प्रश्न: नमस्कार! माझी स्वप्न मोठी आहेत, आणि ती साकार होतील अशी आशा आहे. पण समाजात मी इतरांशी सहजासहजी मिसळत नाही आणि जगाला सामोरं जायची मला भीती वाटते. तर माझं शिक्षण संपलं की मी न घाबरता माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कसा प्रयत्नशील राहू शकेन ?

 सदगुरू: लोक जेव्हा झोपी जातात तेव्हा त्यांना स्वप्नं पडतात. मी तुम्हाला म्हणतोय, काही काळासाठी तुमच्या स्वप्नांना झोपी घाला. आत्ता सध्या कुठलंच स्वप्न पाहू नका, आणि तुम्ही उद्या जगात काय व्हाल हे आत्ताच निश्चित करू नका, कारण अजून ती वेळ आली नाही.                                                                                                                                             

तुमच्या स्वप्नांना थोडा वेळ झोपी घाला कारण स्वप्नं ही आयुष्याच्या भूतकाळातील अनुभवातून निर्माण होतात.

पुढच्या तीन ते पाच वर्षांत तुम्ही एक पूर्णतः वेगळीच व्यक्ती झालेलेअसाल. खरं पाहता, आजच्या दिवसापासून उद्यापर्यंतसुद्धा बदल होत असतो. जरी हे तुमच्या तितकंसं लक्षात आलंनाही, तरी  तुमच्यात काहीतरी बदल होत असतो. म्हणून तुम्ही आजच हा विचार करता कामा नाही, की  “मी जगात काय करावं?” कारण तसं करून, तुम्ही फक्त एक अगदी छोटं आणि संकुचित स्वप्न रंगवणार. आत्ता सध्या, तुमचं काम हे  शक्य तितक्या जास्त गोष्टी आत्मसात करणं आहे.  एक परिपूर्ण क्षमतांचा माणूस म्हणून तुम्ही बहरलं पाहिजे – शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक स्तरावर.सर्व स्तरांवर, शक्य तितकं तुम्ही पूर्णतः स्वतःला विकसित केलं पाहिजे. 

स्पर्धेची चढाओढ

खरं पाहता, एका प्रकारे, एक स्वप्नं किंवा एक महत्वाकांक्षा म्हणजे तुम्ही एक प्रकारच्या शर्यतीचा विचार करत आहात. आजकाल लोक याला रॅटरेस म्हणतात. जर तुम्ही या रॅटरेसमध्ये उतरलात, तर हे केवळ; कोण कुणापेक्षा अधिक श्रेष्ठ, एवढ्याबद्दलच असतं. या रॅटरेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः एक उंदीर असलं पाहिजे. हे म्हणजे उत्क्रांतीच्या प्रक्रीयेच्या उलट दिशेनं जाणारं पाउल ठरेल. ही रेस जरी तुम्ही जिंकलात, तरी तुम्ही फक्त एक उत्तम रॅट किंवा उंदीर व्हाल, पण तरही एक उंदीरच ना. म्हणून, “मी कुठे असेन, इतर कोणापेक्षा मी किती पुढे किंवा किती मागे असेन?” या चौकटीतून विचार करायचं सोडून द्या. हा काळ,  शक्य तितकं जास्त आत्मसात करण्याचा आहे.  ही वेळ झाडावरचे आंबे तोडण्याची नाहीये. ही वेळ फुलं वेगळी करून फक्त त्यांना वाढू देण्याची आहे. 

जर तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल, तर ती केवळ तुमची तशी इच्छा आहे म्हणून जिंकली जाणार नाही. त्यासाठी तुम्ही एक योग्य आणि समर्थ वाहन निर्माण केलं पाहिजे. तुमच्याजवळ आहे मारुती-800, पण तुम्ही विचार करताय फॉर्म्यूला वन रेस जिंकायचा. हवी तितकी स्वप्नं पहा, जणू फॉर्म्यूला वन चा लुईस हॅमिल्टन तुम्हाला ओवरटेक करायचा प्रयत्न  करतोय, पण तुम्ही तुमच्या मारुती-800 ने त्याच्या पुढे निघून गेलात! अशी स्वप्नं तुम्ही पाहू शकता, पण जर तुम्ही फॉर्म्यूला वन च्या ट्रॅकवर जर जाऊन असं काही केलंत, तर तुमच्या मारुती कारची चारही चाकं चार दिशेला उडून जातील. 

