प्र: कोणीतरी म्हणाले आहे की मूल जेंव्हा जन्माला येते तेंव्हा ते सोबत सूचना पुस्तिका घेऊन येत नाही. जर, समजा, जन्मापासून मृत्यू पर्यंत मनुष्याने कसे जगावे यावर एखादी मार्गदर्शिका लिहायची असेल, तर ती कशी असावी?


सदगुरू: ते पुस्तक कोरे असेल तर फारच छान. तुम्ही आता प्रत्येक गोष्टीचे रूपांतर यंत्रात करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला योग्य वाटेल अशा पद्धतीने त्याला “कार्यरत” ठेवण्यापेक्षासुद्धा मानवी जीवनाला इतर काही परिमाणे आहेत. मानव कोणासाठीही उपयोगी असायची काहीही आवश्यकता नाही. हे म्हणजे केवळ गाडीला जुंपलेल्या बैलांनी जंगलात विहार करणार्‍या हरीणांकडे पाहून, “अरेरे, यांचे आयुष्य अगदी वाया चालले आहे, यांचा कोणालाच काहीही उपयोग नाही. हे अजिबात चांगले नाही” असा विचार करण्यासारखे आहे. पण हरीण आनंदात आहे. तुम्ही मात्र गाडीला जुंपले गेलेले आहात, तुमच्यात काहीही आनंद नाही.

 

आपण जर केवळ उपयोगी पडण्याचा प्रयत्न करून आनंदी नसलेले मनुष्य बनलात, तर जीवनाचे सर्व उद्देश निरर्थक बनतात. आपण जे काही करत आहात त्याला काहीच अर्थ राहणार नाही. समाजात, कदाचित तुम्ही केलेल्या कार्याचा गौरव म्हणून तुम्हाला एखादे पारितोषिक देऊन तुमचा सन्मान केला जाईल, परंतु जीवनात त्याला काहीही अर्थ नसेल.

मार्गदर्शक पुस्तिका टाकून द्या!

Sadhguru playing with a girl child | A Child Needs No Instruction Manual


इतरांच्या हुशारीतून जीवनाकडे पाहण्याचे थांबवा. तुमच्या आपल्या जीवनाकडे अधिक हुशारीने पाहायला शिका. इतर प्रभाव दूर केले, तर प्रत्येकाकडे जीवनाकडे लक्षपूर्वक पाहण्याची हुशारी असते. समस्या ही आहे, की भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील नायकांचा तुमच्यावर खूपच प्रभाव पडलेला आहे. सर्वात शेवटी, तुमची मानसिकता फक्त चाहत्यांसारखीच राहते. चाहत्यांची मानसिकता अतिशय
प्राथमिक स्वरूपाची असते.

कोणतेही सर्वसामान्य बालक एक संपूर्ण स्वरूप घेऊन येते. तुम्ही त्याला किंवा तिला फक्त त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यन्त पोहोचवू शकता. तुम्ही त्याला इतर वेगळे काही बनवू शकत नाही. जर तुमचे आदर्श झाड नारळाचे झाड असेल, आणि तुमच्या बागेत आंब्याचे झाड उगवले, तर तुम्ही काय कराल? ते नारळाच्या झाडासारखे दिसत नाही म्हणून तुम्ही सर्व फांद्या कापून काढून फक्त एकच फांदी शिल्लक ठेवाल. ते एक अतिशय केविलवाणे आंब्याचे झाड असेल. तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता ती म्हणजे मुलांचे त्यांची संपूर्ण बुद्धिमत्ता, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यापर्यन्त संगोपन करणे. पण असे तेंव्हाच घडेल जेंव्हा तुम्ही त्यांचे सगोपन कराल, आणि त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीशी छेदछाड करणार नाही. 

पोषक वातावरण निर्माण करणे

Sadhguru with Samskriti student

 

मुलं तुमच्यामधून आलेली नाहीत, ती तुमच्या द्वारे आलेली आहेत. ती तुमची आहेत असा विचार कधीही करू नका. ती तुमच्या द्वारे आलेली आहेत हा तुमचा सन्मान आहे. त्यांना प्रेमळ आणि पोषक वातावरण निर्माण करून देणे हेच केवळ तुमचे काम आहे. तुमच्या मुलांवर तुमचे विचार आणि भावना, तुमचे तत्वज्ञान, तुमच्या श्रद्धा आणि इतर काहीही गोष्टी लादण्याचा प्रयत्न करू नका. मार्ग शोधण्यासाठी त्यांच्याकडे त्यांची स्वतःची पुरेशी बुद्धिमत्ता आहे. त्यांची बुद्धिमत्ता पुरेशी वाढण्यासाठी तुम्ही जर आवश्यक ते पोषक वातावरण निर्माण केलेत, तर त्याना ठाऊक असलेल्या मार्गाने ती हाताळू शकतील.

“प्रत्येक गोष्ट अचूक होईल का?’ ती कदाचित अचूक होईल, कदाचित चुकीची सुद्धा होईल – तो मुद्दाच नाहीये. पण ते चुकीचे होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. मूल जेंव्हा त्याची बुद्धिमत्ता वापरुन मोठे होते, त्याने एक चूक केली तर ती दुरुस्त करण्याची बुद्धी त्याच्याकडे असते. जोपर्यंत ते त्यांच्या कल्याणसाठी काम करत आहेत आणि ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यासोबत काही नकारात्मक गोष्ट करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही वाट पाहणे आवश्यक आहे. मूल एकवीस वर्षे पूर्ण वयाचे होईपर्यंत तुम्ही अजून गर्भवती आहात असाच विचार केला पाहिजे. फक्त वाट पहा. मूल जेंव्हा तुमच्या पोटात होते, तेंव्हा तुम्ही काही केले नाहीत, होय ना? केवळ स्वतःचे व्यवस्थित संगोपन केलेत आणि
वाट पहिलीत. अगदी तसेच – त्यांना वातावरण तयार करून द्या आणि वाट पहा.

Editor’s Note: Download the e-book "Inspire Your Child, Inspire the World" for more of Sadhguru’s wisdom on parenting in . Enter ‘0’ in the price field for a free download.