प्र:सद्गुरु, त्या दिवशी कर्माविषयी बोलत असताना  तुम्ही म्हणाला होतात की एखाद्या व्यक्तीने तिच्या आयुष्यात केलेल्या कर्मांची नोंद ठेवण्यासाठी जीवनात अनेक साधने आहेत; मन, शरीर आणि ऊर्जा सुद्धा. मन निघून गेले असले, तरीसुद्धा ते अद्यापही शरीर आणि उर्जेमध्ये कोरले गेले आहे. हा प्रत्येकाला यातना देण्यासाठी तयार केलेला एक विस्तृत आणि दुष्ट सापळा वाटतो. हे असे का असते?

सद्गुरु: हे पहा, मी जेंव्हा बोलत असतो, तेंव्हा तुमच्याकडे माझे कर्म नोंदवण्यासाठी तीन रेकॉर्डर असतात, मी बोललेल्या शब्दांपासून मला पुन्हा कधीही माघार घेता येऊ नये यासाठी रचलेला एक दुष्ट कट. एखाद्या बेसावध क्षणी जर मी एखादे वचन दिले असेल, तर त्यापासून मी माघार घेऊ नये म्हणून तुमच्याकडे त्याची तीन रेकॉर्डिंग असतात!
 
कर्म म्हणजे तुमची जशी समजूत आहे ते तसे नाही. त्यात काहीही दुष्टपणा नाही. तुम्ही आज जे काही आणि जसे आहात, ते तुमच्या कर्मांमुळेच आहात. ज्या क्षणी तुम्ही जन्माला आलात तेंव्हापासून या क्षणापर्यंत, तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट, विचार, भावना आणि अनुभव हे तुमचे कर्म आहे. त्यानेच तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे बनवले आहे. त्यानेच तुम्हाला या ठिकाणी आणून ठेवले आहे. तर कर्म म्हणजे एक सापळा नाही. पण ते एक बंधन नक्कीच आहे, पण कर्म म्हणजे एक सुरक्षा कवच सुद्धा आहे. कर्म हे तुमच्या शारीरिक अस्तित्वाचा आधार आहे. कर्मांचा आधार नसेल, तर तुम्हाला या शरीरासोबत बांधून ठेवण्यासाठी इतर कुठलाच मार्ग नाही. कर्म हे एक प्रकारचे सिमेंट आहे, ज्याने तुम्हाला या शरीरासोबत घट्ट बांधून ठेवले आहे. आम्ही जर तुमचे सर्व कर्म काढून घेतले, तर याक्षणी तुम्ही हे शरीर सोडून जाल, आणि तसे घडणे आपल्या हातात असावे ते आपल्याला नको आहे. म्हणून याची खात्री बाळगण्यासाठी कर्माची नोंद सुरू आहे की तुमच्या शारीरिक पातळीवर, तुमच्या मानसिक पातळीवर, तुमच्या संवेदना आणि तुमची ऊर्जा यापैकी काहीही गमावले जात नाही. 
 
तुमच्यातील उपजत, सर्वात मूलभूत वृत्ती म्हणजे स्व-संरक्षण. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या भोवती एक भिंत उभारली आहे, आणि ही भिंत आणि तिच्यामुळे तुम्हाला मिळणारे रक्षण तुम्ही काही काळ त्याचा आनंद उपभोगला. पण तुमचातलाच आणखी एक भाग अमर्यादितपणे विस्तारण्यासाठी सदैव आतुर असतो. आणि तुमच्यामधील हे परिमाण तुम्हाला अचानकपणे सांगू लागते की ही भिंत म्हणजे एक तुरुंग आहे. त्याला ती भिंत तोडून बाहेर पडायचे असते. आणि तुमच्यामधीलच दुसरा एक भाग असा असतो, जो स्व-संरक्षणासाठी संघर्ष करत असतो आणि त्याला ती भिंत अधिक बळकट करायची असते. त्याला ती भिंत अधिकाधिक भक्कम करायची असते. तुम्ही जर मनुष्यप्राण्याकडे पाहिले, तुम्ही अगदी चार्ल्स डार्विनचे म्हणणे मान्य केले, तर तुमचा इतिहास सांगतो की तुमचा स्वभाव पशुंचा आहे; पण तुमच्यात एक भाग असा आहे, जो सतत, निरंतर अमर्याद विस्तारासाठी आतुर आहे. तुम्ही या आतुरतेकडे पाहिले, तर तुमच्या असे लक्षात येईल की ती कोणत्याही क्षणी संपणारी नाही. अनंत, अमर्याद झाल्याखेरीज तिचे समाधान होणार नाही.  

