सम्यमा - पलीकडे जाण्याचे द्वार
या महिन्याच्या प्रश्नोत्तरच्या सत्रात, एका सहभागीने ईशा योग केंद्रात सद्गुरूंच्या उपस्थितीत सुरू असलेल्या सम्यमा कार्यक्रमाबद्दल एक प्रश्न विचारला: "मी ऐकले आहे की, सम्यमा आपले कर्म कमी करण्यास मदत करतो. पण मला हे जाणून घ्यायचे होते की, ते कसे काम करते आणि त्यामुळे मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्या चक्रातून मुक्ती मिळते का?"

प्रश्न: मी ऐकले आहे की सम्यमा आपले कर्म कमी करण्यास मदत करतो, परंतु मला हे जाणून घ्यायचे होते की ते कसे काम करते आणि त्यामुळे मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्या चक्रातून मुक्ती मिळते का?
सद्गुरू: मुळात सगळ्या आध्यात्मिक प्रक्रिया या आपल्या जीवनाला जलद गतीवर नेण्यासाठी असतात. जर तुम्ही सामान्य मार्गाने जात असाल, तर त्यासाठी खूप वेळ लागू शकतो. तर, आध्यात्मिक प्रक्रिया त्यांच्यासाठी आहे, ज्यांना घाई आहे. ते शक्य तितक्या लवकर ध्येयापर्यंत पोहोचू इच्छितात. जर तुम्ही मला सांगितले की, किती लवकर तुम्हाला तिथे पोहोचायचे आहे, आम्ही त्या प्रमाणात तुमची साधना आखून देऊ. पण तुम्हाला हे समजले पाहिजे की, जेव्हा गोष्टी खूप वेगाने घडत असतात, तेव्हा तुम्हाला एक ठराविक शिस्त पाळावी लागते. जर तुम्ही रस्त्याने किंवा जंगलाच्या वाटेने चालत असाल, तुम्हाला जर चिंच दिसली, तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, तुम्ही ती तोडू शकता, अगदी त्याची फुलेही चांगली असतात. तुम्ही चिंचेची फुलं थोडी खाऊ शकता.
तर, हे चांगले आहे की, तुम्ही चालत आहात. तुम्ही झाडावर चढू शकता, तुम्हाला पाहिजे तितक्या चिंचा खाऊन जाऊ शकता. जर तुम्ही बैलगाडी चालवत असाल, तर तुम्ही चपळ असले पाहिजे - जे काही उपलब्ध आहे, ते पटकन तोडले पाहिजे. तुम्ही ते निवडून तोडू शकत नाही. तुम्ही कारमध्ये जात असाल, तर तोडणे थोडे धोकादायक असेल. जर तुम्ही तोडले, तर तुमचा हात कापला जाऊ शकतो. जर तुम्ही काहीतरी वेगळे करत आहात, जर तुम्ही विमान उडवत आहात, तर तुम्ही असल्या गोष्टींची कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही अजिबात हात बाहेर काढणार नाही.
तर लोक स्वतःच्या इच्छेनुसार प्रवास करायचे ठरवतात. लोकांनी प्रवासाची पद्धत त्यांच्या इच्छेनुसार ठरवावी कारण, ते त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जाण्यास किती उत्सुक आहेत किंवा ते प्रवासाचा किती आनंद घेत आहेत आणि गंतव्यस्थानाबद्दल अजिबात काळजी करत नाहीयेत. असे नाही की, त्यांना काळजी नाही - कोणीही असे म्हणणार नाही की, त्यांना काळजी नाही. जेव्हा ते इथे बसतात, तेव्हा ते काळजी करत नाहीत कारण ते आरामदायक आहे. पण जेव्हा वेळ निघून जात आहे, तेव्हा ते काळजी करतील. प्रत्येकजण गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू इच्छितो. प्रश्न फक्त एवढाच आहे की, तुम्ही किती वेळ वाट पहायला तयार आहात?
