प्रश्न: आजच्या युगात नवीन आणि जुनी पिढी यांच्यात मतभेद असतात. वयामुळे असलेला जीवनाचा अनुभव आणि तारुण्यातली प्रचंड उर्जा आणि उत्साह या दोघांची सांगड कशी घालता येईल?

తరాల మధ్య అంతరాలేందుకు…?

सद्गुरू : हे असंच चालत आलंय, फक्त आजची गोष्ट नाहीये. खरी समस्या ही आहे की, जुन्या पिढीला त्यांचे विचार जुने आहेत असं वाटत नाही आणि नव्या पिढीला ते फारच जुनाट वाटतात. मुळात गोष्ट ही आहे, की कुणीतरी तुमची जागा व्यापायचा प्रयत्न करतंय. हे फक्त मनुष्यांमध्ये असतं असं नाही. आपण जर जंगली प्राण्यांकडे बघितलं, विशेषतः हत्ती - तरणाबांड हत्ती रागानं सर्वत्र सैरावरा पळत असतो, सर्वकाही उपटून बाहेर काढत असतो, कारण त्याचं त्याच्याच कळपातल्या एका मोठ्या हत्तीशी भांडण झालेलं असतं. तो आपली जागा सोडत नसतो, म्हणून हा भांडायचा प्रयत्न करतो. पण याच्याकडे तेवढी ताकद नसते, म्हणून तो चिडचिड करू लागतो – अगदी वयात येणाऱ्या मुलांप्रमाणे.

आजकाल पालक बाहेरनिघत नाहीत, त्यांना मुलांनी जावं अशी अपेक्षा असते. मुलांना जर पंख पंख फुटले असतील तर तसेही जाणारच. पण जर तसे पंख फुटले नसतील, तर मतभेद होणार.

म्हणूनच आपण भारतीय संस्कृतीत ‘वर्णाश्रम’ प्रस्थापित केला. याचा अर्थ जन्मापासून पाहिली १२ वर्ष बाल्यावस्था किंवा बालपण मानली जातात–ह्या वेळात तुम्ही फक्त खेळायचं आणि शरीर आणि मेंदूची वाढ होऊ द्यायची. १२ ते २४ ब्रम्हचर्य –  ही वेळ आहे तुमच्या शरीराला आणि मनाला शिस्त लावायची, जीवन उर्जांचा विकास करण्याची, जेणेकरून तुम्ही एक शक्तिशाली व्यक्तिमत्व बनू शकता. वयाच्या २४व्या वर्षी, आयुष्याच्या येणाऱ्या सर्व भोगातून जाण्याआधीच, जर तुम्हाला जीवनाचं निखळ सत्य दिसलं, तर तुम्ही संन्यासी बनता. अन्यथा तुम्ही लग्न करून गृहस्थ होता. जर तुम्ही वयाच्या २४व्या वर्षी लग्न केलं, तर दोन तपांनंतर (सोलर सायकल ) किंवा २४ वर्षानंतर तुम्ही ४८ वर्षांचे होता. म्हणजे त्यावेळी तुमची मुलं त्या वयाची होतात जेव्हा ती अगदी तरणीबांड असतात, तुम्ही बाहेर निघावं अशी त्यांची इच्छा असते पण ते तसं सांगू शकत नाहीत.

म्हणून पूर्वी, ४८व्या वर्षी पती-पत्नी सन्यास घेऊन वेगवेगळ्या दिशेला जायचे. पती एका आश्रमात  तर पत्नी दुसऱ्या आश्रमात जाऊन,दोघे १२ वर्ष आध्यात्मिक साधना करायचे. वयाच्या ६०व्या वर्षी ते पुन्हा बाहेर येऊन लग्न करायचे. आजकाल ते दूर जात नाहीत, एकत्र राहतात, पण अजूनही वयाच्या ६०व्या वर्षी पुन्हा लग्न करतात. नाही, तुम्ही १२ वर्षांसाठी वेगळं व्हायला हवं. पहिल्यांदा जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही शारीरिक, भावनिक किंवा अन्य कुठल्यातरी गरजांमुळे एकत्र आला. आता या सगळ्या गोष्टी संपलेल्या असतात. तुम्ही १२ वर्ष अध्यात्मिक साधना केलेली असते आणि तुम्ही आता पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं एकत्र येऊन वानप्रस्थाश्रमात जाता. आयुष्याचा शेवटचा टप्पा जगण्यासाठी तुम्ही वनात जाऊन राहता.

आजकाल पालक बाहेर निघत नाहीत, त्यांना मुलांनी जावं अशी अपेक्षा असते. मुलांना जर पंख फुटले असतील तर तसेही ती जातीलच. पण जर तसे पंख फुटले नसतील, तर मग मतभेद होणारच.

अंतर राखून रहा

लोकांना वाटतं की भावनांपायी पालकांमधे आणि मुलांमधे कलह निर्माण होतोय. पण जीवनाच्या सत्यात उतरून पाहिलं तर हे जंगलात जागेसाठी आणि वर्चस्वासाठी लढणाऱ्या एखाद्या लहान हत्ती आणि मोठ्या हत्ती सारखंच आहे. पुरुष हे एका पद्धतीनं करतात, तर बायका दुसऱ्या पद्धतीनं. पण मुलभूत समस्या तीच आहे– तुम्हाला तुमची जागा हवी आहे, ते जागा रिकामी करून देत नाहीयेत, मग मतभेद हे होणारच. जी मुलं तुमच्यापासून लांब राहत असतात, ते कायम तुमच्याशी अगदी प्रेमानं वागतात. जर ते तुमच्यासोबत राहत असतील, तर नेहमीच मतभेद होणार – तुम्ही वाईट किंवा ते वाईट आहेत म्हणून नाही, पण तुम्हाला एका प्रकारची जागा लागते आणि त्यांना वेगळ्या प्रकारची जागा लागते. जर दोघेही एकाच जागी राहत असले तर तणाव उद्भवणारंच. तुमची मुलं लहान वयातच अगदी प्रौढ झाली असली तर गोष्ट वेगळी आहे – अश्या मुलांचं वयस्कर लोकांशी सहज जुळतं. किंवा जर तुम्ही आजारी पडला तर त्यांच्यात काळजी घेण्याच्या इच्छा निर्माण होईल. अन्यथा मतभेद होणारच.

ही काही नवीन समस्या नाहीये. मला खात्री आहे की ही समस्या अगदी माणसं गुहेत राहत होती तेव्हाही होती. तर हे कसं हाताळावं? वृध्दांनी एक पाऊल मागे सरकायला शिकलं पाहिजे. तरुणवर्ग ती जागा व्यापत जाईल. वृद्धांमधून अश्या प्रकारचं शहाणपण आणि जीवनाचा अनुभव व्यक्त व्हायला हवा, की तरुणांना त्याबद्दल साहजिकच आदर वाटेल. जर तुम्ही तसं केलं नाही तर तरुण तुमचा आदर करणार नाहीत आणि अनेक प्रकारे आपली चीडचीड व्यक्त करतील. जसं तुमचं वय वाढतं, जर तुम्ही एका ठराविक पातळीचं शहाणपण आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आत्मसात केली असेल, जी अद्याप तरुणांपाशी नाही, तर ते तुमच्याकडे अपेक्षेने बघतील. मगच, तुम्ही काही प्रमाणात एकाच ठिकाणी नांदू शकता – तुम्ही पहिल्या मजल्यावर रहा– तळ मजला त्यांच्यासाठी सोडा, जिथून ते तुमच्याकडे वर मदत लागल्यास पाहू शकतील.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.