आध्यात्मिक भेटी

स्वामी गुरुभिक्षा: ते (सदगुरू) माझ्याकडे टक लावून बघत होते. त्यांचे मोठे, खोल, धीरगंभीर आणि असाधारण काळे डोळे गेली दहा मिनिटे माझ्यावर केन्द्रित झालेले होते. “ते मला त्यांच्यासोबत दूर घेऊन जातील का?” – माझ्या कोमल हृदयात एक भयंकर भीती निर्माण झाली, आणि रेल्वेमध्ये माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या आजोबांचे लक्ष माझ्याकडे वेधावे म्हणून मी रडायला लागलो. माझी समजूत काढण्यासाठी जेंव्हा माझे आजोबा खाली वाकले, तेंव्हा पुढचे रेल्वेस्थानक आले आणि हे योगींसारखे दिसणारे गृहस्थ उतरून जाण्यासाठी उभे राहिले. बाहेर पडण्याच्या थोडे आधी, त्यांनी माझ्या कानात मुरुगाचे (शंकराचा दुसरा पुत्र - कार्तिकेय) एक विशिष्ट नाव उच्चारले. मला शांत करण्यासाठी माझे आजोबा आणि इतर प्रवाशांना खूप वेळ लागला. आम्ही जेंव्हा आमच्या स्थानकावर पोहोचलो, तेंव्हा माझे आजोबा मला मुरुगाच्या त्याच नावाच्या मंदिरात घेऊन गेले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी तेंव्हा फक्त पाच वर्षांचा होतो, पण तो चेहरा – त्यांच्या चेहेर्‍यावर असणार्‍या तेजाचे साधर्म सद्गुरू श्री ब्रम्हा यांच्यासारखे होते – आजदेखील माझ्या मनावर स्मृतीत तो चेहेरा असा काही कोरला गेला आहे की जणू काही ही घटना कालच घडली आहे. कदाचित, ही माझ्यामधील एक प्रकारची आध्यात्मिक सुरुवात होती.

swami gurubiksha side profile

मी तीन वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे, आणि मी वीस वर्षांचा असताना माझ्या आजोबांचे निधन झाले. माझ्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात, मी माझ्या कुटुंबाची मालमत्ता आणि इतर आर्थिक प्रकरणे याविषयी सुरू असणार्‍या कायदेशीर खटल्यांमध्ये गुंतलो होतो. माझ्या वयाच्या मानाने मला खूप लवकर समज आली. याच काळात माझी योगी रामसूरतकुमार यांच्याशी भेट झाली. ते खरोखरच एक महान पुरुष होते, आणि त्यांच्या कृपेमुळे मी माझ्या आयुष्यातील अनेक समस्यांचा धैर्याने सामना करू शकलो. माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, मला बांधकाम या माझ्या आवडीच्या व्यवसायात शिरायचे होते. पण योगी राम यांनी असे सुचवले की मी माझ्या कुटुंबाचा सावकारीचा व्यवसायच सुरू ठेवावा. त्यावेळी मला याची अगदी थोडी कल्पना होती की माझ्याकडे असणार्‍या या थोड्याश्या कौशल्याचा उपयोग मला ईशाचे, ज्या समुहाचा मी मे 1992 मध्ये एक भाग झालो, त्यांचे प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार सांभाळताना होणार आहे.

पहिल्या पाच जणांचा ईशा ब्रम्हचारी संघ

sanga of first five

माझ्या किशोर वयामध्ये मी योगाचा खूप मोठा चाहता बनलो आणि केवळ माझ्या योगावरील प्रेमाखातर मी सद्गुरूंच्या वर्गाला उपस्थित राहिलो. परंतु 1992 मधील सम्यामानंतर (सदगुरू मार्गदर्शित ध्यान-धारणा), मला असे वाटू लागले की मी सद्गुरूंना सोडून जाऊ शकत नाही आणि मी त्यांच्या जवळच असणे आवश्यक आहे. मी संपूर्ण तामिळनाडुमध्ये त्यांच्या वर्गांसाठी स्वयंसेवक म्हणून काम पाहायला सुरुवात केली त्याच वर्षी सिंगनलूर येथील त्यांच्या कार्यालयात रुजू झालो. पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरू केलेल्या पाच लोकांमध्ये मी वयाने सर्वात मोठा होतो. आम्ही एका कुटुंबाप्रमाणेच राहिलो आणि भांडलो. सद्गुरू आणि विजी अम्मा (सदगुरुंची पत्नी) कायम आमच्यासाठी भोजन तयार करत असत, आमची भांडणे मिटवत असत, आणि काही वेळा आमचे पालक सुद्धा घेऊ शकणार नाहीत येवढ्या लहान- सहान गरजांची काळजी घेत असत. तो काळ माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ होता.

