प्रश्न:नमस्कार, सद्गुरु, कधीकधी मला असे वाटते की माझ्या डोक्यात मध्यभागी काहीतरी तणाव किंवा संवेदना निर्माण झाली आहे. ते काय आहे ते मला समजू शकत नाही.

सद्गुरु: डोक्याच्या मध्यभागी ब्रह्मरंध्र म्हणून ओळखले जाणारे एक ठिकाण आहे. जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेथे एक कोमल जागा असते, मूल एका विशिष्ट वयापर्यंत वाढत नाही तोपर्यंत तेथे हाड तयार होत नाही. रंध्र हा एक संस्कृत शब्द आहे, परंतु इतर भारतीय भाषांमध्येही याचा वापर सामान्यपणे केला जातो. रंध्र म्हणजे लहान किंवा बोगद्यासारखा रस्ता. ही शरीरातील ती जागा आहे जेथून गर्भात जीवन प्रवेश करते.

तुम्ही ज्या दिवशी इथून निघून जाल, तेव्हा तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागातुन जाणीवपूर्वक निघून गेलात तर ठीक आहे. परंतु जर तुम्ही ब्रह्मरंध्रातून जाऊ शकलात तर जाण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

शरीर हे जीवन टिकवून ठेवण्यास सक्षम आहे की नाही याबद्दल जीवनप्रक्रियेत पर्याय खुले ठेवण्याची जागरूकता असते. म्हणून ते विशिष्ट काळासाठी त्या दरवाज्याला उघडे ठेवते जेणेकरून जर शरीर त्याच्या अस्तित्वासाठी अयोग्य असेल तर ते निघून जाईल - आणि शरीरातील इतर कोणत्याही मार्गातून ते जाऊ इच्छित नाही; त्याला आलेल्या मार्गानेच बाहेर पडायचे असते. चांगला पाहुणा नेहमी समोरच्या दाराने येतो आणि समोरच्या दारानेच बाहेर पडतो. जर तो समोरच्या दारातून आत आला आणि मागच्या दारातून बाहेर गेला तर याचा अर्थ आपले घर धुवून नेले आहे! तुम्ही ज्या दिवशी इथून निघून जाल, तेव्हा तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागातुन जाणीवपूर्वक निघून गेलात तर ठीक आहे. परंतु जर तुम्ही ब्रह्मरंध्रातून जाऊ शकलात तर जाण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

अशी अनेक वैद्यकीय प्रकरणे आहेत जिथे मृत गर्भ जन्माला येतो परंतु सर्व वैद्यकीय मापदंडाप्रमाणे गर्भ निरोगी आहे आणि सर्व काही ठीक आहे. ह्याचे कारण असे आहे की आतले जीवन अजूनही निवड करत आहे. एखाद्या जिवाने गर्भामध्ये प्रवेश केला आणि मूल विकसित होत असताना त्याला परिस्थिती अयोग्य वाटली तर ते निघून जाते. दरवाजा खुला ठेवण्याचे हे एक कारण आहे.

यामुळेच भारतीय संस्कृतीत गर्भवती महिलेच्या आजूबाजूला एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार करण्यासाठी बरीच खबरदारी घेतली जाते. आम्ही आजकाल हे सगळं सोडून दिलं आहे , परंतु तुम्ही आहात त्यापेक्षा कोणीतरी चांगले तुमच्या पोटी जन्माला येईल या आशेने हे केले जात असे. म्हणून गर्भवती महिलेला विशिष्ट आरामात आणि तंदुरुस्तीमध्ये ठेवले जायचे. योग्य प्रकारचे वास, संगीत आणि खाणे-पिणे सर्व काही केले जायचे जेणेकरून तिचे शरीर अशा स्थितीत असेल की योग्य प्रकारच्या जिवाचे स्वागत होईल.

