंग होण्याऐवजी त्यांनी सुरुवातीच्या प्रक्रियेच्या वेळीच तिला एका टाळीने छेद दिला. नंतर जेव्हा लिंग उभं राहिलं तेव्हा हा छेद असलेला भाग लिंगाच्या मागच्या बाजूला करण्यात आला. तो अजूनही तिथे आहे.

भ्रमणगाथा

swami-nirvichara-tajmahal-visitसप्टेंबर २४, २००१, संध्याकाळी ७ ची वेळ, आणि मला सदगुरूंना भेटायला सांगण्यात आलं. याचा अर्थ काय हे मला कळून आलंच होतं, आणि तसंच झालं, मी आत जाताच सदगुरूंनी मला त्यांची एक वापरलेली मोठी शाल आणि एक चिट्ठी दिली, आणि म्हटले “एक वर्ष. वाराणसी आणि केदार” दुसऱ्याच दिवशी मी पहाटे ५.४० ला ट्रायंग्यूलर ब्लॉक सोडला, मला माँ गंभीरी आणि स्वामी निसर्गा तिथे माझ्यासाठी एक पिशवी घेऊन उभे असलेले दिसले. पिशवीमध्ये एक लोकरी शाल, एक भिक्षापात्र आणि माझी पहिली भिक्षा- माझं पाहिलं जेवण, एवढं होतं. सदगुरूंनी मला दिलेल्या शालीचे मी तीन तुकडे केले, एकाचा वापर टॉवेल म्हणून केला, एकाचा धोतर म्हणून, आणि तिसऱ्याचा लंगोट म्हणून! मी पुन्हा एकदा परिव्राजक साधनेला निघालो होतो. आधीच्या वर्षीच्या डिसेम्बरमध्ये सदगुरूंनी मला एक महिन्यासाठी या साधनेला पाठवलं होतं.

ध्यानलिंगाचं दर्शन घेऊन मी बाहेर पडलो. क्षणभर, आश्रम वर्षभरासाठी सोडून चालल्याच्या जाणिवेची एक वेदना उमटून गेली. आश्रमातून बाहेर पडताच माझा श्वासच दडपला ... परंतु, ती भावना लगेचच जाऊन तिची जागा अनेक प्रश्नांनी घेतली- कसं काय करेन मी? अन्नाची सोय काय होईल ? कुठे झोपायला मिळेल? मी कुठे जाऊ? पण या विचारांची बोचणी मला फक्त एक दिवस लागून राहिली. मला हे माहित होतं की साधना पूर्ण झाल्याशिवाय मी परत जाऊ शकत नाही. त्यामुळे मी निरुद्देश सारा देश उभा-आडवा पालथा घातला. सर्व प्रकारच्या प्रदेशातून गेलो, अनेक प्रकारचे लोक भेटले, काय मिळेल ते खाल्लं, आणि अनेक प्रकारच्या समस्यांना आणि दुःखांना सामोरा गेलो. नंतर मी आश्रमात परत आलो तरीही आयुष्य बदललंच कायमचं!

प्रथम मी वाराणसीला गेलो, आणि मग भोपाळनजीक भोजपूर शिवलिंगाला भेट दिली. माझं धोतर तिथे फाटलं, आणि जिथे ते शिवून घ्यायला गेलो, तिथे मला १२ ज्योतिर्लिंगांचं चित्र दिसलं. त्यातलं एक खूपच जवळ आहे हे दिसल्यावर तर खूपच आनंद झाला. म्हणून मग मी उज्जैनला जाऊन महाकालचं दर्शन घेतलं. मी एक एक करून सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेत घेत उन्हाळ्यात केदारनाथ ला पोहोचलो. मी आग्र्याला जाऊन माझी लहानपणीची ताजमहाल पाहण्याची इच्छाही पूर्ण करून घेतली. एक परिव्राजक - भटकता साधू असणं काय असतं याची खरी चव घेता आली. काही घटना मला अगदी ठळकपणे आठवतात...

