सद्गुरु: योगाच्या काही विशिष्ट प्रणालींमध्ये योगींची विभागणी तीन श्रेणीमध्ये केली जाते. त्यांना मंद, मध्यम आणि उत्तम असे संबोधले जाते.

मंद योगी – ही एक चालू आणि बंद धारणा आहे

मंद याचा अर्थ जागृत असणे म्हणजे काय याची त्याला जाणीव आहे. त्याने सृष्टीच्या स्त्रोताची चव चाखली आहे, त्याने वैश्विक ऐक्य जाणले आहे पण तो संपूर्ण दिवसभर हे ऐक्य तो कायम ठेऊ शकत नाही. त्याला स्वतःला त्याची आठवण करून द्यावी लागते. तो जेंव्हा सजग असतो, तेंव्हा तो त्या अवस्थेत असतो. तो जेंव्हा सजग नसतो, तेंव्हा तो संपूर्ण अनुभव गमावतो. हे आनंदी किंवा समाधानी असण्याविषयी नाहीये. हे एखाद्या अनाम परमानंदाच्या स्थितीत असण्याविषयी आहे. तर पहिल्या श्रेणीमधील योगींना हे माहिती असते, पण त्यांना इतर कोणीतरी किंवा स्वतःच त्याने त्याची आठवण करून द्यावी लागते. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले, तर त्याचे आकलन नेहमी एकसारखेच नसते.

तुम्ही जेंव्हा सजग असता, आणि लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींचे आकलन करू लागता, तेंव्हा सारे काही असते. तुम्ही जर पुरेसे सजग नसाल, जेंव्हा तुमचे आकलन कमी होते, तेंव्हा काहीही नसते. जेंव्हा तुमची आकलन खरोखरच खूप खालावते, असे समजूया की तुम्ही झोपी गेलेले आहात, तेंव्हा तुम्ही जगाचे आकलन देखील करू शकत नाही. ते तुमच्या अनुभवामधून अदृश्य झालेले असते. त्याचप्रमाणे, जेंव्हा एखादा विशिष्ट पैलू जेंव्हा अधिक सूक्ष्म बनतो, तेंव्हा तुम्हाला तुमच्या आकलनाची पातळी उंचावणे आवश्यक असते. कोणीही व्यक्ती प्रयत्नपूर्वक चोवीस तास सजग राहू शकत नाही. तुम्ही जर सजग राहण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही जर तसे काही सेकंद किंवा मिनिटे राहू शकलात, तरीही ती एक फार मोठी गोष्ट आहे. अन्यथा, ते सर्वत्र विखुरलेले असेल. म्हणून, पहिल्या पातळीवरील योगींना मंद असे संबोधले जाते. मंद म्हणजे लोकांना वाटते तसे निस्तेज नव्हे, तर त्यांचे आकलन निस्तेज असते.

मध्यम योगी – नीम करोली बाबा

त्यांच्या चेतनेत, शारीरिक क्रिया, ऐहिक क्रिया पूर्णतः नजरआड झाल्या होत्या.

योगींमधील दुसर्‍या श्रेणी किंवा पातळीला मध्यमा असे संबोधले जाते, ज्याचा अर्थ मध्यम असा आहे. त्यांच्यासाठी त्यांचा आंतरिक आयाम आणि भौतीकतेच्या पल्याड असलेले सर्व काही त्यांच्या धारणेत असते, पण ते इथे, भौतिक आयामातील असणार्‍या गोष्टी ते हाताळू शकत नाहीत. असे अनेक योगी आहेत, ज्यांची उपासना आजदेखील केली जाते, पण ते त्यांच्या आयुष्यात काहीही करण्यास असमर्थ होते. आयुष्याच्या एका टप्प्यावर असताना, त्यांना अन्नग्रहण करण्याची आणि मलमूत्र विसर्जन करण्याची देखील आठवण करून द्यावी लागत असे. ते स्वतःच्याच मनामध्ये एका विलक्षण स्थितीत रममाण झाले होते, पण ते एखाद्या असहाय बालकासारखे बनले, बाह्य गोष्टींशी त्यांचा संपर्क तुटला होता.

