कविता: सद्गुरुji, मी आपले यू-ट्यूब वरील पुष्कळ इंटरव्यू पाहिलेत आणि इथे येण्याआधी थोडी तयारी करून आली आहे. ते असो…पण आता मलाच नाही तर इतर अनेकांना ज्याबद्दल जाणून घ्यायचंय अश्या एका मूलभूत प्रश्नापासून मी सुरवात करणार आहे - जेव्हा आपण म्हणता की तुम्ही एक गूढयोगी आहात, याचा अर्थ तुम्ही काही चमत्कार सुद्धा करू शकता का?

सद्गुरु: एका सगळ्यात मोठ्या समस्येने मानवजातीला ग्रासलंय. ती म्हणजे, ते त्यांच्याच मानसिक खेळात एवढे गुंतून गेलेत, भारावून गेलेत की त्यांना सर्वत्र पसरलेल्या सृष्टीतील अद्भुततेची जाणीवच उरलेली नाहीये. तुमचं मानसिक नाट्य, तुमचे विचार आणि भावना यांचा पसारा एवढा वाढलाय, त्यामुळे या नाटकाने आणि तुमच्या देहाने इतकी जागा व्यापली आहे की मूळ अस्तित्वच जणू बाजूला सारल्यासारखं झालंय. तुम्ही जर का काळजीपूर्वक पुरेसं लक्ष दिलंत तर रोजच्या जगण्याच्या सगळ्या गोष्टीत "चमत्कार" आहेत… चिखलातून होणारी फुलाची निर्मिती, कचऱ्याचे सुंगधात झालेले रूपांतरण…हा चमत्कार नाहीये का? हे सगळं सर्वत्र आणि सतत घडतंय.

बऱ्याच लोकांची चमत्काराची कल्पना म्हणजे - या क्षणी मी माझ्या खिशातून एक कबुतर बाहेर काढावं. जर मी तसं केलं तर तुम्हाला पक्षी मिळेल आणि मला घाण झालेला खिसा. यातून एवढंच साध्य होईल.

कविता: खरतर माझी अशी इच्छा होती की तुम्ही असा अद्भुत चमत्कार कराल की पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून जाईल.

सदगुरु: मला वाटतं बहुतेक म्हणूनच सरकारने इसरो च्या मंगळयान मोहिमेवर एवढा खर्च केलाय, जेणेकरून स्त्री आणि पुरुष दोघांना वेगवेगळ्या ग्रहांवर राहता येईल! खरंच... दुर्दैवाने खूप वर्षांपासून स्त्रियांचे शोषण होत आले आहे, जगभरात आणि या देशातही..पण या देशात एक काळ असा होता जेव्हा स्त्रियांचे कुठल्याही प्रकारे शोषण होत नव्हते. त्यांनी खूप सुंदर आयुष्य घालवले एके काळी... उदाहरणाच घ्यायचं झालं तर…आपल्याकडे पूर्ण माहिती नाहीये, पण जे काही कथावशेष शिल्लक आहेत जसं रामायण, महाभारत… त्यात तुम्हाला स्त्रिया चेहरा पदराखाली झकतांना दिसतात का? नाही! तेव्हाच्या समाजात राणी ही कायमच राजाबरोबर वावरतांना दिसते.

मनुष्य ही एकच प्रजाती आहे. गतकालातल्या स्त्रियांच्या शोषणाची प्रतिक्रिया म्हणून आपण दोन भिन्न प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय

पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण हजार वर्षाहून थोडं जास्तच, परकीय आक्रमणं सोसली आहेत. जेव्हा अशी आक्रमणे होतात, ती फक्त सोनंनाणं लुटण्यासाठी नाही, तर ते तुमच्या बायका आणि माताभगिनींनाही सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना कुठेतरी धान्याच्या कोठारात, किंवा धान्याच्या पोत्याच्या आड लपवणे नित्याचे झाले. हजारो वर्षांच्या आक्रमणामुळे स्त्रियांनी मुक्तपणे वावरणे ही गोष्टच चुकीची मानली जाऊ लागली आणि दुर्दैवाने आजही तेच घडतंय.