सद्गुरू कोणत्याही गोष्टीत माझी चेष्टा करण्याची कोणतीही संधी कधीच सोडत नसत. एकदा मी बनवलेल्या काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना, सद्गुरूंना एक चूक आढळून आली. त्यांनी स्वतःच ती चूक दुरुस्त केली आणि त्यांनी पुढील कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला सुरुवात केली. “तुम्ही जसे आम्हा सर्वांना आमच्या चुका दाखवून देता, तशी ही चूक तुम्ही त्याला का दाखवून देत नाही?” असा प्रश्न विजी अम्मा माझ्यासमोर त्यांना गंमतीत विचारला. “मला जर त्याच्या चुका दाखवून द्यायच्या असतील, तर त्याच्याशी बोलून आणि त्याच्या चुका समजावून द्यायला मला संपूर्ण दिवस घालवावा लागेल! सद्गुरू म्हणाले, आणि ते पुन्हा कागदपत्रांवर स्वाक्षरी करू लागले. माझ्याकडे असलेले त्यांचे लक्ष पाहून मला आनंद झाला, पण तरीही माझे गुरु नक्की कोण आहेत, योगी रामसूरतकुमार का सद्गुरू? याबद्दल माझ्या मनात संभ्रम होता. पण लवकरच मला ते स्पष्ट झाले.

एक चमत्कार आणि एक निर्णायक टप्पा

त्यानंतर 1993 मध्ये, मी थोड्या काळासाठी माझ्या स्वतःच्या गावी जाण्याचे योजत होतो. मी निघत होतो तेंव्हा अचानकच सद्गुरू मला म्हणाले, “तुला माझ्याबद्दल विचारणारी दोन लोकं भेटतील. मी बरा आहे आणि मी त्यांच्याविषयी विचारत होतो असे त्यांना सांग.” आणि मी बाहेर पडण्याअगोदर त्यांनी पुन्हा मला त्याची आठवण करून दिली. त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ घ्यावा हे मला माहिती नव्हते, पण जेंव्हा माझ्यासोबत कोणी बोलत असे तेंव्हा मी सावध राहत असे – रेल्वेमध्ये असो, घरी असो, किंवा रास्ते, दुकानं किंवा आणखी कोठे. एक संपूर्ण दिवस कोणीही माझ्याकडे त्यांची चौकशी केल्याशिवायच पार पडला, पण मी मात्र सावध होतो. दुसर्‍या दिवशी मी माझ्या काकांना भेटायला गेलो आणि त्यांनी सर्वात प्रथम मला प्रश्न विचारला, “योगा कसे सुरू आहे? त्यांनी ज्या प्रकारे तो प्रश्न विचारला, त्यानुसार ते सद्गुरूंविषयी बोलत असावेत असे मला वाटले. योगा आणि जग्गी या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे का? मी क्षणभर आश्चर्यचकित झालो, आणि उत्तर दिले, “योगा छान सुरू आहे! स्वाभाविकपणे मी त्यांना असे सांगू शकलो नाही, की “योगाने सुद्धा तुमच्याविषयी चौकशी केली आहे”!

“आणखी एकजण, किंवा कदाचित आणखी दोघेजण राहिले”, असा विचार करतच मी उरलेले पुढचे दोन दिवस घरात घालवले. काहीही घडले नाही. कोबतुरला परत जात असताना, मी मदुराईमध्ये माझ्या चुलत बहिणीच्या घरी थांबलो. “जिग्गी कसे आहेत? माझ्या चुलत बहिणीच्या नवर्‍याने विचारले. “जग्गी बरे आहेत,” मी ताबडतोब उत्तर दिले, “आणि त्यांनी तुमच्याविषयी पण चौकशी केली आहे,” मी भर घातली. सद्गुरूंनी त्यांच्याविषयी चौकशी केली आहे हे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना येवढे अस्वस्थ झालेले पाहून मला मनापासून हसायला आले. ठीक आहे, एक योगाबद्दल विचारात होते, एकांनी जिग्गीची चौकशी केली, पण कोणी जग्गीची मात्र चौकशी केली नाही – सिंगनल्लुरला पोहोचेपर्यन्त मी विचार करत होतो.

