माँ गंभीरी: “माफ करा, पण ही पार्किंगची जागा जग्गींसाठी राखीव आहे,” एका स्वयंसेवकाने नम्रपणे सांगितले. “हे बरोबर नाही,” असे पुटपुटत मी पुढच्या रांगांमध्ये पार्किंग शोधू लागले. खरंतर मी माझ्या बहिणीसाठी या योग वर्गाला आले होते. आपला अस्थमा बरा होईल या अपेक्षेने ती या योग वर्गात येत होती आणि तिला नेण्या-आणण्याच्या जबाबदारीमुळे मी सुद्धा या वर्गात दाखल झाले. वैमानिकाचे प्रशिक्षण घेणारी, किशोरावास्थेतून नुकतीच बाहेर पडलेली एक सक्रीय मुलगी, होते मी, या योग वर्गाचा मी कधी विचारच केला नव्हता.

मी योग वर्गात वैतागून बसले होते. अशी अपेक्षा होती की आता जीम प्रशिक्षकासारखा दिसणारा कोणीतरी येईल आणि योगासने करून दाखवेल. माझी पूर्ण निराशा झाली कारण काहीच मिनिटांत शुभ्र कुर्ता आणि धोतर नेसलेला एक दाढीवाला माणूस शांतपणे चालत वर्गात आला. माझ्यासाठी ही काही चांगली सुरुवात नव्हती. पण सद्गुरूंचा आवाज मन मोहक वाटला. मी काही फारसं लक्ष दिलं नाही. दुसरया दिवशी मुद्दामच लवकर येऊन मी त्यांची पार्किंगची जागा बळकावली. समाधान वाटून मी वर्गात जाऊन बसले. पण या दुसऱ्या दिवशी आम्हा दोघींना काहीतरी वेगळाच वाटत होतं . नेहमी बडबड करत घरी परतणाऱ्या बहिणी आम्ही त्या दिवशी मात्र गप्प गप्पच होतो. तिसऱ्या दिवशी, त्यांची पार्किंगची जागा मोकळी असूनदेखील मी ती नाही घेतली. त्या दिवशी वर्गात मी प्रत्येक शब्दं-शब्द लक्षपूर्वक एकाग्रतेने ऐकला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दिवशी वर्ग संपल्यानंतर ते माझ्यापाशी आले व माझ्या विमान उड्डाण अनुभवांची सहजच चौकशी केली.

त्या रात्री झोप अशी लागलीच नाही.

अध्यात्माचा मार्ग कसा असतो, आत्मज्ञान म्हणजे काय, गुरु म्हणजे कोण, हे काहीच मला माहिती नव्हतं. सद्गुरू कोण आहेत हे ही मला माहित नव्हतं, पण खूप पूर्वीपासूनची त्यांच्याशी ओळख असल्यासारखं वाटत होतं. त्या दिवशी सर्वकाही स्पष्ट दिसत होतं, तो मार्ग, जो कुठला होता तो, तेच माझं आयुष्य असणार होतं पण ते कसं याची कल्पना मात्र मला नव्हती. त्या दिवसापासून मी एक सक्रीय स्वयंसेविका म्हणून काम करू लागले. माझं वय बघता माझ्या आई-वडिलांना चिंता वाटत होती की या मार्गावर जाण्याचा नक्की अर्थ हिला कळला असेल की नाही? नेमकं काय चाललंय ते समजून घेण्यासाठी ते सद्गुरूंना भेटले. त्या भेटीनंतर सद्गुरूंनी मला तीन महिने थांबून मला नक्की काय पाहिजे याचा नीट विचार करायचा सल्ला दिला. आई-वडिलांनी मला इंग्लंडला पाठवलं. पण माझ्या विचारात आता एक स्पष्टता होती आणि मी 90 दिवसांच्या होलनेस कार्यक्रमासाठी परत आले.

