दोन जेवणांच्या मधे तुम्ही काहीही का खाऊ नये याची 5 कारणे
सध्या दोन जेवणांच्या मधे काहीतरी खाणे हे अनेक लोकांसाठी अतिशय सामान्य झालेले आहे. पण सद्गुरु समजावून सांगतात की असे थोडेसे खाणे फारसे चांगले का नाही.
#1 मन आणि शरीर रिकाम्या पोटी सर्वोत्तम प्रकारे कार्य करतात
सद्गुरु: तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की दिवसभर काहीतरी खात राहिल्याने तुम्हाला अधिक सक्रिय राहण्यासाठी मदत होईल. पण पोटात अन्न असताना शरीराला कसे वाटते, आणि पोट रिकामे असताना शरीराला कसे वाटते हे जर तुम्ही पाहिलेत, तर तुम्हाला असे दिसून येईल की तुमचे पोट रिकामे असताना तुमचे मन आणि शरीर सर्वोत्तम प्रकारे कार्य करते. तुमच्या पचनसंस्थेत जर सतत अन्नपचन सुरू असेल, तर साहजिकच त्यासाठी एका निश्चित प्रमाणात शारीरिक ऊर्जेचे वाटप केले जाते, त्यामुळे तुमचे मन आणि शरीर दोघेही सर्वोत्तमरित्या कार्यरत राहणार नाहीत.तुम्हाला तुमच्या संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहायचे असेल, आणि सजग रहायचे असेल तर त्या प्रकारचे अन्न खाल्लं पाहिजे जे तुमच्या पोटातून 1.5 ते 2.5 तासात ते आतड्यांमध्ये सरकेल.तिथून पुढे मग शरीर फारशी ऊर्जा वापरत नाही. आणि त्यानंतर बारा ते अठरा तासात, अन्न पूर्णपणे तुमच्या शरीरातून बाहेर पडायला हवे. योग नेहेमीच असं करण्याचा आग्रह धरतो.
पोट रिकामे आहे याचा अर्थ भूक लागली असा नाही. जेंव्हा शरीरातील उर्जेची पातळी खाली घसरते, तेव्हाच तुम्हाला भूक लागल्यासरखे वाटते. अन्यथा पोट रिकामेच असायला हवे.
तुम्ही ही इतकी सोपी जाणीव ठेवलीत, तर तुम्ही अधिक ऊर्जावान, चपळ आणि सतर्क व्हाल. हा एक यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे मग तुम्ही आयुष्यात जे काही करायचं ठरवलं असू द्या.
#2 शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी शरीर प्रणालीची स्वच्छता
पोटाच्या पिशवीत जेव्हा पचन प्रक्रिया सुरू असते, तेव्हा पेशींच्या स्तरावर शरीराचे शुद्धीकरण जवळजवळ बंद होते. त्यामुळे तुम्ही जर दिवसभर खात राहिलात, तर पेशींमध्ये अशुद्ध घटक दीर्घ कालावधीपर्यंत पेशींमध्ये साठवून ठेवले जातात, ज्यामुळे कालांतराने अनेक समस्या निर्माण होतात. अगदी आतड्यातून विसर्जन प्रक्रिया सुद्धा कार्यक्षमतेने होत नाही कारण मल मोठ्या आतडयात एकाच वेळी जमा होण्याऐवजी ते वेगवेगळ्या वेळी येत राहील.
मोठे आतडे स्वछ नसेल, तर तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात. योगामधे, आम्ही असे म्हणतो की अस्वच्छ मोठे आतडे आणि मानसिक त्रास यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. मोठे आतडे स्वछ नसेल, तर तुम्ही तुमचे मन स्थिर ठेऊ शकत नाही.
आयुर्वेद आणि सिद्धवैद्यकीय प्रणाली यासारख्या पारंपरिक भारतीय वैद्यकीय प्रणालींमध्ये, रुग्णाचा आजार काय आहे याला फारसे महत्व नाही, सर्वात अगोदर त्यांना तुमची पचन प्रणाली शुद्ध करायची असते कारण तुमच्या समस्यांपैकी बहुतेक समस्या अस्वच्छ मोठ्या आतड्यामुळे उद्भवलेल्या असतात.
