प्रश्नकर्ता: हिंदू सनातन धर्म म्हणजे काय? आज तो निष्प्रभ झाला आहे का?

सद्गुरू: हिंदू सनातन धर्म’ असे काही नाही आहे. एक सनातन धर्म आहे, इतकच. सनातन म्हणजे शाश्वत. जे शाश्वत आहे, ते नेहमीच सत्य असणार आहे.

सनातन धर्म हे आयुष्याचे कधीही न बदलणारे परिमाण आहे. तो आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. किडा असो, मुंगी असो, पक्षी असो, प्राणी असो किंवा झाड असो... ते सनातन धर्माप्रमाणे, जो अस्तित्वाचा मुलभूत नियम आहे, जो अस्तित्व राखतो त्याप्रमाणे वागतात. इतरांवर ताबा ठेवण्याकरता किंवा समाजात विवेक प्रस्थापित करण्याकरता मानवाने एकमेकांवर लादलेला हा शिक्षा करणारा कायदा नाही. व्यावहारिक कायदे प्रत्येक पिढीत बदलले गेले पाहिजेत. तो वेगळा मुद्दा झाला. सनातन धर्म म्हणजे व्यावहारिक कायदा नव्हे. हा अस्तित्वाचा नियम आहे.

तुम्ही कोठेही असा, भारतीय असा, हिंदू असा हिंदू नसा, तुम्ही जे कोणी असाल, सनातन धर्म सगळ्यांना लागू पडतो.

प्रथम ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. धर्म म्हणजे नियम. धर्म म्हणजे धार्मिकता नव्हे. या हल्लीच्या संस्कृतीमध्ये आपल्याला धार्मिकता म्हणजे काय ते माहीत नाही. आपण फक्त आपले आयुष्य चांगले होण्याकरता जे मुलभूत नियम आहेत ते समजून घेत आहोत. आपल्याला हे माहीत आहे की जोवर आपण हे नियम पाळत नाही तोवर आपले आयुष्य चांगले होणार नाही. हे काही लादलेले नियम नाहीत, पण तो आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. तुम्हाला जर हे नियम माहीत असतील, आणि तुम्ही त्याला सुसंगत वागत असाल तर तुम्ही तुमचे आयुष्य सहजपणे जगाल. जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील तर तुम्ही विनाकारण त्रास सहन करत बसाल.

सनातन धर्म हिंदूंचा आहे का, भारतीय माणसाचा आहे का दुसऱ्या कोणाचा आहे? हा चर्चेचा मुद्दा नाही. तुम्ही कोठेही असा, भारतीय असा, हिंदू असा किंवा नसा, तुम्ही जे कोणी असाल, सनातन धर्म सगळ्यांना लागू पडतो, कारण हे नियम जीवनाच्या मुलभूत प्रक्रिया नियंत्रित करतात. इतर कोणत्याही संस्कृतीने याकडे इतक्या विद्वत्तापूर्ण पद्धतीने पाहिलेले नाही. याबद्दलच्या अभिमानामुळे, आपण कदाचित ‘हा हिंदू सनातन धर्म आहे’ असे म्हणतो. परंतु ‘हिंदू’ हा शब्द जोडून आपण सनातन धर्माच्या शक्यतांवर मर्यादा घालत आहोत. हिंदू ही भौगोलिक ओळख आहे. हिमालय आणि इंदू सागराच्या मध्ये असलेली जमीन म्हणजे हिंदू. सनातन धर्म प्रत्येक जीवाला लागू पडतो. हा धर्म ज्याचा अजून जन्म झाला नाही अश्या जीवांनी, जन्म झालेल्या जीवांनी, विकसित जीवांनी, मृत जीवांनी, आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि आयुष्याच्या सगळ्या मितींबाबत कसे वागायचे याबद्दल भाष्य करतो. आयुष्याकडे बघण्याचा हा एक प्रगल्भ दृष्टीकोन आहे.

स्मृती आणि श्रुती

तुम्ही जर इथे १०० वर्षांपूर्वी आला असता, तर तुम्ही वेगळ्या प्रकारे कपडे घातले असते आणि तुम्ही काहीतरी वेगळेच करत असता. तुम्ही जर इथे १००० वर्षांपूर्वी आला असतात तर तुम्ही अजून काहीतरी वेगळेच करत असता ....कदाचित तुम्ही शेतकरी किंवा कोळी असता.