गुरुपुजेचा मंत्र विसरलो

एके सकाळी, हिमालयात चालत असताना, काही कारणाने मला संपूर्ण गुरुपूजा आठवेना. कितीही निश्चयपूर्वक प्रयत्न केला तरीही. काही मंत्र होताच मी अडखळो.ज्या दिवशी माझी गुरुपूजाच हरवली आहे, अशा दिवशी दरीत उडी घेऊन अंत केलेलाच बरा असा विचार करून मी वाटेच्या टोकाकडे दरीत उडी घेण्यासाठी जाऊ लागलो. तत्क्षणी माझ्या मनात गुरुपुजेचे मंत्र उचंबळून आले, आणि तेही विनासायास! तेव्हा मला प्रथमच जाणवलं कि सदगुरु संपूर्ण वर्षभर सतत माझ्याबरोबर आणि माझ्या अंतरात आहेत.

जेव्हा अदृष्य हात मदत करतो


मी हेमकुंड साहिब ला जात होतो. ती बर्फ़ाने झाकलेली बिकट वाट फक्त दीड फूट रुंद होती, हमाल आणि यात्रेकरू, सर्वांसाठी तीच एक वाट! मी चढण चढत होतो. अचानक, एकजण गडबडीने खाली उतरून आला. मी वाटेच्या कडेला उभा राहून दऱ्याखोऱ्यांचं दृष्य पाहात होतो, आणि जसा तो माझ्याजवळून गेला, माझा पाय घसरला! आणि त्याक्षणी मला ती पाताळदरी किती खोल होती ते लक्षात आलं! त्या गर्तेत कोसळण्यावाचून काही पर्यायच नव्हता, पण काळ आला होता तरी वेळ आली नव्हती! जणू काही एका अदृश्य हातानं मला मागे खेचलं. कसं माहित नाही!

जेव्हा लोकच वाटेत अडथळे उभे करतात

हैद्राबादला पोहोचण्याच्या थोडंच आधी, मी १० किलोमीटर अंतर पावसात चाललो होतो, आणि सर्दी- तापानं मला गाठलं. दसऱ्याचा दिवस होता आणि शहरात उत्सव चालला होता. मी हुसेनसागर तलाव पार करत असताना, काही मुलांनी माझा पाठलाग चालू केला, माझी टिंगलटवाळी चालू केली. पुढे मला झोपायला पहाटे ४ वाजेपर्यंत जागा मिळाली नाही. शेवटी सिकंदराबादमध्ये एका दुकानाच्या पायरीवर मी दोन तासांसाठी झोपी गेलो. ७ वाजता मला आपल्या साधनाक्रिया करण्यासाठी दुसरी जागा मिळाली. मी नुकती सुरुवातच केली होती, की एक दारुडा त्याच्याकडची दारू मला जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न करू लागला. थोड्या वेळाने, हे सगळं सहन न होऊन मला रडूच कोसळलं ... पुन्हा तिथून उठलो आणि दुसरी जागा शोधू लागलो.

जेव्हा मदतीचा हात पुढे येतो

मी तेव्हा अदिलाबाद पार करत होतो, माझ्या श्वासात खूपच घरघर येत होती. नशिबानं मला एक डॉक्टर भेटले ज्यांनी त्या रात्री माझं फुकट औषधपाणी केलं, आणि बिस्किटंही दिली. लोकांच्या औदार्याच्या कृपेनं माझ्या खिशात नेहमीच बिस्किटं असत. एके दिवशी तर मी पूर्ण दिवस ३० पेक्षा जास्त किलोमीटर अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीवर चाललो. परंतु या अक्ख्या एक वर्षात फक्त तीन दिवस असं झालं कि मला काहीही अन्न मिळालं नाही. जेव्हाजेव्हा मला गरज पडली, तेव्हा तेव्हा मला कुणीतरी शाल, स्वेटर किंवा ब्लॅंकेट देऊ केले. विशेषतः मुस्लिम लोकांनी अत्यंत औदार्यानं जेव्हा जेव्हा मी भुकेला दिसलो तेव्हा तेव्हा मला खाऊ घातलं.

