योगी आणि गूढवादी असणार्‍या सदगुरूंना एक साधक विचारतो, की कुंडलिनी म्हणजे काय – एक असा प्रश्न ज्याचे समर्पक उत्तर समाधानकारकपणे किंवा सहज समजेल अशा पद्धतीने  अगदी क्वचितच दिले जाते. सद्गुरू आपल्याला  कुंडलिनी म्हणजे काय हे आपल्या  दैनंदिन जीवनातील आपल्याला मनापासून पटतील अशी उदाहरणे देऊन समजावून सांगतात.

प्रश्न: कुंडलीनी म्हणजे काय हे आपण कृपया समजावून सांगू शकाल का?

सद्गुरू: “कुंडलिनी” हा शब्द सामान्यतः ऊर्जेच्या त्या परिमाणांचा संदर्भ देतो ज्यांच्या संभाव्य क्षमता अद्याप आपण जाणून घेतलेल्या नाहीत. तुमच्यात ऊर्जेची प्रचंड मोठी मात्रा आहे जी अद्याप स्वतःची क्षमता शोधू शकलेली नाही. मला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अनुभवांपासून दूर घेऊन जाऊ द्या कारण त्याविषयी बर्‍याच कथा आहेत. तुमच्या घरात भिंतीवर एक विजेचा प्लग-पॉइंट आहे. प्रत्यक्षात हा प्लग-पॉइंट कोणत्याही प्रकारची वीज निर्मिती करत नाही. इतरत्र कुठेतरी एक प्रचंड मोठे विद्युत शक्ती केंद्र आहे जिथे वीज निर्माण होते, पण ते तुम्हाला ही वीज थेट देऊ शकत नाही. प्लग-पॉइंटच तुम्हाला वीज पुरवतो. जरी बहुतांश लोकांनी विद्युत केंद्राविषयी विचार केला नसेल आणि ते नक्की कसे आहे, कसं कार्य करतं याबद्दल त्यांना कोणतीही कल्पना नसेल, तरी त्यांना येवढे माहिती आहे की त्यांनी एखादे उपकरण प्लग-पॉइंटला जोडले, की ते उपकरण कार्य करू लागतं.

परम स्त्रोतात सामावून जा

कुंडलिनी हा एक  प्लग-पॉइंट आहे. तो 3 पिन असलेला प्लग पॉइंट नाही, तर तो 5 पिना असलेला प्लग पॉइंट आहे. तुम्ही योगाच्या संदर्भात कदाचित सात चक्रांबद्दल ऐकले असेल. मूलाधार चक्र हे एका प्लग-पॉइंट सारखे आहे. आणि म्हणूनच त्याला मूलाधार या नावाने ओळखले जाते. मूलाधार म्हणजे “मूलभूत” किंवा “प्राथमिक.” उर्वरित सहा चक्रांपैकी पाच चक्रं म्हणजे प्लग आहेत. सातवे चक्र कोणते आहे? ते एखाद्या विजेच्या दिव्याप्रमाणे आहे. तुम्ही जर तो प्लग-इन केलात, तर तुमच्या सर्व गोष्टी उजळून निघतात. तुम्ही जर योग्यरित्या प्लग इन केलेले असेल, तर दिवसाचे सर्व चोवीस तास उजेड पाडणे तुम्हाला अवघड होणार नाही. बॅटरी संपून जाईल या काळजीने तुम्हाला वीज बंद करून ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अगदी निर्धास्तपणे ती चालू ठेऊ शकता कारण तुम्ही स्वतःला ऊर्जा स्त्रोतात सामावून घेतलेले आहे.