मी ही गोष्ट माझ्याजवळ माझ्या फार काळ ठेऊ शकलो नाही आणि मी विज्जी अम्माना सर्व गोष्ट सांगून टाकली. खरोखरच काय घडले हे ऐकून त्यांना देखील आश्चर्य वाटले, की सद्गुरू असे का म्हणाले असतील. त्यादिवशी नंतर, मी सद्गुरूंच्या वर्गात स्वयंसेवक म्हणून काम करायला गेलो. ज्या क्षणी आम्हाला थोडा वेळ एकत्र मिळाला तेंव्हा सद्गुरू माझ्या अंगावर ओरडले, “मी तुला सांगीतलेली एक गोष्ट सुद्धा तुला व्यवस्थितपणे करता येत नाही,” मी विचारात पडलो, “कोणती गोष्ट मी व्यवस्थितपणे केली नाही? पण लगेचच ते हसायला लागले आणि म्हणाले, “विज्जीने मला सर्व काही सांगितले आहे.”

आजपर्यंत ते सर्व काय होते हे मला माहिती नाही, पण माझ्या सोप्या मनाला ते एखाद्या चमत्कारासारखे वाटले की ते पुढे घडणाऱ्या गोष्टी अगोदरच पाहू शकत, आणि तेंव्हा मला समजले की सद्गुरू हेच माझे गुरु आहेत. माझ्या सद्गुरूंबद्दल असलेल्या वचनबद्धतेसाठी हा एक निर्णायक मुद्दा होता.

सद्गुरुंची नम्रता आणि वचनबद्धता

फेब्रुवारी 1993 मध्ये, सद्गुरूंनी आश्रमाचा व्यवहार पक्का केला होता. आश्रमाचे बांधकाम करण्यासाठी देणग्या मागायला ते तमिळनाडूमधील अनेक साधकांच्या घरी गेले. एकदा या कामासाठी सद्गुरूंसोबत करूरला जाण्याची संधी मला मिळाली. सद्गुरूंना देणग्या मागाव्या लागत आहेत हे पाहणे मला सहन होत नव्हते. अनेकांनी खूप काही दिले, तर काहींनी थोडेफार दिले, पण सद्गुरू प्रत्येकासमोर तेवढ्याच नम्रतेने नतमस्तक होत होते.

संपूर्ण अनुभवामध्ये प्रत्यक्ष रहाणे

12 जुलै, 1994 या दिवशी, आम्ही व्होलनेस प्रोग्रॅमसाठी सद्गुरूंच्या कारच्या मागे आश्रमाच्या दिशेने चाललो होतो. येवढा प्रचंड पाऊस पडत होता, की इरट्टूपाल्यम ओढा ओसंडून वाहू लागला आणि आम्हा कोणालाही तो ओढा ओलांडायला जमले नाही. आम्ही अलंदुराईमधील काही स्वयंसेवकांसोबत तेथेच थांबलो, आणि व्होलनेस प्रोग्रॅमसाठी एक दिवस पुढे ढकलायला लागला. ईशाच्या इतिहासात कोणताही कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला गेल्याची ही पहिलीच आणि एकमेव वेळ होती.

माझ्यासाठी, व्होलनेस प्रोग्रॅम म्हणजे केवळ मोठा आध्यात्मिक अनुभवच नव्हता (जो अनेकांसाठी असतो). या कार्यक्रमामुळे मी माझ्या स्वतःमध्येच दुसर्‍या पातळीवर पोहोचलो – जगण्याचा एक तीव्र मार्ग. पहिल्या तीस दिवसांनंतर, सद्गुरूंनी व्होलनेस प्रोग्रॅमच्या सहभागी लोकांना दोन गटांमध्ये विभागले. आमच्यापैकी सातजण “लीव्ह इन” गटात होते, आणि इतर सर्व “शिकवणी” गटात होते, ज्यांना ईशा योग प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात येत होते. सद्गुरू त्यांचा बहुतांश वेळ “शिकवणी” गटात व्यतीत करीत असत, आणि आम्ही सातजण केवळ साधना, बागकाम, आणि इतर लहानसहान कामे करत होतो. काही काळानंतर, आम्हाला वगळले जात आहे अशी आमची भावना होऊ लागली, आणि सद्गुरू आमच्यासोबत वेळ घालवत नाहीत म्हणून आम्हाला अतिशय वाईट वाटू लागले. “सद्गुरू, आमच्यासोबत सुद्धा थोडा वेळ घालावा,” अशी विनंती अगदी रडवेल्या स्वरात एके दिवशी मी त्यांना केली.

