सदगुरू: जगातील सर्वोत्तम धनुर्धारी बनणे हेच अर्जुनाच्या आयुष्यातील एकमेव लक्ष्य होते. तो एक महान योद्धा तर होताच, परंतु अत्यंत अंतर्मुख असा मनुष्य होता. तो अतिशय शिस्तबद्ध आणि पूर्णपणे आपल्या ध्येयावर केंद्रीत तर होताच, पण त्याचबरोबर असुरक्षिततेची भावना त्याच्या मनात आयुष्यभर होती. इतर कोणीतरी आपल्यापेक्षा वरचढ धनुर्धर तर होणार नाही ना? ही एकच चिंता त्याला कायम पोखरत असे. आणि तसे होण्यापासून रोखण्यासाठी त्याने काही अमानुष गोष्टी देखील केल्या.

अर्जुनामध्ये जरी बरेच विस्मयकारक गुण असले तरीही त्याच्यामधल्या या असुरक्षिततेने त्याच्यावर राज्य केले.

एके दिवशी एकलव्य नावाचा एक मुलगा द्रोणांकडे आला. तो आर्य नव्हता तर निषाद होता, निषाद म्हणजे भारतातल्या आदिवासी जमातींपैकी एक. पुराणात त्याचे वर्णन असे आहे – त्याची चाल अगदी बिबट्यासारखी होती. तो काळ्या रंगाचा, जटाधारी, अत्यंत सामर्थ्यवान परंतु दयाळू स्वभावाचा असा मनुष्य होता. त्याने द्रोणांकडे धांनुर्विद्या शिकण्याची इच्छा व्यक्त केली. द्रोण म्हणाले, “तू क्षत्रिय नाही, म्हणून मी शिष्य म्हणून तुझा स्वीकार करू शकत नाही.

मुलगा द्रोणांच्या पाया पडला आणि म्हणाला, “मी तुमची सामाजिक रूढी परंपरेची अडचण समजू शकतो. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. तुमच्या नुसत्या आशीर्वादाने मी शिकेन.” द्रोणांनी त्याची ही नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “मी तुला आशीर्वाद देतो.”  मग एकलव्य जंगलात परत गेला. नदीतून चिकणमाती आणून त्याने अगदी पछाडलेल्या व्यतीप्रमाणे द्रोणांचा पुतळा बनवायला सुरुवात केली. तुम्हाला एक महान गायक बनण्याची इच्छा असेल तर तुम्हाला फक्त एक चांगल्या आवाजाची नाही तर उत्तम कानांचीसुद्धा आवश्यकता असते. तुमची ऐकण्याची क्षमता ही तुम्हाला एक उत्तम संगीतकार बनवते. त्याचप्रमाणे जर तुम्ही तिरंदाज बनू इच्छित असाल तर ते फक्त तुमच्या हातांबद्दल नाही तर ते तुमच्या डोळ्यांच्या क्षमतेबद्दल आहे - तुम्ही एखाद्या गोष्टीचे किती बारकाईने निरीक्षण करू शकता आणि तुमचे लक्ष किती एकाग्रतेने रोखू शकता यावर ते अवलंबून असते.

पक्ष्याचा डोळा

अर्जुनाने त्याच्यातील हे गुण याआधीच दाखवून दिले होते. एकदा सर्व राजकुमारांचं प्रशिक्षण सुरु असताना गुरु द्रोणांनी त्यांचं धनुर्विद्येतलं कौशल्य तपासण्यासाठी कौरव आणि पांडवांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यांनी झाडाच्या शेंड्यावर लाकडाचा एक छोटा पक्षी ठेवला व त्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्यास सांगितलं. एका मागून एक, कौरव आणि नंतर पांडवांनी नेम धरला. द्रोणांनी प्रत्येकाला विचारले, “तुला काय दिसते?” प्रत्येकानी वेगवेगळी उत्तर दिली - “पान, झाड, आंबा, पक्षी, आकाश.” द्रोणाने त्या सर्वांना बाद केले. शेवटी, अर्जुनाची पाळी आली. जेव्हा द्रोणाने त्याला विचारले, “तुला काय दिसते?” अर्जुनाने उत्तर दिले, “मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोयं.”  द्रोण म्हणाले, “सर्वांमध्ये तू  एकटाच आहेस जो पुढचे प्रशिक्षण घेण्यासाठी लायक आहेस,” आणि त्यांनी त्याला धनुर्विद्येची कला शिकवली, ज्यात डोळे बंद करून नेम साधणे, अंधारात बाण चालवणे - अगदी लक्षाकडे न पाहता लक्षभेद करणे या सर्व कला शिकवल्या. ते अर्जुनाला दररोज घनदाट अंधारात जेवायला लावायचे. ते त्याला म्हणत, “जर तू ना बघता आपल्या तोंडात अन्न घालू शकतोस तर तू तुझ्या शत्रूला न बघता त्याच्या छातीत बाण का मारू शकत नाहीस?”

