प्रश्नकर्ता : सद्गुरू, तुम्ही म्हणालात की इतरांच्या धर्माला विरोध न करतासुद्धा प्रत्येकाला आपला धर्म, आयुष्य आणि स्वातंत्र्य जपता येतं. पण त्याउलट आजच्या काळात आपण आपला धर्म स्वतःच्या व्यक्तीमत्वानुसार बनवतो आणि मग इतरांशी आपसात भांडत राहतो; असं होत नाही का?

सद्गुरू: म्हणूनच मी म्हणालो की हा एक फार गुंतागुंतीचा विचार आहे. जर आपल्या गरजांच्या सभोवती आपला धर्म उभा केला तर आपण नक्कीच कुणाचा ना कुणाचा विरोध करू. म्हणूनच लोकांनी स्वत:चा धर्म अशा प्रकारे तयार केला जेणेकरून त्यांची सर्वोच्च महत्वाकांक्षा इतरांच्या महत्त्वाकांक्षेच्या विरोधात असणार नाही. पण जेव्हा आपण रस्त्यावर, घरात किंवा बाजारात वावरताना सर्वांनी एक समान धर्म पाळणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, रस्त्यावरून गाडी चालवतांना आपण रस्त्याच्या कोणत्यातरी एका बाजूनेच गाडी चालवावी हे आधीच ठरलेलं असतं. तुमचा वैयक्तिक धर्म वेगळा आहे असं म्हणून हा सर्वमान्य धर्म तुम्ही मोडू शकत नाही.

तुमचा वैयक्तीक धर्म हा तुम्हाला तुमच्या मूळ किंवा परमोच्च स्वभावाकडे घेऊन जाण्याविषयी आहे. ही एक आंतरिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे ती इतरांच्या वैयक्तिक धर्माच्या विरुद्ध असणार नाही. याउलट, बाह्य जगाचे नियम आणी कायदे म्हणजे प्रत्येकाला पाळावा लागणारा समान धर्म आहे. या समान धर्माला जेव्हा आपण आव्हान देतो तेव्हा संघर्ष हा अटळ आहे. धर्म विविध स्तरांवर असतो. कुटुंबात राहणे हा एक प्रकारचा धर्म झाला. तपस्वी जीवन जगणे हा आणखी एक प्रकारचा धर्म झाला. राजा होऊन राज्य करणे हा आणखी एक प्रकारचा धर्म झाला. व्यावसायिक होऊन व्यापार करणे हा आणखी एक प्रकारचा धर्म झाला. या प्रकारे अनेक धर्म असू शकतात. परंतु एक स्वतंत्र जीव म्हणून तुम्हाला तुमचा स्वतःचा असा धर्म निवडण्याचे आणी त्याचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. परम मुक्ती ही विशेष काहीतरी केल्याने मिळत नाही, कोणत्यातरी एकाच मार्गाचे अढळपणे पालन केल्याने ती साध्य होते - "निश्चल तत्वं, जीवन मुक्ती:' पण जर तुम्ही रोज दिशा बदलत राहिलात तर तुम्ही फक्त गोल गोल फिरत राहाल.

प्रश्नकर्ता: सद्गुरू, जेव्हा तुम्ही आपल्या परमोच्च स्वरूपाबद्दल आणि धर्माबद्दल बोलता, तेव्हा मला धर्म म्हणजे एक कायद्यांचा समूह वाटतो. कायदे बनवत बसण्याऐवजी जीवन आणि घडणार्‍या गोष्टी त्या जीवनात येतील तेव्हा का हाताळू नये?

