धर्म म्हणजे काय आणि धर्मानुसार कसे जगता येईल याचा शोध घेण्यासाठी सद्गुरू महाभारतातल्या घटनांचा उपयोग करतात.

सद्गुरू: कृष्णाने धर्म संस्थापनेच्या इच्छेने पूर्ण जीवन घालवलं. खूप गोष्टीं त्याच्या मार्गाने गेल्या आणि काही प्रमाणात, त्याला जे काय हवं होतं ते त्याने निर्माण केले. बऱ्याच गोष्टीं त्याला पाहिजे तश्या झाल्या नाहीत, आणि लोकांनी त्यांच्या स्वतःच्या कल्पनेनुसार धर्माचे स्पष्टीकरण आणि चुकीचे अर्थ लावण्यास सुरवात केली.

कृष्णाने कबूल केले कि, "जेंव्हा माझ्या स्वधर्माची बाब येते, तेंव्हा मी माझ्या आतमध्ये कसे असायला पाहिजे याबद्दल मी १००% स्पष्ट आहे."

बर्‍याच लोकांनी हा प्रश्न कृष्णाच्या जीवनात आणला. जेंव्हा द्रौपदीचे लग्न होणार होते, तेंव्हा कृष्णाने तिचे पाच पांडव बंधूंसोबत लग्न व्हावे यासाठी सर्व काही केले, आणि द्रौपदीने त्याला प्रश्न केला, "धर्म म्हणजे काय हे तुला ठाऊक आहे का?" किंवा जेंव्हा कृष्णाने भीमाला सांगितले कि, "हस्तिनापूर दुर्योधनासाठी सोडून दे. आपण एक नवीन शहर बनवू," भीम म्हणाला, “तू एक देशद्रोही आहेस. मला दुर्योधनाचा वध करायचा आहे. तू मला हे राज्य त्याच्यासाठी सोडून द्यायला सांगत आहेस आणि दुसरीकडे कुठे जाऊन वेगळं राज्य तयार करायला सांगत आहेस, तेही शून्यातून? तुला धर्माबद्दल काय माहित आहे?” अर्जुन आणि इतर कित्येकांकडून असेच प्रश्न त्याला विचारण्यात आले. लोकांनी कृष्णाला प्रश्न विचारला, "धर्म म्हणजे काय हे तुला खरंच माहित आहे का?" मी त्याने दिलेल्या व्यक्तिगत, विस्तृत उत्तरांमध्ये जाणार नाही, परंतु सर्वसाधारणपणे, कृष्णाने हे कबूल केले कि, "कृतीच्या बाबतीत धर्म सध्या काय आहे हे मलासुद्धा माहित नाही, कारण कृती परिस्थितीच्या अधीन आहे. तथापि आपण कितीही न्याय केला, तरी जेंव्हा बाह्य परिस्थितींचा विषय येतो तेंव्हा आपण अचूकतेपासून थोडसं दूरच असू शकतो. पण जेंव्हा माझ्या स्वधर्माची (एखाद्याची जीवनातील स्वतःची कर्तव्ये) बाब येते, तेंव्हा मी माझ्या आतमध्ये कसे असायला पाहिजे याबद्दल मी १००% स्पष्ट आहे.”

स्वधर्म आणि धर्म

कोणताही बुद्धिमान मनुष्य त्याने कसे वागावे याबद्दल १००% स्पष्ट कधीही नसतो; तो नेहमी ते तोलत असतो. केवळ एक मूर्ख किंवा माथेफिरू १००% स्पष्ट असतो. आपण जे काही करतो, आपलं अस्तित्वच, आपलं खाणं, जगणं, आणि श्वासोच्छवास हे येथील इतर काही जीवांसाठी एक अन्याय आहे, जर तुम्ही ते त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलंत तर. तुम्ही जर काही खाल्लं, तुम्ही जीव घेता. तुम्ही जर श्वास घेतला, तुम्ही जीव घेता. तुम्ही जर चाललात, तरी तुम्ही जीव घेता. म्हणून जर तुम्ही हे सर्व करू इच्छित नसाल आणि तुम्ही स्वतःलाच मारलंत, तरीही तुम्ही जीव घेता. जगातली कोणतीही कृती १००% बरोबर किंवा १००% चुकीची नाही. तुम्हाला फक्त तुमच्या कृतीतून निर्माण केलेल्या सर्व मांगल्याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही त्या पूर्ण केल्या पाहिजेत.