आपण जे काही करतो, आपण जसे कपडे घालतो, आपण जसे बोलतो, आपण जसे वागतो हे त्या त्या काळावर अवलंबून असते, जो सातत्याने बदलत असतो. पुढची पिढी कशी वागेल, कसे कपडे घालेल, काय करेल हे आपण आत्ता जे करतो आहे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. हे आयुष्याचे एक परिमाण झाले, ज्याला आपण स्मृती म्हणतो. स्मृतीचा शब्दशः अर्थ आहे ‘आठवणी मधून’. तुम्ही जे आठवणींमधून शिकता ती असते स्मृती.

एकतर आपण आपल्या आई-वडिलांनी किंवा आपल्या संस्कृतीतल्या लोकांनी जे केले तेच करतो, नाही तर त्यांनी केलेय गोष्टींना प्रतिक्रिया म्हणून त्याच्या उलट गोष्टी करतो. ही सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे. फक्त पिढ्यान पिढ्याच नव्हे, तर अगदी आपल्या आयुष्यात देखील, दर काही वर्षांनी आपल्या स्मृती बदलत जातात. आपल्या आठवणींमधून आपण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलत असतो.

प्रत्येक पिढीने स्मृती नव्याने घडवायला हवी किंवा बदलायला हवी.
 

प्रत्येक पिढीने स्मृती नव्याने घडवायला हवी किंवा बदलायला हवी. आधीच्या पिढीपेक्षा काहीतरी चांगले करून दाखवणे म्हणजे  नेहेमी उत्क्रांती नव्हे. बदलत्या परिस्थितीशी सुसंगत असणे म्हणजे उत्क्रांती होय. त्या त्या परिस्थितीप्रमाणे बदलले पाहिजे, उत्क्रांत झाले पाहिजे. आपल्या कामाच्या पद्धती बदलल्या असल्यामुळे १०० वर्षांपूर्वी लोकं जसे खात होते, तसे आज आम्हाला खायला जमणार नाही यावर चर्चा होऊ शकते. जेव्हा तुम्ही शेती करत होता, तेव्हा तुम्ही काय आणि किती जेवत होता ते आजच्यापेक्षा वेगळे होते. तुमची काम करायची पद्धत सतत बदलत राहायला हवी. अगदी एखाद्या देशाच्या घटनेमध्येसुद्धा, काही पवित्र मानले गेलेले मुलभूत हक्क आहेत ज्यांना तुम्ही हात लावू शकत नाही, ते वगळता, बाकीचे सगळे घटक बदलू शकता, सुधारू शकता किंवा काढून टाकू शकता.

तुमची स्मृती आणि माझी स्मृती वेगवेगळी असेल. पण एक ‘श्रुती’ म्हणून देखील एक गोष्ट आहे. त्याची वेगवेगळ्या प्रकारे व्याख्या करता येईल. त्याचा एक अर्थ असाही लावता येतो की ती आयुष्याची एक लय आहे. तुम्ही ठरवलेली लय नव्हे, ती एक निर्मिती आहे.

तुम्हाला जर श्रुती म्हणजेच आयुष्याची लय समजली, तर तुम्हाला ताल समजेल. याला ‘भारता’ म्हणतात. ‘भारता’ म्हणजे काय तर.... ‘भा’ म्हणजे भाव किंवा जीवनाचा अनुभव. ‘रा’ म्हणजे राग... अर्थात आयुष्याची श्रुती किंवा जीवनाची लय आणि ‘ता’ म्हणजे ताल. तुमच्या बाबतीत जे घडतंय, जो अनुभव तुम्हाला येत आहे ते म्हणजे भाव. पण राग अथवा श्रुती आधीच ठरलेल्या आहेत. आता तुम्हाला त्याच्या अनुसार ताल शोधायला हवा आहे, जेणेकरून तुमचे आयुष्य चांगले होईल - एका सुश्राव्य संगीता सारखे.

जर तुम्हाला ताल सापडला नाही तर जी श्रुती तुमचे आयुष्य फुलवू शकते तीच तुम्हाला चिरडून टाकेल. श्रुती बदलत नाही कारण ती तुम्ही बनवली नाही. ती निर्मात्याने बनवली आहे. सनातन धर्म म्हणजे तुमचे आयुष्य कसे नियंत्रित होत आहे हे समजून घेणे, जेणेकरून तुम्हाला सुंदर आणि उत्तम आयुष्य जगता येईल. 

नियमांशी सुसंगत वागणे

या संस्कृतीमध्ये नैतिकता, आज्ञा, कसे वागावे, कसे वागू नये, “तू जर असे केलेस तर तू स्वर्गात जाशील, तू जर तसे केलेस तर तू नरकात जाशील” याबद्दल कोणीच बोलत नाही आहे. असे काही नसते कारण आमच्या मते, तुम्ही जर नियमांनुसार वागलात तर तुम्हाला अश्या शिक्षेची किंवा अश्या बक्षिसाची गरज पडणार नाही. हे म्हणजे, तुम्ही जर वाहतुकीचे नियम समजावून घेऊन त्याप्रमाणे वाहन चालवत असाल तर पोलिसाची गरज पडणार नाही, यासारखे झाले.