ब्रह्मरंध्र हा “अँटिना" आहे

ब्रह्मरंध्राबद्दल बरीच चर्चा होते आणि बरीच पुस्तकेही लिहिली गेली आहेत आणि दुर्दैवाने बरेच लोक डोक्याच्या मध्यभागी काहीतरी घडतंय अशी कल्पना करू लागतात. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की, तुम्ही तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर लक्ष केंद्रित केलं तर तिथे तुम्हाला थोडी जाणीव होईल. तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. तुमच्या करंगळीच्या टोकावर लक्ष द्या आणि पहा, तुम्हाला तिथे किती जाणीव होते. आणि शरीरात इकडे तिकडे बर्‍याच प्रकारच्या संवेदना घडत असतात - खासकरून जर तुम्ही चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त असलात तर. तुमच्यात काही महान प्रक्रिया होत आहे असा तुम्ही चुकीचा समाज करून घेऊ नये.

शरीरात एकूण ११४ चक्र आहेत, त्यापैकी दोन भौतिक शरीराबाहेर आहेत. जर तुमच्या भौतिकतेच्या पलीकडचा एखादा पैलू तुमच्याध्ये सतत सक्रिय बनला तर काही काळानंतर, हि दोन सुप्त चक्रं सक्रिय बनतात. जर ती सक्रिय बनली तर तुमच्या डोक्यावर एक अँटिना असेल ज्यामुळे तुम्हाला जीवनाचा एक विशिष्ट दृष्टीकोन मिळेल!

उंबरठ्यावर जगणे

हे तुम्हाला नेहमीच काठावर ठेवते - जीवनाच्या उंबरठ्यावर आणि पलीकडेसुद्धा . स्वत: ला नेहमी उंबरठ्यावर ठेवणे हा एका योग्याचा हेतू असतो जेणेकरून ज्या क्षणी त्याची इच्छा असेल त्या क्षणी तो जाणीवपूर्वक बाहेर पडेल. खासकरुन माझ्यासारखा योगी जो जीवनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी आहे, जो स्वत: गाडी पळवतो, हेलिकॉप्टर उडवितो, फुटबॉल खेळतो आणि गुडघा मोडून घेतो. माझ्यासारख्या योग्याने नेहमीच उंबरठ्यावर राहणे फार महत्वाचे आहे. हे सर्व योगी करतात, परंतु मी हे जास्त प्रमाणात करतो, कारण माझे हेलिकॉप्टर कोसळल्यावर सुद्धा मला तिथे बेशुद्धीत मरायचे नाही.

जेव्हा तुम्ही स्वत: ला उंबरठ्यावर ठेवता तेव्हा ते सुरक्षित असते. जर तुम्ही संतुलित असाल तर तारेवरची कसरत सुरक्षित आहे. संतुलित नसलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी हे खूपच धोकादायक दिसते परंतु प्रत्यक्षात, रस्त्यावरुन गाडी चालवण्यापेक्षा हे अधिक सुरक्षित आहे, कारण तारेवरच्या कसरतीत फक्त तुम्ही असता. रस्त्यावर, फक्त तुम्हीच नसता. हे कसं करावं हे माहिती असेल तर तारेवरची कसरत अधिक सुरक्षित आहे. एकदा का तुमच्याकडे संतुलन आले, की उंबरठ्यावर बसणे खूप सुरक्षित आहे. यात कोणताही धोका नाही. चुकून घसरण्याची शक्यता नाही, पण हे तुम्हाला स्वातंत्र्य देते - जर गोष्टी चुकल्या तर तुम्ही बाहेर पडू शकता, पण तुम्ही अजागरुकपणे जात नाही.

तुम्ही उंबरठ्यावर आहात, असा विचार करायला सुरु नका. जर तुमच्या शरीरात काही संवेदना तुम्हाला जाणवल्या तर ते ठीक आहे. एकतर तुम्ही तुमची साधना सुरु ठेवू शकता किंवा तुम्हाला ही ऊर्जा एका मोठ्या शक्यतेत बदलायची असेल तर तुम्ही आमच्याकडे आलंच पाहिजे.