जेव्हा मरणाची भूक लागते

एके दिवशी मी भुकेचा आगडोंब पाहिला, पण तो माझा नव्हे. मला वाटतं तेव्हा मी राजस्थानात होतो. एक मनुष्य रस्त्याने माझ्या दिशेने येत होता. तो रस्त्याकडेला अन्न शोधत असावा. माझ्यापासून साधारण ५० मीटर अंतरावर तो खाली वाकून काहीतरी उचलून खाताना दिसला. दुरून ती जागा एखाद्या चिखलाच्या डागासारखी दिसत होती, "तिथं त्याला काय मिळालं असावं बरं?" मला नवल वाटलं. 

मी नीट दिसावं म्हणून जवळ गेलो, आणि मी जे पाहिलं त्यानं मी आतून हललो, इतका, कि आजही ते आठवताना माझ्या अंगाचा थरकाप होतो. ती कुणाचीतरी सुकलेली उलटी होती, आणि त्यातले कण वेचून तो खात होता. त्या क्षणी, मला माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं झालं. महत्प्रयासाने मी माझ्यावर ताबा मिळवला, आणि त्याला माझ्याकडची बिस्किटे देण्यासाठी बोलावलं. कृतज्ञता दर्शवण्याइतपतही त्याची अवस्था नव्हती, तो तिथेच बसून दोन्ही हातानी बिस्किटे खाऊ लागला.

त्या वर्षात कधीकधी मीही रस्त्याकडेला पडलेलं अन्न वेचलं. परिव्राजक साधनेनं मला परमानंद दिला नाही, कि त्या वर्षभरात कधी अध्यात्माच्या लाटा उचंबळून आल्या नाहीत. पण त्या वर्षाने मला भुकेशी मैत्री करायला शिकवली. मी भुकेने मरणार नाही हे नक्की झालं.

जेव्हा सीमारेषेवर वाद चालू असतो

तेव्हा मी सोमनाथ मंदिराकडून गुजरातमधल्या समुद्रकिनाऱ्याच्या रस्त्यानं पोरबंदरकडे चाललो होतो. मला एकदा हायवे पेट्रोल (महामार्ग गस्तीपथक) ने आणि दोनदा स्थानिक गावकऱ्यांनी थांबवलं. त्यांना खात्री करून घ्यायची होती कि मी पाकिस्तानवरून आलेला विस्थापित तर नाही! माझ्याकडच्या सर्व सामानाची झडती घेण्यात आली, तेव्हापासून मग मी सीमारेषेजवळचे मार्ग टाळायला सुरुवात केली. 

हिमालयातून मी अमरनाथपर्यंत गेलो, मग काठमांडू नेपाळमधील पशुपतिनाथला गेलो. तिथून मी ईशान्येच्या राज्यांकडे गेलो, आसाममध्ये कामाख्यादेवी च्या मंदिराला भेट दिली. रस्त्यांवर सतत बीएसएफचे (सीमा सुरक्षा दलाचे) जवान असल्यामुळे मी लगेचच कलकत्त्याला 
परतलो. मग संबळपूर, कडाप्पा, आणि मग तामिळनाडू! तामिळनाडूत शिरताच माझं मन आनंदानं भरून आलं.