Meme about Rat Race

 

तर शर्यत जिंकायचा प्रयत्न नका करू. फक्त एक उत्तम वाहन तयार करा – ही सगळ्यांत महत्वाची गोष्ट. शर्यत जिंकायचा विचार करणं म्हणजे तुम्ही मागे वळून बघताय,”कुणीतरी माझ्या मागे आहे.” जर तुमच्या आजूबाजूला मूर्ख लोकं असतील आणि तुम्ही शर्यत जिंकत असाल म्हणजे तुम्ही त्यांतल्या त्यांत चांगल्या प्रतीचे मूर्ख आहात. तर असा विचार कधीच करू नका. इतर कुणापेक्षा श्रेष्ठ होण्याच्या या इच्छेनं संपूर्ण मानवजातीला चुकीच्या दिशेला नेलंय. यानं तुम्ही सतत एका आंतरीक कलहाच्या स्थितीत रहाल. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे, जर दुसऱ्याच्या अपयशानं तुम्हाला आनंद मिळत असेल, तर याला एक आजार म्हणावं लागेल. 

स्वप्नांच्या पलीकडे

तर जगात तुम्ही काय केलं पाहिजे? ज्याची अगदी नितांत गरज आहे,तुम्ही ते केलं पाहिजे, तुमच्या डोक्यात येणाऱ्या नवनवीन कल्पना नव्हे. कारण तुमच्या डोक्यातल्या कल्पना कदाचित वास्तवातल्या जगासाठी काहीच उपयोगाच्या नसतील. तर अश्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे? आधीच पुष्कळ लोकांनी त्यांच्या कल्पनांनुसार अनेक गोष्टी करून या जगाचा अनेक प्रकारे नाश केलाय. जर आपण जे गरजेचं आहे ते आनंदानं करू शकलो, तर आपल्याल्या दिसेल की लोकं एकत्र येऊन अश्या कृतीला आधार देतील – आणि मग अनेक गोष्टी घडून येतील. 

म्हणून तुमच्या स्वप्नांना थोडा वेळ झोपी घाला कारण स्वप्नं ही आयुष्याच्या भूतकाळातील अनुभवातून निर्माण होतात.  पण आपलं भविष्य हे भूतकाळाशी कुठल्याच प्रकारे बांधलेलं असता कामा नये. नाहीतर आपण भूतकाळच रिसायकल करून त्यालाच आपलं भविष्य धरून चालणार. बहुतेक लोकांची भविष्याबद्दलची कल्पना म्हणजे, भूतकाळाचा एक तुकडा घ्यायचा, त्याला थोडा मेकअप लावायचा आणि याच किंचित सुधारित आवृत्तीला भविष्य मानायचं. 

मला तुमची सगळी स्वप्नं नष्ट करायची आहेत. होऊ द्या त्यांना नष्ट, जेणेकरून तुम्ही तुमच्या संपूर्ण क्षमतांपर्यंत बहरू शकाल.

भविष्य म्हणजे पूर्णतः नवं असं काहीतरी घडलं पाहिजे. ज्याची तुम्हाला स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकला नाहीत,असं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडावं – हाच माझा आशीर्वाद आहे  तुम्हाला. ज्याची तुम्ही कल्पना करू शकला नाही, ते घडावं. ज्याचं तुम्ही स्वप्नं पाहिली तेच जर घडलं, तर त्याचा काय उपयोग? तुम्ही त्याचंच स्वप्न पाहू शकता जे तुम्हाला माहित आहे. जर फक्त तुम्हाला माहित असलेलंच घडत राहिलं, तर हे एक दरिद्री आयुष्य ठरेल. तर असं काहीतर घडू द्या ज्याचं स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही- तरच जीवनात मजा आहे. 

मला तुमची सगळी स्वप्नं नष्ट करायची आहेत. होऊ द्या त्यांना नष्ट, जेणेकरून तुम्ही तुमच्या संपूर्ण क्षमतांपर्यंत बहरू शकाल. 

Editor's Note: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image