एक उदाहरण म्हणजे नीम करोली बाबा, ज्यांना मलमूत्र विसर्जन करण्याचे देखील भान रहात नसे. ते निव्वळ बसून रहात. कोणीतरी त्यांना सांगत असे, “गेले कित्येक तास तुम्ही लघवी करायला गेलेले नाही, आता मात्र तुम्हाला जाणे अत्यावश्यक आहे,” आणि त्यानंतरच ते त्यासाठी जात असत. त्यांच्या चेतनेमध्ये, शारीरिक क्रिया, ऐहिक क्रिया संपूर्णतः नजरआड झाल्या होत्या. ते एका विलक्षण स्थितीत असत, पण कितीही विलक्षण स्थिती असली, तरीही तुम्ही त्याच स्थितीत राहू शकत नाही कारण जेंव्हा तुम्ही भौतिक जगापासून तुटलेले असता, तेंव्हा तुम्ही भौतिक शरीरात राहू शकत नाही.

उत्तम योगी – दत्तात्रय गुरूंची कथा

तिसर्‍या श्रेणीमधील योगी सदैव अद्वितीयतेच्या धारणेत असतात, आणि त्याच वेळी, ते बाह्य जगाशी अतिशय योग्य प्रकारे तल्लीन, समरस झालेले असतात. येवढ्या मोठ्या प्रमाणात की ते खरोखर योगी आहेत की नाही हे आपल्याला समजत नाही! याचे एक उदाहरण म्हणजे दत्तात्रेय. त्यांच्या भोवताली असणारी लोकं म्हणत की ते एकाच वेळी शिव, विष्णु आणि ब्रम्हाचे अवतार आहेत. हा लोकांचा व्यक्त होण्याचा मार्ग आहे. कारण त्यांना हे दिसत होते, की जरी ते मानवी अवतारामध्ये असले, तरी त्यांच्याबाबत मानवी असे काहीही नव्हते. ते अमानवी आहेत असा त्याचा अर्थ नाही, परंतु ते नक्कीच मानव नव्हते. म्हणून लोकांनी त्यांच्यात येवढे गुण असलेले पाहिले, तेंव्हा ते केवळ शिव, विष्णु आणि ब्रम्हाबरोबरच त्यांची तुलना करू शकले. ते म्हणाले की तो तिघांचा एकत्रित अवतार आहे.

म्हणूनच काही वेळा तुम्हाला दत्तात्रेयाच्या काही प्रतिमांमध्ये त्यांना तीन तोंडे दाखवलेली आढळतात कारण त्यांना तिघांचा एकत्रित अवतार समजले जाते.

दत्तात्रेय अतिशय गूढ आयुष्य जगले. अगदी आजसुद्धा, शेकडो पिढ्यांनंतर दत्तात्रेयांच्या उपासकांची संख्या खूप मोठी आहे. तुम्ही कदाचित कानीफांविषयी ऐकले असेल. अगदी आजसुद्धा ते काळ्या कुत्र्यांसह प्रवास करतात. दत्तात्रेयांच्या भोवताली सदैव अगदी काळीकुळकुळीत कुत्री असत. तुमच्या घरी जर एखादे कुत्रे असेल, तर तुम्हाला हे लक्षात आले असेल की तुमच्यापेक्षा ते अधिक ग्रहणशील असते. गंध, श्रवण आणि दृष्टीमध्ये – ते तुमच्यापेक्षा अधिक चांगले असते. तर दत्तात्रेयांनी कुत्र्याला एका वेगळ्या स्तरावर घेऊन गेले आणि त्यांनी संपूर्णपणे काळी कुळकुळीत असणारी कुत्री निवडली. अगदी आजदेखील कानिफांकडे अशी मोठी कुत्री असतात. ते त्यांच्या कुत्र्यांना चालू देत नाहीत, ते त्यांना त्यांच्या खांद्यावर घेऊन वाटचाल करतात कारण तो दत्तात्रेयांचे पाळीव प्राणी होता. त्यामुळे ते त्यांना अतिशय विशेष वागणूक देतात. त्यांनी नेमून दिलेल्या रूढी अजूनही पाळल्या जातात आणि आध्यात्मिक साधकांचा तो एक सर्वात मोठा समूह आहे.