असं म्हटलं जाते की, आत्ता या क्षणी पृथ्वीवर १ हजार करोड जीव आहेत. परंतु माझ्या मते त्याहून कितीतरी जास्त आहेत, जे तुम्ही अजून पाहिलेही नाहीत. अगदी सूक्ष्म जीवापासून ते मानवापर्यंत आणि या दोघांच्या मधील सर्व जीव, जे या एकाच मातीतून जन्मला आले आहेत. त्याच मातीतून एक झाड अथवा वेल वाढते, ज्या मातीत तयार झालेले अन्न तुम्ही खाता आणि तुम्हाला या प्रकारचे शरीर मिळाले आहे. त्याच मातीत तयार झालेले अन्न मी खाल्ले आहे आणि मला हे शरीर मिळाले आहे.

सनातन धर्म तुमचाही नाही अथवा माझाही नाही. तो निर्मात्याने बनवलेला आहे.

तुम्ही काय वाट्टेल ते केले तरी तुम्ही झाड बनू शकत नाही, कुत्रा बनू शकत नाही, मांजर बनू शकत नाही, गाय बनू शकत नाही, हत्ती बनू शकत नाही किंवा वाघ बनू शकत नाही. स्त्रोत एकच आहे पण त्याच्या अभिव्यक्तीची विविध रूपे पहा. त्यामुळे अर्थातच, हे सगळे नियंत्रित करणारा एक नियम आहे. तो एखाद्या रेल्वे रुळासारखा स्थिर आहे आणि तुम्ही त्यावर वाटचाल करत आहात. प्रश्न इतकाच आहे की तुम्ही किती जोरात आणि किती लांबवर जाणार आहात? तुम्ही किती हुशारीने त्याचा अर्थ लावता? आणि तुमचे जगणे त्याच्याशी किती सुसंगत आहे?

तत्वत: योगाचे पूर्ण तंत्र अस्तित्वाच्या इतर गोष्टींबरोबर सुसंगत असण्यावर भर देते, ज्यायोगे तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेता आणि तुमचे आयुष्य आनंदी आणि उत्साहपूर्ण होते. आयुष्याबाबत तुमची एकच गोष्ट चुकू शकते आणि ती म्हणजे - तुम्हाला आयुष्यात तुमची स्वतःची पूर्ण अभिव्यक्ती सापडते की नाही? झाडाबाबत काय चूक होऊ शकते? झाड पूर्ण बहरेल का अर्धवाट वाढून मरून जाईल एवढाच प्रश्न उरतो. माणसालाही तेच लागू पडते. तुम्ही जर नियमानुसार वागलात तर तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत वाढाल. जर तुम्ही तसे वागला नाहीत तुमची प्रगती कोठेतरी खुंटेल. जरी लोकांना जाणवत नसले तरी आपली मुलभूत चिंता हीच असते. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि ओढ परिपूर्ण आयुष्य जगण्याबद्दल आहे. जर तुम्हाला परिपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर आयुष्याचा पाया ज्या नियमांवर अवलंबून आहे तो समजाऊन घेणे फार आवश्यक आहे.

सनातन धर्म तुमचा अथवा माझा नाही, तो निर्मात्याने बनवलेला आहे. त्याच्याशी सुसंगत वागणे हे तुमचे आमचे काम आहे. इथे भारतात आपण तो समजून घेतला, त्याचे संहितेत रुपांतर केले आणि एका विशिष्ट प्रकारे तो मांडला. याचा अर्थ असा नाही की इतर जगाला तो माहीत नाही. कितीतरी व्यक्तींना तो माहीत आहे. एखाद वेळेस त्यांनी तो श्रुती आणि स्मृती अश्या पद्धतीने लिहून ठेवला नसेल. पण जगातील कित्येक लोकं तो पाळत आहेत, कारण सगळीकडे लोकं भरभरून आणि आनंदाने जगली आहेत. तर, सनातन धर्म आज निष्प्रभ झाला आहे का? त्याची तीव्रता कमी करणे हे आपल्या हातात नाहीच मुळी.

त्याबद्दलची वैयक्तिक समज कमी झालेली असू शकते. तो समजण्याचे प्रत्येकाचे परिमाण वेगवेगळे असू शकते. पण सनातन धर्माची तीव्रता कमी होवू शकत नाही, कारण तो अस्तित्वाचा पाया आहे. तुम्ही त्याची तीव्रता कमी करू शकत नाही, कारण तुम्ही तो निर्माण केलेला नाही.