अध्यात्माचा मार्ग जे स्वीकारतात, त्यांना रोज पहाटे पाच वाजता जेंव्हा उठावं लागतं, तेंव्हा हा प्रश्न पडतो, 'मी हे सगळं नेमकं कशासाठी करतो आहे? सगळं जग तर आठ वाजता उठतं. मी का उठावं पाच वाजता? सगळेजण दिवसातून पाच वेळा खातात. मी का फक्त दोनदा खायचं? प्रत्येकजण किती आनंदात आहे, मग, मी का असं रहावं? 

हा प्रश्न सतत तुमच्या मनात येणार, "मी हे का करायचं?" आता नेहमीच्या पठडीतलं उत्तर द्यायचं तर असं म्हणता येईल की, "तुम्हाला स्वतःचा आविष्कार झाला पाहिजे, तुम्हाला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. तुम्ही मुक्ती मिळवली पाहिजे." पण सकाळ झाली की, तुम्ही म्हणता, "मला मुक्ती वगैरे काही नको. मला फक्त झोपायचं आहे. मला ईश्वर पहायचा नाही. मला फक्त मस्तपैकी खायचं आहे. ईश्वराला भेटण्यात मला काहीच स्वारस्य नाही. शेजारच्या मुलीला किंवा मुलाला भेटायचं आहे." मनात असे विचार येतात, आणि या विचारांना शरीरातील रसायनांचा आधार आहे.  पण आध्यात्मिक ओढीला असा कुठलाही रासायनिक आधार नाही. तरीसुद्धा, 'माझं अस्तित्व काय?' हा प्रश्न एक मोठं रूप धारण करतो. 'मी का इथं आहे?’

एका मुंगी इतकी तुमची बुद्धी असती तर तुम्हाला “माझं अस्तित्व काय?” हा प्रश्न पडला नसता. एखाद्या बैलासारखी जर तुमची बुद्धिमत्ता असती – खरं पाहता त्याचा मेंदू तर तुमच्या मेंदूपेक्षाही मोठा असेल – किमान डोकं तरी नक्कीच मोठं असतं - तर तुम्हाला हे प्रश्न भेडसावणार नाहीत.  मुळात सृष्टी म्हणून जे तुम्ही पाहता, त्यामुळेच समस्या निर्माण होतात. बारकाईनं जर याचं निरीक्षण केलंत तर हा सगळा विरोधाभास आहे हे लक्षात येईल.

केवळ एकाच गोष्टीत जर पूर्णपणे तल्लीन व्हाल तर ती परिपूर्ण आहे असंच वाटेल. तुमची संप्रेरकं (हार्मोन्स) - जेंव्हा अगदी सक्रीय होतात, ते तुमच्या शरीर-मेंदूवर अधिकार गाजवू लागतात - तेंव्हा तुम्हाला वाटतं हाच माझ्या जगण्याचा उद्देश्य आहे.  मग तुमचं लग्न होतं. आणि मग तुम्हाला वाटू लागतं की, 'कसं काय मी या बंधनात अडकलो?' तर प्रश्न; जीवन योग्य प्रकारे घडतं की नाही हा नसून तुमचं डोकं पुरेसं कार्यशील आहे की नाही हा आहे. जर तुमचं डोकं यथायोग्य कार्यशील असेल तर आयुष्य कशाप्रकारे व्यक्त होईल यानं काहीच फरक पडणार नाही.  माझं अस्तित्व काय?  मी कोण आहे? हे प्रश्न साहजिकच मनात उठतील. 

‘तुम्हाला स्वतःचा आविष्कार झाला पाहिजे, तुम्हाला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. तुम्ही मुक्ती मिळवली पाहिजे." पण सकाळ झाली की, तुम्ही म्हणता, "मला मुक्ती वगैरे काही नको. मला फक्त झोपायचं आहे.

सृष्टीच्या स्वरूपाकडे जर तुम्ही बारकाईनं पाहिलंत, तिचं निरीक्षण केलंत, तर तुम्हाला विरोधाभासात जगण्याची कला आत्मसात करावी लागेल, त्यामुळे तुम्हाला आपण एक तडजोडीचं जीवन जगत आहोत असं वाटेल.  केवळ जो पूर्णपणे आंधळा आहे, जो कधी आपल्या भावना, विचार आणि कृतींकडे लक्ष देत नाही, त्यालाच वाटेल की सगळं बरोबर आहे. पण जर तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, आयुष्यात तुम्ही भली मोठी तडजोड करत आहात.

आयुष्यात तुम्ही कुठेही असा, काहीही करा, जर तुमच्याजवळ एक विचारशील डोकं असेल, तर ते नक्कीच हा प्रश्न विचारेल, ‘का मी इथं आहे?’  माझं अस्तित्व काय?  लोक वेगवेगळ्या प्रकारे मेंदूला बधीर करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते शक्य होत नाही.   जर तुमच्याजवळ एक विचारशील डोकं असेल तर लवकरच तुमच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आवासून तुमच्या समोर उभा राहणार.  पण जर बधीर झालेला तुमचा मेंदू असेल तर मृत्यू समयी हा प्रश्न तुमच्या डोक्यात येईल.

