डावी, उजवी की मधली? कुठली राजकीय विचारसरणी उत्तम?
कुठली राजकीय विचारसरणी उत्तम, आयुष्यमान खुराना यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सद्गुरू, लोकशाही म्हणून आपण कसं अधिक परिपक्व होण्याची गरज आहे याबद्दल समजावून सांगतात.

आयुशमान खुराना: नमस्कार सदगुरूजी. मी आयुशमान खुराना आणी मी राजकियदृष्ट्या एक सजग व्यक्ती आहे. आणि राजकियदृष्ट्या भारत आत्ता एका स्थित्यंतरातून जात आहे. कारण आपला समाज एक बहुमुखी समाज आहे - आपल्याकडे अनेक संस्कृती, धर्म , प्रांत, जाती, रंग, संप्रदाय आहेत. आणि माझं ठाम मत आहे की टोकाची राईटविंग आणि टोकाची लेफ्टविंग विचारधारा खुपच धोकादायक आहे. माझी राजकिय विचारधारा कदाचित या दोन्हीच्या मधली आहे. तर, तुम्हाला काय वाटतं, काय योग्य आहे? इथून पुढे आपली वाटचाल कुठल्या दिशेनं असावी कारण आपण आत्ता सध्या एका संभ्रमाच्या परिस्थितीत आहोत.
सद्गुरू : आयुश्यमान- म्हणजे दिर्घायुषी. एक जागरूक लोकशाही म्हणजे तुम्ही कधीही कुठल्याही प्रकारची कायमची ठाम भुमिका घ्यायची नसते. अमेरिकेत हे खुपच प्रकर्षानं घडलं. हे युनायटॆड स्टेस्टस मध्ये जणू दोन धर्मांसारखं झालं. तुम्ही डेमोक्रॅट आहात, की रिपब्लिकन? नाही, माझॆ आजोबा एक रिपब्लिकन होते, माझॆ वडील एक रिपब्लिकन होते, म्हणुन मी ही रिपब्लिकन आहे.
एकदा असं झालं. डेमोक्रॅट लोक एका अश्या प्रांतात प्रचार करत होते जिथून कायम रिपब्लिकन पक्षाला मतं जायची. एका डेमोक्रॅट कार्यकर्त्यानं तिथल्या एका माणसाला विचारलं “तुम्ही डेमोक्रॅट पक्षाला का मत देत नाही?”. तो माणूस म्हणाला, “माझे आजोबा रिपब्लिकन होते, माझे वडील रिपब्लिकन होते, म्हणून मीही रिपब्लिकन आहे.” त्यावर डेमोक्रॅट कार्यकर्ता वैतागून म्हणाला, “समजा तुझे आजोबा बिनडोक असते, तुझे वडील बिनडोक असते, तर तू कोण असला असतास?” तो माणूस उत्तरला, “मी डेमोक्रॅट असलो असतो.”
एका जिवंत लोकशाहीत तुम्ही कधीही ठाम भुमिका घ्यायची नसते. ही एक अशी गोष्ट आहे जी आपण विसरलो आहोत. आपला देशही त्याच दिशेनं चाललाय. तुम्ही याबाजूनं आहात की त्याबाजूनं? नाही, मी अजून पुढच्या निवडणुकीसाठी माझं मत ठरवलं नाहिये. मला पाहू द्या कोण कसं काम करतो, कुणाचं कार्य परिणामकारक आहे.
मी उजवा, डावा, की मधला आहे?…नाही! ज्याक्षणी तुम्ही अशी ठाम भुमिका घेता, तुम्ही लोकशाही नष्ट करता आणि तिला पुन्हा सरंजामशाहीच्या(फ्युडलीझम) दिशेनं नेता. आम्ही या जातीचे आहोत म्हणुन आपण असंच वोट देणार, आम्ही त्या जातीचे आहोत म्हणुन तसंच वोट देणार. असं केल्यानं लोकशाही उरणारच नाही.
लोकशाही म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस, आपली भूमेकेचं नव्यानं मूल्यमापन करावं. सध्या युनायटेड स्टेस्टस मध्ये मला वाटतं, कोण जिंकणार किंवा हरणार, हे ठरवणाऱ्या लोकांचं प्रमाण फक्त चार ते पाच टक्के आहे. बाकीच्या लोकांनी तर आधीच त्यांचं मत निश्चित केलंय.
भारतामध्ये ती टक्केवारी कदाचित १० ते १२ किंवा जास्तीत जास्त १५ टक्के असेल. पण मला वाटतं, येणाऱ्या निवडणुकीनंतर आपणसुद्धा अमेरिकेच्या टक्केवारीजवळ जाऊन पोहोचू. कारण स्थिती बिकट होत चालली आहे. तुम्ही याबाजूनं किंवा त्याबाजूनं असलंच पाहिजे. मी कुठल्याच बाजूनं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही.
लोकशाहीच्या प्रक्रीयेतून मिळालेलं सर्वांत मोठं यश म्हणजे कुठल्याही रक्तपाताविना सत्ताबदल घडतो. आज आपण अगदी मोठमोठ्या राष्ट्रांत रक्ताचा एकही थेंब न सांडता सत्ताबदल होताना बघतो. पण हळूहळू जसं तुम्ही जातीय विचारसरणीचे होता, ‘मी या जातीचा आहे’, किंवा ‘मी त्या जमातीचा आहे’, तुम्ही पुन्हा अशी परिस्थिती आणता जिथे सत्ताबदलासाठी जतीसमुदायांमधे युद्ध होईल. हे जातीसमुदायांमधलं युद्ध आहे.
जर तुम्ही या मार्गानं गेला – तर एकमेकांविरुद्ध टीका करता करता – कुणी तलवार किंवा बंदूक काढून एकमेकांचा जीव घेणं काही फार लांबची गोष्ट नाहीये. आजकाल केवळ व्हॉटसॅपच्या मदतीनं जनसमुदायांमध्ये हिंसक तणाव निर्माण करता येतो.
मला वाटतं – यानं मी अनेकांसाठी अतिशय अप्रिय होईल – पण मला वाटतं पक्षासाठी मेम्बरशिप किंवा सदस्यत्व देणंच बंद केलं पाहिजे, कारण पक्ष म्हणजे जणू जमातींसारखे होऊ लागले आहेत. वेळ आली आहे आपण लोकशाही म्हणून अधिक परिपक्व होण्याची.
तर, आयुशमान तुम्ही कुठलीही भुमिका घेता कामा नये. ह्या साडेचार वर्षात, काय काम झालं आहे याचा चार ते सहा महिन्यांत आढावा घे. ह्या साडेचार वर्षांत जे काही कार्य झालं आहे, ते ह्यांना परत एक संधी देण्याइतकं फायदेशीर आहे, की आता नवीन लोकांचा गट निवडायला हवा? हा निर्णय शेवटच्या तीन ते सहा महिन्यात प्रत्येक नागरिकानं घ्यायला हवा.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.