कर्माचे कोठार

तुमचा इतिहास पशु-प्राण्यांचाच आहे. पण तुमचे भविष्य दैवी आहे. सध्या तुम्ही एखाद्या लंबकासारखे दोन्हींच्या मध्ये झोके घेत आहात. तुमच्यातील एक भाग, तुमच्यामधील सर्वात प्रबळ वृत्ती म्हणजे स्व-संरक्षण. तुमच्यामधील दूसरा आयाम ही सर्व बंधने तोडण्यासाठी आतुर आहे. कर्म ही स्व-संरक्षणाची भिंत आहे. तुम्ही एके काळी ती अतिशय काळजीपूर्वक बांधली होती, पण आता मात्र तुम्हाला तो आपण होऊन बंदीतवास पडल्यासारखे वाटते आहे. कर्म हे आपण होऊन आपल्याचसाठी निर्माण केलेला महालरुपी कैदखाना आहे. पण तुम्ही त्याच्यावाचून जगू शकत नाही, आणि त्याचा त्याग करून सुद्धा जगू शकत नाही. हीच खरी समस्या आहे. म्हणून मग आता तुम्ही तुमच्या तुरुंगाची क्षितिजे रुंदावण्याचा प्रयत्न करता, पण असे समजा की आम्ही तुम्हाला एका 5 x 5 फुट आकाराच्या छोट्याश्या खोलीत बंदिस्त केले. आम्ही तुम्हाला तिथे पूर्णपणे बंदितवासात ठेवले, तुमच्या इच्छेने नाही – तर मात्र तुम्ही स्वातंत्र्यासाठी आतुर व्हाल. तेव्हा आश्रमाच्या भिंती, आश्रमाचे कुंपण  म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य वाटणार. आम्ही तुम्हाला त्याच्या बाहेर जाऊ दिले, तर तुम्हाला ते खूप मोठे स्वातंत्र्य वाटेल, पण तीन दिवसांतच तुम्ही पर्वतांकडे पहाल, आकाशाकडे पहाल, आणि या दरवाजाकडे पहाल आणि तुमची स्वातंत्र्याची कल्पना आश्रमाच्या दरवाजापेक्षा  आणखी काहीतरी वेगळी  बनेल. आम्ही तुम्हाला म्हणू, ठीक आहे, तुम्ही थेनीकांडीपर्यन्त (ईशा आश्रमा नजीक असलेले एक छोटे गांव) जाऊन परत येऊ शकता. काही काळ ते खूपच छान स्वातंत्र्य वाटेल, पण मग नंतर तुम्हाला कोयंबतूरपर्यन्त जाऊन यावेसे वाटेल. तुम्ही काही वेळा कोयंबतूरपर्यन्त जाऊन आलात, की कोयंबतूरही मग पुरेसे नाही असे तुम्हाला वाटू लागेल. तुमच्यापैकी जे पारंपरिक अध्यात्माने प्रभावित झाले असतील, त्यांना हिमालयात जावेसे वाटेल. अन्यथा तुम्हाला एखाद्या आणखी मोठ्या शहरात वगैरे जावेसे वाटेल. तर तुमची बंधनात असण्याबद्दलची कल्पना सतत बदलत असते. सोबत तुमची स्वातंत्र्यबद्दलची कल्पना सुद्धा सतत विस्तारित, विकसित होत आहे. 
 
टप्प्याटप्प्याने जीवन समजावून घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करून शेवटी मूर्खासारखे वाटून घेऊन का मरायचे? याकडे लक्ष देण्याची हीच वेळ आहे. तुमची मुक्तपणाची कल्पना ही अमर्याद, अनंत होण्याची आहे. तुमचे अस्तित्व अनंत, अस्सिमाशिवाय इतर कोणतीही कमी गोष्ट स्वीकारणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःकडे पाहिलेत तर ही गोष्ट स्पष्ट होईल. तुम्ही अमर्याद होऊ इच्छित असाल, तर भौतिक बंधने मोडून काढल्याने तुम्ही अमर्याद होऊ शकणार नाही कारण भौतिकत्व कधीही अमर्याद होऊ शकत नाही. फक्त तुम्ही भौतिक वास्तवाची परिसीमा ओलांडून पुढे गेलात, तर तुम्ही खुद्द भौतिक अस्तीत्वच पार करून पुढे गेलात, तर अमर्याद बनण्याची संभावना आहे.  