मला वाटतं हे सगळं पुढच्या पिढीत बदलेल, आपण त्या दृष्टीने आत्ताच बरीच प्रगती केली आहे. स्वातंत्र्यानंतरची ही दुसरीच पिढी आहे, त्यामुळे आपण घाई करून या एका प्रजातीची विभागणी करण्याचा प्रयत्न करू नये. मनुष्य ही एकच प्रजाती आहे. गतकालातल्या स्त्रियांच्या शोषणाची प्रतिक्रिया म्हणून आपण दोन भिन्न प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हे भविष्यात पुरुष आणि स्त्रिया दोहोंसाठी अयोग्य असेल. आपण जे बदल समाजात घडवतोय ते मागील काळात झालेल्या चुकीच्या गोष्टींच्या प्रतिक्रियेतून होता कामा नयेत हे फार महत्वाचे आहे. निव्वळ प्रतिक्रियेतून ते येण्यापेक्षा, आपल्याला भविष्यात योग्य असं काय हवय? त्याकडे आपण डोळसपणे पाहायला पाहिजे.

कविता: म्हणजे सद्गुरू असं म्हणतायत की चमत्कार नसतात, फक्त लॉजिक म्हणजेच तर्क वापरूनच........

सद्गुरू: नाही नाही नाही.. चमत्कारही असतात... आता आपण जो तर्कसंगत विचार वापरतोय तो खूपच प्रार्थमिक स्वरूपाचा आहे. एके काली आपण आपला तर्क सुद्धा अशा उंचीवर नेऊन ठेवला, जिथे गूढगम्य गोष्टींचा उलगडा होण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो; हीच या संस्कृतीची महानता आहे. तर्क आणि चमत्कार यांच्याकडे आपण परस्पर विरोधी गोष्ट म्हणून पाहिलं नाही. आपल्याला हे उमगलं होतं की आपल्या आयुष्यात अद्भुत गोष्टी अनुभवण्यासाठी, स्थिर आणि तर्कनिष्ठ वैचारिक पायाचीच गरज आहे. नाहीतर आपल्या अद्भुत अनुभूती सुद्धा इंग्रजी म्हणीप्रमाणे "फ्लॅश इन द पॅन" म्हणजे क्षणभंगुर असतील; शाश्वत नव्हे. आपल्या तर्काला मजबूत पाया असेल आणि आपण जर तो ठराविक उंचीवर नेला असेल तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अद्भुत होऊ शकेल. तसं घडण्यासाठी तुम्ही, हा पुरुष...ही स्त्री...अशा बालिश विचारसरणीत अडकता कामा नये. पुरुष आणि स्त्री यांच्या मिलनामुळेच तुमचा आणि माझा जन्म झालाय; की तुम्हाला अजूनही वाटतंय की काहीतरी चमत्कार घडला आणि तुम्ही आकाशातून खाली पडलात...?

सर्वप्रथम, प्रत्येक गोष्टीची आर्थिक निकषावर प्रतवारी करणे ही घोडचूक आहे. तुम्ही किती कमावता? तुम्ही किती सुखसोयी पुरवू शकता? हेच जर का उन्नतीचे परिमाण असेल तर विश्वास ठेवा, जगात स्त्रिया असतील पण तुम्ही स्त्रीतत्व समूळ नष्ट कराल. आज जर स्त्रीला जगाच्या बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर तीला पुरुषाप्रमाणे वागावे लागते. ही एक भीषण गुलामगिरी आहे. आपले आयुष्य आणि जग जर सुंदर बनवायचं असेल तर स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व संतुलित प्रमाणात असणे अतिशय आवश्यक आहे.