सद्गुरू: जीवन आपोआप घडत नाहीये. ते सतत घडवलं जात आहे. एकतर तुम्ही ते काल तयार केलं होतं आणि आता ते तुमच्यावर एका आपत्तीसारखं कोसळलंय किंवा आज तुम्ही त्याच्या निर्मितीत गुंतले आहात. स्वतःहून काहीच तयार होत नाही. दोन पैलू आहेत; एक धर्म आणी दुसरं कर्म. योग्य प्रकारचं कर्म करण्यासाठी तुम्हाला धर्माची आवश्यकता असते. तसे नसेल तर, दररोज, प्रत्येक क्षणी, तुमचं कर्म तुम्हाला गोंधळून टाकील. तुमच्या कर्मांची दिशा ठरवण्याचं काम धर्म करतो, जेणेकरून तुमचं जीवन तुम्हाला हवं त्या दिशेने तुम्ही घडवू शकाल. तुमचं जीवन घडवणं म्हणजे तुमचं घर, गाडी, पती किंवा पत्नी निवडणं नाही. त्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक जीव म्हणून तुम्ही कसे आहात... ही एकच गोष्ट तुमची आणि तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवते; आणि तुम्ही या जीवनात आणि जीवनानंतर किती चांगल्या प्रकारे राहाल हे सुद्धा ठरवते. तुम्ही कोणाबरोबर आहात, तुमच्याभोवती काय चालू आहे, तुम्ही राजवाड्यात राहता की नाही, तुम्ही अन्न खाता की सोनं याने काहीही फरक पडत नाही. सोनं खाल्लं तर लवकर मराल; एवढाच काय तो फरक! सर्वप्रथम, तुम्हाला जीवन नक्की कुठे आहे हेच माहित नाही. तुम्ही सर्व चुकीचे दरवाजे ठोठावत आहात, ज्याचा काही फायदा होणार नाही. तुमचा धर्म प्रस्थापित करणे म्हणजे, मूलभूत जीवन प्रक्रियेपासून तुमचं कर्म विचलित होणार नाही याची खात्री करणे. तुम्हाला सतत याची आठवण राहायला हवी की तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने असणं हा तुमचा धर्म आहे.

तुमचा धर्म प्रस्थापित करा

हे विश्वाच्या नियमांविषयी आहे. हे विश्वाच्या धर्माविषयी आहे कारण तुम्ही जे काही करता, तुमच्या हृदयाचे ठोके जसे पडतात, तुमचा श्वास ज्याप्रकारे तुम्ही तो घेता, तुमची शरीर यंत्रणा ज्या प्रकारे ती काम करते ते विश्वाशी खोलवर जोडलेलं आहे. तुम्ही विश्वाच्या नियमांचं जाणीवपूर्वक पालन केलं तर तुम्ही एक अभूतपूर्व मार्गाने कार्य करू शकाल. आत्ता, तुम्हाला शरीरात किंवा मनात अस्वस्थता वाटत असेल त्याचं कारण तुम्ही नकळत, आपण विश्वाच्या मूलभूत नियमांचे पालन करत नाही आहोत. तुम्ही हे जाणीवपूर्वक केलं किंवा तुमच्या नकळत हे घडलं, तरी त्याचा परिणाम एकच होतो. हाच सृष्टीचा नियम आहे. तुम्ही जाणीवपूर्वक वरून खाली पडला काय, किंवा नकळत पडलात काय, दुखापत ही होणारच. फरक इतकाच आहे की तुम्ही जाणीवपूर्वक पडलात तर तुम्ही तुमच्या पायाच्या दिशेने पडायचा प्रयत्न कराल आणि नकळत पडलात तर डोकयावर पण आपटू शकता. पण त्यात वेदना आणि दु:खाचा अनुभव सारखाच असेल. तुम्ही नकळतपणे जरी मार्ग सोडून गेलात तरी भटकणारच. धर्म म्हणजे काय हे मला समजलं आहे असा विचार करणार्‍यांसाठी धर्म काम करणार नाही. जो धर्माची अंमलबजावणी करतो, स्वतःच धर्म बनतो त्याच्यासाठीच धर्म काम करतो.

आधी धर्म, मग कर्म

भीष्म म्हणतात, “माझा धर्म कठोर आहे - मी तो ठरवलाय आणि आता मी धर्मरूप झालो आहे. काही झालं तरी, मला माझ्या आयुष्याची किंमत मोजावी लागली तरीही, मी माझा हा धर्म बदलू शकत नाही कारण आता मीच तो धर्म झालो आहे.” जर तुम्ही असे असाल, तर तुमचा धर्म प्रस्थापित करुन तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करता. ‘योगस्थः कुरु कर्मणी’ म्हणजे, आधी तुमचं असण्याची रीत प्रस्थापित करा – आणि मग कर्म करा. आधी धर्म मग कर्म. सध्या तुम्ही तुमचा धर्म जाणून घेतल्याशिवाय बरेच कर्म करता - ही खरी मुलभूत समस्या आहे.