माझ्या आई-वडिलांनी माझ्या निर्णयाचा मान राखत मला पुढील वाटचालीस शुभाशीर्वाद दिले. त्यासाठी मी सदैव त्यांची ऋणी आहे.

योग प्रशिक्षक ते गुरु

त्या 90 दिवसांच्या होलनेस कार्यक्रमात मी सद्गुरूंमध्ये जे काही पाहिलं त्यातून आमच्यातील संबंधात अनेक प्रकारे एक प्रगल्भता आली. प्रत्येक दिवशी ते नवीनच वाटायचे आणि त्यांच्यातील उर्जादेखील रोज वेगळीच असायची. पहिले ३० दिवस दररोज ते एक नवीन परंतु विस्फोटक ध्यान धारणा करून घ्यायचे. सामान्य आकलनापेक्षा जास्त असा जीवनाचा दृष्टीकोन आमच्यापैकी बहुतेकांना मिळाला. 90 दिवसांनंतर मला असे जाणवले कि आम्ही मित्राचे शिष्य आणि शिष्याचे भक्त झालो आहोत आणि त्याचबरोबर सद्गुरूंचे परिवर्तन योग प्रशिक्षकातून दृष्ट्यामध्ये आणि द्रष्ट्यातून गुरुमधे झाले. आम्ही बहुतेकजण आपापसात जरी या बद्दल बोलत नसलो तरी नकळत तसं झालं होतं. होलनेस कार्यक्रमानंतर मी पूर्ण वेळ रहिवासी म्हणून तिथेच राहिले - आता फक्त एकच मार्ग समोर होता. कोठल्याही निवडीशिवाय या मार्गावर चालणे काय असते हे लवकरच मला समजणार होतं.

आंतरिक समतोलाचा शोध

होलनेस कार्यक्रमानंतर माझ्यातल्या उर्जा अशा काही खुलल्या की कधी अत्युच्च आनंदाची शिखर आणि कधी भयंकर नरकयातना मी रोज अनुभवू लागले. हे सहन करणे या 20 वर्षे वय असलेल्या मुलीला कधीकधी खूप कठीण जायचे. एक दिवस तर असा आला की मला खोल गर्तेत अडकल्यासारखे वाटू लागले, आणि मी लगेचच सद्गुरूंना फोन करून मदत मागितली. "यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनांनी मी तुला सज्ज केले आहे," एवढंच बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. यावर विचार करून मी माझ्या साधनेचे एक वेळापत्रक बनवले. पुढील 48 दिवस प्रातःविधी आणि सकाळचे जेवण आटपून 10:30 ते संध्याकाळी 5:30 मी कडूलिंबाच्या झाडाखालील एका दगडावर बसायचे (या जागेला आम्ही शिवालय म्हणतो) व 3 तास ॐकार जप, नंतरचे 3 तास सुख क्रीया आणि त्या पाठोपाठ सम्यमा ध्यान करायचे. मी जमिनीला पाय तेव्हाच लावायचे जेव्हा संध्याकाळी सद्गुरुंसमोर जायचे असायचे (ही वेळ संध्याकाळी 6:20ची होती) किवा सायंकाळचची साधना असायची . ह्या साधनेमुळे आणि सम्यमामुळे मी इतकी आत्मसंतुलीत झाले की आजही अनेक प्रसंगातून मी तारून जाते. आयुष्याला मिळालेले हे एक असे वळण होते की ज्याने मला माझ्या मार्गावर स्थिर केले. मला 1996 साली ब्रह्मचर्येची दीक्षा मिळाली.

