बरेच लोक पैसे कमावतात ते उदरर्निवाहासाठी नव्हे.ते पैसे कमावतात कारण ही एकच वस्तू त्यांना या जगात आपण कुणीतरी आहोत याचीजाणीव करून देते. तुम्ही कुणीतरी होण्याचा प्रयत्न करता कारण तुम्ही जसे आहात त्यात एक अपूर्णतेची जाणीव सतत तुम्हाला सलत असते.  आणि म्हणून ही उणीव भरून काढण्यासाठी अनेक वस्तू संग्रही करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. मानसिक, भावनिक आणि शारीरिक पातळीवर तुम्हाला अपूर्णत्वाची जाणीव होत असते.

खरं पाहता, ब्रम्हांडाच्या तुलनेत तुम्ही अगदी एक लहान मनुष्य आहात. तुम्हाला असं वाटतं की या सर्व वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह केल्याने आपण परिपूर्ण होऊ, पण तसे कधीच होत नाही. पुष्कळ वस्तूंचा संग्रह केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला परिपूर्णतेचा अनुभव येतच नाही, हो ना?

सर्व प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की पैसा हे केवळ एक माध्यम आहे. पैश्याला स्वतःची अशी किंमत नाही. जर पैशाला स्वतःचे असे मोल असते तर, तुम्ही आपले स्वतःचे असे पैसे छापले असते आणि आपल्या घरी ठेवले असते. पण तो केवळ कागद ठरला असता. केवळ व्यवहाराचं ते एक माध्यम असल्याने, जगात अनेक वस्तू मिळविण्याचे एक साधन असल्यानेच, पैसा मौल्यवान झाला आहे. पण त्याला स्वतःची अशी किंमत नाही.

ज्या लोकांची जीवनाची समज अगदी कच्ची असते, ते पैशाची उपासना करू लागतात. पैशांच्या राशींची ते “लक्ष्मी “ म्हणून उपासना करतात. सर्वात खालच्या दर्जाची उपासना म्हणजे पैशाची उपासना, कारण ‘व्यवहाराचं माध्यम हा पैलू वगळला तर पैशाला काहीच अर्थ नाही.  पैशाला महत्व आलेलं आहे कारण जगात तुम्हाला तो कोणतीही वस्तू विकत घेऊन देऊ शकतो.

जगात आज एक मोठी चूक समाज व्यवस्थेने केली आहे आणि ती म्हणजे आर्थिक व्यवहाराला आयुष्यात सर्वाधिक महत्व दिले आहे.  संपूर्ण जगात आर्थिक व्यवहार अगदी महत्वाचा भाग झालेला आहे.  प्रेम नव्हे, आनंद नव्हे, माणुसकी, कला, संगीत या सारख्या गोष्टी नव्हे तर केवळ अर्थार्जन जीवनाचा अगदी महत्वपूर्ण भाग झाला आहे. एकदा का आर्थिक व्यवहार तुमच्या जीवनाचा सर्वात महत्वपूर्ण भाग झाला, की तुमचं जीवन निकृष्ट होईल. जीवनाचा मार्मिक पैलू तुम्ही जाणू शकणार नाही आणि आयुष्याच्या सूक्ष्मतम गोष्टी तुमच्या अनुभवाच्या कक्षेत उतरणार नाहीत. परंतु असं असलं तरी, तुमची आर्थिक स्थिती जर मजबूत नसेल तर सूक्ष्मतम गोष्टीं मिळविणे कठीण होईल. कारण काही सूक्ष्मतम गोष्टींनांसुद्धा जगात किंमत मोजावी लागते.

 

म्हणून जेव्हा समाज अगदी गरीब होतो तेव्हा तो निकृष्ट होतो आणि समाज जर खूप श्रीमंत झाला तर दर्जाहीन होतो.  पैशाव्यतिरिक्त इतर गोष्टींना काहीच महत्व नसेल तर आर्थिक व्यवहार पाशवी आणि निर्दयी होतात. म्हणून समाज श्रीमंत असेल,पण ही दर्जाहीन श्रीमंती नसेल, तेव्हाच आयुष्यातील इतर गोष्टी जोपासल्या जातील. आपल्याला एक संतुलन साधावं लागेल. आर्थिक व्यवहाराला एक निश्चित महत्व असले पाहिजे पण त्याचबरोबर जीवनातल्या इतर पैलूंना देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे.