स्वतःला जागरूक कसं करू शकतो
सद्गुरू जागरुकते बद्दल माहिती देत आहेत. जागरूक कसे व्हायचे हे जाणून घेण्यापूर्वी जागरूकता म्हणजे काय ते जाणून घेऊया? वास्तविक जागरूकता अनेक स्तरांवर असते......
प्रश्न: मी स्वतःला जागरूक करण्यासाठी काय करू शकतो?

तुम्हाला तुमचे आयुष्य पूर्णपणे जाणून घ्यायचे असेल, तर ते कसे जाणून घ्यायचे? चला उदाहरणासह समजून घेऊया- आपण असे समजूया की इथे फक्त एकच लाईट जळत आहे आणि आपण त्याची वोल्टेज कमी केली आहे. त्यामुळे थोडाच प्रकाश पडत आहे आणि आपण थोडसंच पाहू शकतो. जर तुम्ही वोल्टेज वाढवला तर तुम्हाला अचानक अधिक स्पष्ट दिसेल, कारण प्रकाश पसरलेला असेल. जागरूकता असणे म्हणजे अगदी तसेच आहे. आता तुमची उर्जा, तुमचे शरीर, तुमच्या भावना, तुमचे मन सर्व काही कमी, सीमित वोल्टेज मध्ये कार्यरत आहेत. जर तुम्ही वोल्टेज वाढवला तर अचानक तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसू लागतील ज्या आतापर्यंत तुमच्या संवेदनाच्या क्षेत्रात नव्हत्या.
सोप्या शब्दात, जरा तांत्रिक भाषेत सांगायचे झाले तर, तुम्हाला तुमचे वोल्टेज वाढवणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या उत्साहाच्या मदतीने तुमचे वोल्टेज सहजपणे वाढू शकता, परंतु याद्वारे तुम्ही तुमच्या अंतिम मुक्कामापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुमच्या व्होल्टेजला विशेष मार्गाने वाढवण्याची आणखी काही तंत्रे आहेत, जी तुम्हाला नेहमी जागरूक ठेवू शकतात.
माझ्याकडे पहा मी स्वतःच, स्वतःमध्येच नशेत धुंद आहे. दारु किंवा मादक पदार्थांमुळे नाही, मी त्याला आज पर्यंत स्पर्शही केला नाही. मी स्वतःच्याच नशेत धुंद आहे. मग मी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे का? हो आहे, म्हणून मी नेहमीच एका स्तरावर धुंद असतो आणि दुसऱ्या स्तरावर पूर्णपणे जागरूक असतो. मला हवे असल्यास कोणत्याही क्षणी मी एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाऊ शकतो. जर तुमच्यात ऊर्जा भरली असेल आणि तुम्ही बाहेरून नियंत्रित असाल - तरच तुम्ही आयुष्य पूर्णपणे अनुभवू शकता. आत्ता तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनाच्या मूलभूत प्रक्रियेवर लगाम घालायला सुरुवात केली आहे, परिणामी तुमचे आयुष्य फक्त थेंबथेंबानी घडत आहे. पण खरं पाहता, तुमच्यातील आयुष्य एखाद्या मोठ्या विस्फोटा प्रमाणे घडले पाहिजे, परंतु बाहेर त्याचे पूर्णपणे नियंत्रण असले पाहिजे. अशा स्थितीत पोहोचल्यावर, सुरुवातीला तुम्ही पाहाल काही काळ बाह्य परिस्थितीसुद्धा स्फोटक बनतील, परंतु थोड्याच कालावधीत तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात कराल. आता आत जोरदार स्फोट पण बाह्य परिस्थिती मात्र पूर्णपणे नियंत्रित. आयुष्य असेच असले पाहिजे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वेगवान स्फोट आणि बाहेर मात्र पूर्णपणे नियंत्रित. जेव्हा असे घडते, तेव्हा तुम्ही तुमचे शरीर, तुमचे मन, भावना, प्रत्येक गोष्ट त्याच्या कार्यक्षमतेच्या टोकापर्यंत वापरण्यास सक्षम व्हाल. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला सक्षम मानले नाही, अचानक वोल्टेज वाढवल्यामुळे तुम्ही ते करण्यास सुरुवात कराल.