सद्गुरुंनी मोठ्या प्रेमाने माझ्याकडे पाहिले,आणि दुसर्‍या दिवशी आम्हाला भेटायला आले. ते एका वाकलेल्या झाडावर बसले आणि आम्ही सातजण त्यांच्या भोवती बसलो. “तुम्ही जे काही करत आहात ते प्रेमाने करत रहा. अगदी तुम्ही गवत काढत असाल, तरी ते सुद्धा प्रेमाने करा, आणि तुमची साधना आणि ज्ञान याची काळजी मी घेईन.” असे सद्गुरू आम्हाला त्या भेटीत म्हणाले. आम्ही त्यांच्याकडून मिळवलेले ज्ञानाचे हे पहिले वचन होते!

व्होलनेस प्रोग्रॅममध्ये एकदा, सद्गुरूंनी सहभागी व्यक्तींना भविष्यात आश्रमात वास्तव्य करणार्‍या लोकांनी पाळण्यासाठी आवश्यक नियमांवर चर्चा करायला सांगितले. झपाट्याने वाढत जाणार्‍या या नियमांच्या यादीने मी बुचकळ्यात पडलो आणि सावध झालो. त्याने मला संपूर्णपणे घाबरवून टाकले. त्या दिवशी संध्याकाळी मी सद्गुरुंसोबत त्यांच्या खोलीत गेलो. तेथे खूप अंधार होता आणि माला आठवते की त्यांनी हातात एक टॉर्च घेतलेला होता. आम्ही त्यांच्या दरवाजात थांबलो. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मी उत्स्फूर्तपणे त्यांना संगितले, “जग्गी, मला कोणतेही नियम नको आहेत.” त्यांनी माझ्या चेहेर्‍यावर टॉर्चचा प्रकाश पाडला. त्यांना नक्कीच माझ्या डोळ्यात अश्रु दिसले असावेत. ते हळुवारपणे, अतिशय हळुवारपणे म्हणाले, “ठीक आहे, तुझ्यासाठी कोणतेही नियम नाहीत.” आज जरी आश्रमाचे सर्व नियम मी पाळत असलो, तरी त्याक्षणी माझ्या एखाद्या लहान मुलासारख्या प्रतिक्रियेला सद्गुरूंनी ज्या प्रकारे हाताळले त्यामुळे तो क्षण माझ्यासाठी संस्मरणीय ठरला आहे.

पूर्णत्व कार्यक्रम पार पडल्यानंतर लवकरच, आम्ही सर्वांनी ध्यानलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सद्गुरूंसोबत स्वतःला झोकून दिले. ते दिवस अतिशय कठोर परिश्रमाचे आणि कठोर साधनेचे होते. मी कायदेशीर आणि आर्थिक बाबींची काळजी घेतली, आणि ध्यान्लींगाचा घुमट व परिक्रमेसाठी आवश्यक असणार्‍या विविध वस्तु शोधून त्या विकत घेण्याच्या प्रक्रियेत मी सहभागी होतो. त्यानंतर 1996 मधील महाशिवरात्रीमध्ये मला ब्रम्हचर्याची दीक्षा देण्यात आली – ही ब्रम्हचाऱ्यांची दुसरी तुकडी होती.

महासमाधी म्हणजे काय हे मला खरोखरच ठाऊक होते का?

जानेवारी 1997 मध्ये, विज्जी अम्मांची महासमाधी हा आमच्यावर झालेला मोठा आघात होता. विशेषतः मी अतिशय दुखीः झालो. त्याचे एक कारण म्हणजे माझे तिच्यासोबत अतिशय सुरेख असे नाते होते – ती माझी विश्वासू सहकारी होती. ज्या गोष्टी मी सद्गुरुंसोबत बोलू शकत नसे, त्या मी तिच्याशी बोलत असे. आणि दुसरे कारण म्हणजे, हे असे घडणार आहे याची पूर्वकल्पना मला विज्जी अम्मा आणि सद्गुरू यांनी अगोदरच देऊन ठेवलेली असून देखील, असे खरोखरच घडेल यावर माझा कधीही विश्वास नव्हता. मला अतिशय मूर्ख असल्यासारखे वाटले.