आज लोकं ज्या प्रकारे खात आहेत, त्यानुसार मोठे आतडे स्वच्छ ठेवणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हानच आहे. पण असे समजा की तुम्ही दिवसातून दोनदाच मोठे जेवण घेतले आणि अधूनमधून काहीच नाही, जसे आपण सहसा आश्रमात करतो, किंवा आपण जर खूपच सक्रीय असू तर आपण एखादे फळ खाऊ शकतो, मग तुमचे मोठे आतडे नेहेमीच स्वछ राहील.
योग प्रणालीत, आमचे असे म्हणणे आहे की दोन भोजनांच्या मधे किमान सहा ते आठ तासांचे अंतर असायला हवे. ते जर शक्य नसेल, तर किमान पाच तासांचे अंतर तरी असायलाच हवे. त्यापेक्षा कमी वेळ म्हणजे तुम्ही तुमच्यावर अनावश्यक त्रास ओढवून घेत आहात.
#3 अन्नाचे यथायोग्य शरीर प्रणालीत पचन
ज्याला तुम्ही तुमचे शरीर आणि मन असे म्हणता ती एक विशिष्ट स्मृतींचा साठा आहे. या स्मृतीमुळेच – (किंवा तुम्ही त्याला माहिती असे म्हणू शकता) – या शरीराने त्याचा आकार आणि रूप धारण केलं आहे. या स्मृतीच्या आधारेच आपण खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर शरीरात होते. असे समजा, की मी एक आंबा खातो आहे. आंबा माझ्या शरीरात प्रवेश करतो आणि तो पुरुष बनतो. जर एखाद्या स्त्रीने आंबा खाल्ला, तर तोच आंबा तिच्या शरीरात जाईल आणि स्त्री बनेल. जर एखाद्या गाईनी आंबा खाल्ला, तर तो तिच्या शरीरात जातो आणि गाय बनतो. हा आंबा माझ्या शरीरात जाऊन पुरुष का बनतो, स्त्री किंवा गाय का बनत नाही? हे मूलतः मेमरी म्हणजेच स्मृतीमुळे घडते, एक विशिष्ट प्रकारची स्मृती जी माझ्या शरीरात आहे.
आणि असे का आहे, की जर मी आंबा खाल्ला, तर त्याचा एक भाग माझी त्वचा बनतो आणि ती त्वचा त्याच रंगाची बनते? तुम्हाला अचानक तुमच्या हातावर आंब्याच्या रंगाचा त्वचेचा तुकडा दिसत नाही. कारण स्मृतीची अशी एक मजबूत संरचना आहे, मी जे काही खाईन, माझी स्मृती याची खात्री करेल की त्याचे रूपांतर याच व्यक्तीत होईल, इतर कोणत्या व्यक्तीत नाही.
जसे तुमचे वय वाढत जाते, तशी शरीराची अन्न आत्मसात करण्याची क्षमता कमी होत जाते कारण तुमची अनुवांशिक स्मृती आणि उत्क्रांतीची स्मृती; तुम्ही जे काही खाता त्याचे परिवर्तन करण्यासाठी अक्षम होत जाते. तुम्ही कदाचित निरोगी असाल आणि तुम्ही खात असलेले अन्न पचवण्याची क्षमता तुमच्यात असेल, पण शरीर तेवढ्याच जोमाने तुम्ही खाल्लेल्या आंब्याचे रूपांतर मनुष्यात करण्यासाठी सक्षम राहणार नाही. पचन घडते पण एका जीवाचे रूपांतर दुसर्या जीवात होणार नाही कारण तुमची स्मृती कमकुवत होते आहे.
