सद्गुरु:अनेक लोकं नेहेमी भाग्यवान ग्रह, भाग्यवान तारे, भाग्यवान आकडे – यासारख्या अनेक गोष्टींच्या शोधात असतात. या शोधण्याच्या आणि गोष्टी घडून येण्याची वाट पाहण्याच्या प्रक्रियेत, ते स्वतः अगदी सहजगत्या निर्माण करू शकले असते , अशा अनेक गोष्टी ते पुर्णपणे गमावून बसतात. आयुष्याच्या प्रत्येक पैलूमधे, ते घडवून आणणारे तुम्हीच असले पाहिजे. तुमची शांतता आणि तुमची अशांतता ही तुमची जबाबदारी आहे. तुमचा आनंद आणि तुमचे दुखः ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्यामधे असलेला देव आणि राक्षस ही तुमची जबाबदारी आहे. जेंव्हा तुम्ही योगायोगाने जीवन जगता, तेंव्हा तुम्ही भीती आणि चिंतेत जीवन जगता. जेंव्हा तुम्ही हेतुपूर्ण आणि सक्षम जीवन जगता, तेंव्हा काय घडते आहे किंवा काय घडत नाहीये याने काही फरक पडत नाही – किमान तुमच्यात जे काही घडते आहे ते तुमच्या नियंत्रणात असते. तसे जीवन अधिक स्थिर जीवन असते.

तुमची शांतता आणि तुमची अशांतता ही तुमची जबाबदारी आहे. तुमचा आनंद आणि तुमचे दुखः ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्यामधे असलेला देव आणि राक्षस ही तुमची जबाबदारी आहे.

काही वर्षांपूर्वी, माझ्या महितीतील एक महिला एका महत्वाच्या व्यावसायिक भेटीची तयारी करत होती. तामिळनाडुमधे अनेक लोकांची अशी श्रद्धा आहे की जेंव्हा तुम्ही सकाळी गाडी सुरू करता, तेंव्हा तुम्ही ती रिव्हर्स गियरमधे सुरू करू नये. नाहीतर तुमचे संपूर्ण आयुष्यच उलट्या दिशेने जाईल. म्हणून सकाळी ते कायमच थोडे पुढच्या दिशेला सरकतात. तर घराबाहेर पडण्यासाठी गाडी मागे घेण्याआधी तिला तिची गाडी थोडी पुढे घ्यायची होती. अतिशय चिंतातुर होऊन आणि घाबरून जाऊन, काही इंच गाडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात, तिचा पाय क्लचवरुन निसटला आणि भिंतीला धडक मारून गाडी थेट बेडरुममधे शिरली!

योग्य प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यासाठी आवश्यक ते आंतरिक आणि बाह्य वातावरण आपल्याभोवती निर्माण करण्याऐवजी, तसे घडवून आणण्यासाठी आपण कायमच भलत्याच गोष्टीकडे पहात असतो. तुमचा आजचा आंतरिक अनुभव कसा होता हे नक्कीच तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणत्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवता त्यावर ते अवलंबून नाही. हे फक्त तुम्ही तुमच्या भोवतालच्या जीवनाकडे किती संवेदनशीलतेने , हुशारीने आणि किती जाणीवपूर्वक पाहता यावर अवलंबून आहे.

तर मग या कशातच काही सत्य नाही का? तसे असणे गरजेचे नाही. त्यापैकी बहुतांश गोष्टींमागे एक वैज्ञानिक आधार आहे पण काळाच्या ओघात त्याचा विनाश झालेला आहे. पिढ्यानपिढ्या विज्ञानाने त्याचा मूळ आकार गमावला आहे आणि त्याने दुसरेच स्वरूप धारण केले आहे. त्या व्यतिरिक्त, आज, राजकीय आणि इतर प्रकारच्या वर्चस्वामुळे आपण या निष्कर्षापर्यंत पोचलो आहोत की एखादी गोष्ट पश्चिमेकडून आली असेल तर ते विज्ञान आहे, जर ती पूर्वेकडून आली असेल तर ती अंधश्रद्धा आहे.

 

अगदी तुम्ही बसावे कसे, उभे कसे राहावे आणि खावे कसे इथपासून प्रत्येक गोष्ट – मानवी कल्याणसाठी सर्वोत्तम काय आहे यानुसार संरचित करण्यात आली होती.

या संस्कृतीत उल्लेखल्या गेलेल्या अनेक गोष्टींचा शोध , संशोधनावर अब्जावधी डॉलर्सचा खर्च करून आज पुन्हा एकदा लावला जात आहे आणि त्याला मानवी स्वभावाविषयी अतिशय “महान” संशोधन असे म्हटले जात आहे. आपल्याला या गोष्टी नेहेमीच ठाऊक होत्या कारण ही संस्कृती जगण्याच्या सक्तीतून निर्माण झालेली नाही. ही एक अशी संस्कृती आहे जी संत आणि ऋषिमुनींनी जाणीवपूर्वक विकसित केलेली आहे. त्यामध्ये प्रचंड वैज्ञानिक मूल्य आहेत. अगदी तुम्ही बसावे कसे, उभे कसे राहावे आणि खावे कसे इथपासून प्रत्येक गोष्ट – मानवी कल्याणासाठी सर्वोत्तम काय आहे यानुसार संरचित करण्यात आली होती. दुर्दैवाने आपण आज पहात असलेली आध्यात्मिक संस्कृती अनेक आक्रमणांनी आणि अनेक शतके अस्तीत्वात असलेल्या गरिबीमुळे मोडकळीस आली आहे. तरीसुद्धा आध्यात्मिक प्रक्रियेची मूलभूत नीती नष्ट होत नाही किंवा नष्टही केली जाऊ शकत नाही. या प्राचीन परंपरेचे फायदे संपूर्णतः घेण्याची वेळ आता आलेली आहे.