ऑगस्ट 1996 मध्ये पहिल्यांदा विज्जी अम्मानी सद्गुरूंना तिची अशी इच्छा असल्याचे सांगत असताना मी ऐकले. आम्ही ध्यान यात्रेनंतर दिल्लीहून रेल्वेने कोयंबतूरला येत होतो. मला वाटले, त्यांची नेहेमीप्रमाणे चेष्टामस्करी सुरू आहे. दुसर्‍या वेळी, सद्गुरूंनी मला चहा प्यायच्या ठिकाणी थांबविले आणि सांगितले की विज्जीना महासमाधी घ्यायची आहे, आणि तिला हे पाऊल उचलण्यापासून कसे परावृत्त करावे हे त्यांना समजत नाहीये. आणि तरीसुद्धा, मी ते फारसे गांभीर्याने घेतले नाही.

महासमाधीच्या एक आठवडा आधी, सद्गुरूंनी मला काही कामानिमित्त मैसूरला यायला सांगितले. त्या वेळी विज्जी अम्मा मला काहीतरी वेगळ्याच दिसल्या. “विज्जी, तू खूप वेगळी दिसते आहेस. काय चालले आहे?” मी तिला विचारले. “पहा, याला सुद्धा वाटते आहे की मी वेगळी दिसते आहे,” असे तिने ताबडतोब सदगुरूंना वळून सांगितले. “त्याचे कारण म्हणजे ती लवकरच महासमाधी घेणार आहे” असे उत्तर सद्गुरूंनी मला दिले. तरीसुद्धा – तरीसुद्धा खरोखरच तसे काही घडेल असे मला वाटले नाही. कारण महासमाधी म्हणजे काय हे मला माहिती होते आणि मी शंका व्यक्त केली, की “विज्जी अम्मा आध्यात्मिक साधनेच्या या सर्वोच्च स्थितीपर्यन्त कशी पोहोचू शकेल?”

म्हणून मी जेंव्हा त्या गेल्याचे ऐकले, तेंव्हा मला माझ्या अंगावर कोणीतरी बॉम्ब टाकला आहे की काय असेच वाटले. माझी झालेली हानी शब्दात व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे योग्य शब्दच उरले नव्हते, पण माझ्या आतमध्ये कोठेतरी, मला तिच्याबद्दल थोडीफार आसुया सुद्धा वाटत होती.

तीव्रतेची आणखी एक झेप

माझी हानी शब्दात सांगता येण्यासारखी नव्हती, तरीसुद्धा दुखः करत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. ध्यानलिंग प्रतिष्ठापनेच्या कामात आम्ही सर्वजण व्यस्त होतो. ब्रह्मचारी म्हणून माझ्या आयुष्यातील तो सर्वात खडतर काळ होता. विज्जी अम्मांच्या महासमाधीनंतर चार महिन्यांनी सद्गुरूंनी मला आंध्र प्रदेश येथील कडप्पा येथे असलेल्या मंदिरात जाण्यासाठि 400 साधकांची व्यवस्था करायला सांगितले. आम्ही कडप्पाला जाण्यापूर्वी, एका साधकाने त्या मंदिरातील लिंगाला सोन्याचे कवच करण्यासाठी तिच्याकडील सोने दान केले. सोंनाराकडून ते कवच एका लहानशा मिरवणुकीमधून आश्रमात आणण्यात आले, आणि त्यानंतर ते कडप्पा येथे लिंग सुशोभित करण्यासाठी घेऊन जाण्यात आले. कडप्पा येथे प्रथमच सद्गुरू त्यांच्या गुरुंविषयी बोलले.

त्यांनी त्या रात्री सर्व ब्रह्मचार्यांना त्याच मंटपात एक शक्तीशाली प्रक्रिया शिकवली, ज्या मंटपात ते ध्यानलिंगाचा आराखडा काढण्यासाठी त्यांच्या मागील जन्मात बसले होते. ही प्रक्रिया अतिशय शक्तीशाली होती, माझा हात विचित्र प्रकारे वर खाली होऊ लागला, आणि मी संपूर्ण रात्रभर, हत्तींच्या चित्कारासारखे, विचित्र, मोठमोठे आवाज करत होतो. पुढील काही महीने कोणत्याही शक्तीशाली परिस्थितीत, मी या अवस्थेतून जात होतो. आणि माझ्यामधील तीव्रतेने कडप्पा मंदीराच्या त्या भेटीनंतर आणखी एक मोठी झेप घेतली

“ध्यानलिंग तुम्हाला काय सांगतो आहे?”

sadhguru-dhyanalinga-pic

24 जुन 1999 या दिवशी ध्यानलिंगाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.