माझा आशीर्वाद आहे; "मी का अस्तित्वात आहे? मी हे का करतो आहे?" हा प्रश्न लवकरात लवकर तुम्हाला पडला पाहिजे, जेंव्हा तुमच्यात पुरेशी उर्जा आहे, शक्ती आहे; संसारिक बंधनांत तुम्ही इतके जखडले नसाल, जे तुम्हाला ह्या प्रश्नांच्या छळापासून मुक्त करण्याचा मार्ग निवडायला अडसर होतील.  हा प्रश्न इतका धीरगंभीर होतो की तुम्ही झोपू शकत नाही.  शांतपणे तुम्ही एका जागी बसूसुद्धा शकत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही नीट करू शकत नाही.

कारण आपल्या अस्तित्वाचं हे मुलभूत स्वरूपच असं आहे.  केवळ असा कोणीतरी, किंवा एखादा प्राणी जो मानवी बुद्धीस्तराच्या खाली वावरतो तोच अशा अस्तित्वात स्थिर होऊ शकतो. पण एक सखोल विचारशील मनाची व्यक्ती अशा अस्तित्वात टिकू शकणार नाही. कोणत्याही दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं तरी तुम्ही यात स्थिरावू शकणार नाही. तुम्हाला शहरात ठेवलं तरी तिथे चैन पडणार नाही; जंगलात नेऊन ठेवलं तरी तिथेसुद्धा तुम्ही समाधानी होणार नाही; एखाद्या लहानशा झोपडीत नेऊन ठेवलं तरी तिथे तुम्ही स्थिरावणार नाही; अगदी राजवाड्यातसुद्धा नेऊन ठेवलं तरी तिथेसुद्धा तुम्हाला स्थैर्य लाभणार नाही; कारण अस्तित्वाचं मुलभूत स्वरूपच असं आहे.

अस्तित्वाची निर्मितीच अशी आहे की, जेणेकरून माणूस एका जागी स्थिर, अप्रवाही राहू शकणार नाही. तो कुठेही असू द्या, काहीही करू द्या, काही काळाने त्याला ते सर्व निरर्थक वाटू लागतं आणि मग दुसऱ्या ठिकाणी काहीतरी नवीन शोधू लागतो.  तुम्हाला असं निरंतर, नाविन्यपूर्णाच्या शोधात ठेवणारी ती दैवी शक्ती खरच किती करुणामय आहे.

आम्ही कैलास यात्रेला गेलो होतो. तेंव्हा यात्रा व्यवस्थापनात मला थोडा हलगर्जीपणा जाणवला. मग मी वॉलेंटीयर्स आणि शिक्षकांना बोलावून विचारलं, "काय अडचण आहे? दर वर्षी आपण इथं येत आहोत म्हणून कैलास आता कंटाळवाणा झाला आहे का तुम्हाला? इथे येण्यासाठी लोक आपला उजवा हात तोडून द्यायला तयार आहेत.  काय अडचण आहे? त्यावर ते म्हणाले, "सदगुरू, तसं काही नाही. आम्ही जरा थकलोत." मी म्हटलं, "थकला असाल तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही काही संपला नाहीत. थकलात ही काही अडचण नाही. तुम्ही काही मृत नाही झालात. हो ना?  तुम्ही तर तरुण आहात." त्यावर एका सहयात्रीकानं म्हटलं, "कामात हे सगळे सतत अगदी व्यस्त आहेत.  "त्यावर मी म्हटलं, "जगण्याची ती सर्वोत्तम पद्धत आहे. तुम्हाला काय वाटतं; सुस्त, निष्क्रिय असणं उत्तम आहे का? सतत कार्यरत असणे हा जगण्याचा उत्तम मार्ग आहे.  याचा अर्थ, तुमच्या आयुष्यात सतत काहीतरी घडत आहे.  डबक्याप्रमाणं साचलेलं तुमचं आयुष्य नाही. क्षणोक्षणी काहीतरी घडणारं आयुष्य आहे तुमचं.

सतत काहीतरी घडतं आहे, म्हणजे तुम्ही किती नशीबवान आहात. आठवड्याचे सात दिवस, वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस, काहीतरी घडतंय. "ईशा संस्थे” बाबत ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.  सतत काही न काही चाललेलं असतं.  हे फार महत्वाचं आहे.  निश्चलतेत स्थिर करण्याऱ्या कृतीशिलतेचा आनंद तुम्हाला लाभो!

सप्रेम कृपाशीर्वाद

 

From Darshan, 23 August 2012 at the Isha Yoga Center