शरीर स्वतःला कमकुवत होत चाललेल्या स्मृतीशी जुळवून घेईल, पण तुम्ही काय खाता आणि कसे खाता याबद्दल जर सजग असाल, तर अधिक संवेदनशीलतेने तुम्ही जुळवून घ्याल. तुम्ही जर शारीरिकरित्या अतिशय सक्रीय नसाल, किंवा तुम्हाला काही वैद्यकीय समस्या नसेल, आणि तुमचे वय जर पस्तीस वर्षांपेक्षा अधिक असेल, तर दिवसातून दोनदाच जेवणे तुमच्यासाठी नक्कीच अधिक आरोग्यदायी ठरेल. तुम्ही जर अधिक खात असाल, तर तुम्ही तुमच्या पचनसंस्थेवर अनावश्यक भार घालत आहात. तुम्हाला आता तेवढ्या प्रमाणातील अन्नाची गरज नाही कारण तुमची उभी वाढ आता पुर्णपणे थांबली आहे. तुम्हाला जर थोडस भुक लागल्यासारखे किंवा थकल्यासारखे वाटले, तर दोन जेवणाच्या मधे एखादे फळ खाल्ल्याने काम भागेल. तुम्ही जर तसे राहू शकलात, तर तुम्ही अतिशय चांगले जीवन जगाल. हे आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले आहे आणि तुम्ही निरोगी राहाल.
#4 अखंडता राखणे
आध्यात्मिक प्रक्रियेची एक पातळी म्हणजे तुम्ही तुमचे शरीर आणि मन एकसंध, अखंडता बाणली पाहिजे. अखंडता म्हणजे मला असे म्हणायचे आहे की जेंव्हा तुमची शरीर प्रणाली एका विशिष्ट प्रकारे एकसंध नाही, ती जर विस्कळीत, विखुरलेली असेल, तर ती काहीही अनुभवण्यास सक्षम असत नाही. अगदी प्रचंड, अविश्वसनीय गोष्टी जरी घडल्या, तरी तुम्ही त्या मुकाल. इनर इंजीनीयरिंग प्रोग्रॅममधील प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे आखली गेली आहे जेणेकरून तुमच्यात शारीरिक आणि मानसिक पातळीवर निश्चित स्वरूपाची अखंडता कायम राहील, ज्यामुळे तुमची अनुभवण्याची क्षमता सुधारेल.
हे जग आणि तुमचे जीवन अनुभवण्यासाठी तुमच्याकडे असणारे एकमेव साधन म्हणजे तुमचे शरीर. तुम्ही मन असे सुद्धा म्हणू शकता, पण ते सुद्धा एक शरीरच आहे. कोणत्याही बाह्य गोष्टीसाठी शरीर खुले करण्यासाठी, तुम्ही तुमची शारीरिक अखंडता ढिली करता. ही एक अशी गोष्ट आहे जी लोकांना समजलेली नाही. दिवसभरात तुम्ही स्वीकारण्यासाठी कितीवेळा शरीर खुले करता यावर सुद्धा तुम्ही किती काळ जगाल हे ठरते. तुम्ही जर बाह्य गोष्टींसाठी तुमचे शरीर खूप वेळा उघडत राहिलात, तर तुम्ही तुमची प्रणाली ढिली करता. आणि त्या प्रकारचे शरीर काहीही करू शकत नाही कारण त्यात अखंडता नसते. आणि जेंव्हा अखंडता नसते, तेंव्हा कोणत्याही गोष्टीशी संपर्क उरत नाही. तुम्ही कसेबसे टिकून राहाल. त्यापलीकडे काहीही घडणार नाही.
योगी किंवा साधना करणारे दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदाच अन्नसेवन का करतात आणि अधेमधे काहीही नाही याचे कारण म्हणजे त्यांना त्यांचे शरीर कशासाठीही खुले करायचे नसते. हवा आणि पाण्याशिवाय कोणतीही बाह्य तत्वे तुमच्या शरीरात सतत शिरायला नकोत कारण त्यामुळे संवेदनशीलतेच्या दृष्टीने तुमच्या प्रणालीची अखंडता ढिली होईल. संवेदना हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वात बाह्य आवरण आहे. तुम्हाला जर स्वतःला अतिशय संवेदनशील ठेवायचे असेल, तर तुम्ही तुमचे शरीर कशासाठीही आणि प्रत्येक गोष्टीसाठी खुले न ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही पुरेसे अन्न खाल्लेच पाहिजे. तो मुद्दाच नाही, पण तुम्ही खूप वेळा खाऊ नये.