विज्जी आक्काचा बिसिबेले भात

सुरुवातीला आश्रमात आम्ही फक्त पाचच जण होतो. आमची प्रिय आजी लाकडांच्या चुलीवर आमच्यासाठी जेवण बनवायची . एक लहानसे शेड आम्ही स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा म्हणून वापरायचो. मी पाट्टीला तिच्या कामात मदत करायचे. सद्गुरू जर आश्रमात असले तर ते भाजी चिरण्याचे काम करायचे. एकदा विज्जीनं सगळ्यांसाठी बिसिबेले भात बनवला. कौतुकाच्या अपेक्षेनं तिने भात कसा झालाय हे सद्गुरूंना विचारले. ते म्हणाले, "हं.. सांबार साड़म फारच छान झाले आहे!" विज्जी वैतागली. त्यांची अशीच थट्टामस्करी आम्हाला खूप आवडायची.

sadhgurus-wife-vijjimaa-samadhi

विज्जीचं आणि माझं पहिल्यापासूनच खूप छान पटायचं. ती जेव्हा आश्रमात असायची तेव्हा आमची साधना आम्ही एकत्रच करायचो. ज्या दिवशी तिने तिचे शरीर त्यागले त्या दिवशीही दिवसभर मी तिच्याबरोबरच होते.

23 जानेवारी,1997 रोजी पौर्णिमा होती. सद्गुरूंनी मला बोलावून विज्जीबरोबर थांबण्यास सांगितले. ती त्यादिवशी एका विशिष्ठ साधनेत होती, म्हणून मी एकतर तिच्या बरोबर ध्यान करायला नाहीतर ब्रह्मचार्यांसाठी ती जेवण बनवत होती त्यात मदत करायला मी थांबले. पौर्णिमेला जेवण तीच बनवायची. पहिल्या ध्यान सत्रानंतर ती तडक सद्गुरूंच्या डेस्कपाशी गेली आणि तेथील एक डायरी मला आणून दिली. ती म्हणली, "इथून पुढे, जग्गीच्या सर्व अपॉइंटमेंट्स यात लिहून तूच त्यांना पाठवत जा." मी हलकीशी नापसंती व्यक्त केली. मी विज्जीला सद्गुरूंच्या अपॉइंटमेंट्स बद्दल सांगायचे आणि ती त्यांना जाऊन सांगायची आणि हे सगळं व्यवस्थित चालू असताना तिला ते बदलावसं का वाटलं हे मला कळत नव्हतं. पण ती ठाम होती. मी फारसं लक्ष दिलं नाही. त्याच संध्याकाळी शरीर त्याग करायची तिची योजना मात्र मला कळली नव्हती.

आजही ती डायरी माझ्याकडे आहे.फक्त एक स्मृती म्हणून नाही तर इथे असलेल्या संधींची एक मोठी आठवण म्हणून. निराशेच्या आणि दुःखाच्या क्षणी मला पुढे जाण्याची प्रेरणा देण्यासाठी.

प्राण प्रतिष्ठेसाठी मोजावी लागलेली किंमत

मध्यंतरीच्या काळात सद्गुरूंनी ध्यानालिंग प्राण-प्रतिष्ठेसाठी लागणाऱ्या उर्जा प्रक्रियेवर काम करण्यास सुरुवात केली होती आणि आम्हाला ते काय असते हे ही माहिती नव्हते. सद्गुरू आमच्या मनाची तयारी करून घेतंच होते की या सोहोळ्यानंतर त्यांना कदाचित देहत्याग करावा लागेल – खरंतर त्यांनी आधीच त्यांची समाधी बांधून ठेवली होती. आमचा तर खूपच गोंधळ उडाला होता. ध्यानालिंग प्राण-प्रतिष्ठा तर हवी होतीच, पण सद्गुरूंचा जीव आमच्यासाठी जास्त मौल्यवान होता. नेमकी काय मदत होईल हे माहिती नसतानाही आम्ही ब्रह्मचार्यांनी आम्हाला काय जमेल ते करायचे ठरविले. आम्ही सर्व तरुण होतो, तेव्हा सगळ्यात आधी आपापसातले मतभेद बाजूला सारून सद्गुरूंना कमीतकमी त्रास होईल असे वागायचे ठरवले. त्यांच्या दीर्घायूसाठी चित्त शक्ती ध्यान करायचे ठरवले. आम्ही ते पुढे कित्येक आठवडे रोज केले.