सम्यमा ही एक ठराविक प्रकारची प्रक्रिया आहे, जिथे आम्ही तुम्हाला जलद गतीवर नेतो, पण अत्यंत सुरक्षित वातावरणात. लोकांची डोकी फुटू शकतात, जर का ते सुरक्षित वातावरणात केले गेले नाही तर. यामुळेच आम्ही कठोर मापदंड लावतो, कारण जे काही केले जाते त्यासाठी आम्हाला योग्य शिस्त आणि एकाग्रता अपेक्षित आहे. नाहीतर, अगदी बसने जाताना देखील, जर तुम्ही चिंच्याच्या झाडाला धरले, एकतर बसला थांबावे लागेल किंवा तुम्हाला तुमचा हात तरी तिथेच सोडून जावे लागेल. यापैकी एक गोष्ट घडेलच. नाहीतर तुम्ही तुमचा हात बाहेर काढू नये. तुम्ही फक्त जग मागे पडताना पहात रहा. जर तुम्ही चालत आहात तर ते असे नसते, पण त्यासाठी खूप वेळ लागतो. अगदी कोईम्बतूरला पोहोचण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागू शकतो. सम्यमा तो आयाम आहे, जिथे जे अपारदर्शक आहे त्याला आम्हाला पारदर्शक करायचे आहे.
तर, सम्यमा स्वतःहून धोकादायक नाही किंवा अशी गोष्ट नाही की, कोणीतरी त्यासाठी तयार आहे किंवा तयार नाही. प्रत्येकजण त्या दिशेने वळलेला आहे, पण, पूर्वतयारी केल्याशिवाय त्यांना नक्कीच ते खूप अवघड वाटू शकते; आवश्यक त्या ओढीशिवाय त्यांना ते कठीण वाटू शकते. म्हणून मी म्हणेन, जर तुम्ही फक्त चांगले जीवन शोधत असाल - चांगले जीवन म्हणजे शांत, आनंदी, प्रेममय जीवन - तर इनर इंजिनीयरिंग आणि भाव स्पंदन तुमच्यासाठी पुरेसे आहे. परंतु जर तुम्हाला जीवनाच्या मूळ स्रोताबद्दल जाणून घ्यायचे असेल, अशी तीव्र इच्छा होत असेल, तर तुम्हाला थोडा अधिक गंभीर प्रयत्न करावा लागेल. सम्यमा तेच आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला हळूहळू बाजूला ठेवायला शिकता, हे तुम्ही फक्त तेव्हाच कराल जेव्हा तुम्हाला समजेल की, या निर्मितीत एकमेव अडथळा तुम्ही आहात. त्याचवेळी, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दरवाजासुद्धा बनू शकता. हे दरवाज्यासारखे आहे. जर दरवाजा बंद असेल, तर तो अडथळा आहे. जर तो उघडा असेल, तर तो मार्ग आहे, नाही का? तुम्ही तसेच आहात. तुम्ही अपारदर्शक बनू शकता आणि अडथळा ठरू शकता. दरवाजा बंद आहे म्हणजे, जरी रूपकार्थाने मी म्हणालो की, तुमच्यासाठी दरवाजे बंद आहेत, म्हणजे तुम्ही जाऊ शकत नाही. जर दरवाजा असेल, तर तो उघडण्याचा मार्ग असायलाच पाहिजे, नाही का? तो सध्या बंद असेल, परंतु जर दरवाजा असेल, तर शक्यता आहे. जर ते सर्व काही दगडाचे असते, तर ते वेगळे होईल. पण आता हा दरवाजा आहे. कोणीतरी त्याला बंद केले आहे, ठीक आहे, परंतु जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही त्याला उघडू शकता.
जर ते शक्य नसेल, तर किमान त्याला अर्धपारदर्शक करायचे आहे, जेणेकरून जरी त्याने तुम्हाला पार जाऊ दिले नाही तरी, किमान तुम्ही स्पष्टपणे बघू शकाल की, तिथे जीवनाचा दुसरा आयाम आहे. एकदा का तुम्ही पाहिले, मग तुम्ही स्वतःला फसवू शकणार नाही. तुम्हाला माहीत आहे की, तिथे जायचे आहे.