धर्म हे फक्त तुम्ही स्वतःमध्ये कसे आहात याबद्दल आहे. तुम्ही जर सर्वसमावेशक स्थितीमध्ये असल्यास, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनुसार, परिस्थितींनुसार कृती कराल.

धर्म हे फक्त तुम्ही स्वतःमध्ये कसे आहात याबद्दल आहे. तुम्ही जर सर्वसमावेशक स्थितीमध्ये असल्यास, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनुसार, परिस्थितींनुसार कृती कराल. तुम्ही जर समावेशाच्या स्थितीमध्ये नसाल, तुम्ही जर "तू विरुद्ध मी" अशा स्थितीत असाल, तर तुम्ही जे काही करता ते चुकीचे आहे. तुम्ही काहीही योग्य करू शकत नाही कारण तुमचे अस्तित्वच चुकीचे आहे कारण तुम्ही ते "तू विरुद्ध मी" असे बनवले आहे.

कृष्णाचं संपूर्ण जीवन हे फक्त या एका गोष्टीचं प्रदर्शन होतं: तिथे "तू आणि मी" नव्हतं, ते "मी आणि मी" किंवा "तू आणि तू" होतं. मग तो गोपींसमवेत असो किंवा तो राजकारणी म्हणून वागत होता, किंवा तो गीता शिकवत होता, संदेश नेहमी सारखाच होता: समावेशाचा. एकदाका तिथे फक्त "मी आणि मी" आहे, मग कृती म्हणजे फक्त परिस्थितींचा आणि विवेकाचा प्रश्न आहे. कोणतीही कृती १००% बरोबर किंवा १००% चुकीची असू शकत नाही. परंतु जसे कृष्णाने नेहमीच आग्रह धरला, आणि जसं मी स्वधर्माबद्दल सर्वकाळ आग्रह करत राहिलो आहे, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःमध्ये कसे रहायचे याविषयी १००% स्पष्टता असू शकते.

धर्म आणि राक्षसाची संतान

एकदा असे घडले की कृष्ण काही लोकांना भेटला, आणि प्रत्येकजण त्याच्याकडे आला आणि त्यांनी धर्म म्हणून जे पाहिलं ते त्याला सांगितलं. हे कृष्णाच्या आयुष्यातील एका विशिष्ट क्षणी घडले, जेंव्हा त्याने हाती घेतलेल्या कामगिरीमुळे तो निराशेच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचला होता. ही वैयक्तिक निराशा नव्हती. तो असा मनुष्य नव्हता जो स्वतःबद्दल किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टींबद्दल निराश होऊ शकतो. निराशा कामगिरी पूर्ण होत नाही याबद्दल होती. जेंव्हा लोकं ते जसे असायला पाहिजे तसे उभे राहत नाही हे त्याला आढळले, तेंव्हा त्याने विचारले: "तुम्हा सर्वांना, कोणत्या धर्मासाठी उभे राहायचंय?" एक श्रीमंत माणूस आला, एक कंजूष ज्याने पैसे मिळवण्यासाठी आणि संचय करण्यासाठी शक्य असलेल्या सर्व गोष्टी केल्या होत्या, आणि म्हणाला, "मी विद्वान ब्राह्मण आणि देवाकडून धर्म विकत घेतो. मी माझ्या कुटुंबाला खायला घालतो आणि मंदिरात पूजा करतो. हा माझा धर्म आहे." कृष्ण म्हणाला, "तुझा धर्म हा लोभाची संतान आहे. मी नाही ओळखत तुला." आणि त्याने त्याला जाऊ दिले.

पवित्र चिन्हांनी अंकित केलेला एक माणूस आला आणि म्हणाला, “मी एक धार्मिक मनुष्य आहे. मी पापाच्या मार्गावर जायला कचरतो. मी कधीही मारलं किंवा चोरी केली नाही किंवा इतर कोणतेही पापी कृत्य केले नाही. मी चांगल्या मार्गाने जगलो आहे. मी देवाला घाबरणारा आहे.” कृष्ण म्हणाला, "तुझा धर्म भीतीची संतान आहे. मी नाही ओळखत तुला." आणि त्याने त्याला जाऊ दिले.