जर तुम्ही तुमच्या धर्माचा पाया भक्कम केला नसेल तर तुमचं कर्म तुम्हाला तुमच्या कल्याणापासून दूर नेईल कारण तुमचं बहुतेक कर्म नकळतपणे घडतंय.

कर्म केवळ आपण जगात करत असलेल्या गोष्टी नाहीये, तुम्ही तुमच्या डोक्यात तयार करत असलेल्या अनेक निरर्थक गोष्टींमध्ये सुद्धा आहे. हे कर्म आहे. कर्म म्हणजे कृती. कर्माचे चार स्तर आहेत - शारीरिक कृती, मानसिक कृती, भावनिक कृती आणि उर्जेच्या पातळीवर केलेली कृती. तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षणी, तुम्ही या चार प्रकारची कर्म करत आहात. तुम्ही जेवताय म्हणजे हे करताय, तुम्ही चालताय म्हणजे हे करताय, तुम्ही अगदी गाढ झोपेत असलात तरीही ही चारही प्रकारची कर्म करताय; जीवनाच्या अगदी प्रत्येक क्षणी, जागे असताना आणि झोपेतसुद्धा. या सर्व प्रकारच्या कर्माने तुम्हाला तुमच्या कल्याणापासून दूर नेऊ नये यासाठी तुम्ही धर्माचा पाया भक्कम करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही तुमच्या धर्माचा पाया भक्कम केला नसेल तर तुमचं कर्म तुम्हाला तुमच्या कल्याणापासून दूर नेईल कारण तुमचं बहुतेक कर्म नकळतपणे घडतंय. पण जर तुम्ही तुमचा धर्म प्रस्थापित केला तर कर्माचा एक स्वाभाविक साचा तयार होतो - मग तुमच्या कर्माला एक मांडणी किंवा क्रमवार रचना असेल, ठराविक दिशा असेल, ठराविक ध्येय आणि त्याची पूर्तता असेल. तुम्ही तुमचा धर्म प्रस्थापित केला नसेल तर तुमचं कर्म सर्वत्र भरकटत राहील. मग जे तुमच्या डोळ्यांना दिसेल त्याच्यामागे तुमचं मन, भावना आणि शरीर पळत सुटतील. असं केलं की तुम्ही गोंधळून जाता. जेव्हा तुमचा जीव हे शरीर सोडून जाईल तेव्हा कुठं जायच हे देखील त्याला समजणार नाही कारण ते गोंधळलेलं असेल. मी तुमच्या गोंधळलेल्या मनाबद्दल बोलत नाहीये - त्याची तुम्हाला चांगलीच जाणीव आहे. मी गोंधळलेल्या जीवाबद्दल बोलतोय. धर्म नसल्यामुळेच हा जीव गोंधळतो. जेव्हा तुम्ही हे शरीर सोडता आणि आता कुठे जायचं हे जीवाला माहिती नसतं, तेव्हा ती प्रचंड यातनामय अवस्था असते. एका मनुष्यासोबत याहून आणखी वाईट काही होऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने, हे फार मोठ्या प्रमाणात घडत आहे, कारण लोक स्वत:साठी कोणत्याही प्रकारचा धर्म प्रस्थापित करत नाहीत आणि त्यांना हे स्वातंत्र्य वाटतं.