एकलव्याची अतूट एकाग्रता 

अर्जुनाने या सर्व प्रगत तंत्रांचे प्रशिक्षण घेतले आणि मीच जगातील सर्वोत्तम धनुर्धर आहे असे त्याला वाटू लागले. पण नंतर एकलव्य आला, द्रोणाचा आशीर्वाद घेतला आणि परत जंगलात गेला. जेव्हा एकलव्य द्रोणांकडे आला तेव्हा त्याने द्रोणाबद्दलच्या अगदी बारीक तपशीलाकडेही नीट लक्ष दिले. हा तिरंदाजाचा महत्वाचा गुण आहे - त्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही. एखादी गोष्ट पाहताना ज्याच्या नजरेतून तपशील चुकतो, त्याच्याकडून लक्ष्यवेध करताना नक्कीच चूक होऊ शकते. त्याने द्रोणाची प्रतिमा त्याच्या मनात उतरवली आणि परत जाऊन त्यांची चिकणमातीची प्रतिमा तयार केली आणि त्या प्रतिमेस गुरु म्हणून नमस्कार करून द्रोणाच्या आशीर्वादाने सराव करण्यास सुरुवात केली.

अर्जुनाने एकलव्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांमधली एकाग्रता बघून अर्जुनाला धडकीच भरली, कारण तो जाणून होता की या प्रकारे लक्ष केंद्रित करणारी व्यक्ति कधी नेम चुकवणार नाही.

एके दिवशी पांडव व कौरव जंगलात शिकार करायला गेले. त्यांचा शिकारी कुत्रा त्यांच्या पुढे गेला. काही वेळाने कुत्र्याने जोरजोरात भुंकणे सुरू केले. पांडवांना वाटलं की शिकार सापडली आणि त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरवात केली. मग अचानक कुत्रा शांत झाला. त्यांना वाटलं वाघ किंवा अस्वलाने कुत्र्याला मारलं असावं. ते कुत्र्याच्या शोधात निघाले, पण तेवढ्यात कुत्रा त्यांच्याकडे परत आला. त्याला सहा बाण अश्याप्रकारे मारलेले होते की त्या बाणांचा त्याच्या तोंडाभोवती चिमटा बनेल जेणेकरून तो भुंकू शकणार नाही.

जेव्हा त्यांनी हे पाहिले तेव्हा भीमाने सर्वप्रथम प्रश्न विचारला की द्रोण जंगलात आले आहेत कि काय, कारण दुसरं कुणीच हे काम करू शकत नाही, अगदी अर्जुनसुद्धा! कुत्राच्या तोंडाभोवती चिमटा बनवण्यासाठी क्षणार्धात सहा बाण मारणे आवश्यक होते. ते द्रोणांच्या शोधात निघाले आणि त्यांना हा तरुण मुलगा दिसला जो अगदी एखाद्या बिबट्या सारखा उभा होता आणि त्याच्या हातातला धांनुश्याबान बाण त्याने अर्जुनावर रोखलेला होता, कारण एकलव्याने ज्याक्षणी या पाच जणांना पाहिलं तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की अर्जुन एक धनुर्धर आहे आणि सर्वप्रथम अर्जुनालाच  मारलं पाहिजे. अर्जुनाने एकलव्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांमधली एकाग्रता बघून अर्जुनाला धडकीच भरली, कारण तो जाणून होता की या प्रकारे लक्ष केंद्रित करणारी व्यक्ति कधी नेम चुकवणार नाही. त्याच्या लक्षात आलं की यानेच कुत्र्याला बाण मारले असतील. अर्जुनाला आता काळजी वाटू लागली कारण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर त्याच्या समोर उभा होता.

