२४ डिसेंबर, २०११ ला सद्गुरूंनी स्व-परिवर्तनासाठी एक पवित्र जागा 'आदियोगी अलायम'ची प्रतिष्ठापना केली. हा समारंभ ईशा योग्य केंद्र, तमिळनाडू येथे १०,००० लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठापनेच्या या प्रक्रियेमध्ये, लिंगावर अर्पण करण्यासाठी सद्गुरूंनी दूध आणि नागाचे विष यांचे मिश्रण तयार केले पण आधी त्याचा स्वतःवर प्रयोग केला. एक भक्ताने याबद्दल विचारले. व्हिडिओमध्ये प्राणप्रतिष्ठापनेची चित्रमालिका समाविष्ट आहे, आणि सद्गुरूंचे उत्तरही, ज्यात प्रतिष्ठापनेची वैज्ञानिक आणि गूढ बाजू मांडली आहे. याची टिप्पणी इथे दिली आहे.

प्रश्न: तुम्ही दुधाबरोबर नागाचे विष का ग्रहण केले?

सद्गुरू: तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की ते विष आहे, 'जहर' नाही. विष तेव्हाच काम करते जेव्हा ते रक्तात मिसळते, पोटात नव्हे. पण नेहमीच, कुठेतरी छोटीशी फट असते, हलकासा घाव असतो, अल्सर असतो इत्यादी... बस, तिथे ते प्रवेश करेल. आणि तसंच झालंय कारण माझे डोळेसुद्धा थोडेसे निस्तेज झालेत, बाकी मी ठीक आहे. तर जे काही मी त्याला (शिवाला) समर्पित करतोय, ते मी स्वतःवर प्रयोग केल्याशिवाय त्याला कसं अर्पण करू? आणि बऱ्याच पूर्वी हे विष माझ्यासाठी अगदी फलदायी ठरले आहे. त्याने माझे जीवन अक्षरशः संपले, पण त्याबदल्यात मला जीवनापेक्षाही काहीतरी अतुल्य मिळाले. तर विषाने कधीच माझ्याविरुद्ध काम केलं नाही, त्याने माझ्यासाठीच काम केलंय आणि करत आलंय.

तर यात बरेच पैलू आहेत. मला चिंता इतकीच आहे की मी जे काही बोलेन ते लोकं तुकड्या तुकड्यांमध्ये उचलतील आणि त्याचप्रमाणे समजून घेतील आणि मग दंशले जातील... विष थोड्या थोड्या प्रमाणात अगदी मादक असते. अति प्रमाणात कोणतीही गोष्ट विनाशकारी ठरते. हेच काय, तर ऑक्सिजन सुद्धा तुम्हाला मारू शकतो. तुम्हाला माहिती आहे का हे? (१) पोंगल तुम्हाला मारू शकते. अति पोंगल तुमचा नाश करू शकते. बहुतेक, नागाच्या दंशापेक्षा जास्त लोक पोंगलने मारतात. हो, खरंय.

स्थायुरूपी पारा फक्त तीन गोष्टी सामावून घेतो. आपण प्रयोग करून बघू शकतो, पण मला अशा गोष्टी करायच्या नाहीत. दुसऱ्या एखाद्या पाऱ्याच्या तुकड्याबरोबर आपण हे करून बघू शकतो. तुम्ही बघाल -- ते सोनं सामावून घेईल, चांदी सामावून घेईल आणि नागाचे विष सामावून घेईल. तुम्ही दुसरे कुठले विष ठेवून बघा, ते सामावून घेणार नाही. त्याबाबत ते अत्यंत निवडक आहे. फक्त तेच हवंय त्याला. हे तीनच घटक तो ग्रहण करेल, बाकी कशाला स्पर्शही करणार नाही. तर, हे सगळं काही अकारण नाहीये, त्याला ही चांगलं कारण आहे. जर हे सगळं समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचे असेल तर...रोज सकाळी सूर्य उगवतो. हे बऱ्यापैकी वैज्ञानिक आहे का की नाही? मी विचारतोय. की हे वैज्ञानिक आहे ना? हं? सूर्य सकाळी उगवतो हे पुरेसं वैज्ञानिक आहे का?

प्रश्नकर्ता: हो..

सद्गुरू: तर यात इतकं वैज्ञानिक काय आहे? कोंबडा आरवतो आणि म्हणून सूर्य उगवतो, यात वैज्ञानिक काय आहे? आधुनिक विज्ञानानुसार "असे का?" हे कोणीही तुम्हाला कशाच्याहीबद्दल सांगू शकत नाही. तर, तुम्हाला नांदायचे असेल तर तुमची विज्ञानाची परिभाषा बदलली पाहिजे. ज्ञानाच्या आणि अनुभूतीच्या नव्या आयामामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तुमची विज्ञानाची संकल्पना विचाराच्या आणि दृष्टिकोनाच्या एका वेगळ्याच उंचीवर उत्क्रांत व्हायला हवी, विचारांहून अधिक.