अगदी आत्तादेखील, तुमच्याकडे ऊर्जा आहे. मी काय बोलतोय ते तुम्ही ऐकू शकता. याचा अर्थ जीवन ऊर्जा तुमच्यात कार्यरत आहेत, पण अतिशय कमी प्रमाणात. त्याचा एक अतिशय लहानसा भाग कार्यरत आहे. ती जर तुमच्यासाठी संपूर्णतः उपलब्ध झाली, ती जर योग्यरित्या प्लग-इन केली गेली, तर तिचा वापर करून घेऊन तुम्ही काय करू शकता याला कोणत्याही मर्यादा नाहीत. अगदी घरात असलेल्या प्लग-पॉइंटबाबतही, तुम्ही एकदा प्लग-इन केलेत, तर तुम्ही प्रकाश मिळवू शकता, ए.सी.  सुरू करू शकता, हिटर चालू ठेऊ शकता, ती.व्ही. पाहू शकता –तुम्हाला हवे ते करू शकता. फक्त एका पॉवर-पॉइंटच्या मदतीने. तुम्ही अनेक गोष्टी करू शकता.

कुंडलिनी : अस्तित्वाचा आधार

दुर्दैवाने, बहुतेक लोकं सृष्टीच्या स्त्रोतासोबत जोडली गेलेली नाहीत. ते स्वतःची शक्ती स्वतःच निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मग ते दिवसातून पाचवेळा खातात, पण तरीसुद्धा बहुतेक वेळ ते थकलेलेच असतात. जीवन कार्यरत ठेवणे हा एक संघर्ष बनतो. ऊर्जा म्हणजे केवळ भौतिक ऊर्जा किंवा कार्य नाही, तर आयुष्याच्या संदर्भातील ऊर्जा. आपलं अस्तिवच म्हणजे ऊर्जा, नाही का? ऊर्जा हाच अस्तित्वाचा आधार आहे. तुम्हाला जर हा आधार माहिती असेल, तर ते जीवनाचा आधारभूत पाया जाणून घेण्यासारखे आहे. तुम्हाला जर ऊर्जेचे मार्ग समजले, तर तुम्हाला या सृष्टीच्या संपूर्ण यंत्रणेची माहिती होईल. त्यामुळे तुम्ही जर त्यासोबत जोडले गेले असाल, तर वीज म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, ती काय करू शकते आणि तुम्ही तिचा वापर कसा करून घेऊ शकता हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही शक्तीच्या एका अमर्याद स्त्रोतासोबत जोडले गेले आहात – तीच कुंडलिनी आहे.

जोडले जाण्यासाठी काय करावे लागते?

आता जर एक उपकरण प्लग करताना, तुमचा हात जर थरथरत असेल, तर तुम्ही संपूर्ण भिंत कुरतडून टाकाल, पण तुम्हाला प्लग लावता येणार नाही. त्याच प्रमाणे, पाच पिनांच्या प्लग-पॉइंटमध्ये प्लग लावणे अनेक लोकांना अवघड जाते कारण त्यांचे शरीर, त्यांचे मन, त्यांच्या भावना आणि त्यांच्या उर्जेमध्ये स्थैर्य नसते. हा सर्व योगाभ्यास हे आवश्यक असणारे स्थैर्य प्राप्त करून घेण्यासाठीच आहे, ज्यामुळे तुम्ही त्याच्याशी जोडले जाऊ शकता. एकदा का तुम्ही जोडले गेलात – की अमर्याद ऊर्जा तुमच्याजवळ उपलब्ध आहे! तुम्हाला विद्युत केंद्राला भेट देऊन त्याची माहिती घेण्याची गरज भासणार नाही. तुम्ही फक्त त्यासोबत स्वतःला जोडून घ्या आणि सारे काही चांगले होईल.

योग हे केवळ एक स्वतःला योग्यरीत्या प्लग पॉइंटमध्ये जोडून घेण्याचे एक विज्ञान आहे, ज्यामुळे उर्जेचा अखंड स्त्रोत तुम्हाला मिळत राहील. एकदा तुम्ही या अखंडित शक्तीच्या स्त्रोताशी जोडले गेलात, की साहजिकच तुमचे जीवन जसे पुढे जायला हवे तसे जायला सुरुवात होईल. जीवनाला ज्या ध्येयाची ओढ आहे त्या ध्येयाच्या मागे तुम्ही स्वाभाविकतः पुढे जाल. तुम्ही तुमच्या आकर्षक कल्पना, स्वप्नं, विचार, भावना किंवा जगाच्या बंधनात हरवून जाणार नाही.

Image courtesy: Plug Me In by jeffk