द्रोणांची गुरुदक्षिणेची मागणी

अर्जुनाने त्याला विचारले, “तू कोण आहेस? तू धनुर्विद्या कुठे शिकलास? तू तर क्षत्रियही नाहीस! ” तो युवक म्हणाला, “मी एकलव्य आहे. द्रोण माझे गुरु आहेत.” अर्जुन तात्काळ द्रोणाकडे धावत गेला आणि रडत म्हणाला, “तूम्ही मला वचन दिले होते कि मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर होईन, पण तुम्ही माझ्यापेक्षा एकलव्याला सरस बनवलेत. हे योग्य नाही." द्रोणाने विचारले, “हे तू काय बोलतोयस?” तो म्हणाला, “जंगलात एक  युवक आहे जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि तो म्हणतो की तुम्ही त्याचे गुरु आहात. त्याने तुमचा पुतळा बनवला आहे आणि त्यासमोर तो धनुर्विद्येचा सराव करतोय.”

एकलव्य म्हणाला “गुरुजी, तुम्ही मागाल ती दक्षिणा देण्यासाठी मी तयार आहे. त्यावर गुरु द्रोण म्हणाले “तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे.”

द्रोण त्यांच्या स्वभावानुसार म्हणाले, " हो, हे सत्य आहे की मी तुला वचन दिलंय की मी तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवेन. तू साम्राज्यासाठी अतिशय महत्वाचा आहेस आणि जर तू सर्वश्रेष्ठ नसशील तर मला माझी दक्षिणा मिळणार नाही. मी या समस्येतून मार्ग काढतो." ते जंगलात एकलव्याला भेटण्यास गेले. जरी द्रोणांनी त्याला प्रत्यशात काही शिकवलं नसलं तरी आपले गुरु द्रोण येत असेलेले पाहून एकलव्याला अतिशय आनंद झाला आणि तो त्यांच्या चरणांवर कोसळला. अत्यानंदाने त्याने द्रोणांना नमन केलं आणि त्यांना काही फळ आणि फुल अर्पण केली. पण द्रोणांच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. ते म्हणाले, "तू एक उत्तम धनुर्धर बनला आहेस ही फार अनादनाची गोष्ट आहे, पण मग माझी गुरु दक्षिण कुठे आहे?" त्या काळात परंपरा अशी होती की गुरुदक्षिणा दिल्याखेरीज शिष्य गुरूंना सोडून जाऊ शकत नसे आणि शिकलेली विद्या वापरू शकत नसे. 

एकलव्य म्हणाला “गुरुजी, तुम्ही मागाल ती दक्षिणा देण्यासाठी मी तयार आहे. त्यावर गुरु द्रोण म्हणाले “तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे.” पारंपारिक भारतीय धनुर्विद्देमध्ये प्रत्यंचा ओढण्यासाठी उजव्या हाताचा अंगठा वापरत असत. उजव्या हाताचा अंगठा नसेल तर तुम्ही धनुर्धर बनूच शकणार नाही. तलवार किंवा भाला चालवणार्‍यापेक्षा धांनुर्धरांना त्या काळी फार महत्व होतं कारण ते लांब अंतरावरून शत्रूला मारू शकत. स्वत:च्या जीवाला द्वंद्वयोद्ध्यांपेक्षा कमी धोका पत्करून ते समोरच्याला मारू शकत होते, म्हणून युद्धामध्ये ते सर्वात महत्वाचे आणि अतिशय उपयोगी होते.

जेव्हा एकलव्याने कर्तव्याच्या भावनेतून स्वत:चा उजवा अंगठा कापण्यासाठी तलवार उपसली, तेव्हा द्रोणांनी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितले, आणि अर्जुन निरुत्साहित होईल या आशेने अर्जुनाकडे पाहिले. पण अर्जुन अतिशय शांतपणे हे सगळं पाहत होता, जणू काय हा एक विधी होता जो व्हायलाच हवा होता. अर्जुनामध्ये जरी बरेच विस्मयकारक गुण असले तरीही त्याच्यामधल्या या असुरक्षिततेने त्याच्यावर राज्य केले. त्याला जगातील सर्वोत्तम धनुर्धारी व्हायचे होते आणि आता एकलव्याच्या तुटलेल्या अंगठ्याने पुन्हा एकदा अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणार होता.