#5 अनिवार्यतेकडून जाणीवेकडे
खावेसे वाटत असताना न खाणे हा साधनेचा एक भाग आहे त्यामुळे तुम्ही अन्नाची, किंवा कोणत्याही गोष्टीची अनिवार्यता दूर करता. अन्न ही अतिशय मूलभूत गोष्ट आहे. त्यावर आधारित, जीवनात अनेक गोष्टी अनिवार्य बनतात.
तुम्ही आश्रमात आलात तेंव्हा तुमच्यापैकी अनेकांना हा त्रास सहन करावा लागला असेल: आता जेवणाची वेळ झाली आहे, तुम्ही भुकेलेले आहात, तुम्हाला खरोखरच अतिशय भूक लागली आहे आणि तुम्ही भोजन कक्षात येता. तुमच्या समोर भोजन वाढलेले आहे, तुम्हाला त्यावर ताव मारायचा आहे. पण लोकं मात्र डोळे मिटून आणि हाताची घडी घालून प्रार्थना करत आहेत. कल्पना अशी आहे की तुम्ही अतिशय भुकेलेले आहात पण तुम्ही दोन मिनिटे अधिक थांबावे. तुमची ज्या गोष्टींविषयी अनिवार्यता आहे त्यात असे करण्याचा प्रयत्न करून पहा. तुमची ज्या गोष्टींविषयी अनिवार्यता आहे त्यात फक्त दोन मिनिटे थांबून पहा. ते तुम्हाला ठार करणार नाही. ते तुम्हाला अतिशय शक्तिवान बनवेल.
शरीरातील ही अनिवार्यता दूर करणे अतिशय महत्वाचे आहे. तुमचे शरीर आणि मन ह्या एक रचना आहेत. भूतकाळातील सर्व ठशांनी काही सवयी निर्माण केलेल्या आहेत आणि त्या अनिवार्य आहेत. तुम्ही त्यानुसार वागलात, तर तुम्ही उत्क्रांत होण्यासाठी तयार नाही असा त्याचा अर्थ आहे. एकाच छापाचे आयुष्य जगायला तुमची काहीही हरकत नाही. तुम्हाला तो छाप मोडून नवीन शक्यता अजमवून पहायच्या नाहीत.
अन्न ही एक अतिशय प्राथमिक आणि सोपी गोष्ट आहे पण तरीसुद्धा, तुम्ही ते कसे हाताळता यामुळे फार मोठा फरक पडतो. हा तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये अगोदरच साठवलेल्या महितीपासून दूर नेऊन अधिक सजगतेने जीवनात कार्यरत राहण्याचा प्रवास आहे, जी तुमच्या मनावर नकळतपणे राज्य करत आहे. बंधने अनेक स्तरांवर असतात, पण तुमचे शरीरच तुमच्यामधे असलेल्या सर्व बंधनांचा पाया आहे, म्हणून तुम्ही तुमच्या शरीरावर काम करणे आवश्यक आहे.
गौतम बुद्धाने तर असे सांगितले, “तुम्ही जेंव्हा भुकेलेले असाल आणि तुम्हाला अन्नाची अतिशय आवश्यकता असेल, तेंव्हा जर तुम्ही तुमचे अन्न इतर कोणाला देऊ केलेत, तर तुम्ही अधिक शक्तीशाली बनाल.” मी त्यासारखी गोष्ट करण्यास सांगत नाहीये. मी फक्त इतकंच म्हणतो आहे, की “फक्त दोन मिनिट थांबा” – ते तुम्हाला नक्कीच अधिक शक्तिशाली बनवेल.