पुनःश्च गुरुदर्शन

मी सेलम-तामिळनाडूमध्ये होतो, माझं गावच ते. त्या दिवशी सेलममध्ये महासत्संग होता. ही ११ महिन्याच्या भटकंतीनंतरची गोष्ट. मी कार्यक्रमस्थळी जाऊन तयारी बघत बसलो. एक सोडता कुणीही ब्रह्मचारी किंवा व्हॉलंटियर मला ओळखू शकला नाही. मी तिथून निघालो, पण संध्याकाळी सत्संगासाठी परत आलो. मी सदगुरुंच्या थोडा जवळ गेलो, आणि मग परत गर्दीत मिसळून गेलो. पण एक व्हॉलंटियर
माझ्या मागे आला आणि त्यानं मला पॅक केलेलं जेवण दिलं. अगदी काहीच वर्षांपूर्वी मी ह्या शहरात माझ्या घरी अगदी आरामात राहत होतो. त्या रात्री, अगदी त्याच शहरात, मी एका दुकानाच्या पायऱ्यांवर झोपलो. आणि सुखाने झोपलो.

बारा वर्षांच्या साधनेचं फलित

काही ब्रह्मचारींना जानेवारी २००३ मध्ये संन्यासाची दीक्षा देण्यात आली होती, परंतु त्यांमध्ये मी नव्हतो. त्याचं मला काहीकाळ वाईट वाटलं, पण नंतर जाणवलं कि सदगुरु योग्यायोग्य जाणतात. मला डिसेंबर २००६ मध्ये संन्यास दीक्षा मिळाली, माझ्या ब्रह्मचर्य दीक्षेनंतर जवळपास १२ वर्षांनी. आपल्या परंपरेनुसार, पुढच्या पायरीच्या दीक्षेसाठी आधी १२ वर्षांची साधना सांगितली आहे. दीक्षेनंतर माझे बरेच पाश आणि सवयी गळून पडल्या. हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं कि ही पदोन्नती किंवा प्रमोशन नसून एक समर्पणाची प्रक्रिया आहे. मला कळून आलं कि माझा अध्यात्मिक प्रवास आता अश्या पायरीवर येऊन ठेपला आहे कि तिथून आता मागे फिरणे नाही!

कालभैरव कर्म

मला बालपणी प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असे. हा एक मोठाच विरोधाभास आहे कि आता मी सतत दहनविधींच्या आणि जळणाऱ्या प्रेतांच्या सहवासात असतो. २०११ मध्ये, मी पहिलाच ब्रह्मचारी होतो ज्याला सदगुरूंनी ”कालभैरव कर्म” नावाच्या सोप्या मृत्यूपश्चात क्रियेचं प्रशिक्षण दिलं. आता बऱ्याच ब्रह्मचारींना ह्या क्रियेचं प्रशिक्षण देण्यात आलंय. या क्रियेदरम्यान नक्की काय होतं हे मला कळत नाही, परंतु मी सदगुरुंनी दिलेल्या सूचना जशाच्या तश्या पार पाडतो. रोजच ह्या प्रक्रियेचा भाग झाल्यामुळे मृत्यू हा माझ्या आयुष्याच्या फार जवळचा घटक बनून गेला आहे. मला वाटतं एके दिवशी खरोखरच मी पंचेंद्रियांच्या पल्याड पोहोचलेल्या जीवांचा सारीपाट अनुभवू शकेन.

 

जोवर सदगुरु आहेत तोवर मला जगायचंय

आत्मज्ञान हे माझं लक्ष्य नाही. माझा मोक्ष हे सदगुरूंचं लक्ष्य आहे, आणि ते त्यात कमी पडणार नाहीत याची मला ५००% खात्री आहे. त्या एका गोष्टीची चिंता करण्याची मला गरज नाही. पण हा माझा शेवटचा जन्म नसावा... पुन्हा परत जन्माला येऊन ध्यानलिंगच्या सहवासात राहायला मिळावं अशी मला आशा आहे. जर माझ्या गुरूंनी पुढची अजून ८० वर्षे सूक्ष्मरूपात इथे राहण्याचं ठरवलं आहे, तर त्यांच्या सोबत राहण्याची आणि त्यांच्या पुन्हा उपयोगी पडण्याची संधी मी का बरं सोडावी?
 

Editor's Note: Watch this space every second Monday of the month as we share with you the journeys of Isha Brahmacharis in the series, "On the Path of the Divine."