तयारी जवळपास पूर्ण होत आली होती, पण सद्गुरू आम्हाला प्राण-प्रतिष्ठेची नेमकी तारीख काही सांगत नव्हते. त्यांना त्यांचे शरीर त्यासाठी संपूर्णपणे सक्षम व्हायला हवे होते. आधी ते म्हणायचे की लवकरच होईल, मग ते म्हणायला लागले की, “बरं, कदाचित उद्या, कदाचित परवा.” आमचा जीव त्या दिवसाची वाट पाहताना कासावीस झाला होता. अखेर तो दिवस आला. 23 जून 1999 रोजी सांगितलं की प्राण-प्रतिष्ठा उद्या होईल. त्यांनी मला काही मोजक्याच शिस्तबद्ध स्वयंसेवकांना बोलावणे पाठवण्यास सांगितले कारण या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात त्यांना कुठल्याही प्रकारची गडबड नको होती. म्हणून त्या दिवशी घुमटाखाली जवळजवळ 150-200 लोक उपस्थित होते.

dhyanalinga-consecration-pic

या प्रक्रियेत, आमंत्रित साधकांना लिंगाकडे पाठ करून तर ब्रह्माचार्यांना लिंगाकडे तोंड करून बसवण्यात आले. सद्गुरू अवुदायर वर (एक खास दगडी मंच) होते. एका विशिष्ट प्रक्रियेच्या शेवटी सद्गुरू म्हणाले, “अज्ञ” आधीच दिल्या गेलेल्या सूचनांनुसार आम्ही ती प्रक्रिया चालू ठेवली. मग ते म्हणाले “विशुद्धी” आणि नंतर “अनाहत”. जेव्हा ते म्हणाले “मणिपुरक,” वेदनेने ते पुढे झुकले. मग ते म्हणाले, “स्वाधिष्ठान” आणि त्यांचे पाय डगमगायला लागले. ते पाहून मी सतर्क होऊन बसले. शेवटी आम्ही त्यांना “मूलाधार” असे म्हणताना ऐकले आणि लगेचच तोल जाऊन कोसळताना त्यांना आम्ही पहिले. मी तत्परतेने धावले आणि दगडावर त्यांचे डोके आपटण्याआधी त्यांच्या डोक्याखाली हात दिला. तोवर बाकीचे ब्रह्मचारीपण भोवताली गोळा झाले.

आम्ही त्यांना बाहेर उभ्या असलेल्या गाडीतून त्यांच्या घरी घेऊन गेलो. पुढे 3 दिवस ते आम्हाला दिसले नाहीत. फक्त एकदाच थोड्यावेळासाठी ते स्वयंसेवकांच्या मेळाव्यात डोकावून गेले पण तेव्हाही ते ब्राह्मचार्यांच्या आधारानेच आले होते. मी खूप बेचैन होते. त्यांच्या तब्येतीबाबत आश्वासक काहीतरी ऐकण्यास आसुसलेली होते. तीन दिवसांनी मला असा निरोप आला की सदगुरूंनी मला भेटायला बोलावलं . आणि ते तिथे त्यांच्या आरामखुर्चीत बसले होते, चेहेऱ्यावर स्मित हस्य आणि तेज होते. मी त्यांना घट्ट धरले आणि मला रडू कोसळले. त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. त्याक्षणी सर्वकाही परिपूर्ण वाटले. ते तिथे होते, जिवंत.... आमच्यासोबत.