अनुवांशिकतेच्या खेळातून बाहेर पडूया

जर स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण कोणत्या बाजूने वाहन चालवावे याचे नियम रद्द केले आणि जर प्रत्येकाला पाहिजे तसे वाहन चालवू दिले तर लोक स्वतंत्र होणार नाहीत - ते त्यात अजूनच अडकतील. नियम मोडून स्वातंत्र्य येत नाही - केवळ मार्ग स्पष्ट असेल तरच स्वातंत्र्याला अभिव्यक्ती मिळू शकते. तर, आपल्या आयुष्यात गोष्टी आपोआप घडतात आणि आपण जसं आवडेल तसं त्यांना हाताळू असा विचार करू नका. हा काही उत्स्फूर्तपणा नाही - ही तुमची आंतरिक सक्तीपूर्ण प्रवृत्ती आहे. अगदी उत्स्फूर्ततेसाठी देखील आपले पाय खंबीरपणे रोवलेले हवेत. पाय भक्कमपणे रोवले नसतील तर ती फक्त सक्तीने केलेली कृती असेल, उस्फुर्तपणे केलेली नाही, कारण तुमच्या शरीराची रचना ज्या प्रकारे घडवली गेली आहे ती सुद्धा तुम्ही निर्धारित केलेली नाही. तुमचं शरीर अजूनही कृष्णाच्या द्वापर युगात असलेल्या आपल्या पूर्वजांसारखंच दिसतं. लोकांची थोडी सरमिसळ झाली असेलही, तरीही या पूर्वजांची अनुवंशिकता तुमच्यासोबत खेळ खेळते आहे.

लाखो वर्षांपूर्वी येथे राहून गेलेले लोक आजही तुमच्याबरोबर खेळ खेळत आहे. तुमच्या आत घडणार्‍या गोष्टींच्या पलीकडे जाऊन स्वत:चा धर्म प्रस्थापित करणे ही काही सोपी गोष्ट नाही. “हा माझा धर्म आहे” असे म्हणण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या वडिलांच्या, तुमच्या पूर्वजांच्या आणि इतर सर्वांच्या देखील पलीकडे जात आहात. याचा अर्थ तुम्ही तुमची अनुवंशिकता सोडत आहात आणि तुमचा स्वतःचा मार्ग स्थापत आहात. भीष्मांनी हे पाहिलं होत की त्यांच्या वडिलांच्या वागण्याचे काही विशिष्ट साचे होते, ते सक्तीने 'सारखे प्रेमात पडणारे' व्यक्ती होते. ते सतत प्रेमात पडले, पण भीष्मांचं कर्म आणि धर्म दोन्हीही त्या पद्धतीचे नव्हते. “मी माझ्या धर्मापासून कधीही विचलित होणार नाही. माझं जीवन राष्ट्राला समर्पित आहे आणि हेच माझं सर्वस्व आहे.” भीष्मांनी आपल्या अनुवांशिकतेची बंधने झुगारून स्वत:चा मार्ग स्थापित केला. आपला भूतकाळ आपल्या जीवनाचा ताबा घेणार नाही अशा प्रकारे आपला स्वतःचा धर्म स्थापित करणे हीच अध्यात्मिक साधना आहे. तुम्हाला माहीत आहे का? एकदा कुणीतरी येशूला म्हटलं की त्याला जायचं आहे आणि त्याच्या मृत वडिलांचा दफनविधी करून यायचं आहे, तेव्हा येशू म्हणाले, “मृतांना मृतांसोबतच राहू द्या.”

नुकतेच स्वत:चे वडील गमावलेले असताना असं बोलणं ही सर्वात अमानुष आणि असह्य गोष्ट वाटते. पण येशूने हे असेच म्हटले कारण तो केवळ त्या मृत बापालाच सोडायला नाही तर त्याच्या आत खळबळ माजवणार्‍या सर्व मृत पूर्वजांना सोडून द्यायला सांगत होता. जर तुम्ही मेलेल्यांना मेलेल्यांकडे सोडून दिलं नाही तर तुमचा स्वत:चा असा धर्म असणार नाही; तुमचं स्वतःचं जीवनही असणार नाही. दुसरं कुणीतरी तुमच्यातून जगण्याचा प्रयत्न करतोय.. आपला स्वतःचा धर्म स्थापित करणं म्हणजेच जे मेलेत त्यांना मेलेल्यांकडे सोडणं आणि स्वतःसाठी एक नवीन मार्ग तयार करणं. हेच स्वातंत्र्य आहे.

उर्वरित पुढील भागात...