आपली यशाची संकल्पना इतकी बालीश आणि अपरिपक्व बनलीय - तुमच्याकडे किती संपत्ती आहे? असंच जर तुम्ही वागणार असाल तर तुम्ही स्त्रीतत्वाला संपूर्णपणे संपवून टाकाल; कारण हे अपरिपक्व जगाचं लक्षण आहे. अशाने व्यावसायिक वृत्ती तुमच्या मनात आणि घरात शिरेल. पाश्चिमात्य समाजात हेच घडतंय. ते लग्न करतानाच एक करार करतात, “आपला जर घटस्फोट झाला तर कोणाला काय मिळणार?” जीवनात यापेक्षा जास्त गलिच्छपणा काय असू शकतो? जर तुम्ही असे हिशोब आधीच करत असाल तर दोन व्यक्तींना एकाच बंधनात कसे गुंफाल? म्हणून व्यापाराला तुमच्या घरापर्यंत नेऊ नका. जर आपण आर्थिक सुबत्तेलाच आपल्या आयुष्याची फुटपट्टी समजलो तर हे असंच होणार.

कविता: बरोबर आहे. तुम्ही रामायण, महाभारत अशा धर्मग्रंथाचा उल्लेख केलात... तर... 

सद्गुरू: मी थोडी सुधारणा करीन त्यात, आपण धर्मग्रंथ आणि अतिशय नैसर्गिक रित्या आपला इतिहास लिहिण्याची पद्धत यांच्यात गल्लत करता कामा नये. महाकाव्य म्हणजे एक “ओघवत्या आणि जिवंत भाषेत लिहिलेला ऐतिहासिक दस्तऐवज” जेणेकरून तो सर्व काळांशी सुसंगत असेल. सध्याची इतिहास लिहिण्याची पाश्च्यात्य पद्धत अशी आहे, "हा राजा होऊन गेला, त्याने इतक्या लोकांना मारले, त्याने असे केले, तसे केले; मग दुसरा आला त्याने कायकाय केले आणि तो मरण पावला इत्यादी...हे कळून तुम्ही काय करणार? हजार वर्षांपूर्वी कोणी जगला काय किंवा मेला काय, त्याच्याशी तुम्हाला काय देणंघेणं? पण तुम्ही रामायण किंवा महाभारत वाचा; त्या जिवंत कथा आहेत...आणि त्या आजच्या काळाशीही तितक्याच सुसंगत आहेत. हे खरोखरच गत काळापासून शिकणे आहे. आपण दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकू शकतो ही मनुष्याची आधारभूत रचना आहे. प्रत्येक मूर्खपणा आपण करून बघायची गरज नाही. जरी तो ५००० वर्षांपूर्वी घडला असेल तरी त्यामुळे काय घडलं हे समजून घेऊन आपण आपले आयुष्य सुधारू शकतो.

कविता: गेल्या अनेक पिढ्या जर तुम्ही रामायण आणि महाभारत आणि अशा अनेक कथांमधून बोध घेत असाल तर मग आजकालच्या पुरुषांकडून ते त्यांच्या पत्नीला सीतेसारखी वागणूक देणार नाहीत अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता? तुम्हाला माहितेय, कोणीतरी काहीतरी म्हणालं म्हणून त्याने त्याच्या पत्नीला जंगलात सोडून दिलं. इतकी वर्ष आपण शिकत आलोय ती शिकवण आपण कशी पुसून टाकणार? आपण "रिफ्रेश" बटण दाबून नव्याने कशी काय सुरवात करणार, जेणेकरून आपण स्त्रीला एक मानाचे स्थान देऊ? हे आपण आपल्या मुलांना कसं शिकवणार?

सद्गुरू: हे आता मला थोडे योग्य संदर्भ देऊन स्पष्ट करू द्या. राम इतका प्रदेश पार करून दक्षिणेला गेला, त्याने युद्ध केले, एका शहराला नेस्तनाबूत करून आपली पत्नी परत मिळवली ही काही छोटी गोष्ट नाही.

कविता: पण त्याने तिला अग्नी परीक्षा द्यायला लावली, त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नाही.

