सद्गुरू विविध प्रकारच्या स्वप्नांचे स्पष्टीकरण देतात, अपूर्ण इच्छा दर्शविण्यापासून ते तंत्रांच्या अशा पैलूंकडे, ज्यात स्वप्ने प्रत्यक्षात उतरतात.

प्रश्नः स्वप्नांचे महत्त्व काय आहे? ते एक प्रकारची चेतावणी किंवा एखाद्या गोष्टीचे संकेत आहेत का?

सद्गुरु: लोक आपल्या दैनंदिन जीवनात स्वप्ने पाहतात याचे कारण त्यांच्या बेलगाम इच्छा. बहुतेक माणसांना त्यांच्या इच्छांची जाणीव नसते. जर त्यांनी एखाद्या गोष्टीकडे पाहिले तर त्यांच्या नकळत त्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होते. जर त्यांनी दुसरे काही पाहिले तर त्याची इच्छा निर्माण होते. हे बहुतेक माणसांच्या बाबतीत नेहमीच घडत असते. ते जे काही पाहतात, त्याबद्द्ल थोडीशी इच्छा निर्माण होते, पण जाणतेपणाने नव्हे.

या इच्छा मोठ्या प्रमाणात तयार होत राहतात. जर ह्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला शंभर आयुष्य लागतील - तुम्ही इतक्या गोष्टींची इच्छा केलेली असते! तुमच्या आयुष्यात, दिवसाच्या कालावधीत ह्या पूर्ण होणे अशक्य आहे. तर, स्वप्नांमध्ये त्यांना अभिव्यक्ती मिळते आणि यापैकी बहुतेक स्वप्ने तुम्हाला आठवणार नाहीत. मी असं म्हणेन, अपूर्ण इच्छा स्वप्नांमध्ये पूर्ण होणं याबाबत मनुष्याची पंच्याण्णव टक्के स्वप्न असतात.

स्वप्ने पाहण्याची दुसरी अवस्था

स्वप्नातील दुसर्‍या अवस्थेचा तुमच्या अवचेतनेशी संबंध असू शकतो, जिथे कधीकधी तुम्हाला ती अचूक परिस्थिती दिसत नसते, परंतु एक विशिष्ट समांतर परिस्थिती जी तुमच्या जीवनातील कोणत्यातरी बाबींच्या संदर्भात असते. अवचेतन हे तर्कानुसार किंवा वेळ आणि जागेच्या क्षेत्राप्रमाणे काम करत नसल्यामुळे तुम्ही उद्या काय घडू शकते हे कदाचित आधीच पाहू शकता, परंतु कदाचित स्पष्टपणे नाही. सहसा, ही समांतर दृष्टी असू शकते. उदाहरणार्थ असे म्हणूया की तुम्ही डोंगरावर चढत आहात आणि तुमचे पाय दुखत आहेत परंतु तरीही तुम्ही कुठेही जात नाही आहात. उद्या सकाळी कदाचित तुम्ही ऑफिसला जाऊन आणि एका कठीण कामाला सामोरे जाऊ शकता. दोन ते तीन टक्के स्वप्ने अशी असू शकतात.

तंत्र - स्वप्ने प्रत्यक्षात आणणे

इतर काही प्रकारची स्वप्ने आहेत जी उपयोगात आणून तुम्ही निर्मिती करू शकता. तंत्राचा संपूर्ण पैलू हा तुमची कल्पनाशक्ती वापरून तुम्हाला हवी ती निर्मिती करणे याबाबत आहे. जर तुम्ही तुमची करंगळी घेतलीत आणि तुमच्या मनाने एकही बिंदू न सोडता बोटाची बाह्यरेषा आखलीत, ह्यासाठी बराच सराव लागेल, जर तुम्ही १००% हे करू शकलात - प्रत्येक बिंदू आणि बिंदू, तुम्ही तुमची कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकता. तुम्ही हे वास्तविकतेत आणू शकता कारण तुम्ही तुमचे मन एका विशिष्ट प्रकारे वापरत आहात. संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया फक्त इतकीच आहे - तुमची कल्पनाशक्ती वापरुन आणि बारकाईने प्रत्येक गोष्ट तयार करुन, आणि काही काळानंतर तुम्ही त्यात प्राण फुंकू शकता.

तुम्हाला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाला चाळणी लावण्याचा प्रयत्न तुम्ही करत राहिलात तर तुमचा वेळ आणि आयुष्य तुम्ही वाया घालवाल. म्हणून स्वप्नांकडे लक्ष देऊ नका, जीवनाकडे लक्ष द्या.

आजही हे सत्य आहे, भारतातील गूढविद्या जाणणारे भात किंवा कणकेपासून बाहुली बनवतात. ते सर्व प्रकारच्या गोष्टींसह त्याला घडवतील आणि नंतर तिला प्रत्यक्षात चालायला लावतील - रोबोटसारखे. ती दोन, तीन पावले चालेल आणि मोडून खाली पडेल. हे सगळं मनाची शक्ती वापरुन करता येतं. तुम्ही फक्त कल्पनाशक्ती वापरुन स्वत: ला प्रशिक्षित केलं तर तुमची स्वप्न प्रक्रिया त्याप्रमाणे होऊ शकते. रामकृष्ण परमहंस यांनी कालीला खायला घातल्याचा आणि अशा काही कथा तुम्ही ऐकल्या असतील? हे सगळे अर्थशून्य दिसते परंतु त्यांच्यासाठी ते वास्तव होते. असे असंख्य लोक होते ज्यांच्यासाठी ते एक वास्तव होते. काली खरोखर येऊ दे की न येउ दे, ते स्वत: ह्या गोष्टी स्वतःसाठी घडवून आणतात. त्यांचे मन यावर इतके एकवटले आहे कि, ते प्रत्यक्षात ते रूप तयार करतात. तुम्ही फक्त आपल्या मनाचा उपयोग करून वास्तविकतेत आणू शकता.

स्वप्नाच्या अवस्था यासारख्या सुद्धा असू शकतात, परंतु स्वप्नांच्या महत्वाबद्दल जास्त विचार करू नका किंवा तुम्हाला पडलेलं प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात उतरेल अशी आशा करू नका. ते तुम्हाला वेडं करून सोडेल. बहुतेक स्वप्न म्हणजे केवळ अपूर्ण इच्छा पूर्ण होणे एवढीच असतात. जर स्वप्ने लक्षणीय असतील तर ती प्रकट होतील. परंतु तुम्हाला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाला चाळणी लावण्याचा प्रयत्न तुम्ही करत राहिलात तर तुमचा वेळ आणि आयुष्य तुम्ही वाया घालवाल. म्हणून स्वप्नांकडे लक्ष देऊ नका, जीवनाकडे लक्ष द्या.