तुमच्या निवडीनुसार जीवन जगणे

कर्म ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला भौतिकत्वात जखडून ठेवते. त्याशिवाय इतर कोणताही मार्ग नाही. म्हणून निसर्ग, किंवा सृष्टीकर्ता अशी खात्री करून घेतो की तुम्हाला शोध घेण्यासाठी एक आधार असावा. शरीराची साथ असल्याशिवाय कशाचाही ठाव घेणे शक्य नाही. शरीराचा त्याग केलेल्या जीवाला स्वतःच्या निवडीने ठाव घेणे अशक्य. जोवर तो एका विशिष्ट पातळीपर्यंत विकसित होत नाही, तोपर्यंत तो केवळ प्रवृत्तींच्या माध्यमातून शोधू शकतो, जाणीवपूर्वक निवडीतून नाही. पण शरीर धारण केलेल्या व्यक्तीला, वास्तविकतः प्रत्येक क्षण हा एक जाणीवपूर्वक निवडीचा क्षण असतो. तुम्ही तुमच्या जीवनात सजग राहिलात, तर प्रत्येक क्षण तुमच्या निवडीनुसार असतो. 

तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्म साठवले आहे याने काही फरक पडत नाही – पण या क्षणी करण्याचे कर्म हे नेहेमी तुमच्याच हातात असते.

 
ब्रम्हचर्य किंवा संन्यास म्हणजे तुम्ही तुमच्या निवडीनुसार जगत आहात. आणि आता निवडीनुसार जगण्याची ही प्रक्रिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, आम्ही योगात अनेक गोष्टी निर्माण केल्या आहेत. सकाळी तुम्हाला बिछान्यात लोळायला आवडते. ही शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, पण आता मात्र तुम्ही सकाळी योगाआसने करता. तुम्ही अजाणतेपणे बिछान्यात लोळू शकता, पण सकाळी तुम्ही अजाणतेपणे योगाआसने मात्र करू शकत नाही. साहजिकच शरीराच्या हालचालींची संपूर्ण प्रक्रिया जाणीवपूर्वक होते. तुम्हाला या जाणीवपूर्वक कृतीचा पैलू तुमच्या आयुष्यात उतरवण्याची इच्छा आहे – जाणीवपूर्वक विचार, जाणीवपूर्वक भावना, जाणीवपूर्वक ह्या धरतीवर जगण्यासाठी निवडलेला मार्ग. तुमच्या जीवनाची अवघी ऊर्जाच जागरूक बनते आहे कारण जर तुम्ही जागरूक झालात, तरच तुमचे आयुष्य तुमच्या निवडीनुसार घडते. नाहीतर तुमचे जीवन म्हणजे एक सक्तीपूर्ण आयुष्य असेल. सध्या बंधन आणि मोकळीक यामधील फरक हा आहे, की एकतर तुम्ही सक्तीने कार्यरत आहात किंवा तुमच्या निवडीनुसार.  
 
मनुष्य प्राण्यासाठी कर्माचे अनेक प्रकार आहेत. त्याचे फळ कायमच मिळत असते, पण तुम्ही प्रत्येक क्षणी त्यातून काय निर्माण करता हे नेहेमी तुमच्यावर अवलंबून असते – ते तुमच्याच हातात असते. तुमचे कर्म कोणत्या प्रकारचे आहे हे महत्वाचे नाही – या क्षणाचे कर्म नेहेमीच तुमच्या हातात असते. आता ह्या क्षणी आनंदी असावे की दुःखी हे 100% जाणीवपूर्वक निवडीने करता येते, जर तुम्ही सजग असण्यास राजी असाल तर. म्हणून कर्माची नोंद ठेवली जाणे, किंवा तुम्ही माझे बोलणे रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी 3 उपकरणे वापरत आहात ही माझ्यासाठी समस्याच नाहीये कारण मी माझे शब्द कधीही मागे घेणार नाही. तर मग माझी काय अडचण आहे? तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 300 रेकॉर्डर वापरु शकता. तुम्ही तीच गोष्ट रेकॉर्ड कराल. निसर्ग लक्षावधी प्रकारांनी नोंदी ठेवत आहे. तुमची काय अडचण आहे? तुम्ही फक्त पुढे जाऊ शकता. तुम्ही पुन्हा माघार घेऊ शकत नाही. तर मग करू द्यात त्यांना नोंदी. देवदूत, सैतान आणि सर्वाना नोंदी ठेऊ द्या. वृक्ष, पशू आणि कीटकांना सुद्धा तुमच्या कर्माच्या नोंदी ठेऊ द्या. तुम्हाला काय अडचण आहे?

Editor’s Note: Find more of Sadhguru’s insights in the book “Of Mystics and Mistakes.” Download the preview chapter or purchase the ebook at Isha Downloads.