सद्गुरू: आपण याचा शब्दशः अर्थ घेतोय. अग्नी परीक्षा याचा अर्थ खरोखरीच एखाद्याने आगीत प्रवेश करणे नव्हे. याचा अर्थ असा आहे की तीला काही चाचण्यांना सामोरे जावे लागले – अर्थातच...कारण तो एक राजा होता; प्रत्येक जण त्याच्याकडे एक आदर्श म्हणून बघत होते. तुमचे आचरण कसे आहे आणि तुमची कृती काय आहे हे अतिशय महत्वाचे आहे, कारण संपूर्ण देश तुमच्यावर अवलंबून आहे. त्या काळात राम लोकांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवत होता. सीता गर्भवती होती, त्यांचे पुत्र तिच्या पोटात वाढत होते, एका राजासाठी त्याचे मुलगे किती महत्वाचे! असं सगळं असतांनाही, तो तिला जंगलात पाठवतो...नाहीतर देशात अस्थिरता निर्माण झाली असती. याकडे तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहता का? मला वाटतं आपल्याला असेच पंतप्रधान आणि नेते मिळायला हवेत, जे देशाच्या कल्याणाकरिता जे योग्य असेल ते कुठल्याही परिस्थितीत करण्यास तयार असतील.

कविता: मला मान्य आहे की नेत्याला त्याग करावा लागतो, त्यात काही शंका नाही. आणि लोकांसमोर उदाहरण ठेवण्यासाठी ते अतिशय टोकाचा त्याग करतीलही. पण हे एक उदाहरण असं आहे की लोक त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि आपल्या पत्नीलासुद्धा तसेच वागवतात. त्या काळाच्या नेत्याचं उदाहरण समोर ठेऊन, त्याचं अनुसरण करणं, आणि ते आजच्या काळात सुद्धा वापरणं हे कितिसं सुसंगत आहे?

सद्गुरू: आज जर तुम्हाला जंगलात पाठवले तर त्याला जंगल सफारी हॉलिडे म्हणता येईल. मला वाटतं हे खूपच शब्दशः घेतलं जातंय. मी जेव्हा नेल्लोरला होतो तेव्हा ७००० पेक्षा जास्त शाळकरी मुलाच्या ग्रुपला मार्गदर्शन करत होतो. एक चौदा वर्षाची मुलगी उभी राहिली आणि तिनं प्रश्न विचारला, असं म्हणतात रामाने अयोध्या ते श्रीलंका इतका लांबचा प्रवास पायी चालत केला. हे प्रॅक्टिकली शक्य आहे की ही फक्त एक कथा आहे? मग मी तोच प्रश्न तिला विचारला, आत्ता तू छोटी मुलगी आहेस, उद्या मोठी होऊन जोडीदार शोधशील. तुला अशा प्रकारचा नवरा आवडेल का, जो, तू जर हरवलीस तर तो तुझा माग काढत तुला शोधून काढेल? की तुला असा नवरा हवा जो प्रॅक्टिकली तुला शोधणं शक्य नाही म्हणून दुसरे एखादे प्रॅक्टिकल सोल्युशन बघेल? त्या लहानग्या मुलीलाही माहित्येय तिला कुठल्या प्रकारचा जोडीदार हवा ते.

एखाद्या घटनेचा चुकीचा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला कायमच आहे पण त्या घटनेचा योग्य अर्थ लावणे हे तुमचं कर्तव्य आहे, नाही का? आणि पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा आताच्या काळातल्या सांडर्भांनुसार न्यायनिवाडा करणे हे अयोग्य आहे.

कविता: होय तोच खरा प्रश्न आहे. त्यामुळे या महाकाव्याचे शब्दशः अर्थ न घेता पुढे जायला पाहिजे.

सद्गुरू: म्हणूनच मी ती चूक सुधारली, ते धर्मग्रंथ नाहीत. हे ऐतिहासिक ग्रंथ आहेत. ते आपल्याला बोध घेण्यासाठी आहेत, चुकीचे अर्थ लावण्यासाठी नाहीत.