इशाच्या विस्ताराची सरुवात

प्राण प्रतिष्ठा - पार पडली, कार्यक्षेत्र आणि उपक्रम प्रचंड वाढले आणि आम्ही वेगवेगळी कामे सांभाळू लागलो. आश्रमाचे काम ते स्वयंपाकघर ते प्रशासकीय कामे, माझे कार्यक्षेत्र वाढतच होते. सद्गुरूचे एक मात्र आहे की ते प्रत्येक गोष्टीला उत्सवाचे स्वरूप देतात, त्यामुळे दिवस रात्र जरी काम केले तरी आजुबाजूला प्रचंड उत्साहाचे वातावरण असे.

आश्रमातील मुलभूत सुविधा आणि व्यवस्था लावतांना देखील खूप मजा आली. मला आठवतंय की स्पंद सभागृहामध्ये एक नवे स्वयंपाकघर बांधायचे नियोजन मी आणि स्वामी निसर्ग करत होतो. या स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या भांड्यांबद्दल एका चेट्टीयार कुटुंबाला मी सल्ला विचारला. भांड्या-कुंड्यांचा संपूर्ण संच (सोने आणि हिरे या व्यतिरिक्त) हुंडा म्हणून द्यायची पद्धत या समाजात आहे. अल्प किंमतीत तो हुंडा ते आम्हाला विकायला तयार झाले. चमचे, बाऊल, ताटं, वाट्या, ग्लास, मोठी पातेली आणि इतर स्वयंपाकघरातील उपकरणे त्यांच्याकडून गोळा करतांना खूप मजा आली. एका बाईच्या हुंड्यामधून आमचं अख्ख स्वयंपाकघर लागलं!

आम्ही एक नियम केला होता. महिन्यातील एका दिवशी सर्वांनी स्वयंपाकघरात जमायचे –काहींनी स्वयंपाक करायचा, काहींनी मदत करायची आणि बाकीच्यांनी टवाळगिरी करायची. त्या दिवशी आम्ही बाहेर बागेत जेवायचो. सद्गुरू आश्रमात असले तर तेही आमच्यात सामील होत. एकदा ते म्हणाले की ही परंपरा आपण चालू ठेऊ आणि ती पौर्णिमेच्या रात्री ठेवत जाऊ – सर्व दिवे बंद करून चंद्रप्रकाशात जेवू. आणि सुरु झाली, आमच्या आवडीची पौर्णिमेची मेजवानी.

एक अनपेक्षित साक्षात्कार

kailash-manasarovar-lake-maa-gambiri

पुढे काही वर्षांनी, ईशा यात्रेची मुख्य जबाबदारी माझ्याकडे असताना, सद्गुरूंनी मला आमच्या साधकांना घेऊन तिबेटमधील कैलास मानसरोवराला जाता येईल का हे पाहण्यास सांगितले. 2006 साली पहिल्या 160 साधकांना घेऊन आम्ही पवित्र यात्रा करायचे ठरले. यात्रेच्या तयारीत मग्न असताना कैलास आणि मानसरोवराकडे अध्यात्मिक दृष्ट्या मी कधी विचारच केला नव्हता. माझ्यासाठी तो एक उपक्रम होता तो उत्तमरीत्या पार पाडायचा होता.

सद्गुरूंची जीप एके ठिकाणी थांबली व ते खाली उतरले. मी पाठीमागच्या गाडीतच होते व मी पण खाली उतरले. लांब, समोर एक मोठा जलाशय होता. त्याकडे बघतांना माझ्यात काहीतरी बदल होत असल्याचे जाणवले. माझे डोळे डबडबले होते. आयोजनाच्या नादात यात्रेचे हे ठिकाण एव्हढे शक्तीशाली असेल असा विचारच मनात आला नाही. मी सद्गुरुंकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. तेव्हापासून प्रत्येक वर्षी कैलास मानसरोवर यात्रेचे आयोजन हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला. वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या शेकडो साधकांना अति उंचीवरील, चीनमधे असलेल्या त्या दुर्गम, निर्जन ठिकाणी सुरक्षित नेऊन आणणे हे मोठे कसरतीचे काम होते. हे जबाबदारीचं काम मला सोपवण्यात आलं होतं, हा निश्चितच माझा बहुमान होता.