परशुराम गुरुच्या शोधार्थ बाहेर पडतात

परशुराम हे महाभारत काळामधील एक महान क्षत्रीय ऋषी होते. अनेक मार्गांनी, कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धात सहभागी न होता, त्यांनी त्या युद्धाचे भवितव्य ठरवले. त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच कर्णाशी संधान साधले होते. म्हणून जरी त्याच्याकडे प्रचंड क्षमता होती, तरीही त्याच्या मनातील भावनिक आंदोलनांमुळे त्याला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी दैवी धारणा ठेवता आली नाही. त्याच्या मनात सदैव उलट सुलट विचार सुरू असत – बहुतांश वेळी नकारात्मक विचारच.

परशुरामाने जेंव्हा मद्य ,स्त्री आणि मद्यपानाच्या पलीकडे असणारी गोष्ट दत्तात्रेयांमध्ये पाहिली, तेंव्हा त्यांना याची जाणीव झाली की दत्तात्रय सदैव दिव्यत्वाच्या संपर्कात असतात, आणि तो क्षण त्यांच्या आत्मसाक्षात्काराचा क्षण ठरला.

म्हणून ते अनेक गुरूंकडे किंवा शिक्षकांकडे गेले. जेंव्हा त्यांच्या लक्षात आले की ते शोधत असणारे ज्ञान त्या गुरूंकडे नाही, तेंव्हा त्यांनी ठार मारत असत. अखेर ते दत्तात्रयांकडे आले. लोकांनी त्यांना संगितले, “दत्तात्रेय हेच तुझे उत्तर आहे.” त्यांच्या हातात असणार्‍या परशुसकटच ते त्यांच्याकडे आले. ते जेंव्हा दत्तात्रेय रहात असलेल्या ठिकाणाकडे यायला लागले, तेंव्हा त्यांना तेथे अनेक आध्यात्मिक साधक जमा झालेले दिसले. ते त्यांच्या आश्रमात डोकावून पहात होते आणि तेथून पळून चालले होते!

जेंव्हा परशुराम दत्तात्रेयांच्या निवासस्थानी गेले, तेंव्हा त्यांना असे दिसले की एक मनुष्य एका मांडीवर एक मद्याचा पेला आणि दुसर्‍या मांडीवर एका तरुण स्त्रीला घेऊन बसला आहे. ते पाहतंच राहिले. दत्तात्रेय नशेत होते. परशुरामांनी त्यांच्याकडे पाहिले, त्यांच्या हातातील परशु शेवटच्या एक वेळेस खाली ठेवला आणि त्यांना प्रणाम केला. इतर सर्वजण निघून गेले होते. ज्या क्षणी त्यांनी प्रणाम केला, त्या क्षणी मद्याचा पेला आणि स्त्री नाहीसे झाले आणि दत्तात्रेय त्याठिकाणी त्यांच्या कुत्र्यांसह बसलेले दिसू लागले. परशुरामांना दत्तात्रेयांमध्ये त्यांचे तारणहार सापडले.

दत्तात्रेय हे दाखवून देतात की जगात कोणतीही गोष्ट करता येते आणि ती करत असताना हरवून न जाणे शक्य आहे, आणि परशुरामांसाठी हे एक प्रात्यक्षिक होते, कारण ते एक प्रचंड क्षमता असणारी व्यक्ती होते, पण त्यांच्यामधील ही क्षमता त्यांच्या रागावाटे व्यक्त केली जात होती, भावनिक नैराश्यामुळे नकारात्मक भावना मनात निर्माण होत होत्या. म्हणून दत्तात्रेयांनी एक नाटक रचले, आणि जेंव्हा परशुरामांनी मद्य ,स्त्री आणि मद्यपानाच्या पलीकडे असणारी एखादी गोष्ट पाहिली, तेंव्हा त्यांना याची जाणीव झाली की दत्तात्रेय सदैव दिव्यत्वाच्या संपर्कात असतात, आणि त्या क्षणी त्यांना साक्षात्कार घडला. ते जर त्यांच्या आयुष्यात समजूतदार राहिले असते, तर त्यांच्या परशुपासून अनेक लोकं वाचू शकली असती!