सोनाक्षी सिन्हा: प्रिय सद्गुरूजी, मी खूप भावनिक व्यक्ती आहे आणि नेहमी भावनिकदृष्ट्या एखाद्या परिस्थितीपासून स्वतःला वेगळं ठेवणं मला अवघड जातं. मी पाहू शकते की हे जिथे जायला हवे तिथे जात नाहीये, पण तरीही माझं मन आणि माझ्या भावना त्यापासून वेगळ्या दिशेला वळवणं खूप अवघड जातं. मी त्याच विषयी विचार करत राहते आणि तिथेच अडकून राहते. आणि मला असं करायचं नाहीये. तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती मी कशी हाताळू शकते?

सदगुरू: जगात डोकं आणि हृदय यांच्या द्वंद्वाबद्दल खूप चर्चा सुरू आहे. खऱ्या अर्थानं असं काही नाहीये कारण जसा तुम्ही विचार करता तश्याच तुमच्या भावना होतात. जशा तुमच्या भावना असतात, त्याच प्रकारे तुम्ही विचार करता.

वेगवेगळ्या लोकांसाठी, वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य मिळतं. आज, खासकरून सध्याच्या शिक्षण पद्धतीमूळे, बहुतेक लोकांसाठी, त्यांचे विचार त्यांच्या भावनांच्या पुढे धावतात. पण तरीही अजूनही असे पुष्कळ लोक आहेत ज्यांच्या भावना विचारांच्या पुढे धावतात. आजकाल ज्या लोकांच्या भावना विचारांच्या पुढे धावतात त्यांना मूर्ख ठरवलं जातं कारण जरी लोक इमोश्नल कोशंट (भावनिक बुद्धिमत्ता) बद्दल बोलत असले, तरी त्यांना भावनांची शक्ती आणि बुद्धिमत्ता समजत नाही.

आता, सोनाक्षी काय विचारत आहेत, की अशा काही परिस्थिती असतात ज्यामध्ये तुम्हाला पडायचं नसतं, पण भावना त्यांत इतक्या गुंतलेल्या असतात की विचार तिथेच जात राहतात आणि नकळतपणे तुम्ही तिथेच जात राहतात. एवढंच आहे विचार हा चपळ असतो आणि तो लगेच वळवता येतो. पण भावना रसाळ असतात. त्यांना दिशा बदलायला थोडा वेळ लागतो. आज तुम्ही विचार करता की "ही सर्वात अप्रतिम व्यक्ती आहे", उद्या त्या व्यक्तीनं तुम्हाला आवडत नाही असं काही केलं की ताबडतोब तुम्ही म्हणाल, "ती अजिबात चांगली नाही". पण भावना तेवढ्या चपळ नाहीत. जर माझ्या भावना या व्यक्तीसोबत पुढे गेल्या असतील, तर त्या एवढ्या ताबडतोब माघारी फिरू शकत नाहीत. त्या मधल्या काळात, तुम्हाला त्रास होतो.

याबद्दल तुम्ही काय करू शकता? तुमच्या भावना आणि विचार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू नका कारण मूळातच मनाची प्रवृत्ती अशी आहे की "मला या व्यक्तीविषयी विचार करायचा नाहीये" म्हणजेच उर्वरित आयुष्य मी त्याच व्यक्तीविषयी विचार करणार आहे.

हे म्हणजे माकडाच्या गोष्टीसारखं आहे. जर तुम्हाला सांगितलं, "पुढच्या पाच सेकंदांसाठी माकडांचा विचार करू नका", तर तुम्हाला विचार न करायला जमेल? फक्त माकडांचे विचार येतील !! कारण हाच मनाचा स्वभाव आहे. जर तुम्ही म्हणाला "मला हे नको", म्हणजे आता तेच होत राहणार.

जेव्हा सक्तीपूर्ण विचार आणि भावना येतात, तेव्हा पहिली गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे , ती म्हणजे तुम्ही त्यांना ते जसे आहेत तसे पाहा- त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या क्षणी तुम्ही प्रतिकार कराल, त्या वाढत जातील.

या मनामध्ये, वजाबाकी आणि भागाकार नाही. तुमच्याकडे फक्त गुणाकार आणि बेरीज आहे. मी जर म्हणालो “मला ही भावना नको”, तर ती वाढेल- एकाचे दोन होतील. जर तुम्ही म्हणाला “अरे देवा हे परत येतंय, हे मला नकोय. तर त्याचा शेकड्याने गुणाकार होईल. हाच तुमच्या मनाचा स्वभाव आहे. तुम्ही बळजबरीने काहीही काढू शकत नाही.

तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की विचार आणि भावना या तुमच्यापाशी आधीपासून असलेल्या माहितीची केवळ पुनरावृत्ती आहेत - असं काही जे तुमच्या आठवणीत आहे. एवढंच की ती आठवण जरा दुर्गंधीयुक्त आहे, म्हणून ती येत राहते . तुम्हाला त्या पासून जरा अंतर राखावे लागेल.

समजा तुम्ही विमानतळाकडे जाण्याच्या मार्गावर आहात आणि ट्राफिक जॅम मध्ये अडकले आहात. आता तुम्हाला किती चिंता आणि तणाव जाणवेल! आणि कसेतरी, तुम्ही विमानतळावर पोहोचलात आणि विमानात बसून उड्डाण भरले. तिथून वरून, जेव्हा तुम्ही खाली पाहता, ट्रॅफिक जॅम किती छान दिसते! हे केवळ यामुळे की आता जरासे अंतर आहे. हे तेच ट्रॅफिक आहे पण जरासे अंतर असल्यामुळे, त्याचे काहीच वाटत नाही.

त्याचप्रमाणे तुमच्या भावना आणि विचारांसोबत जराश्या सरावानंतर, तुमच्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांपासून तुम्ही थोडे अंतर निर्माण करू शकता. पण तुम्ही एकेक विचार आणि भावना काढून टाकायचा प्रयत्न केला, तर ते हजार पटीने वाढत जातील.