वेदनेमधील परमानंद

2009च्या यात्रेत माझ्याबद्दल काहीतरी वेगळच घडलं.

कैलासाला जाताना माझा एक अपघात झाला आणि माझ्या मनगटात बरीच फ्रॅक्चर्स झाली. नशीबाने आमच्या बरोबरचा एक डॉक्टर दहाच मिनिटांत तिथे पोचला व तात्पुरते उपचार त्याने केले. असह्य्य वेदना होत होत्या. मला इन्जेक्शन व वेदनाशामक गोळ्या दिल्या गेल्या पण त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. वेदनेनी झोप लागत नव्हती आणि उशांच्या सहाय्याने मी बसून होते. माझी रूम-मेट शेजारी आरामात झोपली होती आणि खिडकीतून बाहेर कैलास पर्वत दिसत होता. काहीवेळानी मी “शंभो” असा जप सुरु केला. लवकरच माझ्या लक्ष्यात आलं कि मी “सद्गुरू” असं जप करते आहे . हे ध्यानी नसतानासुद्धा सहजच घडत होते. “सद्गुरू” हे जपनाम होऊ शक्त का ते ही मला ठाऊक नव्हते. हळुहळू लक्षात आलं वेदनेत आणि माझ्यात अंतर पडत चाललंय. असह्य्य वेदना त्यांच्या जागीच होत्या मात्र मला आता त्या जाणवत नव्हत्या.

त्यावर्षी कैलासाहून परत आल्यावर, माझ्यात काहीतरी मुलभूत बदल घडला होता. “नेमका कोणता?” मी विचारात पडले. एक दिवस अचानक जाणवलं की आठवतंय तेव्हापासून, लहानपणापासून मी कितीही आनंदात असले तरी आत कुठेतरी न सांगता येणारी एक वेदना असायची – ती आता गायब झाली आहे!

असंच एकदा, खूप उदास वाटत होतं, संध्याकाळचा नेहेमीचा फेरफटका मारण्यास मी शिवपादमकडे निघाले होते. हलका वारा अंगावर घेत मी चालले होते आणि निरव शांततेने मला गाठलं. मी चालायचा वेग कमी केला आणि पर्वताकडे पहिले. सर्वसामावेशतेचा भाव माझ्यात पसरलेला जाणवला. आकाश, डोंगर, वारा, झाडं, भोवतालचे सर्व जीवन माझ्यात एकरूप झाल्याचे जाणवले. ही जाणीव थोडा वेळ राहिली. त्यानंतरचे बरेच दिवस मी अनवाणी चालायचे कारण जमिनीचा स्पर्श हवाहवासा वाटायचा आणि आत खोलवर मौनाचा भाव असायचा.

सगळ्यात अप्रतिम आणि परिवर्तनाचे क्षण कमीत कमी अपेक्षा असतांना माझ्या आयुष्यात आले.

देवांना पण हेवा वाटावा

on-the-path-of-the-divine-maa-gambiri-and-sadhguru-pic

प्रारंभीच्या काळात, छोट्या जमिनीच्या एका तुकड्यावर सुरुवात करतांना एकच स्वप्न होतं की सद्गुरूंना ते जे आहेत त्यासाठी साऱ्या जगाने ओळखावे. ते सत्यात उतरताना पहाणे हे अत्यंत हृदयस्पर्शी आहे. आश्रमासाठी जमीन शोधण्यापासून आत्तापर्यंत या प्रवासात सद्गुरूंची साथ देणे हे माझे अहोभाग्य समजते. सद्गुरू एकदा म्हणाले होते कि असे एक स्थान बनवले पाहिजे कि देवांनासुद्धा त्याचा हेवा वाटला पाहिजे. अशी जागा बनवणाऱ्या बरोबर मी राहते.