एक योद्धा कृष्णाजवळ आला आणि म्हणाला, “मला माझा धर्म माहित आहे. मी माझ्या सर्व शत्रूंचा आणि मला विरोध करणाऱ्या सर्वांचा नाश केला आहे. मी देवतांना संतुष्ट करण्यासाठी आहुती देतो, गरिबांना दान देतो आणि जगाला माझा विजय घोषित करतो. मी ब्राह्मणांना खायला घालतो आणि ते माझे गुणगान गातात.” कृष्ण म्हणाला, “तुझा धर्म गर्वाची संतान आहे. मी नाही ओळखत तुला." आणि त्याला जाऊ दिले.

एक नम्र दिसणारा माणूस कृष्णाकडे आला आणि म्हणाला, “मी नम्र आणि सहिष्णू आहे. मी एक विनयतेच मूर्तरूप आहे. विरोध न करता मी आनंदाने त्रास सहन करतो. मी भूक, तहान, थंडी आणि अगदी दुर्दैव सोसतो." कृष्ण म्हणाला, "तुझा धर्म गुलाम मनाची संतान आहे. तुला तुझ्यातील दिव्यत्वाची जाणीव नाही. मी नाही ओळखत तुला." आणि त्याला जाऊ दिलं.

एक धूर्त दिसणारा माणूस आला आणि तो कृष्णाला म्हणाला, मी धोकादायक कृती, सिंहाच्या जबडयापासून दूर राहतो आणि मी सुरक्षिततेच्या मार्गावर चालतो आणि याने देवाच्या क्रोधापासून वाचतो, मला माहित आहे मला शांती मिळेल." कृष्ण म्हणाला, "तुझा धर्म भ्याडपणाची संतान आहे. मी नाही ओळखत तुला." आणि त्याने त्याला जाऊ दिले.

एक अतिशय आत्मविश्वासू, गर्विष्ठ दिसणारा माणूस कृष्णाकडे आला आणि म्हणाला, “जीवनाच्या सापळ्यांपासून वाचण्यासाठी, देहाची तीव्र इच्छा दडपण्यासाठी, मी स्वतःमधल्या आणि इतरांमधील मानवी दुर्बलतेचा तिरस्कार करतो. तीव्र विरक्तीने, मी संपर्क टाळतो आणि मी वेगळा राहतो, एकटाच , मी पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. मला कोणाचीही किंवा कशाचीही गरज नाही." कृष्ण म्हणाला, " तुझा धर्म हा अहंकाराचा धर्म आहे. मी नाही ओळखत तुला." आणि त्याला जाऊ दिलं.

एक व्यापारी आला आणि म्हणाला, "मी गरिबांना दान करून देवाला कर्ज देतो आणि मी याचं एक वहीखात देखील ठेवतो जेणेकरून ते कधीही विसरणार नाही. मी माझ्या धर्माद्वारे मुक्ती मिळवेन." कृष्ण म्हणाला, "तुझा धर्म व्यापाराची संतान आहे. मी नाही ओळखत तुला." आणि त्याला जाऊ दिलं.

एक संत दिसणारा माणूस कृष्णाकडे आला आणि म्हणाला, “माझा बुद्धीचा धर्म आहे. मी संतांच्या वचनाने जगतो. दुष्टांचा प्रतिकार करत नाही, शांतपणे सहन करत राहतो, मी देवाचे राज्य मिळवेल." कृष्ण म्हणाला, "तुझा धर्म निष्क्रियतेची संतान आहे. मी नाही ओळखत तुला." आणि त्याला जाऊ दिलं.

एक रेशमी पोशाख घातलेला, चांगले तेल लावलेला, चकचकीत केस असलेला माणूस, आला आणि म्हणाला, "धर्म म्हणजे एक भ्रम आहे. मी खातो, मी पितो, मी व्यभिचार करतो. माझे शरीर माझे एकमात्र मंदिर आहे. देहातील आनंद ही माझी उपासना करण्याची विधी आहे. यापलीकडे काहीही नाही आहे.” कृष्ण म्हणाला, “तू राक्षसाची संतान आहेस. तुला कधीही माफ केले जाणार नाही.” आणि त्याने त्याच्याकडे पाठ फिरविली.

हे असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, जर एखादा केवळ त्याच्या भौतिक स्वरूपालाच समर्पित असेल, तर त्याच्यासाठी कोणताही मार्ग नाही. एखाद्यामध्ये वेगवेगळे दोष असू शकतात जसं कि भीती, लोभ, क्रोध, चिंता, भ्याडपणा, गर्व आणि इतर अनेक गोष्टीं असू शकतात, परंतु तो जर भौतिकतेपेक्षा काही अधिक गोष्टींची आस बाळगत असेल, तर त्याच्यासाठी मार्ग आहे.