सर्प, मुख्यत्त्वे नाग, हा एक विशिष्ट प्रकारचा जीव आहे. महादेवांच्या गळ्यातील फणा काढून आभूषणाप्रमाणे वेटोळ्यात बसलेल्या नागाच्या प्रतिकामागचे कारण म्हणजे, शिव साधारणपणे त्रिनेत्री म्हणून ओळखले जातात, ज्याचा अर्थ ते आकलनाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचले आहेत. जे काही ग्रहण केलं जाऊ शकत ते सगळं त्यांनी केलंय. गळ्यातील नाग म्हणजे ते जणू काही अगदी नागासारखे आकलन करू शकतात.

आकलनशक्तीचा सापाशी काय संबंध? समजा, वेलियांगिरी पर्वतावरील साप अध्यात्मिक विज्ञानाविषयी तुमच्या कोणाहीपेक्षा नक्कीच अधिक जाणतो. या ग्रहावरील कुठलेही अध्यात्मिक पुस्तक तो तुमच्यापेक्षा अधिक जाणतो, ते काही त्याच्या बुद्धीने नव्हे, तर ऊर्जेच्या स्वरूपात. त्याला ते माहित असते. कारण जे काही इथे घडलंय, अत्यंत दिव्य गोष्टी इथे घडल्या आहेत. समजा तुम्हाला ध्यानलिंग बनवण्याचे विज्ञान जाणून घ्यायचं असेल, त्यांना माहिती आहे. ऊर्जेच्या दृष्टिकोनातून, बुद्धीने नाही. जर तुम्ही ऊर्जा स्वरूपात जाणून घेऊ शकलात, तर मनुष्य असल्याने तुम्ही तेच ज्ञान बुद्धिमध्ये परिवर्तीत करू शकता. आपले सर्व अनुभव आपण बुद्धीने समजावून घेऊ शकतो, नाही का? जर तुम्हाला एखादा अनुभव आला, तुम्ही तो बुद्धीने समजावून घेण्याचा प्रयत्न करता आणि मग त्याचे शक्य तितके वर्णन करण्याचा प्रयत्न करता. हा प्रामुख्याने मनुष्याचा गुण आहे. पण त्याला (सापाला) हे सहजपणे माहित आहे, ऊर्जेच्या रूपात.

भौतिकदृष्ट्या, समजा, आत्ता या क्षणी नाही, पण पुढच्या आठवड्यात जगाच्या दुसऱ्या भागात एखादा भूकंप होणार आहे, कॅलिफोर्निया, जपान किंवा आणखी कुठेतरी. तर वेलियांगिरी वरच्या सापांना हे आधीच माहीत असते की असं काहीतरी होणार आहे. सहज ज्ञात होते त्यांना. जर त्यांचे निरीक्षण करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक त्या गोष्टी असतील, तर अक्षरशः या पृथ्वीवर जे जे काही घडते ते तुम्हाला सांगतील, त्याच्या वागण्यातील छोट्याश्या बदलातून, ते स्वतःला कसं हाताळतात यावरून. सापाचे आकालन खूप चांगले असते. तुम्ही त्याला प्राणी म्हणू शकत नाही, कारण तो शिवाच्या वर आहे, चरणांत नाही, तो माझ्याइतकाच सक्षम आहे असे म्हणून शिवाने त्याला उच्च स्थान दिले आहे.

मी तुम्हाला हे सांगितलंच पाहिजे. एक असा पैलू आहेज्याचा मी उल्लेख केला नाही. असे योगी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विष वापरले आहे. ज्यांना साप कसा हाताळायच ते माहित नाही, ज्यांना साप किंवा नाग कसे हाताळायचे ते माहित नाही ते विंचवाच्या विषाचा उपयोग करतात. आणि मग ते विंचवाचा दंश करवून घेतात. आणि मग काय घडतं तर तुमचा एक भाग निद्रिस्त होऊन जातो आणि दुसरा भाग झिणझिण्या येऊन अत्यंत सतर्क होतो. मी इथे असा सहज बसून राहू शकतो अगदी उद्या सकाळपर्यंतसुद्धा. कारण माझा एक भाग निद्रेत आहे आणि दुसरा भाग तेजोमयरित्या प्रकाशित होऊन गेलाय. याचा मला एक प्रकारचा फायदा आहे.