सद्गुरु: गोरखनाथ हे आज देखील भारतातील नामवंत योग्यांपैकी एक आहेत. त्यांच्या अनुयायांना सहसा कानिफ म्हणून ओळखले जाते – त्यांच्या कानात असलेल्या मोठ्या छिद्रामुळे ते कायमच ओळखू येतात.

मत्स्येंद्रनाथ हे गोरखनाथांचे गुरु होते. मत्स्येंद्रनाथ, ज्यांना लोकं एक शिवाचाच अवतार असे समजून मान देत असत, हे एक थोर योगी आणि गूढवादी होते. ते सामान्य मनुष्य नव्हते; ते त्यांच्या कितीतरी पलीकडे पोहोचले होते. त्यांच्या अतिशय कट्टर शिष्यांचा अपवाद सोडता त्यांनी त्यांचे जीवन लोकांपासून दूर, अतिशय निर्जन ठिकाणी एकांतात घालवले. त्या शिष्यांपैकी एक गोरखनाथ होते. गोरखनाथ भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागातले आहेत; आणि मत्स्येंद्रनाथ देखील त्याच भागातील होते – अगदी आजदेखील त्यांच्या नावाचा एक पर्वत आहे.

ही घटना साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी घडली:

एके दिवशी गोरखनाथांनी पाहिले की त्यांचे गुरु मत्स्येंद्रनाथ कोणाला तरी भेटायला आसामला गेले, आणि त्यानंतर ते परत आलेच नाहीत. त्यांना झालेल्या दृष्टांतात त्यांना असे दिसून आले की त्यांचे गुरु शारीरिक सुखात रममाण झालेले आहेत. ते अस्वस्थ झाले –“माझे गुरु अशा परिस्थितीत कसे राहू शकतात?” म्हणून मग ते पश्चिम किनार्‍यापासून आसामला जायला निघाले, जे तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर होते. त्यांनी संपूर्ण अंतर पायी चालून पार पाडले आणि तेथे पोहोचल्यावर त्यांना असे आढळले की त्यांचे गुरु एका वेश्येच्या घरात बसले आहेत, आणि त्यांच्या मांडीवर बसलेल्या दोन स्त्रियांशी त्यांची प्रणयक्रीडा सुरू आहे. त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसेना. त्यांनी विचार केला, “मत्स्येंद्रनाथांसोबत असे कसे घडू शकते?” ते तर खुद्द शिवाचे अवतार आहेत. गोरखनाथांनी मत्स्येंद्रनाथांना येवढ्या सामर्थ्यवान अवतारांमध्ये पाहिले होते, आणि तिथे मात्र हा मनुष्य दोन वेश्यांसोबत बसलेला होता.

मग गोरखनाथ त्यांना म्हणाले, “तुम्ही परत आलेच पाहिजे” आणि त्याने रागाने त्या दोन वेश्यांना तेथून हाकलून लावले. त्याने त्याच्या गुरूंना तेथून बाहेर काढले आणि ते पुन्हा माघारी फिरले. परतीच्या वाटेवर, मत्स्येंद्रनाथ स्नान करायला गेले. त्यांनी त्यांची पिशवी गोरखनाथांकडे दिली आणि ते म्हणाले, “ही पिशवी व्यवस्थित जपून ठेव.” यामध्ये एक अतिशय मौल्यवान वस्तु आहे.” आणि ते स्नानासाठी नदीवर निघून गेले. ती पिशवी अतिशय जड होती, म्हणून मग गोरखनाथांनी ती उघडली आणि त्यांना त्यामध्ये दोन सोन्याच्या विटा ठेवलेल्या आढळून आल्या. त्यांना अतिशय दुखः झाले – “माझ्या गुरूंना झालय तरी काय? आधी ते वेश्यांसोबत होते, आणि आता ते सोने जमा करत आहेत! त्यांची इच्छा असेल तर ते एखाद्या खडकावर लघवी करून त्या संपूर्ण खडकाचे रूपांतर सोन्यात करू शकतात; त्यांच्याकडे तेवढी जादू आहे. पण हा माणूस मात्र या दोन सोन्याच्या विटांच्या मोहात पडला आहे. असे का असावे?” आणि मग त्यांनी त्या सोन्याच्या दोन विटा घेतल्या आणि त्या जंगलात भिरकावून दिल्या आणि ते पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले.

आपले गुरु गैरमार्गाला लागले आहेत हे पाहून गोरखनाथ अतिशय दुखीः झाले होते आणि त्यांचे गुरु गैरमार्गाला लागण्याआधी तीन हजार किलोमीटर अंतरचा प्रवास पायी करून त्यांच्या गुरूंना गैरमार्गाला लागण्यापासून वाचविले म्हणून त्यांना स्वतःचा अभिमान वाटू लागला. जेंव्हा त्यांच्या मनात ही अभिमानाची भावना जागृत झाली, तेंव्हा मत्स्येंद्रनाथांनी त्यांचा हात गोरखनाथांच्या डोक्यावर ठेवला, आणि अचानक गोरखनाथांना समजले की ते तेथेच बसलेले आहेत. ते आसामला चालत सुद्धा गेले नव्हते, आणि त्यांनी वेश्यांना सुद्धा पाहिले नव्हते, तसेच सोन्याच्या विटा देखील पाहिल्या नव्हत्या – काहीही नाही. हे सर्व त्यांच्या मनातच घडत होते. परंतु त्यांच्यासाठी हे सारे वास्तव होते – ते खरोखरच चालले होते, तेथे गेले होते आणि त्यांना पाहिले होते. हे सर्व गुरूंच्या जादूमुळे घडले होते. मत्स्येंद्रनाथांनी सर्व गोष्टी त्यांच्याभोवती, प्रत्यक्षात घडवल्या होत्या. आणि गोरखनाथांना मोठा धक्का बसला. – “माझ्या हातून हे काय घडले. माझे गुरु वेश्यांसोबत होते अशी कल्पना मी केली. माझ्या गुरूंना सोन्याची लालसा निर्माण झाली आहे अशी कल्पना मी केली.” ते अतिशय दुखीः झाले. त्यानंतर मत्स्येंद्रनाथ म्हणाले, “ठीक आहे. किमान मला वाचविण्यासाठी तीन हजार किलोमीटर अंतर पायी चालण्याची इच्छा तरी तुझ्या मनात होती. हे अतिशय चांगले आहे; ही चांगली भावना सदैव तुझ्या मनात ठेव.”