2000 मध्ये केंव्हातरी, मी पहिल्यांदा लिंग अर्पणम केले. एके दिवशी मी जेंव्हा टी ब्लॉकमध्ये फुले खुडत होतो, तेंव्हा माझी सद्गुरुंसोबत भेट झाली. “तर मग ध्यानलिंग तुम्हाला काय सांगतो आहे?” असे सद्गुरूंनी विचारले. मी पुन्हा एकदा संभ्रमात पडलो, आणि काय उत्तर द्यावे हे न समजून, मी पुटपुटलो,“काहीच नाही! नंतर मला ते काय बोलत होते त्याचे महत्व समजले. याआधी, मी नक्कीच मंदिरात मनोभावे पुजा करत होतो, पण माझ्यासाठी ते एक मंदिरच होते – सद्गुरूंनी प्रतिष्ठापना केलेले एक मंदिर. पण सद्गुरुंनी मला हा प्रश्न विचारल्यानंतर, माझ्या मनात हे स्पष्ट झाले की ध्यानलिंग म्हणजे सद्गुरू; आणि सद्गुरू म्हणजेच ध्यानलिंग. ते दोघेही मला एकसारखेच भासू लागले!

माझ्या सुरुवातीच्या प्रवासात, माझी वचनबद्धता केवळ सद्गुरुंसोबत होती. मी येथे असण्याचे कारण आणि मी ब्रम्हचार्य घेण्याचे कारण म्हणजे मी सद्गुरुंशिवाय राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हतो. परंतु माझ्या लिंग अर्पण सोहोळ्यानंतर ध्यानलिंग हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे बनले. अगदी आजसुद्धा मी बाहेरील लोकांशी व्यवहार करून थकून जातो, विशेषतः आर्थिक बाबी, मी ध्यानलिंगासमोर येऊन दोन तास बसून राहतो आणि माझे मन शांत होते.

आध्यात्मिक परिपक्वतेच्या दिशेने प्रवास

sadhguru offering food to sw gurubiksha

मी सन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर एक साधक म्हणून माझे आयुष्य अतिशय परिपक्व झाले. 2003 मध्ये, ब्रम्हचारी संमेलनादरम्यान, सद्गुरुंनी आमच्यापैकी दहा जणांना सन्यासाची दीक्षा दिलीआणि आम्हाला आज ज्या नावांनी ओळखले जाते ती नावे दिली. त्यावेळी याचा अर्थ काय हे मला फारसे समजले नव्हते, पण लवकरच माझ्या असे लक्षात आले की माझ्यामध्ये एक मूलभूत बदल घडून आलेला आहे. माझ्यामधील अनेक अनिवार्यता आपोपाप निघून गेल्या, आणि मी माझ्या मार्गावर संपूर्णतः प्रस्थापित झालो. मला स्वतःमध्ये मी मुक्त झाल्याची जाणीव झाली, पण मला हे सुद्धा समजले की मी मुक्त झालेलो नाही.

शेवट करण्याअगोदर, मला हे सांगावेसे वाटते, की आश्रमातील लोकं खरोखरच अतिशय चांगली आहेत. मी जेंव्हा आश्रमाबाहेरील लोकांना भेटतो, तेंव्हा मला ते अनेक क्षुल्लक मार्गांनी पैसे, नातेसंबंध, मान, घरे, गाड्या, इत्यादि. गोष्टींमध्ये अडकलेले दिसतात, पण इथे मात्र तसे नाही. अजूनही निसर्गाने आपल्यावर लादलेल्या मर्यादांमध्ये आम्ही जरी संघर्ष करत असलो, तरी आपण जाणीवपूर्वक किंवा जाणतेपणे अनेक अनावश्यक बंध मोडून पडलेले आहेत. अशा लोकांमध्ये मला राहायला मिळाले हा माझ्यासाठी एक आशीर्वादच आहे असे मी समजतो.