सद्गुरू: या सृष्टीतील सगळ्यात अद्भुत यंत्र हे कॉम्प्युटर किंवा कार किंवा अंतराळयानही नाही तर ते मानवी मन आहे. ही सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे. जर तुम्हाला माहिती असेल की ते जागरूकपणे कसं वापरावं.

तुमचं मन पाच अवस्थांमध्ये असू शकतं. ते निद्रिय अवस्थेत असू शकतं. याचा अर्थ ते सक्रीय नाहीये, ते खूपच प्राथमिक अवस्थेत आहे. निद्रिय मन ही काही समस्या नाही. ज्याचं मन खूपच साधं असतं आणि ज्याची बुद्धिमत्ता कुशाग्र नाही त्याला काही त्रास नाही. तो नीट खातो, नीट झोपतो. केवळ विचार करणाऱ्या माणसांनाच झोपेची समस्या आहे. साध्या मनाचे लोक शरीराच्या सर्व क्रिया बुद्धिमान लोकांना पेक्षा खूप चांगल्या प्रकारे करतात कारण गोंधळासाठी साठी थोड्या बुद्धीमत्तेची आवश्यकता असते पण निद्रिय मन हे मानवी शक्यतांपेक्षा पशु प्रकृतीच्या जास्त जवळ असते.

ज्याक्षणी निद्रिय मनामध्ये तुम्ही थोडी ऊर्जा भरता, ते सक्रिय होते पण ते भरकटलेले असू शकते. जर तुम्ही त्यामध्ये अजून ऊर्जा भरलीत तर मग अशा स्थितीला पोहोचते जिथे भरकटलेले नसते पण ते दोलायमान असते. एक दिवस तिकडे जाते तर दुसऱ्या दिवशी तिकडे जाते. हे भरकटलेल्या मनापेक्षा खूप चांगले आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये अजून ऊर्जा भरली तर हळूहळू ते एकाग्र होत जाते. हे खूपच चांगले आहे. पण मन ही एक जागरूक प्रक्रिया होणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे.

एखाद्या माणसाला यश हे खूप सोपे आणि नैसर्गिक प्रकारे मिळतं आणि दुसऱ्या माणसाला खूप कष्ट घ्यावे लागतात यामागचं कारण म्हणजे पहिला मनुष्य एक त्याला हवा तोच विचार करत असतो आणि दुसरा मनुष्य स्वतःच्या विरुद्ध विचार करत असतो.

मर्कट मन

योगामध्ये एक खूप सुंदर कथा आहे. एक माणूस फिरायला जातो आणि अचानकपणे स्वर्गात पोहोचतो. खूप चालल्यावर तो थोडा दमतो आणि विचार करतो “मला आराम करायला जागा मिळाली असती तर किती झालं असतं”

मग त्याला एक सुंदर झाड दिसतं आणि त्याच्या खाली खूप छान मऊ गवत असते. मग तो तिथे जातो आणि त्या गवतावर झोपतो. काही तासानंतर तो आराम करून उठतो आणि मग विचार करतो “मला भूक लागली आहे, मला काही खायला मिळालं तर खूप बर होईल.” मग तो खूप सुंदर गोष्टींचा विचार करतो ज्या त्याला खायला हव्यात आणि त्या सगळ्या त्याच्यासमोर प्रकट होतात. त्याचं पोट भरल्यावर तो माणूस विचार करतो “मला प्यायला मिळालं तर बरं होईल” आणि हव्या असणाऱ्या सगळ्या पेयांचा तो विचार करतो आणि ती सर्व त्याच्यासमोर प्रकट होतात.

योगामध्ये मानवी मनाला मर्कट म्हणजेच माकड म्हटले आहे. कारण तीच त्याची प्रकृती आहे. माकड म्हणजेच नक्कल करणे होय. जर तुम्ही असं म्हणालात की तुम्ही माकडाप्रमाणे वागताय याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणाची तरी नक्कल करताय. हेच तुमच्या मनाचे पूर्णवेळ काम आहे. म्हणूनच अव्यवस्थित मनाला माकड म्हटले आहे.

जेव्हा त्याच स्वर्गात गेलेल्या माणसात हे माकड सक्रिय झाले, त्याने असा विचार केला “अरे बापरे हे काय घडतय, मी जेवण मागितलं, जेवण आलं, मी प्यायला मागितलं, पेय आली. कदाचित इथे भूतं असतील.” त्याने आजूबाजूला पाहिलं आणि तिथे भुतं होती. ज्या क्षणी त्याने त्यांना पाहिलं तो घाबरला आणि म्हणाला “अरे बापरे इथे भुतं आहेत, कदाचित ती मला त्रास देणार” आणि भुतांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, आणि तो दुःखाने ओरडायला किंचाळायला लागला. तो म्हणाला “ही भुते मला त्रास देतात ती मला ठार मारणार” आणि तो मेला.

समस्या ही होती की तो एका कल्पवृक्षाखाली बसला होता. त्याने जे मागितलं ते घडलं. सुव्यवस्थित मनाला कल्पवृक्ष म्हटले जाते. या मनामध्ये जे काही तुम्ही मागाल ते खरं होतं. आयुष्यात तुम्ही सुद्धा कायम कल्पवृक्षाखाली बसलेले असता म्हणूनच तुमचे मन हे कल्पवृक्ष होईपर्यंत विकसित करणे गरजेचे आहे. वेडेपणाचा स्रोत म्हणून नाही.